Saturday 1 February 2020

कवडसा

कवडसा

- सुजाता महाजन
       

‘गोदेऽऽ गोदेऽऽ ए गोदेऽऽ’’
    कॉलनीत झाडझूड करणारा बापू घसा खरवडून गोदीला हाक मारत होता. तिने लक्षच दिलं नाही. सतत बिड्या फुंकत राहणा-या बापूचा तिला तिटकारा वाटायचा. तसंही, ओळख आहे म्हणून उगीचच पुरुषांशी बोलत बसणं तिला आवडायचं नाही. आपण बरं नि आपलं काम बरं. कॉलनीत चार - पाच घरांचं धुण्याभांड्यांचं, स्वयंपाकाचं काम तिच्याकडे होतं. तिची आई, दोन बहिणी, वहिनी या कॉलनीतच काम करत होत्या.
    सकाळची कामं संपली की त्या सगळ्याजणी - म्हणजे आई, गोदू, आणि आणखी एक बहीण गंगी खाली पार्किंगमध्ये भेटायच्या. एकत्र जेवायच्या. कुणाकडचं काही न काही उरलेलं मिळालेलं असायचं. मस्त गप्पा मारत जेवण व्हायचं. जेवण झालं की आपापल्या कामांना सगळ्याजणी निघून जायच्या.
    मधली बहीण यम्नी मात्र त्यांच्यात यायची नाही. म्हणजे त्यांनाच ते आवडायचं नाही. यम्नी उठवळ होती. तिचं वागणं पाहून कुठल्याच घरात बायका तिला कामावर ठेवायच्या नाहीत. हमखास कॉलेजात शिकणा-या नोकरी करणा-या पोरांकडे तिला काम मिळायचं. यम्नी ते खुशीखुशीने करायची.
    सध्या कॉलनीतल्या काश्मिरी मुलांकडे तिला काम होतं. साफसफाई, स्वयंपाक सगळंच. गोरीगोमटी, नाकेली, काळ्याभोर डोळ्यांची ती पोरं दिवसभर बाहेरच असायची. यम्नी सकाळीच त्यांचं काम करायची.
    सकाळी ती जेव्हा कामावर यायची तेव्हा हे टोणे सगळे बेडरूममध्ये वाट्टेल तसे पसरलेले असायचे. कुणी हाफ चड्डीवर उघडं तर कुणी बनियनवर.
    कुणीतरी झोपेतच तिला दार उघडायचं. दार उघडणारा पुन्हा त्या अस्ताव्यस्त पसरलेल्या बैलांमध्ये जाऊन पडायचा.
    यम्नी हसायची. तिला हे दृश्य फार आवडायचं. ती घर आवरायला घ्यायची. जिथं तिथं पोट्य्यांनी ओढलेली सिगारेटची थोटकं, कोल्ड्रिंक्सच्या बाटल्या, वेफर्स, चिवड्याच्या रिकाम्या उलट्या पिशव्या, घरभर पसरलेले कळकट, मळकट कपडे, वाट्टेल तशा फेकलेल्या उश्या, इथे तिथे पडलेले टॉवेल्स, स्वयंपाकघरात उघडं वाघडं पडलेलं रात्रीचं अन्न, अर्धवट उघडे, तेलाचे ओघळ असणारे टिफिन... एक न्‌ दोन...
    बाईचा अजिबात वावर नसलेलं ते अस्ताव्यस्त विस्कटलेलं घर तिला खुणावत असायचं. ‘‘काय मेले पसारा करत्यात!’’ असं कौतुकाने पुटपुटत ती आवरायला घ्यायची.
    घराच्या कानाकोप-यातली धूळ काढायची, सगळ्या बाटल्या, पिशव्या, थोटकं सगळं गोळा करून केर काढायची, खरकटी भांडी घासायची, पुस्तकं, वर्तमानपत्रं नीट लावयची, सोफ्यावर उश्या नीटनेटक्या ठेवायची. कपडे भिजवायची. मग पोरांच्या बेडरूममध्ये घुसून ‘‘उठो, अब! मुझे सफाई करनी है, उठो, उठो!’’ करत सगळ्यांना बाहेर काढायची.
    पोरं कशीबशी उठून ‘‘क्या यम्नाबाई, सोने भी नही देती हो।’’ म्हणत बाहेर सोफ्यावर डुलक्या घेत बसायची. तोवर यम्नी बेडरूम चकाचक करायची. फरशी, संडास, बाथरूम सगळं स्वच्छ करायची.
    हे घर आपलंय असं तिला वाटायचं.
    बेडरूम आवरून झाली की चहा करायची. पोरं बाहेर टी.व्ही. बघत चहा घ्यायची. यम्नी पण तिथंच उभं राहून त्यांच्याबरोबर चहा प्यायची. आपण त्यांच्यातलेच एक आहोत असं तिला वाटायचं. इथं तिला अनिर्बंध स्वातंत्र्य असायचं. पोरं ती काय करतेय याकडे बिलकूल लक्ष द्यायची नाहीत. तिने काही प्रश्न विचारले तर ब-याचदा उत्तर पण द्यायची नाहीत. शरीरावर कुठेच मांसाचा पत्ता नसलेली उंच, लुकडी यम्नी त्यांचं लक्ष वेधून घेऊ शकायची नाही. ती आपलं सगळं काम पूर्ण लक्ष घालून व्यवस्थित करते एवढंच त्यांना माहीत होतं.
    यम्नीला याची फिकीर नव्हती. या फ्लॅटमध्ये मिळणा-या स्वातंत्र्यावर ती खूश होती. कधी पोरं टीव्हीमुक्त दिसली तर ती त्यांच्या चौकश्या करायची. ‘‘कहॉं से आये है?’’
    ‘‘घर मे कौन कौन है?’’ वगैरे. घरची आठवण काढली की पोरं मुडमध्ये यायची. काश्मीरमधलं आपलं प्रेमळ घर, आईवडील यांच्या आठवणी तिला सांगत राहायची. मग यम्नीला फार मोठेपण वाटायचं.
    या फ्लॅटमध्ये तिला स्वातंत्र्य असलं तरी तिचं स्वातंत्र्य बाहेरच्या लोकांच्या डोळ्यांवर येत होतंच. कॉलनीत लोकांना गॉसिपसाठी काहीतरी विषय पाहिजे असायचाच. यम्नीमुळे अनायास मिळायचा.
    आई आणि धाकटी बहीण गंगी थोडंफार तरी यम्नीशी बोलायच्या पण गोदू कधीच नाही. गोदूला तर तिच्याशी ओळख दाखवणंही जड जायचं. तिच्याशी बोलताना नव-याने पाहिलं तर रात्री मारहाण ठरलेली. ‘‘त्या छिनाल बयेशी कश्यापाई बोलत व्हतीस? तुजंबी ठरवती का काय कुठं साटंलोटं?’’
    नव-याचं हे विषारी बोलणं गोदीच्या जिव्हारी लागायचं. त्यामुळे ‘मरो ते बहिणीचं नातं’ असं होऊन जायचं.
    आत्ताही यम्नीच्या शेजारी राहणारा बापू हाक मारतोय म्हटल्यावर तिने दुर्लक्षच केलं. काम ना धाम! उगीच यम्नीविषयी काहीतरी कागाळ्या करत बसणार. ती तरातरा कामाला निघून गेली.
    थोड्या वेळाने एका विंगमधलं काम संपवून दुस-या विंगकडे जाताना तिला पार्किंगमध्ये बरीच गर्दी दिसली. ब-याच साळकाया माळकाया तिथं उभ्या होत्या. बापू गर्दीच्या मध्यभागी उभा राहून भसाड्या आवाजात काहीतरी सांगत होता.
    तेवढ्यात गर्दीच्या मध्याकडून कुणीतरी जोरात धावत आलं. तिची धडक होता होता वाचली. पाहिलं तर, आई आणि गंगी !
    या का पळतायत? त्या दोघींचं तिच्याकडे लक्ष नव्हतं. दोघी बेभानपणे धावत होत्या.
    ‘आयेऽ आयेऽ काय झालं? गंगेऽऽ’’ गोदीनंही त्यांच्यामागे धावत हाकांचा सपाटा लावला.
    तेवढ्यात मागून बापू आला न्‌ म्हणाला, ‘‘त्येच तुला सकाळी हाका मारून सांगत व्हतो पन तू आपली तुज्याच नादात. यम्नीनं जाळून घेतलं नव्हं का. रात्री...’’
    त्याचं वाक्य पूर्ण व्हायच्या आत गोदी आई आणि गंगीच्या रोखाने धावत सुटली.
    ‘‘आये ऽ आये ऽ, गंगे ऽ’’
    मग त्या भांबावलेल्या, बावरलेल्या तिघीजणी एकमेकींना भेटल्या. काही न सुचून पहिल्यांदा घरातल्या पुरुषमंडळींना सांगायला गेल्या.
    शेवटी त्यांचा बाप, भाऊ, गोदीचा नवरा, गंगीचा नवरा आणि आई सरकारी हॉस्पिटलमध्ये यम्नीला पाहायला गेले.
    गोदी आणि गंगी उरलेल्या कामांकडे वळल्या. गोदीचं लक्ष कुठेच लागत नव्हतं. फाटक्या फ्रॉकमध्ये, दोन वेण्या घालून गोड गोड हसणारी छोटी यम्नी सारखी तिच्या डोळ्यांसमोर येत राहिली. आपण उगीचच तिला तोडलं, तिचा राग राग करत राहिलो अशी अपराधाची भावना सारखी मनात येत राहिली. 
    वीस वर्षांच्या यम्नीला छोटी छोटी तीन पोरं होती. पहिलीत आणि बालवाडीत 
जाणा-या दोन मुली आणि अंगावर पिणारा एक वर्षाचा मुलगा. नव-याला तिने टाकून दिलं होतं की त्याने तिला याची कुणालाच कल्पना नव्हती. पण तीन मुलांना घेऊन ती एकटीच राहात होती. मुलींना शाळेत सोडून धाकट्या बाळाला गंगीकडे ठेवून कामाला जायची. गंगीची कामं उशीराची होती. पण तेही धोक्याचंच होतं. कारण गंगी तिच्याहून लहान अठरा वर्षांची. तिलाही दोन मुलं. गंगी कधीकधी यम्नीचं बाळ घरात आहे हे विसरूनच जायची. बाळ एकटं घरात जोरजोरात रडत रहायचं. तेव्हा यम्नी फ्लॅटमधल्या स्वातंत्र्याचे क्षण उपभोगत काम करत असायची.
    अशी यम्नी. तिने जाळून घेण्याचा प्रकार का केला असावा याचं कोडं कुणालाच उलगडत नव्हतं.
    दुस-या दिवशी दोघी बहिणी धीर करून यम्नीला पाहायला गेल्या. विशेषतः गोदीला वाटत होतं, यम्नीचं काही बरंवाईट झालं तर आपल्याला दिसायची नाही पुन्हा आणि आपल्याही मनात राहून जाईल आणि तिलाही वाटेल की पहा, बहीण मरणाच्या दारातसुद्धा भेटायला आली नाही.
    त्यांचं आयुष्य कितीही कष्टाचं, गरिबीचं, छळाचं कसंही असलं तरी इतकं टोकाचं दुःख त्यांनी पाहिलेलं नव्हतं. सरकारी हॉस्पिटलमधला तो वॉर्ड म्हणजे शारीर दुःखाची अंतिम स्थिती होती. कुणाचा हात तुटलेला तर कुणाचा पाय, कुणाचा चेहरा जखमांनी भरलेला. भाजलेल्यांच्या विभागात किंकाळ्या घुमत होत्या. अंगावर कपडे ठेवता येत नसल्याने वरून छोटे छोटे डेरे टाकून ती दुर्दैवी शरीरं झाकून ठेवलेली होती.
    यम्नीच्या डे-याचा पडदा थोडा सरकवून गोदीनं आत पाहिलं. यम्नी शुद्धीवर होती. चेहरा खूप जळालेला होता. भुवया, पापण्यांचे केस जळाले होते. चेहरा फुगून मोठा झाला होता. हातापायांची जळालेली लोंबणारी कातडी कापून टाकलेली होती. त्यामुळे मांस दिसत होतं. डोळ्यांच्या नुसत्या फटीच दिसत होत्या.
    गोदीची चाहूल लागल्यावर यम्नीने क्षीण आवाजात विचारलं, ‘‘गोदूताई, तू आलीस?’’
    ऐन मृत्युच्या उंबरठ्यावर तिला विजयाची भावना झाली. गोदूने कितीतरी वेळा तिचा अपमान केला होता. नवरा नसताना तीन छोट्या मुलांना वाढवणं म्हणजे गंमत नव्हती. पावलोपावली परीक्षा होती. पण गोदूने कधीही मदतीचा हात पुढे केला नव्हता. यम्नी दिसली  की ती फणका-याने निघून जायची. आणि आता हीच गोदी आपल्याला पाहायला आली. यम्नीच्या मनात खोलवर समाधान दाटलं. डोळ्यातनं अश्रूंची धार लागली.
    तेवढ्यात सिस्टरने घाईने तिथून सर्वांना हाकलून लावलं. पाहायची परवानगी नव्हतीच कारण इन्फेक्शनचा धोका तिथं सर्वात जास्त.
    गोदी बाहेर आली. गंगीने तर पाहिलंच नव्हतं. त्या दोघी भराभर वॉर्ड पार करत हॉस्पिटलमधून बाहेर आल्या. गंगी अनेक प्रश्न विचारत होती पण गोदींच्या डोक्यात काही शिरत नव्हतं.
    गंगीचे प्रश्न थांबविण्यासाठी एकदाच तिने तिला फटकारलं, ‘‘गप्प बस ग! आता मला काई विचारू नकोस.’’
    बसमधल्या गर्दीत ती यांत्रिकपणे घुसली कशी, कंडक्टरला काय सांगितलं, बसमधनं उतरली, चालत घरापर्यंत आली हे काय कधी घडलं, कसं घडलं तिला काही कळलं नाही.
    तिला घरापाशी सोडताना गंगी म्हणाली, ‘‘ताई, तुला लईच धक्का बसल्यावानी दिसतंय. जा, आता थोडी इश्रांती घे. पड थोडी उगी. दुपारी बोलुयात आपुन.’’
    ती काय बोलतेय याकडे गोदीचं लक्षच नव्हतं. तिच्या छोट्या झोपडीत यावेळी कुणीच नव्हतं. नवरा कामावर. मुलं शाळेत.
    त्या शांत झोपडीत पिंपाला पाठ टेकून ती बसली. तिचं छोटंसं घर नीटनेटकं लावलेलं होतं. पत्र्याच्या भिंतीतून उन्हाचे कवडसे घरात ठिकठिकाणी पडले होते. तिने त्या कवडशांवर हात ठेवला. तिच्या हातावर एक उबदार कवडसा आला.
    त्याच्याकडे पाहता पाहता तिला गदगदून आलं. यम्नीचं भयंकर रूप आठवून पोटात डचमळून आलं. झोपडीच्या मागे जाऊन ती ओकून आली. थकून जमिनीवर अंग टाकलं.
    यम्नी आपली बहीण इतकी वेगळी कशी? तिला काय आवडतं? त्या काश्मीरी मुलांमध्ये ती इतकी कशी रमते? नव-याला तिने का सोडलं? तिला मुलांची काहीच पर्वा कशी नाही? नेमकं काय झालं असेल? का जाळून घेतलं असेल तिनं? तिचं काहीच कुणाशी भांडण नव्हतं. आम्ही बोलत नव्हतो पण त्याची तिला काय खेदखंत नव्हती. थोडंफार वडील बोलायचे. आई न्‌ गंगी पण. दादाने तर तिचं नावच टाकलं होतं. आत्तासुद्धा चार कामांच्या घरी आई तिच्यासाठी पैसे मागतेय पण दादाकडे मागितले नाही तिनं. आईच्या मनाला काय वाटत असेल? काल म्हणत होती, ‘‘आता आपुन तरी काय करनार? आपुन करू शकतो तेवडं करनार नाही तं मरू द्यायचं. काय करनार? आता हिची पोरं सांबाळावी लागतील. जमेल तेवढं करायचं नाही तं सोडून द्यायचं त्यांच्या नशिबावर त्यांना. मागतील भिका, नाही तं ते अनाथ पोरांसाठी असतं तिकडं टाकायचं. गरीबाला नाती परवडतात कुटं?’’
    यम्नी साठ - सत्तर टक्के भाजली होती. सहजासहजी मरणार नाही. हाल हाल होऊन मरणार हे उघडच होतं. पोलीसांना तिने बयान दिलं होतं, ‘‘स्टोचा भडका उडून हे घडलं. मी मटण शिजवत होते.’’ पोलीस तिच्या घरी जाऊन तपास करून आले होते. त्यांनाही मटण सापडलं होतं. त्यामुळे यम्नीवर केस झाली नाही. पण खरोखरच यम्नीनं पेटवून घेतलं होतं की तो अपघात होता हे कुणालच माहीत नव्हतं. यम्नीविषयीच्या विचित्र लोकमतामुळे घटनेचं वर्णन सुरुवातीपास्नं ‘जाळून घेतलं’ या शब्दांनीच झालं होतं हे खरं.
    त्यामुळे घटनेला नंतर विचित्र फाटे फुटत राहिले. आणि अनेक लोक निष्कारण त्यात गुंतून पडले. 
    ...
    काश्मीरी लोक ज्या फ्लॅटमध्ये भाडेकरू होते, त्या फ्लॅटचा मालक कॉलनीतच दुसरा गार्डन फ्लॅट घेऊन राहात होता. त्याचा परिवार खूप मोठा होता. ही जमीन एकेकाळी त्याचीच होती. बिल्डरला ती दिली. बिल्डरकरडे पैसे नसल्याने त्याने या जमिनीच्या बदल्यात प्रत्येक बिल्डिंगमध्ये दोन - दोन फ्लॅट या परिवाराला दिले होते. त्या सर्वांनी भाडेकरू ठेवले होते. हा एरिया बराच रिमोट असल्याने इथं फक्त विद्यार्थीच भाडेकरू म्हणून मिळू शकत होते. यांना भाडेकरून मिळाले होते ते एक तर आफ्रिकन नाहीतर युपी - बिहारी किंवा काश्मिरी. या सगळ्यांचे वेगवेगळे त्रास होते. विशेषतः रात्री बारानंतर दारू पिऊन धिंगाणा घालणं, भांडणं, मारामा-या करणं किंवा मोठ्ठ्या आवाजात गाणी लावून नाचत बसणं, येन केन प्रकारेण आसपासच्या कुटुंबांना त्रास होईन असं सगळं ते करत राहात. अनेकदा कुटुंबप्रमुख किंवा विंगमधले सगळे एकत्र जमून त्यांना सांगायला जात. त्याचा परिणाम एवढाच होई की थोडा वेळ आवाज बंद होई. तासाभराने पुन्हा सुरू. त्यांच्या मालकाला, त्याला सगळे दादा म्हणत, सांगण्याचा प्रयत्न अनेकदा लोकांनी केला. पण दादा दाद देणारा नव्हताच. त्याच्या मनात हे पक्क ठसलं होतं की, ‘ही जमीन आपली हाय. इथं बिल्डरनी कुनालाही आनून बसवलं तरी मालक आपुनच.’ त्याची प्रत्येक कृती ‘सत्ता’ दाखवून देणारी असायची. साहजिकच कॉलनीतले लोक दादाला आणि त्याच्या भाडेकरूंना कंटाळलेलेच होते. 
    आता यम्नीचा प्रकार घडल्यावर कॉलनीत कुजबुज सुरू झाली. काश्मिरी.मुलांनी तर यम्नीला संकटात पाडलं नसेल? ती मुलं ‘‘यम्नाबाई, तुम हमारे कश्मीर मे चलो । तुम्हारा घर बसा देंगे ।’’ म्हणताना काहीजणांनी ऐकलं होतं.
    यम्नीचा भाऊ, तिचे दोन्ही मेव्हणे हे ऐकून पेटल्यासारखे झाले. यम्नी त्यांच्या आयुष्यात कुठेच नव्हती पण आता एकदम त्यांना तिची दखल घेणं आवश्यक वाटायला लागलं.
    एक दिवस तिघंही दारू पिऊन कॉलनीत आले आणि काश्मिरी मुलांच्या खिडकीखाली उभं राहून त्यांना शिव्या द्यायला लागले. विंगचे लोक आपापल्या घरातून हा प्रकार पाहात होते. त्यांना हे हवंच होतं. दुस-याच्या काठीने साप मेला तर बरंच की! विंगच काय ख्खी कॉलनी काश्मिरी आणि आफ्रिकन विद्यार्थ्यांच्या विरोधात होती. पण दादाशी वाकडं कोण घेणार?
    तेवढ्यात कुणीतरी दादाला जाऊन सांगितलं, तुमच्या भाडेकरूंना मारायला लोक आलेत. दादा निघालाच ‘‘च्या मायला, कुनाची माय व्यायलीय रे’’ म्हणत हातात काठी घेऊन.
    त्याच्या तोंडून कोसळणा-या शिव्यांच्या धबधब्यात तिघे दारूडे एवढे चिंब झाले की आपण इथं कोणत्या कारणाने आलो हेच त्यांना आठवेना. तिघंही आयुष्यातली सर्वात कमाल वेगमर्यादा गाठत पळत सुटले.
    विंगमधल्या लोकांनी मग यम्नीच्या प्रकरणाचं भांडवल करून काश्मिरी विद्यार्थ्यांविरुद्ध एक अर्ज तयार केला. त्यात त्यांच्या रात्री - अपरात्रीच्या सर्व प्रकारांबद्दल तर लिहिलेच, शिवाय कॉलनीतल्या स्त्रियांना त्यांच्यापासून धोका असल्याचं पण लिहिलं.
    अर्ज पोलीसांकडे देण्यात आला.
    दादाला जेव्हा हे कळलं तेव्हा कॉलनीतल्या लोकांच्या नावाने तो नुसता थयथया नाचत राहिला, शिवीगाळ करत राहिला.
    प्रश्न बाईचा असल्याने काश्मीरी मुलांना लवकरच हलावं लागलं.
    यम्नीला स्वप्नवत वाटणारे दिवसाचे ते तास तिच्याच भाजण्याच्या प्रकारामुळे तिच्या आयुष्यातनं संपून गेले.
    कॉलनीतले लोक कुठेतरी दादाच्या ‘पावर’ ला शह देता आला म्हणून खुश झाले.
    यम्नीची पोरं कधी गंगीकडे, कधी आजीकडे, कुणी खायला घालेल तिकडं जात राहिली.
    आणि गोदी, उन्हाच्या कवडशासारख्या हातातून निसटलेल्या यम्नीसाठी मनातनं तळमळत राहिली.

No comments:

Post a Comment