माझी लहानपणची काही वर्षं (इ.3री ते 7वी) आजी आजोबांकडे सुखनैव गेली. वडलांची बदली मुंबईला झाल्यामुळे आणि तिथल्या शाळेत मी न रमल्यामुळे माझी रवानगी नाशिक मुक्कामी झाली. घरी मी, आज्जी नि आजोबा असे आम्ही तिघंच. त्यांना मी आज्जी नि बाबा म्हणायचे. ते दोघंही जवळपास नास्तिकच. घरात नावाला देवाच्या 2-3 तसबीरी. आज्जीची पूजा एका मिनीटात संपायची. तिचं वाचन अफाट. सगळी कामं आटपून तिला कधी एकदा निवांत वाचत बसते असं व्हायचं. शिवाय बाबा Civil engineer होते. त्यांनाही ती कामात मदत करायची. Drawings च्या blue prints काढणे, त्या वाळवणे वगैरे.
माझं आजोळही नाशिकचंच नि तिथेही फक्त आज्जी आजोबाच....कासत्या नि नाना. तिची भाचरं अगदी लहानपणापासून तिच्याकडे वाढली. त्यांची ती काशी आत्या. आईही तिला त्याच नावाने हाक मारायला लागली. त्या नावाचा मी केलेला अपभ्रंश कासत्या. या घरी देवधर्म भरपूर. कुळधर्म, कुळाचार, देवीचं नवरात्र, खंडोबाचं नवरात्र वगैरे, वगैरे. कासत्या देवळालीला एका शाळेत शिक्षिका होती. शाळा सांभाळून ती हा बाकी व्याप कशी सांभाळायची देव जाणे. तिकडे रहायला गेलं की उदबत्तीच्या सुवासाने, घंटेच्या किणकिणाटाने नि नानांच्या आरतीच्या सुरांनी सकाळी प्रसन्न जाग यायची.
कासत्याच्या शेजारी वैद्य मावशी व काका रहायचे. त्यांना मूलबाळ नव्हते. काका अगदी सामान्य रंगरूपाचे तर मावशी उंच , गोरी. परिस्थिती बेतासबात. अर्थात हे मला आता जाणवतंय तेंव्हा काहीच कळत नव्हतं.
दर गुरवारी त्यांच्या कडचं वातावरण एकदम बदलून जायचं. संध्याकाळी काका देवघरासमोर बसायचे. घर माणसांनी फुलून जायचं. उद, धूप, उग्र वासाची उदबत्ती नि फुलं ह्या संमिश्र वासाने वेगळंच वातावरण बनायचं. आरती सुरू झाली की काकांच्या अंगात यायला सुरवात व्हायची. लोकं त्यांना प्रश्न विचारायचे. ते काहीतरी पुटपुटायचे नि मावशी खड्या आवाजात त्यांना काय म्हणायचंय ते सांगायची. अर्थात तेंव्हा मला तिच्याकडे entry नसायची. कासत्याच्या घराच्या खिडकीच्या फटीतून हे सगळं दिसायचं. तेंव्हा काहीच कळत नव्हतं हा काय प्रकार आहे हे. फक्त एवढं मात्र वाटायचं की हे काकांच्या मनाविरूद्ध चाललंय. मावशी मला गुरूवारी घरी येऊच नको म्हणायची. ही सावली तुझ्यावर नको गं असं म्हणायची. नंतर नंतर माझी प्रश्नोत्तर फारच वाढायला लागल्यावर कासत्या नि आज्जीची काहीतरी खलबतं झाली असणार. त्यामुळे या ना त्या कारणाने माझं गुरूवारी तिकडे जाणं बंद झालं....
आता विचार करता असं वाटतं की थोडा समाजात मोठेपणा, थोडं अर्थार्जन ही, हा प्रकार सुरु करण्या मागची कारणं असू शकतील...
मी सहावीत असताना माझी एक मैत्रीण नेहेमी नाराज असायची. तिची बहीण खूप हुशार, आवाज छान असणारी नि ही सावळी, सामान्य शिवाय अभ्यासातही मागे असणारी. दुर्लक्षित. शाळेतही कोणाच्या खिजगणतीत नसणारी. कदाचित घरीही तुलना होत असेल. त्यांच्याकडे नवरात्र असायचं. त्यावर्षी अष्टमीच्या दिवशी देवीची आरती सुरु झाल्यावर हिच्या अंगात देवी आली आणि ही सुसाटली गावाबाहेरच्या कालिकेच्या देवळात. तिच्या मागे धावून घरच्यांची दमछाक झाली. पण नंतर घरात तिची category च बदलली....
या प्रसंगांमुळे माझी एकदम ठाम समजूत झाली की देव/देवी अंगात आली की सगळे आपलं ऐकतात...
होता, होता मी सातवीत गेले. तेंव्हा मला Scholarship च्या परीक्षेचं फार attraction होतं. परीक्षा द्यायची नि 8 वी ते10वी संपेपर्यंत दर महिना पगार घ्यायचा! हे खूप भारी वाटायचं. जणू काही परिक्षेला फक्त बसायचं एवढंच काम. पण यातली गोम नंतर कळली. शनिवार, रविवार क्लास. त्यामुळे खेळायचा वेळ drastically कमी झाला. हे काम फारच कठीण झालं. कॉलनीतले आपले दोस्तलोक आपल्याला चिडवून खेळतात याचा फारच मनस्ताप व्हायला लागला.
आणि मला एकदम जालिम उपाय सापडला...अंगात येणे...मैत्रीणीचं उदाहरण डोळ्यापुढे होतंच...
झालं.... एका शुक्रवारी सकाळी लौकर आंघोळ करून, दिवा लावून देवापुढे हात जोडून बसले. आज्जीचं लक्ष कधी जातंय याची वाट बघत...
शेवटी आज्जी म्हणाली, मंजा हे काय आता नवीन?
मी- कोणाला मंजा म्हणतेस?
आज्जी - अगंबाई ! मग तू कोण?
मी - सांडव्यावरची देवी...
आज्जी - हो का...मग इकडे कुणीकडे?
मी - चेष्टा नको.
आज्जी - चुकले बाई...पण लौकर बोल. मला कामं आहेत पुष्कळ.
मी - तुझ्या नातीला Schlorship च्या परीक्षेला बसवू नकोस. तिच्या नाजूक प्रकृतीला ते झेपत नाहिए. ही माझी आज्ञा आहे...
आज्जी (हसू दाबत)- ही.....आणि नाजूक...
मी - पुन्हा चेष्टा?
आज्जी - अगं बाई, तू थोडा उशीर केलास गं हे सांगायला...
मी - म्हणजे?
आज्जी - अगं आमची कुलस्वामिनी अंबाबाई आहे नं, कोल्हापूरची. ती काल रात्रीच माझ्या स्वप्नात आली आणि म्हणाली, नातीला Schlorship च्या परिक्षेला बसव. तिला चांगले मार्क मिळतील. तिचा महिन्याचा पगार सुरू होईल...शिवाय तिने असंही सांगितलं की अभ्यास करून तिला भरपूर खेळूदे. समोर कॉलनीत तर खेळणार. सगळी आपलीच तर माणसं...
मी- म्हणजे तू माझं ऐकणार नाहीस तर?
आज्जी - अगं काय करू? अंबाबाई आमची high command आहे. तिचं सांगणं नाही गं मी डावलू शकत...
मी - बरं ...ठीक आहे तर मग...
आज्जी उठून कामाला लागली नि तिचं लक्ष नाही असं बघून मी माझं original रूप घेतलं......आणि खरंच पुढच्या वर्षापासून माझा महिन्याचा पगार सुरू झाला.....
Manjusha Datar
ReplyForward |
No comments:
Post a Comment