Monday 30 March 2020

पार्वती शक्तीपीठ यात्रा

पश्चिम बंगालमधील देवीच्या  चौदा शक्तिपीठांचे दर्शन घेण्याची संधी आली. हिंदूंची शक्तीपिठे ही पुरातन मंदिरे आहेत. तेथे देवीच्या विविध रूपातील पार्वतीची म्हणजेच शक्तीची उपासना चालू आहे. प्रत्येक शक्तीपीठा साठी एक भैरव मंदिर आहे. भैरव म्हणजे शंकराचे संरक्षक रूप. त्याचप्रमाणे महादेव हे विश्वाचे स्वामी आहेत त्यामुळे शक्तिपीठे ही शिव व शक्ती यांच्या प्रार्थनेची मंदिरे समजली जातात व त्यातून चैतन्य ऊर्जा आणि शक्ति(+energy) यांचा लाभ होतो. या भावनेतून ही यात्रा केली जाते . असो. 

पश्चिम बंगाल बरोबर  झारखंड छत्तीसगड आणि आंध्र प्रदेश   यामधील  चार शक्ती पीठांचे दर्शन  घेतले. त्याच्याबरोबर विविध स्थळांचे  म्हणजेच कलकत्त्यातील दक्षिणेश्वर व बेलूर मठ,गंगासागर, शांतिनिकेतन, मायापुर,  छत्तीसगड मधील जगदलपुर येथील प्रसिद्ध जलप्रपात,आंध्र प्रदेशातील अराकु व्हॅली आणि बोरा केवज, ओरिसा चा काही भाग विशाखापट्टण इत्यादी ठिकाणे  बघता आली. पंधरा दिवसात कारने सुमारे  4500 किलोमीटर प्रवास झाला. छोटी-मोठी शहरे, गावे, खेडी, पाडे, डोंगर-दर्‍या, पठारी प्रदेश,जंगले, मोठे हायवे, छोटे रस्ते, उजाड प्रदेश, हिरवीगार वनश्री, अशा सर्व प्रदेशातून आम्ही फिरलो. श्री सुनिल व सौ मनीषा गांधी , सौ शैला वेलणकर  व मी असे चार  मुसाफिर होतो .या सर्व प्रवासाचा मार्गदर्शक अर्थातच आपला सर्वज्ञानी गुगलदादा आणि जीपीएसताई! 

काही शक्तीपीठे ही  शहरांमध्ये/ गावांमध्ये असून काही ग्रामीण भागांमध्ये आहेत. वैशिष्ट्य म्हणजे  ही सर्व  मंदिरे स्वच्छ असून वातावरण पवित्र राखले गेले आहे. सर्व ठिकाणी यथासांग पूजा चालते. सगळ्या मंदिरांमध्ये कमी-जास्त प्रमाणात भाविकांची गर्दी असते. काही मंदिरांजवळ  तलाव किंवा नदी आहे.  काही मंदिरे  निसर्गरम्य परिसरात आहेत.  बंगालमधील तारापीठ हे खूप पुरातन शक्तिपीठ असून त्याच्या  विस्ताराची तुलना फक्त जम्मूतील वैष्णवी देवी बरोबर होईल. आम्ही तिथे दर्शनाला गेलो असताना एक विचित्र अनुभव आला. मी तिथल्या दान पेटीत दान करण्यासाठी हातात पैसे ठेवले होते. माझा हात 2 पंड्यांनी गच्च धरून  माझ्या मुठीतले पैसे  काढून घेण्याचा प्रयत्न केला. आणखी एके ठिकाणी मी  दानपेटी कुठे असे विचारता तेथील पंडे  दान पेटी च्या पुढे  घेराव घालून बसले. तर झारखंडमधील बाबा वैजनाथ धाम  येथील भयंकर गर्दी  आणि आक्रमक बेशिस्त दर्शन रांग पाहून  आम्ही  भयचकित झालो .असे दोन-तीन प्रसंग सोडता  बाकी सगळीकडे चांगलाच अनुभव आला. काही देवळांमध्ये अजून बकरा बळी देण्याची पद्धत आहे हे पाहून वाईट वाटलं. बंगाल मधील  तामलूक येथील विभास देवीला दररोज दुपारी जिवंत माशाचा नैवेद्य दिला जातो हे पाहून गंमत वाटली.

ही यात्रा करताना एक जाणवलं की  या सर्व राज्यांमध्ये  धाब्यांवर  स्वच्छ  आणि चांगले जेवण,चहा  मिळत होते.  बंगालमध्ये  छोट्या गावांमध्ये  आणि टपरीवजा दुकानांमध्ये सुद्धा रसगुल्ले आणि गुलाबजाम  ताजे मिळत होते .गावांमध्ये  तर राहण्यासाठी  चांगली हॉटेल्स मिळालीच पण  हायवेलगत सुद्धा  रहाण्याची चांगली सोय झाली. बहुतेक सर्व ठिकाणी हायवेज चांगल्या स्थितीमध्ये आहेत. वाईट रस्ते  कमी आहेत. साधारण संध्याकाळी साडेपाच वाजता तिथे अंधार होई त्यामुळे त्याच्या नंतरचा दोन-अडीच तास  प्रवास  अंधारातच होत असे. काही वेळेला  हायवे जंगलातून जात असे. रस्त्यावर रहदारी अतिशय तुरळक आणि कित्येक किलोमीटर छोटे गाव सुद्धा लागत नसे.  वस्ती आणि दिवे दिसायला लागले की  बरं वाटे.  कारच्या टायर्सला  इ.अनेक वेळा रिपेअर करावे लागले परंतु अशी वेळ येताच जवळच  दुरुस्तीचे दुकान असे, शिवाय, अशी वेळ रात्री आणि जंगल प्रवासात कधी आली नाही ही केवळ ईश्वरी कृपाच म्हणावी.

कलकत्त्या पासून पूर्वेकडे व उत्तरेकडे जाताना  जमीन  दलदलीची दिसत होती . अनेक घरांना स्वतःचे एक छोटे तळे होते  की ज्यात स्वतःसाठी माशांची शेती करीत. एकंदरीत  हिरवाई तिथे भरपूर दिसली. लहान लहान गावांमध्ये सुद्धा  फळे आणि भाज्या भरपूर प्रमाणात विक्रीला होत्या.मैलोन मैल  वेगवेगळ्या  धान्यांची  शेती पाहायला मिळत होती आपला देश खरोखरच सुजलाम-सुफलाम आणि समृद्ध आहे हे सहज दिसून पडलं.  आसेतु हिमाचल आपली देवळे आणि परंपरा  यामध्ये साम्य आहे. तरीसुद्धा धार्मिक, साध्या, काहीशा भोळ्या अशा माणसांचा हा हिंदू समाज संघटित करणं आणि हिंदूंच्या अस्तित्वाच्या लढ्यासाठी भूमिका तयार करणं हा केवढा प्रचंड आणि  उद्यम आहे या विचारांनी मन खंतावले! या समृद्ध भूमीवर हिंदू परंपरा चिरकाल सुरक्षित राहो  व  वृद्धिंगत  होवो अशी प्रार्थना आम्ही देवीजवळ केली.

By

Bharti Garud

No comments:

Post a Comment