नाही करायची दुस-याला मदत या शहरात
- सुजाता महाजन
‘‘हॅलो, प्रीती बोलतेय. मांडवी आहे?
‘‘मांडवी, प्रीतीचा फोन आहे.’’
मांडवी आंघोळीला चालली होती. तिने पाण्याचा नळ बंद केला आणि कपड्याला हात पुसत बाहेर येऊन फोन घेतला.
‘‘हॅलो प्रीती, बोल.’’
‘‘मांडवी, मला थोडी मदत करतेस? तुला तर माहितीय, मी सकाळीच बाहेर पडते. पप्पूला शाळेत सोडून पुढे कामाला जाते. आमचे नाना त्याला आणतात. पण नानांना हल्ली फार कमी दिसतं. रोज माझ्या मनावर एक टेन्शन असतं, की कसे आणत असतील त्याला गाडीवर. मी तुला म्हणणार होते, तुझा राजू पप्पूच्याच वर्गात आहे. तू राजूला रिक्षाने आणतेस तर पप्पूलाही आणत जा. तुमच्या घरापर्यंत फक्त. नाना तुमच्या घरासमोर भाजीवाले बसतात ना तिथं थांबतील. तिथून आमच्या घरापर्यंत काही रिस्की नाहीये. अजिबात गर्दी नाही. दोन छोटे रस्ते पार केले की आमचं घर. मोठे चौक नाही, बसेस नाही. तेवढं नाना आणू शकतात. करशील का एवढं प्लीज!’’
मांडवी छोट्या गावातून आलेली, कुणालाही मदत करणं तिच्या दृष्टीने अगदी स्वाभाविक गोष्ट होती. प्रीती काही तिची मैत्रीण नव्हती, फक्त ओळखीची होती. एवढ्यातच प्रीतीने नवं घर घेतलं होतं. जुनं घर सोडलं पण नव्या घरासाठीचं कर्जच मंजूर झालं नाही. तिच्या नव-याला नोकरी पण काही खास नव्हती. प्रीतीने स्वतःला नोकरी शोधली. दिवसभर काम करून अठराशे रू. देणारी. मुलगा नर्सरी स्कूलमध्ये जाणारा. प्रीतीचे वडील - नाना - त्याला शाळेतनं आणायचे. नंतर शेजारी एका पाळणाघरात ठेवायचे. संध्याकाळी सात वाजता प्रीतीचा नवरा त्याला घेऊन यायचा. आठ वाजता प्रीती घरी पोचायची. ही प्रीतीची दैनंदिनी.
मांडवीला हे खूप विचित्र वाटायचं. या शहरात ही काय जगण्याची पद्धत असावी लक्षात यायचं नाही. स्त्री-पुरुष लग्न करतात, मुलं होऊ देतात. मग दोघंही नोकरीला जातात. मुलाला दाया सांभाळतात किंवा पाळणाघरं सांभाळतात. संध्याकाळी दमून भागून घरी येताना तयार पोळ्या, पॅक्ड फूड असं काय काय घेऊन येतात किंवा फोनवर ऑर्डर देतात. सुटीच्या दिवशी सगळ्या कुटुंबाने बाहेर जेवायला जायचं. यांच्या जगण्यात टेबलखुर्ची, टीव्ही, सीडीज्, नवे कपडे, दागिने, बाहेरचं खाणं एवढ्याच गोष्टी. ना कधी उगवता सूर्य पाहातात ना माळवता. फुलं पाहतात ती बूकेत. यांना सारखा ‘ बोअरडम’ असतो. त्यावर इलाज चित्रपट, टीव्ही, हॉटेलिंग, चिक्कार खरेदी एवढेच.
प्रीतीबद्दल मांडवीला सहानुभूती वाटते. प्रीतीसारख्या कुणाबद्दलही. स्वतः थोडी तोशीस सहन करून दुस-याला मदत करणं हे मूल्य ती मागे सोडून आलेल्या जगातलं होतं, इथं हा अवगुण समजला जातो हे मांडवीच्या लक्षात येत नाही.
उदाहरण द्यायचं तर, एक दिवस दारावर एक बाई मोजे विकायला घेऊन आली. तीन मोज्यांचे जोड घेतले तर तीन फ्री मिळणार असे ती सांगत होती. कोण भला माणूस एकसारखे सहा मोज्यांचे जोड विकत घेईल! म्हणून मांडवीला तिची दया आली. कशी विकणार ही मोज्यांचे एवढे जोड? दिवसभर घरोघरी जाऊन मोज्यांची शिफारस करायची, मग स्वतःच्या घरी जाऊन घरातली कामं निपटायची. असा विचार करत मांडवीने तिच्याकडून ते सहा जोड घेऊन टाकले. घरात सगळे मांडवीच्या या स्वभावाला जाणून होते. कुणी काहीच बोललं नाही.
एकदा अशीच एक बाई आली. ‘‘मी वारीला आल्येय. दक्षिणा दे. थोडीशी साखर दे.’’ मागायला लागली. मांडवीने पैसे आणून दिले तर म्हणाली, ‘‘चहापत्ती आणि साखर पण दे.’’
मांडवीने पाहिलं, चहापावडर संपत आली होती. पण टी बॅग्ज होत्या कशावर तरी मिळालेल्या. तिने त्याच दिल्या. ती बाई म्हणाली, ‘‘अगं बया, हे काय! वारीतले समदे हसतील. बरं चल, राहू दे. आता एक साडी दे पाहू. मला बाबांनी तुझ्याकडं पाठवलंय.’’
मांडवीने लाल रंगाची एक जुनी साडी आणली. ती म्हणाली, ‘‘देवाला मेंदी रंग पसंत आहे. हिरवा हिरवा.’’
मांडवीकडे हिरवी साडी नव्हती. ज्या ज्या दाखवल्या त्या तिला पसंत पडल्या नाहीत. शेवटी ती लालच तिने ठेवून घेतली. मांडवीला भरभरून आशीर्वाद दिले. ‘‘घरात बरकत येईल. सगळ्यांचं कल्याण होईल. तू मोठ्या मनाची आहेस. बाबांनी मला तुझ्याकडं पाठवलंय.’’
मग मांडवीने घातलेल्या पंजाबी ड्रेसकडे पाहून म्हणाली, ‘‘असा एक डरेस दे माझ्या मानलेल्या मुलीला’’ मांडवीला हसू आलं. तिने एक ड्रेस आणला. तो बाहीवर थोडासा फाटलेला होता. ते पाहून बाई म्हणाली, ‘‘हा कसा घालेल ती ?तिला लाज वाटते. दुसरा दे ना.’’
मांडवीने दुसरा ड्रेस आणून दिला. तो मेंदी कलरचा होता. बाई एकदम खूश झाली. ‘‘मेंदी रंगाचा आणलास. हा रंग देवाला पसंत आहे.’’
मांडवीने तिला हे विचारलं नाही की, देवाने स्वतः सांगितलंय, त्याला हा रंग पसंत आहे असं?
बाईने सा-या गोष्टी तिच्या पिशवीत भरल्या. मांडवीच्या हातात खडीसाखर ठेवली. खडीसाखर काढता काढता तांदळाचे दाणे खाली पडले. ती म्हणाली, ‘‘या घरात माझे तांदूळ सांडले. लक्ष्मी सांडली. या घरात सगळ्यांचं सगळं चांगलं होईल. मला, या बहिणीला विसरू नकोस. मी पुन्हा येईन प्रसाद घेऊन. आता इतकं सगळं दिलंयस तर चप्पल पण देऊन टाक. मग झालं.’’
शेवटी मांडवीची स्लिपर घेऊन ती गेली.
हा सगळा किस्सा ऐकून मांडवीच्या शहरातल्या बहिणी हतबुद्ध झाल्या. मग तिच्यावर तुटून पडल्या, ‘‘हद्द झाली तुझी. कपडे, पैसै, चहा पावडर, साखर, चप्पल... संसारच थाटून दिलास तिला. ती काय देणेकरी होती तुझी? या शहरात असं राहिलीस तर एखाद् दिवशी घर लुटून नेतील लोक. कुणालाही घरात पाऊल नाही टाकू द्यायचं. अनोळखी लोकांना दारच नाही उघडायचं.’’
मांडवी भोळेपणाने म्हणाली, ‘‘मी काही माझ्या गरजेच्या गोष्टी नाही दिल्या. तिला त्या खूप गरजेच्या होत्या. माझ्याकडे पडूनच होत्या. चांगली वाटत होती ती बाई.’’
दोघी बहिणींनी कपाळावर हात मारून घेतला.
अशी मांडवी. ती प्रीतीला शक्य तितकी मदत करणारच. तिने सांगूनही टाकलं, पप्पूला आणीन. काळजी करू नकोस.
दुस-याच दिवशी तिच्या राजूला ताप आला. तिने त्याला शाळेत पाठवलं नाही. तिच्याच कॉलनीत त्या शाळेत जाणारी अजून दोन मुलं होती. शिरीष आणि नंदू. नंदूला स्वतः तिने अनेकदा शाळेतून आणलं होतं. नंदूच्या आईला आज तिने पप्पूला आणायला सांगितलं, ‘‘तू पप्पूला घेऊन ये. मी कॉलनीच्या गेटपाशी थांबीन. पप्पू आला की त्याला त्याच्या नानांपाशी सोपवीन.’’
सगळं ठरलं. नंदूची आई मुलांना आणायला गेली.
मांडवी बरोबर अकरा वाजता कॉलनीच्या गेटपाशी पप्पूला घ्यायला गेली. दुस-या बाजूला पप्पूचे नाना उभे होते. ते म्हणाले, ‘‘हे काय? तू पप्पूला आणणार होतीस ना?’’
मांडवी आपण बेजबाबदार नाही आहोत हे सांगायला उतावीळ झाली. ‘‘आज आमच्या राजूला ताप आला. त्याला शाळेत नाही पाठवलं. पप्पूला आणायला सांगितलंय कुणाला तरी.’’
कडक ऊन पडलं होतं. ती जागा वाट पाहण्यासाठी अजिबात योग्य नव्हती. एकामागून एक अशा तीन बसेस रस्त्यावर येऊन उभ्या राहिल्या. त्यांच्या मध्ये मध्ये जी थोडी रिकामी जागा होती तिच्यात वाकून पाहात रिक्षा शोधायच्या, रिक्षात दोन मुलं आणि एक बाई आहे का तपासायचं, तापातल्या राजूचं ‘कडेवर घे’ चं टुमणं ऐकायचं. या सगळ्यात वीस-पंचवीस मिनिटं गेली. ती पप्पूसाठी काळजीने आणि दिलेलं वचन निभावू न शकण्याच्या अपराधभावाने भरून गेली.
ती पप्पूच्या नानांना म्हणाली, ‘‘तुम्ही इथं थांबा. मी आत कॉलनीत रिक्षा गेलीय का पाहून येते.’’
रस्ता क्रॉस करून ती कॉलनीत गेली. रिक्षा आलेली नव्हती.
तेवढ्यात शिरीषचे बाबा स्कूटरवर आले. शिरीष पुढे उभा होता आणि मागच्या सीटवर पप्पू बसला होता. पप्पूला पाहिल्यावर तिच्या जिवात जीव आला. एवढासा पप्पू. कुठल्यातरी पूर्ण अनोळखी माणसाच्या स्कूटरवर बसून मांडवीकडे आला होता. मांडवीशी त्याची काही खूप ओळख नव्हती. मांडवीने त्याला स्कूटरवरून उतरून घेतलं आणि शिरीषच्या बाबांना विचारलं, ‘‘हा तुमच्याबरोबर कसा काय आला?’’
‘‘नंदूची आई याला आणि आणि नंदूला घेऊन रिक्षात बसली तेवढ्यात कसा कोण जाणे, नंदू पडला रिक्षातून.’’
‘‘काय सांगता?’’
‘‘हो. फार लागलं नाही त्याला. पण मग त्याची आई त्याला घेऊन दवाखान्यात गेली. मग याचं काय करणार? म्हणून मी घेऊन आलो.’’
ते ऐकून मांडवी गार पडली. तिने शिरीषच्या बाबांचे पुन्हा पुन्हा आभार मानले. मग एका हाताने पप्पू आणि दुस-या हाताने राजूचं बोट धरून रस्ता क्रॉस करू लागली. रस्त्यात रिक्षास्टॅण्डच्या रिक्षा कशाही उभ्या होत्या. त्यांच्या मधून रस्ता काढत, वाहनांना चुकवत कशीबशी पलीकडे पोचली तर बरोबर त्याचवेळी नाना रस्ता क्रॉस करून पलीकडे जाताना दिसले, कॉलनीत.
‘‘नानाऽ नानाऽ’’ ती जोरात हाका मारायला लागली, पप्पूपण. पण त्यांच्यापर्यंत एकही हाक पोचली नाही. पुन्हा कसरत करून मुलांना घेऊन तिथं पोचेपर्यंत तिने हाकांनी सारा रस्ता जागृत करून टाकला. नाना सोडून.
अखेर तिने नानांकडे पप्पूला सोपवलं. सगळं सांगितलं. आता तिला काळजी वाटत होती नंदूची. तिनंच पप्पूला आणायचं काम नंदूच्या आईवर सोपवलं होतं. त्यामुळे नंदू पडला हे ऐकून ती फार काळजीत पडली होती.
तेवढ्यात रिक्षा येऊन थांबली. त्यात नंदूची आई. तिच्याबरोबर डोक्याला पट्टी बांधलेला नंदू आणि खांद्यावर झोपलेला छोटा टिनूपण.
‘‘काय झालं?’’ मांडवीनं अधीरतेनं विचारलं.
‘‘याला घे.’’ नंदूच्या आईने टिनूचं गाठोडं मांडवीच्या हातात दिलं आणि ती उतरली.
‘‘न जाणे, कुणाचं तोंड पाहिलं होतं आज सकाळी. जीव वाचला, नंदूच्या पायावरनं रिक्षा जाणार होती आज. तो पप्पू एका कोप-यात बसला होता, हा एका कोप-यात. त्याला नीट बसवत होते तर हा इकडून पडून गेला.’’
याचा अर्थ पप्पूमुळेच हे घडलं होतं. म्हणजेच मांडवीमुळे. या घटनेला जबाबदार कोण? प्रीती आणि पप्पूची आई एकमेकींना ओळखतही नाहीत. नंदूला काही झालं असतं तर प्रीती जबाबदार नाहीच. मांडवीच.
मांडवी कुणाला मदत करत होती?
मांडवी कुणाच्या जगण्याला आणि मृत्यूला जबाबदार होती?
या सगळ्या घटनेशी मांडवीचा काय संबंध होता?
यातल्या कुठल्या गोष्टीशी नंदूच्या आईचा संबंध होता?
प्रीतीच्या समस्येशी नंदूच्या आईचा काय संबंध?
पप्पूला घरी आणणा-या शिरीषच्या बाबांचा प्रीतीशी काय संबंध?
कोप-यावर उभ्या, कमी दिसणा-या व ऐकू येणा-या नानांचा शिरीषच्या बाबांशी काय संबंध किंवा नंदूच्या आईशीही काय संबंध?
हे सगळे एकमेकांचे कोण लागतात? कुणीही नाही.
या सगळ्या एकमेकांशी संबंध नसलेल्या माणसांमध्ये एका घटनेचा एकत्रित अनुभव यायला मांडवीच जबाबदार होती.
जे घडतं त्यावर कुणाचा अधिकार असतो! चालता चालता एखादा माणूस खड्ड्यात पडतो तो कुणामुळे?
हा विचार करत मांडवी जिना चढत होती. तिच्या घरात फोनची रिंग वाजत होती.
धावत जाऊन तिने फोन उचलला. प्रीती बोलत होती, ‘‘हॅलोऽ, प्रीती बोलतेय. पप्पू ठीक आहे ना गं? काल त्याच्या डोक्याला लागलं होतं. मी विसरूनच गेले होते आणि आज मला पुन्हा पुन्हा तेच आठवतंय. कामात लक्ष लागत नाहीये. घरी चाललेय रजा घेऊन’’ रडवेला होत जाणारा तिचा स्वर.
आपल्या बाळाकरता तडफडणारी ही या शहरातली आई!
मांडवीनेपण धडा घेतला, नाही करायची दुस-याला मदत या शहरात, काही खरं नाही.
***
No comments:
Post a Comment