Tuesday, 31 March 2020

एकेक बुरूज ढासळताना

रिदम हाऊस !  नावांतच लय असलेले संगीत प्रेमींच एक प्रेमाच ठिकाण. रिदम हाऊसची स्थापना कधी झाली ? हे मला माहित नाही, पण माझा त्याच्याशी संबंध साठीच्या दशकातील. पूर्ण अर्ध शतकाचे नाते !

त्यावेळेला रेकॉर्ड (तबकड्या) होत्या. कुणीही तिथे जाऊन आपल्याला हवी असलेली रेकॉर्ड तिथे असलेल्या Cubical मध्ये जाऊन ती ऐकू शकत असे. त्यासाठी कोणताही चार्ज नसे. अर्थात जाणारा माणूस रेकॉर्ड आवडली तर खरेदी करत असे. पुढे कॅसेटचा जमाना आला. हिंदुस्थानी, कर्नाटकी संगीत त्याचबरोबर सिनेसंगीत, सुगम संगीत अशा सर्व प्रकारच्या कॅसेटस् तिथे असत. एका एका गवयाच्या विविध रागातल्या अनेक कॅसेटस् तिथे असत.  तिथला सेवक वर्गही अत्यंत तत्पर. आपण एक विशिष्ट कॅसेट हवी आहे, असे सांगितले तर ते ती त्वरीत काढून देत, नसल्यास २-४ दिवसांत आणून ठेवीत.

दुपारच्या आणि संध्याकाळच्या वेळी विविध वयोगटातील लोकांची तिथे गर्दी असे. माझ्या पिढीला संगीताच्या बाबतीत रिदम हाऊसचा मोठा आधार होता किंबहुना रिदम हाऊसनेच आमचा संगीताचा कान तयार केला.

रेकॉर्डस्, कॅसेटस्, सीडी यानुसार होणाऱ्या बदलाला रिदम हाऊस सामोरे गेले. आपल्या ग्राहकांची संगीताची भूक, जिज्ञासा भागविण्याचा प्रयत्न करत राहिले. पण आता ती वेळ आली, रिदम हाऊस बंद झाले.

गेल्या अनेक दिवसांपासून बातम्या येत होत्या. पण एक वेडी आशा होती, हे घडणार नाही. तस तर ते समोरच असलेल्या 'समोव्हर'च्या बाबतीतही वाटत होते. 

रिदम हाऊसमध्ये कॅसेट, सीडी घेणं आणि समोव्हरमध्ये जाऊन निवांतपणे सँडवीच, कॉफी-चहा घेणं, ही एक वेगळ्या प्रकारची चैन होती आणि ती मी मनसोक्तपणे उपभोगली. तसेच शेजारचे way side inn तिथे fillet of pomphet खाणं म्हणजे अल्टीमेट होत.

काळाच्या थोड्याफार फरकाने ह्या स्वता:च institute असलेल्या संस्था आज बंद झाल्या आहेत. माझ्यासारख्या अनेकांच्या मनात अशीच हळवेपणाची भावना निर्माण झाली असणार आहे. आमच्या मुलांनाही आम्ही या ठिकाणांची गोडी लावली होती.

असे काही होईल, अस वाटत नव्हतं. पण काळाची पाऊले कोण ओळखू शकतो ? पण दु:ख जरूर आहे. ह्या संस्था आज बंद झाल्या, त्याची कारणे अनेक असू शकतील आणि ती valid ही असतील, पण घडते ते दु:खदायक आहे. ही मनातली सल आहे, ती थांबवणं आपल्या हातात नाही. तेव्हा आयुष्याच्या संध्याकाळी यांची आठवण काढत जगणं एवढचं आता उरलं आहे.

तिन्हीसांजेच्या वेळी अमीर खॉं साहेबांचा मांरवा ऐकताना जी हुरहुर निर्माण होते, ती कातरता आता जाणवू लागली आहे.

अलविदा...!  रिदम हाऊस... माझ्या आयुष्यातला मोठा काळ आनंदाने जगण्यासं मदत केल्याबद्दल आभार !...

            - सौ. मेधा आर. सुळे

No comments:

Post a Comment