Saturday 1 February 2020

Blogpost story



तब्बल 32 तास  तू माझ्याबरोबर नव्हतास.  तुला काहीच वाटलं नाही रे दुष्टा.  जीव माझाच कासावीस झाला.  तुला तीळमात्रही असं वाटलं नाही ना मी कुठे आहे असं विचारावं? चोविस तासातले सतरा-अठरा तास आपण एकत्र असतो तरीही कोणत्या मोहाच्या क्षणी तुझा विसर पडला मला देव जाणे! 

तू जवळ नाहीस हे कळल्यावर असं कधी माझ्याही बाबतीत होऊ शकतं यावर विश्वासच बसला नाही.  म्हणून आधी शोध शोधलं तुला.  पण छे! निराशाच पदरी आली.  आपण शेवटचे एकत्र कुठे होतो हे आठवायचा प्रयत्न केला पण तेही आठवेना.  माझा धीरच सुटला रे अगदी. इतकी उदास आणि निराश मी कधीच झाले नव्हते. 

मला तुझ्याबरोबरचे सारे क्षण आठवू लागले.  गेली साताठ वर्ष तर तुझ्याशिवाय माझा एक क्षणही जात नव्हता.  तुझ्यामुळेच मला किती गोष्टी नव्याने कळल्या! तुझ्या मदतीने मी खूप काही शिकले.  तुझ्या मदतीने किती गोष्टी मी मिळवल्या सारं सारं आठवत होतं.  फक्त एक सोडून.  तुझी माझी ताटातूट झाली कशी नेमकी? 

लहान मुलासारखं भोकाड पसरून रडायचंच बाकी राहिलं होतं. तुझा भाऊही तुला हाकांवर हाका मारत होता पण अंहं! तुला उत्तरच द्यायचं नव्हतं ना!  तुझ्याकडून उत्तर नाही म्हंटल्यावर घरात माझी तासंपट्टी सुरू झाली.  माझं वेंधळेपण, गलथानपणा सर्वांवर स्तुतीसुमनं उधळून झाली.  पण तुला काय त्याचं! तू तर दगडच झाला असावास बहुतेक. तुझ्या विचारात रात्रही तळमळून काढली.

आणि शेवटी लागला बाबा एकदाचा थांगपत्ता तुझा.   मलाही हायसं झालं.  आणि अखेर या हातातून, त्या हातात, या गाडीतून त्या गाडीत, या बॅगेतून त्या बॅगेत असा प्रवास करत करत अखेर माझ्यापर्यंत गलीतगात्र झालेला तू पोचलास काल रात्री साडे अकरा वाजता.

पेंगुळलेली मी तुझ्या दर्शनाने झटक्यात जागी झाले.  माझ्या जीवात जीव आल्यावर तत्क्षणी तुझ्या जीवात जीव भरायला सुरूवात केली आणि निर्धास्त झोपले. सकाळी उठून बघते तो काय! माझा सॅमसंग गॅलेक्सी एस 6 आपल्या ड्यूटीवर माझ्यासाठी हजर झाला होता.

Anagha Joshi

No comments:

Post a Comment