Saturday, 1 February 2020

सुखाचा शोध.


                   

खरतर आपली प्रत्येक धडपड ही सुखासाठीच असते. कोणीही असो मला दुःख मिळावे म्हणून कोणतीच गोष्ट करत नाही.
सुख मिळविण्यासाठी आपण काय काय करतोॽ उत्तम शिक्षण घेण्याचा प्रयत्न करतो. नोकरी, व्यवसाय भरभराटीचे असेल असा प्रयत्न करतो. या सर्वांद्वारे मिळणारा पैसा खर्च करुन आपले घर, आपला देह सजविण्याचा प्रयत्न करतो. सत्ता, अधिकार प्राप्त करतो ज्यायोगे आपल्याला इतरांकडून मानसन्मान मिळाला की सुख वाटते. उत्तमोत्तम खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतो, विविध ठिकाणी पर्यटन करतो. अनेकानेक गोष्टी करतो. या सर्वांद्वारे आपल्याला दरवेळी पूर्ण सुख मिळते का आणि ते टिकून रहाते का असे जर प्रश्न आपणच आपल्याला विचारले तर त्याचे काय उत्तर येतेॽ हे सुख तुकड्या तुकड्याने प्राप्त होते मात्र कधी पूर्णत्वाने मिळत नाही. याचा परिणाम हव्यास वाढत जातो आणि सुख मात्र दूर दूर जाते.  
आता खरे सुख कोणालाच मिळत नाही काॽ याचा शोध घेतला तर आपल्याला दिसते की काही माणसे सुखात नांदतात. पण सदैव नांदतात असे दिसत नाही. सदैव सुख मिळण्यासाठी काही उपाय आहेत की नाहीॽ तर नक्कीच आहेत. गीतेमध्ये याचे उत्तर आपल्याला सापडते नक्की. ते उपाय कोणते त्याचा थोडासा परिचय आज करुन घेऊ.
आपण जन्माला येतो तेव्हाच काही ऋण घेऊनच जन्माला येत असतो. ज्या परिसरात राहतो, ज्यांच्या सहाय्याने आपले जीवन व्यतीत होते त्या सर्वांचे काही न काही ऋण आपल्यावर तयार होतच असते. त्यांची परतफेड न करणाऱ्याला भगवद् गीतेत भगवंतांनी चोर म्हटले आहे.
मातृपितृ ऋण, गुरु ऋण, देशऋण, समाज ऋण, देव ऋण यातून पूर्णतः उतराई होणे शक्य नसले तरी आपल्या कमाईतला काही न काही हिस्सा या सर्वांसाठी खर्ची घातला पाहिजे. तो पैसा या स्वरुपाचाच असला पाहिजे असे काही बंधन नाही. सेवा, वेळ, विचार यांचेही उचित वेळी, उचित ठिकाणी केलेले दानही स्वीकृत असते.
मी जन्माला आलो माझ्या संचिताने, शिक्षण घेतले माझ्या बुद्धीने, कमावतो मी माझ्याच मेहनतीने मग खर्चही मी माझ्याचसाठी करीन असे जर कोणी म्हणेल तर त्याने हे लक्षात घेतले पाहिजे की जन्माला येतांनाही तुला कोणाचे तरी सहकार्य होतेच. शिकतांना तर अनेकांनी सहाय्य केले आहे आणि नोकरीही देणारे दुसरेच कोणीतरी आहे. किंवा व्यवसाय असला तरी तो दुसऱ्याच्याच भरवशावर चालणार आहे. तेव्हा या सर्वांसाठी काही सहकार्य तूही दिलेच पाहिजेस. ते न दिले तर तू त्यांच्या सहकार्याची चोरी केलीस असे होते.
याचाच अर्थ असा की आपल्याला सुख हवे असेल तर आपल्या हातून चौर्यकर्म होता उपयोगी नाही.
सध्याच्या काळातील इंटिरिअर डेकोरेशन हा परवलीचा शब्द झाला आहे. सगळ्यांनाच आपले घर डेकोरेट करण्याची आवड असते. त्यासाठी वेगवेगळ्या वस्तूंचे, कल्पनांचे सहाय्य माणूस घेतो. पैसा खर्च करुन दुसऱ्याच्या मदतीने करण्याकडे कल असतो.  घराची सजावट जशी करतो तशीच आपल्या शरीरातील बाह्यइंद्रिये आपल्याला दिसतात त्यांना सजवण्यासाठी आपण अनेक साधनांचा उपयोग करतो. त्यासाठी कितीतरी नवेनवे साहित्य आणि कल्पना यांचा पूर आलेला दिसतो.
आपले बाह्यदर्शन जसे असते तसे अंतरंग दर्शनही असते. पण अंतरंगाचा थांगपत्ता सहजी लागतच नाही. चर्मचक्षुने मन दिसत नाही. पण वर्तनावरून ते कसे आहे हे बरोबर कळते. मनाचे सुशोभनही व्हायला हवे. अन्यथा नाव सोनूबाई आणि हाती कथलाचा वाळा असे होते.  त्यासाठी मन सुंदर व्हावे यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न करायला हवेत. विवेकाने मनाला ताब्यात ठेवले पाहिजे. नित्यनेमाने साधना केली पाहिजे. सद्विचाराने मन प्रसन्न ठेवले पाहिजे. नामस्मरण, सत्संग, उत्तम ग्रंथांचे वाचन याची सवय करुन घेतली पाहिजे. या सर्वाद्वारे मन सुसंस्कृत होते. आणि त्याचे प्रतिबिंब मग आपल्या समाधानी, प्रसन्न चेहऱ्यावर दिसू लागते. प्रसन्नता, समाधान हीच सुखाची गुरुकिल्ली असते. संतांचे दर्शन असे असते कारण त्यांनी हा इंटिरिअर डेकोरेशनचा कोर्स प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होऊन केलेला असतो. आणि तो प्रथम क्रमांक तसाच राहील यासाठी ते नित्य अभ्यास करतात.
खरे तर सुख हे मानण्यावरच अवलंबून असते. शाश्वत सुखाचा शोध संतांना लागला आणि त्यांनी तो मार्ग आपल्याला दाखवून दिला. त्यांचे सांगणे कळते पण वळत नाही अशी आपली अवस्था असते. भौतिक जगातल्या दृश्य वस्तूंपासून मिळणारे सुख हे क्षणिक असते. आपल्याला जे प्राप्त आहे ते आपल्याच संचिताचे फळ आहे व त्यात समाधान मानावे असे एकदा कळले की खरे सुख काय ते समजते. यासाठी आपल्यापेक्षा कमी ज्यांच्याकडे आहे त्यांच्याकडे पाहिले पाहिजे. सर्व अवयव धडधाकट असलेल्याने एकाद्या दिव्यांग आयुष्य लाभलेल्याकडे पहावे.
आपल्यावर ईश्वरी कृपा असतेच फक्त ती आपल्याला समजली पाहिजे. त्यासाठी मनात एक गोष्ट कायम ठेवावी की मला माझ्या लायकीपेक्षा भगवंताने काकणभर तरी जास्तच दिले आहे. निर्मळ व पवित्र अंतःकरण होण्यासाठी दुसऱ्यातील दोष न पाहता आपल्यातील दोष कमी कसे होतील हे पाहिले की सुखाचा शोध नक्कीच लागतो.
आपली प्रगती होण्यासाठी शारीरिक आणि मानसिक तपाची फी त्यासाठी द्यावी लागते. जितकी नियमितता असेल त्याप्रमाणात या फीची  भरपाई करता येते. एकवेळ पैशाच्या रुपात फी देणे सोपे असते. इथे मात्र स्वस्थ चित्ताने एकाग्र होऊन साधना, तप करणे साधावे लागते. हे साध्य करण्यासाठीच गीतेसारख्या ग्रंथाचे नुसते वाचन नव्हे तर अध्ययन, चिंतन घडले पाहिजे.

No comments:

Post a Comment