Monday 30 March 2020

एका दिवसाची शांतता



गुरुवारी मोदींनी सहृदयतेने एक सदिच्छा व्यक्त केली. करोना नावाच्या विषाणुला पायबंद घालण्यासाठी. रविवारी २२ मार्च २०२० या दिवशी भारताच्या अत्यावश्यक सेवा करणारांखेरीज संपूर्ण जनतेने कोणत्याही कामासाठी घराबाहेर पडायचे नाही. आणि संध्याकाळी ५ वाजता ५ मिनिटांपर्यंत आपल्या घराबाहेर येऊन अशा अत्यावश्यक सेवा देणाऱ्या सर्वांबद्दल सामूहिक कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी उचित साधनांनी उच्चारव करावयाचा. गेले दोन दिवस बहुतांश लोकांचा या कल्पनेला पाठिंबाच दिसला. काही नतद्रष्ट प्रत्येक समाजात असतातच. आताही ते प्रकट झालेच. पण अनेकांच्या दृढ निश्चयाने त्यांचा प्रभाव क्षीणच झालेला दिसला.
     
प्रत्यक्षात रविवारी तर खरोखरच सात वाजेपर्यंतही लोकांनी गडबड न करता शनिवारच्या रात्रीपासूनच घरात रहाणे मान्य केले असे दिसले. अगदी लहान लहान मुलेही दिवसभर घरातच होती. याचाच अर्थ त्यांच्या शिक्षकांनी त्यांना दोन दिवस शाळेत उचितरित्या असे करणे आवश्यक का आहे ते समजावले असावे. तसेच पालकांनीही त्यांच्याशी घरात योग्य असा संवाद ठेवून त्यांना घरात रमवले असावे.
     
आपल्या भारतीय संस्कृतीत अशी शांतता राखण्याचे, कृतज्ञता व्यक्त करण्याचे अनेक उपक्रम दिले आहेत. पण आपणच त्यापासून खूप लांब निघून आलो आहोत. आता करोना या विषाणूने आपल्याला ती शांतता अनुभवण्याची, कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी दिली असे म्हणायला हवे. कोणत्याही प्रकारच्या वाहनांचा कर्णकर्कश्श आवाज, विविध ठिकाणचा कोणत्याही कारणाने होणारा गलबला आज कुठेही नव्हता. झाडांवरचे पक्षीही आज मुक्तपणे आकाशात विहार करत असतील. त्यांच्या उड्डाणांना कोणत्याही प्रदूषणाचा अडथळा आला नसेल आज. आमच्या घरामागेच नदी, झाडे आहेत. त्यावर एरवीही पक्षी असतातच पण आज त्यांचा दिवसभर कलरव जितका नादमधुर होता तितका नित्य नसतो किंवा असला तरी आपल्यापर्यंत पोहोचत नसेल.
     
प्रत्येक घराने आज आपल्या कुटुंबियांसोबत अनेक गोष्टी पुन्हा नव्याने केल्या असतील. अनेकांनी आपापल्या आवडीचे छंद पुरवले असतील. निवांतपणे भोजन केले असेल. काहींनी आपापल्या उपासना केल्या असतील. एकूणच संपूर्णपणे सकारात्मक उर्जेने दिवस घालवतांना सगळ्यांना वेध होते ते संध्याकाळचे पाच वाजण्याचे. आमच्यासारख्या काही सख्यांनी आपापल्या घरी राहूनच भगवद् गीतेच्या अठरा अध्यायांचे २ ते पावणेपाच या वेळात पठण केले. तत्पूर्वी प्रत्येकीने ‘सांप्रतकाळी आपल्या भारत देशात तसेच पूर्ण विश्वात करोना नावाच्या विषाणुचा प्रभाव कमी करण्यासाठी आणि भारतीयांचे निरामयजीवन सुकर होवो तसेच या आपत्तीने होणाऱ्या आर्थिक दुष्परिणामांचे उपशमन होऊन सर्वांचेच मनोबल, शारिरीक बल वर्धिष्णु व्हावे यास्तव मी∕ आम्ही गीतापाठ करीत आहे. परमेश्वर त्यास साह्य करेल ही माझी दृढ श्रद्धा आहे.’ असा संकल्प केला.
     
बरोबर ५ वाजता आमचे पठण आणि त्यानंतरचे गीतामहात्म्य, क्षमापना, प्रार्थना, आरती संपन्न होताच सगळीकडून नादब्रह्माचा स्वर उमटला आणि आम्हीही त्यात सहभागी झालो. अनेकांना अशी कृतज्ञता व्यक्त करतांना आपले अश्रू अनावर झाले. दिवसभराच्या शांततेनंतर, परस्परांपासून अलग असतांनाही जे भावनेचे ऐक्य होते त्याचा अनुभव मिळत असणार. संपूर्ण देशाच्या ऐक्याचे असे प्रत्यंतर आपण अनुभवत आहोत ही अत्यंत सुखद गोष्ट वाटली असणार प्रत्येकाला. ५ मिनिटांच्या या नादब्रह्माने केलेली जादू प्रत्येकाच्या बोलण्यात व्यक्त होत राहील.
     
मला वाटते या संधीचा उचित उपयोग करून घेण्याचा मार्ग आपण आता निवडला पाहिजे. आपल्या संस्कृतीतले सगळेच काही आंधळेपणाने घेण्याची, करण्याची काहीच आवश्यकता नाही. पण जे वाईट आहे ते सोडून चांगले आहे त्याचा डोळसपणाने पुढच्या पिढीला वारसा सोपवला पाहिजे.
     
धोक्याच्या घंटीने आपण सावध झालो आहोत आता बुडण्याची वेळ येईपर्यंत वाट न पाहता आज जसे एकत्रितपणे, खंबीरपणे, संयमितपणे वागलो तसेच कायम वागू या.


By

Padma Dabke


No comments:

Post a Comment