शोधा आपापला स्वभाव
मनुष्यमात्राचा सत्त्व, रज आणि तम या गुणांनी युक्त असा स्वभाव बनलेला असतो. यातील प्रत्येक गुण योग्य
ठिकाणी वापरला तर तो उचित परिणाम देणारा असतो. मात्र त्यासाठी समवृत्ती असावी लागते. सातत्याने ती टिकतेच असे नाही. ‘रजस्तमश्चाभिभूय सत्त्वं भवति भारत। रजः सत्त्वं तमश्चैव तमः सत्त्वं रजस्तथा’ त्यामुळे कोण्यावेळी कोणता गुण वाढलेला आहे हे समजण्यासाठी काही लक्षणे सांगितली जातात. त्या त्या लक्षणांवरुन कोणत्या गुणाचे प्राबल्य आहे ते समजून येते.
रोजच्या दैनंदिन जीवनातही आपल्याला ते सहजपणे कळते. समजा रस्त्याने जातांना गर्दीच्यावेळी एकाद्याला
चुकून धक्का लागतो. तेव्हा एकादा माणूस पटकन ‘माफ करा हं’ म्हणतो. एकादा ‘काय नीट चालता येत नाही काॽ’ असे विचारतो. एकादा त्यावरुन हमरीतुमरीवरही येतो. घटना एकच आहे. पण तिघांच्या प्रतिक्रिया, त्याचे प्राकट्य वेगवेगळे दिसते. पटकन माफ करा म्हणणारा बहुतांशवेळा सात्विक स्वभावाचा असतो. दुसऱ्याची चूक दाखवणारा रजोगुणी असतो तर हमरीतुमरीवर येणारा तमोगुणाचे प्राबल्य असणारा असतो.
ज्या वेळी रागावर नियंत्रण उरत नाही. चुका होऊ लागतात, मोह आवरणे अशक्य होते, शास्त्रसंमत गोष्टी
करण्याचा विचार येत नाही तर शास्त्रविरुद्ध विचार अमलात आणावे असे वाटते तेव्हा समजावे तमोगुणाचे वर्धन
शरीरात झाले आहे. छोट्या छोट्या गोष्टींवरुन निराशा, आत्महत्येचे विचार, सतत चिंतामग्न किंवा अत्यंत बेपर्वा वृत्ती दिसत असेल तर तेथेही तमोगुण वर्धिष्णु आहे असे समजावे. खावे, प्यावे आणि झोपावे एवढेच जिवित ध्येय असणारी माणसे तमोगुणीच असतात. दे रे हरि खाटल्यावरी अशी वृत्ती याच गुणाची द्योतक.
एकादी व्यक्ती कायम काही ना काही कार्य करीतच असते. स्वस्थ, शांतपणे ती थांबूच शकत नाही. मात्र ते कार्य
केवळ प्रपंचातलेच असते. किंवा प्रपंचातील सुख प्राप्त करण्यासाठी करते. अशी व्यक्ती रजोगुण प्रधान समजायला हवी. कोणत्यातरी लोभाखातर कर्म करण्याची वृत्ती होत असेल तर समजावे रजो गुण वाढीस लागला आहे. आपल्या माणसांची, प्रपंचातल्या चीजवस्तूंची काळजी वाढीस लागते. स्वकर्तृत्वाचा अभिमान दिसतो. केवळ शरीरानेच नाही तर मनानेही या व्यक्ती प्रपंचातल्या गोष्टींचे चिंतन करीत असतात.
ज्ञान संपादन करण्याकडे, शांतपणे लोकहितास्तव कार्य करण्याची इच्छा होत असेल तर समजावे सत्त्वगुणाचे
वर्धन होत आहे. प्रपंचापेक्षा परमार्थ जाणण्याची, त्यात रमण्याची आवड होत असेल तर सत्त्वगुण वर्धिष्णु आहे असे स्पष्ट दिसते. विवेक आणि वैराग्य यांचा बडेजाव न होता सहजवृत्तीने त्या गोष्टी घडत असतील तर सत्त्वगुणाचे ते प्रगटीकरण असते. श्रद्धा आणि दुसऱ्यांचा आदर करुन स्वतः मात्र लीन असणारी वृत्ती सात्विक होय. आपल्या वाट्याला येणारे भोग जसे आहेत तसेच भोगून संपवण्याची तयारी व हे प्रारब्धाने आलेले आहेत याचे ज्ञान असते. अविनाशी तत्त्वाचे सत्त्यत्व प्रचितीस आलेले असल्याने समभावाने पहाण्याची दृष्टी येते. कोणतेही षडविकार आवश्यकतेपेक्षा जास्त प्रगट होत नाहीत. हे सात्विक गुण वाढत असल्याचे लक्षण मानले पाहिजे.
अंगी सत्त्व, रज आणि तम हे गुण असतील, तर प्रत्येकाचे काय फल मिळतेॽ
जगात अनेक प्रकारच्या स्वभावाची माणसे दिसतात. काही दयाळू, उदार, संतापी, शांत, चंचल. याचा अर्थ
इतर गुण त्याचे ठायी नसतात असा नव्हे. प्रकृतीच्या तिनही गुणांच्या मिश्रणानेच माणसाचा स्वभाव बनत असतो. मात्र जो गुण प्रकर्षाने प्रकट स्वरुपात दिसतो त्या गुणाची ती व्यक्ती आहे असे आपण मानतो. अध्यात्मिक दृष्ट्या तम, रज आणि सत्त्व असे तीन विभाग केलेले आहेत. या प्रत्येक गुणाची लक्षणे दिलेली आहेत. त्यापैकी अधिकत्वाने जी ज्याच्यात दिसतात त्याला त्या गुणाची व्यक्ती म्हटले जाते. अर्थात गुण आले की त्याचे फलही आलेच. तमोगुणी व्यक्ती आळशी, निद्राग्रस्त आणि बहुधा दुराग्रही असल्याने एकतर भांडण, चिडचिड यात वेळ दवडते. नाहीतर शास्त्रविरोधी, कुटील कारस्थानी कारवाया करण्यात मग्न असते. विवेक, विचार यांचा दुरान्वयानेही संबंध येत नाही. समाज विघातक कृत्ये केल्याने समाजाला हानी पोहचवते. स्वतःचे अधःपतन करुन घेते. मूढयोनीत प्रवेशाचा मार्ग निश्चित करुन घेते. त्याच्या बुद्धीवर अज्ञानाचा पडदाच पडलेला असतो. रजोगुणाच्या गतीला तमोगुण दाबून टाकतो.
रजोगुण असलेली व्यक्ती आपला प्रपंच उत्तम करण्यासाठी जे जे आवश्यक असेल ते ते सर्व करायला तत्पर
असेल. मात्र कोणतेही कार्य प्रदीर्घ काल तो करु शकत नाही. चंचलता या गुणामुळे धरसोड वृत्ती होते. आपल्या
संसारातील सगळ्यांची काळजी करेल. त्यांच्या भौतिक गरजा भागवण्यासाठी रात्रंदिवस कष्ट करेल, संपत्ती प्राप्त करेल. सुखोपभोगाची साधने मिळवेल. अभिमान जागृत ठेवेल. देवधर्माच्या गोष्टी आपल्या प्रपंचातील सुखाला पूरक म्हणून करेल. माणसांना जोडून ठेवेल. भोगप्राप्ती होते पण हवेपण संपत नाही. या सगळ्यात गुंतून राहिल्याने अंतिमतः दुःखी होईल. रजोगुणी पुनरावृत्तीच्या फेऱ्यात सापडते. अंगी सत्त्व गुण असेल तर तो स्वतःचा उद्धार करण्याच्या प्रयत्नाबरोबर समाजालाही काय चांगले देता येईल याचा विचारही करतोच करतो. ज्ञानाची विविध प्रकारे जपणूक करेल. शांत, संयमी, वैराग्यपूर्ण आयुष्य जगेल. वस्तुसंग्रह न करता लोकसंग्रह करेल. देवकार्य, राष्ट्रकार्य यासाठी विविध उपक्रम राबवेल. अनिष्ट रुढी, परंपरा यांचे खंडन करेल. सात्विक वृत्तीने समाजाचे भले होईल. आत्मोद्धार करुन जन्ममरणाचा फेरा चुकवेल. तथापि या गुणांचा अहंकार सुखावला तर जन्ममरण चुकत नाही पण साधना केल्यामुळे श्रीमतां गेहे अर्थात पुढची वाटचाल सुरु राहू शकेल
अशा कुळात जन्म मिळतो.
“कर्मणः सुकृतस्याहुः सात्त्विकं निर्मलं फलम्। रजसस्तु फलं दुःखमज्ञानं तमसः फलम्॥”
एका वाक्यात सांगायचे तर ’सात्विक गुणाचे फळ निर्मलाची प्राप्ती, रजोगुणाची प्राप्ती म्हणजे दुःख, तमोगुणाचे
फळ अज्ञान असते.’ असे सांगता येईल.
Padma Dabke.
No comments:
Post a Comment