‘आपल्यापेक्षा कुणीही बरं’ हे क्षिप्राचं मनातल्या मनात उच्चारण्याचं वाक्य होतं. दिवसातून अनेकदा हे वाक्य तिच्या मनात उमटायचं. दर दिवशी प्रत्येक प्रसंगात ती स्वतःला तपासून पहायची, स्वतःला नापास करायची आणि मग हे वाक्य. आपल्या आजूबाजूला आपल्यासारख्या व्यक्ती तिला दिसत नव्हत्या. प्रत्येक जणाने जगण्याची एक रीत शोधून काढलेली दिसत होती. त्याप्रमाणे तो वागायचा, ज्यांनी हे शोधून काढलेलं नव्हतं त्यांना ‘आसपासची चार माणसं जशी वागतील तसं आपण वागावं’ एवढं तरी माहीत होतं, जमत होतं. ज्यांनी रीत शोधून काढली त्यांच्यामुळे आणि त्यांचं पाहून वागणा-या लोकांमुळे समाज होता, वेडावाकडा का होईना अस्तित्वात होता. पण क्षिप्रासारखे लोक - ज्यांना सतत प्रश्नच पडतात, एकाचं उत्तर शोधेपर्यंत दुसरा प्रश्न पडतो, उत्तरं सापडतच नाहीत. ऐन मोक्याच्या वेळी निर्णयक्षमता नसते, त्यांच्यावर कसं विसंबून रहावं समाजानं?
त्या दिवशी रात्री अकरा वाजता पश्याच्या घरून फोन आला, ‘‘पश्या सीरीयस. आयसीयूत अॅडमिट. पोचा लवकर’’ क्षिप्रासकट सगळे धावत पळत पोचले. बरेच जण आधीच जमले होते. पश्या म्हणजे क्षिप्राच्या भावाचा मित्र. अगदी घरगुती, जवळचे संबंध. सगळे तिथं दाटीवाटीने उभे राहिले. रात्रीची वेळ असल्याने बहुतेक पुरुषांची विमानं आकाशात होती. पश्याला हार्ट अॅटॅक आला होता. तो कसा आला, काय झालं हे कुजबुजत्या आवाजात सांगणं चालू होतं. खुद्द पश्याही हार्ट अॅटॅकपूर्वी ‘विमाना’ तच होता. पश्याचे एक नातेवाईक सर्व परिस्थितीची सूत्रं हातात घेऊन लोकांना सूचना देत होते. त्यांचे विमान आकाशात जरा जास्त उंचावर गेले होते. त्यामुळे ते दोन - तीनदा हॉस्पिटलच्या पाय-यांवरून पडता पडता वाचले.
पश्या जेमतेम पंचेचाळिशीचा होता. देहयष्टी किरकोळ. अधूनमधून दारू पिणं सोडल्यास व्यसनं नव्हती. दुखणी नव्हती. अशा माणसाला हार्ट अॅटॅक का यावा? त्याला उलट्या वगैरे झाल्या तरी खुद्द तोही दवाखान्यात यायला तयार नव्हता, ‘‘काय, अॅसिडीडी झालीय. होऊन जाईल बरं’’ वगैरे म्हणत. रेवा, त्याची मेव्हणी, तिथं होती. तिने ‘ते काही नाही, आत्ताच्या आत्ता चला दवाखान्यात’ करत त्याला पाठवून दिलं. हॉस्पिटलमध्ये त्याला व्हीलचेअरवरून जावं लागलं आणि तिथल्या टेबलवर झोपवताच तो श्वासासाठी तडफडू लागला, हातपाय झाडू लागला. लगेच ऑक्सिजन वगैरे सगळी व्यवस्था झाली. बीपी अतिशय खाली आलं होतं. पल्स लागत नव्हते. अशा परिस्थितीत थोड्या वेळाने डॉ. नी त्याची परिस्थिती ‘क्रिटिकल’ असल्याचं जाहीर केलं.
नंतर पुढच्या एक तासातच पश्या सगळ्यांतून मुक्त झाला. हॉस्पिटलच्या बाहेरच्या व्हरांड्यात क्षिप्रा उभी होती. पश्याचा भाऊ वरून ‘‘गेला, गेला’’ असं खूण करत आला. आणि मटकन खाली बसला. क्षिप्रा बधिर होऊन त्याच्याकडे पाहत राहिली. लोक भराभर गोळा झाले. पश्याच्या बायको - पोरांकडे धावले. पुढची सारी रात्र, कुठून कुठून जमा होणारी माणसं, खरं खोटं डोळ्यातलं पाणी, हुंदके, उसासे, तीच तीच वाक्यं... किती बाई चांगला होता. सर्वांशी हसून खेळून, कध्धी कुणाशी वाकडं नाही, बायकोपोरांचंही किती कौतुक... किती कष्ट करायचा, पुन्हा कायम हसतमुख, हां कधी रडका चेहरा नाही, नशिबाला दोष देणं नाही... रात्रभर हे चालूच.
पश्या खरोखरच असा होता. क्षिप्राच्या डोक्यात प्रश्न सुरू झाले. सगळ्यांत नैसर्गिक गोष्ट इतकी अनैसर्गिक का? कधी न कधी मरण्याचं वास्तव घेऊनच आपण जन्माला येतो तर मरण इतकं अनैसर्गिक का होऊन जातं? आपण का दुःख करतो, का रडतो? समाजातला प्रत्येक माणूस ‘मरण’ ही अनैसर्गिक गोष्ट का मानतो? ‘अरे, काल तर मला भेटला होता’ अरे, काल भेटणारा आज मरू शकतो. थोड्या वेळापूर्वी बोलणारा एकदम गप्प होऊ शकतो. प्रत्येकाने आपल्या स्वतःसाठी किमान ऐंशी वर्षाचा लाईफस्पॅन धरलेला असतो. त्यात पहिली वर्षं शिक्षणाची, नंतर नोकरी आणि संसार, उतारवयात विरूपता येत येत कमकुवत होत जाणारं शरीर आणि मग मरण. म्हणून आपल्या भाषांमध्ये ‘भविष्यकाळ’ आहे आणि उद्या, परवा असे शब्दही आहेत.
त्यानंतरचे दोन - तीन दिवस मरणाचा विचार करण्यात गेले. गाडीतनं जाताना असं वाटायचं, आता एखादा ट्रक मागून ठोकेल. आपल्या शरीरावर ट्रकच्या चाकांचा दाब ती कल्पनेने अनुभवायची. कधी तिला आपण पाण्यात बुडतो आहोत, घुसमटून श्वास घेता येत नाहीये असं वाटायचं. मरण अनुभवण्याची प्रक्रिया सोसत नव्हती. ‘मरण असणं’ हे अनैसर्गिक वाटत नव्हतं. पुन्हा पुन्हा तिच्या मनात नेहमीचा विचार आपल्यापेक्षा कुणीही बरं. खळखळून रडतात आणि मरण आहे हे विसरून कामाला लागतात.
अशात पश्याचा ‘दहावा’ आला. सगळे घाटावर जमले. पश्याचा मुलगा पिंड हातात घेऊन घाटावर ठेवायला चालला. दुसरेही एक गृहस्थ वारले होते. त्यांचाही मुलगा पिंड घेऊन चालला होता.
पश्याच्या मुलाने पिंड ठेवताच कावळ्यांनी झडप घातली. खाऊन, पाणी - बिणी पिऊन कावळे समोरच्या झाडावर जाऊन बसले. दुस-या गृहस्थाचा पिंड ठेवताच कावळ्यांची बॅच नुसतीच जागच्या जागी काव काव करत बसली. किती किती वेळ गेला तरी मंडळी पिंडाजवळ यायला तयार नाहीत.
ही बातमी झपाझप पसरली. प्रत्येकजण दुस-याच्या कानाशी लागला. तिथल्या तिथं कुजबुजत चर्चा सुरू.
‘‘पाहिलंत ना? किती वेळची वाट पहातायत ते लोक, कावळा शिवायला तयार नाही.’’
‘‘हो ना. आणि याच्या पिंडाला काय पटकन् शिवला !’’
‘‘मला तर बाई टेन्शनच होतं. अकाली गेला. इच्छा असतीलच की कितीतरी. पण सगळ्यातून मुक्त झाला बिचारा.’’
‘‘विश्वास होता त्याचा सगळ्यांवर. आपण नसलो तरी लोक काळजी घेतील आपल्या बायको - पोरांची.’’
‘‘काय पण आश्चर्य आहे न?’’
‘‘अहो, हे तर काहीच नाही. काही काही वेळा दिवसभर बसलं तरी कावळे दाद देत नाहीत. आमच्या वडिलांचा पिंड तर ठेवू सुद्धा दिला नाही कावळ्यांनी. हातातनंच उचलून नेला.’’
क्षिप्रा वेड्यासारखी हे पाहत होती. तिला काही अर्थच लागत नव्हता या प्रकाराचा. हे तर्काला, बुद्धीला कुठेच पटत नव्हतं. पण कावळ्यांच्या वागण्याचा अर्थ काय घ्यायचा तेही समजत नव्हतं. आपल्यापेक्षा सगळं खरं मानणारे कुणीही खरे. तिला वाटलं. इतरांचं वागणं न पटूनही स्वतःबद्दल संशय वाटायचा.
मुलाच्या शाळेत ती जेव्हा जायची तेव्हा इतर बायका भेटायच्या.
‘‘आमच्या वरुणला...’’
‘‘मी न् माझ्या शांभवीला...’’
‘‘आमचा केतन ना...’’
‘‘पौरवीला सुद्धा...’’
असे त्यांच्यात संवाद सुरू असायचे या सर्व ‘शहाणी मुलं’ होत्या. म्हणजे त्या कर्तृत्ववान आया होत्या. त्या, मुलांना त्यांच्या महत्त्वाकांक्षेप्रमाणे अभ्यास करायला लावायच्या. पहिल्या नंबरसाठी मुलांपेक्षा आयांमध्ये स्पर्धा असायची. त्याशिवाय त्यांची मुलं स्वीमिंग, तबला, गाणं, चित्रकला, गणित ऑलिम्पियाड, ट्रेकिंग असं काही ना काही करायचीच. लीलया एका क्लासहून दुस-या
क्लासला जायची. या आयांची प्रचंड शिस्त त्या मुलांच्या वागण्यातनं झिरपत राहायची.
क्षिप्रा यातलं काहीच करत नव्हती. तिनं मुलाला स्वतःचा स्वतः अभ्यास करावा, वाचन करावं हे शिकवलं होतं. ती मन लावून स्वतःच्या अभ्यासात गढलेली असायची. अभ्यासासाठी कुणी कुणाच्या मागे का लागावं? मुलांच्या मागे का लागावं? गोष्ट सगळं समजून घेण्याचीच असते. प्रश्नोत्तरं कशाला पाठ करावी लागतात? हे तिला कळायचं नाही. पण प्रश्न एवढाच नव्हता. आपण मुलाला महत्त्वाकांक्षेमागे धावायला लावत नाही, हे चूक की बरोबर हे या बायकांना पाहिलं की, तिला ठरवता यायचं नाही. वर्गात तुमचा मुलगा सगळ्यांना हसवतो हे तिला खूप गंभीर चेहरा करून सांगितलं गेलं तर ‘‘हे इतकं सीरियस आहे का?’’ हा प्रश्न तर पडायचाच पण’ हे इतकं सीरियस नाही. तुम्ही उगाच मुलाच्या मनात अपराधभाव निर्माण करू नका.’ असंही ठाम होता यायचं नाही तिला. तिच्या संस्कारात जातिभेद कधीच आलेला नव्हता. तिच्या घरात अनेक जातिधर्माची माणसं कायम यायची. साहजिकच मुलांच्याही संस्कारात जातिभेद झिरपला नाही. किंबहुना जात आणि धर्म या काय भानगडी असतात आणि त्या आपल्या जगण्याला समाजात एक वेगळं पोत आणतात हे ही मुलांना समाजात मिसळायला लागल्यावर कळलं. आपल्याकडे विशेष हेटाळणीच्या नजरेने पाहिलं जातं, आपला उल्लेख कुत्सितपणे होतो अशी मुलांची तक्रार यायला लागल्यावर क्षिप्रा भानावर आली. आपण मुलांना वास्तवाचं भान दिलं नाही, याची जाणीव तिला झाली. मुलांच्या सरळसोट, उघड प्रश्नांना तिच्या तत्त्वप्रणालीत उत्तरं नव्हती. प्रश्न उपस्थित करण्याचा बुद्धीचा खुलेपणा तिनेच मुलांना दिला होता पण वास्तव आणि तत्त्वप्रणाली यांची सांगड तिला घालता येत नव्हती. प्रश्नांना अंगावर घेण्याचा आणि मुसुंडी मारून उत्तरं शोधण्याचा धीटपणा तिच्यात नव्हता.
अशा वेळेस तिला वाटायचं, आपली वाढ ही अशी अर्धवट कशी झाली?
पश्याच्या जाण्यानंतर एक दिवस रेवा भेटली. वाईट मनःस्थितीत होती. पश्या जाण्यापूर्वी ती घरात होती. त्याच्याशी बोलली होती. रेवा सायकॉलॉजीची विद्यार्थिनी होती. ती क्षिप्राला म्हणाली, ‘‘मी खलास झालेय. त्या दिवशी त्याला उलट्या होत होत्या. मी बाहेरच्या हॉलमध्ये बसले होते. त्याला काय होतंय पहायला आत गेले. त्यानं एकदम माझ्याकडे पाहिलं.’’ हे सांगताना रेवाचं अंग शहारलं. ती पुढे म्हणाली, ‘‘क्षिप्रा, मी त्याची ती नजर विसरूच शकत नाही. तसं त्याने माझ्याकडे कधीही पाहिलं नव्हतं. एका क्षणात मला कळलं, हा जगणार नाही. क्षिप्रा, ज्या घरात मरण, म्हणजे कुणी गेलेलं असतं ना, तिथे एक वेगळाच वास येतो. तसा वास मला घरात आला. आईशप्पथ, मी खोटं सांगत नाहीये. मी एवढा आग्रह का धरला त्याला दवाखान्यात नेण्याचा माहीताय?. पश्या सांगत होता मला, मी चाललो. कुत्री रडत होती त्या दिवशी. त्या दिवसापासून झोपच नाही मला. घरात एकटं बसायची भीती वाटते.’’
क्षिप्राला वाटलं, ही सायकॉलॉजीची विद्यार्थिनी. हिची ही अवस्था. ही तर पॅरासायकॉलीजत घुसतेय. मरणाचा सेन्स येणं, वाईट घटनेची चाहूल लागणं, याबद्दल किती लोक बोलतात. बरेचसे खोटारडे असतील पण रेवाला तर ती लहानपणापासून ओळखत होती. ती मनापासून बोलत होती.
खरंच कधी माणूस एवढा तरल होत असेल का? स्वतःचं शरीर सोडून त्याचं मन दुसरीकडे कुठे पोचू शकत असेल का?
रेवा म्हणाली, ‘‘माझ्या ओळखीतली एक दहावीतली मुलगी वारली. त्यांच्या दारात एक जांभळाचं झाड होतं. खूप बहर यायचा त्याला. ती गेली त्या वर्षी झाडाने फळच धरलं नाही.’’
शोक निसर्गात पसरतो? प्राणी, वनस्पती नक्कीच माणसापेक्षा जास्त संवेदनशील, तरल असतात. ते निसर्गातून काय जाणतात? कशाची चाहूल लागते त्यांना? कुठली अघटितपणाची लिपी त्यांना वाचता येते?
पुन्हा क्षिप्रा पहिल्या प्रश्नापाशी आली. प्राणी, वनस्पती आणि तरल संवेदनशीलतेचे लोक अघटिताची पावलं ओळखतात. पण एवढ्या सगळ्यांना अघटित वाटणारा मृत्यू अघटित असतो का? असला तर का असतो?
तिने रेवाची समजूत घातली. ‘‘असं काही नसतं ग. उगाच घाबरू नकोस.’’ रेवाची समजूत पटेना. तेव्हा तिने तिच्याच भाषेत तिला समजावलं, ‘‘अग, पण तो तर मुक्त झाला. कावळा शिवला न पिंडाला.’’
रेवाला हे चटकन् पटलं.
क्षिप्रा मनातल्या मनात दुखावली. ज्ञानाची परंपरा किती कुजक्या मुळांची आहे. फोफावतच नाहीये. आणि भ्रमांची, अंधश्रद्धांची मुळं किती पक्की. आपण या कुजक्या परंपरेचीच निर्मिती. आपल्या शिक्षणात ज्ञानाशी संबंधित काहीच नाही. नुसती माहितीची धोकंपट्टी. ज्ञानाला ज्ञानाचे फुटणारे धुमारे नाहीत.
‘आपल्यापेक्षा कुणीही बरं’ हा नेहमीचाच विचार तिच्या मनात आला. निर्णय असा आपण एवढाच घेऊ शकतो की आपल्यापेक्षा कुणीही बरं. यापलीकडे आपल्याला जाता येत नाही. शिवाय वेगवेगळ्या परिस्थितीत सारखी आपल्याला काहीतरी भूमिका घ्यावी लागते. भूमिकेशिवायचं जगणं इथं कठीण. इतिहासाने अर्धवट सोडून दिलेले विषय आपली पाठ पुरवतात. भूतकाळाचा नकोनकोसा सांधा जोडून वर्तमानाचा निर्णय द्यावा लागतो. वास्तवाशी फारकत घेऊनही चालत नाही. व्यवहाराच्या पटरीवरून गाडी घसरलेली चालत नाही. नुस्ते तत्त्वप्रणाली जपत जगणारे लोक कितीसे असतील. मेजॉरिटी तर तत्त्व - बित्त्व काही न मानता व्यवहार आणि भावना, श्रद्धा, आपल्या धारणांवर जगणारी आहे. आपण ना आयडिऑलॉजीज जपणारे ना मेजॉरिटीत मिसळणारे. आपल्यापेक्षा कुणीही बरं !
No comments:
Post a Comment