Saturday, 1 August 2020

इची गो इची ए

मन", एक न दिसणारा, आपलाच पण कघी कघी आपल्यालाच न उमगणारा असा अविभाज्य भाग . क्षणात इकडे तर क्षणात तिकडे....सध्याच्या  लॉकडाऊनच्या या काळात तर, "अचपळ मन माझे नावरे आवरीता" हा प्रसंग वारंवार येतोय. जरा वेळ मिळाला की मन येतंय आपलं फिरून, ना त्याला काळवेळाचं बंधन ना अंतराच्या सीमा. 
         या अशा फिरण्यात  मनात घर करून बसलेल्या ठिकाणी तर अनेकदा फेरफटका होतो. मी अशीच खूप  वेळा , खूप ठिकाणी फिरून येते.  त्यात माझ्या  जिवाभावाचं  *"जपान"* असतंच असतं.आणि ओघानेच नाव गाव माहीत नसलेल्या परंतु माझ्या मनात कायमअसणाऱ्या त्या प्रेमळ बाईंची आठवण हमखास येतेच , त्यांच्या  " *इची गो इची ए*"  या शब्दांसहित.
   
     
  घटना तशी छोटीशीच.जपानमध्ये असताना प्रथमच मी एकट्याने बाहेर पडले होते  एका मैत्रिणीकडे राहायला जाण्यासाठी. रात्रीची वेळ होती. दोन -तीन  वेळा ट्रेन बदलून जायचं होतं आणि मोबाईल डेटा पॅक नसल्याने आधीच ट्रेनची माहिती व्यवस्थित काढून ठेवली होती.  तरीही चूक व्हायला नको   म्हणून ट्रेन चेंज करताना स्टेशन मास्तरना विचारून घेत होते . तेवढ्यात साधारणपणे सत्तरीच्या घरातल्या एक बाईंनी,  " मी तिकडेच चालले आहे , चल माझ्याबरोबर. मी दाखवते तुला " असं स्वतःहून म्हटलं.  मला अगदी हुश्श झालं. गप्पा मारत मारत आम्ही दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर पोचलो.  ट्रेनमध्येही आमच्या गप्पा सुरूच  होत्या.  इकेबानाच्या शिक्षिका होत्या त्या. लांबचा पल्ला होता तसा. जपानी माणसं ट्रेनमध्ये बोलत नाहीत सहसा, पण त्या  माझ्याशी स्वतः होऊन बोलत होत्या (अर्थातच जपानी भाषेत). त्यामुळे आजूबाजूची माणसंही तशी कुतूहलानेच  बघत होती आमच्याकडे.  माझ्या आधीच त्यांचं स्टेशन येणार होतं.  ते यायच्या अगोदर त्यांनी,  हातानी शिवलेला सुंदर असा, चॉकलेटनी  भरलेला बटवा पिशवीतून काढला आणि माझ्या हातात देत  म्हणाल्या    *" ही घे तुला व्हॅलेन्टाईनची भेट "* . हो.. तो दिवस  होता     *14 फेब्रुवारी 2014*  मला क्षणभर काही सुचलंच नाही इतकी  अवाक झाले होते मी. मग भानावर येऊन त्यांना  म्हटलं की माझ्याकडे आत्ता काहीच नाही तुम्हाला देण्यासारखं .    तुमचं नाव , पत्ता तरी  सांगा ना ,  निदान ई-मेल आयडी तरी द्या ,मी कॉन्टॅक्ट करीन तुम्हाला.  अगं नको,  *"इची गो इची ए देस"* असं त्या म्हणाल्या.  तेवढ्यात त्यांचं स्टेशनही  आलं  अन् पटकन त्या उतरुनही गेल्या.  पण गाडी दिसेनाशी होईपर्यंत हात हलवत  उभ्या होत्या त्या. मी प्रथमच ऐकत होते हे शब्द, अर्थ काही केल्या उलगडेना. दुसऱ्या दिवशी होस्टेलला पोचल्यावर डिक्शनरीतून अर्थ शोधेपर्यंत त्या बाई आणि त्यांचे ते शब्द माझ्या मनात पिंगा घालत होते.
  
   अर्थ पाहिला आणि मी थक्क  झाले. मोजक्या चार शब्दात खूप खूप काही सांगून गेल्या त्या....जीवनाचं सारच जणू.  
शब्दशः म्हणायचं झालं तर , "आयुष्यात कदाचित एकदाच घडणारा प्रसंग, त्याचा आनंद घे". पण हा एवढाच वरवरचा अर्थ अभिप्रेत असेल का ?  तो तर नक्कीच नसावा..नव्हे नव्हताच.

       आपल्या जीवनात घडणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला हे लागू  केलं तर,   " आहे तो क्षण समरसून जग, त्यातून आनंद घे " असाच नाही का गर्भितार्थ ? पण आपल्याला हे उमगतच नाही त्यामुळे आत्ताच्या क्षणात आपण पुढचा विचार करत बसतो  आणि सर्व काही गमावून बसतो आहोत. आहे त्या  " क्षणात " जगणं खरंच इतकं अवघड आहे का? की आपल्यालाच तसं करायचं नाहीये ? साधक बाधक विचार करून वागणं ठीकच आहे , परंतु लोक काय म्हणतील ? बरं दिसेल का?  या  आणि अशाच  अनेक कारणांमुळे आपण आपल्या उर्मी दडपून टाकत असतो. त्यापेक्षा  मनाचा कौल घेऊन वर्तमानात राहून  आनंद घेत जावा, देत जावा.  दुःखालाही याच प्रकारे सामोरं जावं.
     अर्थातच यात  बेलगाम वागणं अभिप्रेत नाही मला.  सजगतेने आहे तो क्षण जगावा .शंभर टक्के  हे जमेलच याची खात्री नाही, पण थोडा  प्रयत्न करायला काय  हरकत आहे ?  ते तर नक्कीच जमेल असं मला वाटतं.

     कोण कुठल्या एकदाच भेटलेल्या त्या बाई माझ्या मनात कायमचं घर करून बसल्या आणि खूप काही अमूल्य असं सांगून गेल्या. 
    कोणीतरी म्हणून गेलं आहे "नदीच्या कालच्या पाण्यात आज पाय बुडवता  येत नाही " 
इची गो इची ए यापेक्षा काही वेगळं सांगतंय का ?

*शामा छाजेड*

No comments:

Post a Comment