Tuesday 31 March 2020

मग? ....

मग?

- सुजाता महाजन
   



सकाळी सकाळी पहिली वाईट बातमी आली. तारामावशी गेल्या! ‘क्षिप्रा’ हे ऐकल्यावर सुन्न होऊन बसली. काल रात्रीच ती तारामावशींना भेटली होती. काल सकाळी जेव्हा ती नेहमीप्रमाणे तारामावशींकडे गेली तेव्हा त्या संपूर्ण चेकअपसाठी हॉस्पिटलमध्ये गेल्याचं कळलं होतं म्हणून ती रात्री काय झालं चेकअपचं विचारायला गेली होती. तिला मावशींची काळजी नेहमीच वाटायची.


क्षिप्राला इथं येऊन, या कॉलनीत, फक्त दोनच महिने झाले होते. शहरातही ती नवीन होती. तिला सारखी आईची आठवण येत होती. आल्या आल्या पहिल्याच दिवशी तारामावशी भेटल्या. त्यांचे पती सोसायटीचे चेअरमन असल्यामुळे क्षिप्रा काहीतरी विचारायला त्यांच्याकडे गेली होती. तारामावशींची मुलं अमेरिकेत. घरी नवरा, सासू न त्या, तिघेचजण. त्यांना दम्याचा खूप त्रास होता. तरी घरातलं सारं कामकाज नीटनेटकं करायच्या. कॉलनीतल्या लोकांमध्ये त्यांचं मिसळणं व्हायचं नाही कारण त्यांना जिना उतरायचीसुद्धा मनाई होती. महिना - पंधरा दिवसातनं डॉक्टरांना दाखवण्याच्या निमित्तानेच खाली उतरायच्या. त्यांच्याकडे येणारं जाणारंही कुणी नव्हतं.


क्षिप्रा त्यांच्याकडे पहिल्याच दिवशी गेली आणि जातच राहिली. तारामावशींना बाहेरून काही लागलं तर आणून द्यायची. माळ्यावर ठेवलेलं काही काढायचं असेल तर काढून द्यायची. तारामावशीही तिचे लाड करायच्या. नवीन लोणचं केलं की पहिलं वाटीभर क्षिप्रासाठी. लाडू केले की पहिला लाडू खाणार क्षिप्रा.


काल रात्री जेव्हा ती त्यांना भेटायला गेली तेव्हा तारामावशी फार थकलेल्या वाटत होत्या. पण रिपोर्टस्‌ सर्व नॉर्मल आले होते म्हणून खुश पण होत्या. आपल्या व्याधिग्रस्त शरीरावर जोक करत होत्या, हसत होत्या.
आणि रात्रीतूनच त्या गेल्या.


बातमी कळल्यावर क्षिप्रा धावत धावत गेली. घरात प्रत्येक ठिकाणी त्यांचं अस्तित्व जाणवत होतं. त्यांनी स्वतः केलेली मिठाई टेबलवर ठेवलेली होती. गॅसवर त्यांनी केलेल्या भाजीची कढई होती. फ्रीजमध्ये त्यांनी केलेली विविध प्रकारची लोणची होती.


एकेका भांड्यात त्यांचं मन होतं. कुठलीही गोष्ट त्यांनी कधी फेकून दिली नाही. प्रत्येक वस्तूचा होता होईल तो अनेक प्रकारे उपयोग करायच्या. मुलांचे लहानपणीचे कपडेसुद्धा त्यांनी सांभाळून ठेवले होते. एकमेकांशी अजिबात न जुळणा-या आकाराची भांडी, कुणाच्याही मापाचे नसलेले असंख्य कपडे, एका बाजूने लिहिलेल्या को-या कागदांचे ढीग, फाटलेल्या चादरी, उशांचे अभ्रे हे सगळं त्यांनी साठवून ठेवलं होतं. इतकंच काय, केस विंचरल्यानंतरची गुंतवळं जमवून त्यांनी स्वतःसाठी एक गंगावनही केलं होतं.


या सा-या गोष्टी क्षिप्राने आधीसुद्धा पाहिल्या होत्या. पण तारामावशींच्या जाण्यानंतर त्यांचं अस्तित्व एकदम हिंसक वाटायला लागलं. आता त्यांचे पती, दिवाकर, हे सगळं एक मिनिटात फेकूनही देतील. तारामावशीने आपल्या मनात कितीतरी मान - अपमान खोल साठवून ठेवले होते. त्यांची काय व्यवस्था लावायची होती त्यांना? क्षिप्राला वाटलं, रोज थोडा थोडा कचरा आपण आपल्या आतल्या कप्प्यांमध्ये साठवत राहतो, ‘कधीतरी सवड काढून आवरू’ म्हणत आणि अस्ताव्यस्त, न आवरलेले कप्पे ठेवून तसेच आपण घर सोडून जातो. किती अमानुष पद्धतीने जगण्याशी बांधलेले असतो आपण.


क्षिप्रा जेव्हा तारामावशींच्या मृतदेहासमोर उभी राहिली तेव्हा या विचारानेच तिला रडू कोसळलं.
तारामावशी तिच्यासाठी काय होत्या, ती त्यांच्यासाठी काय होती हे फक्त दोघींच्या घरच्यांनाच ठाऊक होतं. कॉलनीतले सगळे लोक तिथं जमले होते. क्षिप्राचं रडणं पाहून त्यांना खूप विचित्र वाटलं. काल - परवा कॉलनीत आलेली ही बाई तारामावशींसाठी एवढं रडतेय? हिला काय अधिकार?
सगळ्यांच्या चेह-यावरचं आश्चर्य जाणवल्यावर क्षिप्राने स्वतःला सांभाळलं. ती शांत झाली. पण बायकांनी तिचा पिच्छा सोडला नाही. ‘क्षिप्रा’ च्या पाठीवरनं हात फिरवत एक बाई बाकीच्या बायकांना सांगू लागली, ‘‘नुकतीच तिची सासूपण गेली ना! म्हणून इतकी रडतेय ती. तिला आठवत असेल सारं.’’ हे समर्थन आवश्ययकच होतं, नाहीतर तिच्या दुःखाचा हिशोब लावायचा कसा?


संध्याकाळी त्यांच्यापैकी एक बाई क्षिप्राला मंदिरात भेटली. तिने विचारलं, ‘‘नातं होतं तुझं त्यांच्यांशी काही?’’
विषय ताजा होता त्यामुळे ती काय म्हणतेय ते जाणून क्षिप्राने उत्तर दिलं, ‘‘नाही.’’


‘‘मग?’’


या ‘मग?’ शब्दात समाजाचे नियम लपलेले होते. काही स्पष्ट, काही अस्पष्ट. चालायचं होतं ते या नियमांना अनुसरून. यात एक अलिखित नियम असा होता की, आपलं ज्याच्याशी समाजमान्य नातं नाही, समाजाला ज्ञात असलेली मैत्री नाही त्याच्यासाठी आपण रडू शकत नाही. यापेक्षा ‘उगीच जास्त’ काही करण्यासाठी समाजमान्यता नव्हती. ‘मग’ एवढाच दोन अक्षरी शब्द प्रश्नांकित होऊन आला की समर्थनाची मागणी करू शकतो.


क्षिप्राला आठवलं, काही दिवसांपूर्वी म्हंजे सासू जाण्यापूर्वी ती सासूबरोबर एका दुकानात काहीतरी खरेदी करून बाहेर पडली. तेवढ्यात समोरच्या रोडवर एका ट्रकचा एका मोटरसायकलला थोडासा धक्का लागला. मोटरसायकलवाला गोल फिरून प्रचंड जोरात आपटला. इतका जोरात की, ‘माय गॉड!’ करत क्षिप्रा जोरात पुढे धावली. त्या मोटरसाकयकस्वाराला लोकांनी सांभाळलं, उचललं. पण क्षिप्राचं धावत जाणं, सासूच्या आणि जवळपासच्या लोकांना चेह-यावर तीव्र निषेधाची प्रतिक्रिया उमटवून गेलं. रात्रीपर्यंत सासू तिच्याशी नीट बोलली नाही.


म्हंजे क्षिप्राला अधिकार नाही, तारामावशींसाठी रडण्याचा. नाहीतर तिला त्यांच्याशी असलेले जे काही आपुलकीचे संबंध, त्यातला धागा न्‌ धागा समोर एक्झिबिट करावा लागेल.


काही दिवसांनी आणखी एक बाई क्षिप्राला दुकानात भेटली. तिने विचारलं, ‘‘तुमचं त्यांच्याशी काही नातं होतं का?’’ आता या गोष्टीला बरेच दिवस झालेले असल्याने क्षिप्रा विसरली होती. पण बाईच्या मेंदूत तारामावशीचा मृत्यू आणि क्षिप्राचं रडणं यांची सांगड घातली गेली होती.


क्षिप्राने विचारलं, ‘‘कुणाशी?’’


‘‘त्याच, तारामावशींशी’’


‘‘नाऽही’’


‘‘मग?’’


त्यांनी, क्षिप्राला आपल्या अश्रूंचं प्रयोजन सांगणं बंधनकारक करून टाकलं. रडण्याच्या अधिकाराचं विस्तृत समर्थन दिल्याशिवाय आता क्षिप्राची सुटका नव्हती.

No comments:

Post a Comment