Saturday, 1 August 2020
यात्रा पंचकेदार, पंच प्रयाग व पंच बद्री
यात्रा पंचकेदार, पंच प्रयाग व पंच बद्री
खूप वर्षांपासून पंचकेदारला जायची इच्छा होती. पण स्वतःच्या पाठीवर सॅक घेऊन २१ दिवस ट्रेक करण्याची आता शक्यताच नव्हती. तरीपण चाचपणी सुरुच होती. माझे काका श्री. दत्तात्रय करंदीकर व त्यांचे स्नेही श्री. दामले यांच्याकडून असे कळले की, पंच केदारच्या (प्रत्येक केदारच्या) पायथ्यापर्यंत गाडी जाते. तिथून पुढे आपण ट्रेक करुन अथवा घोड्यावरून जाऊन दर्शन करु शकतो. त्यामुळे आम्हाला खूप आनंद झाला. सर्व माहिती त्यांच्याकडून गोळा करुन आम्ही आमचा कार्यक्रम ठरविला. (सफरचंद गृप - श्री. सुनील गांधी, सौ. मनिषा गांधी, श्री. वैभव गांधी, सौ. भारती गरुड, बेडगे व मी) श्री. करंदीकर व श्री. दामले हिमालयाचे एनसायक्लोपिडिया आहेत. तिकडच्या रस्त्यांची, गावांची खडानखडा माहिती आहे त्यांना.
आमची तारीख ठरली दि. १९.०९.२००९ ते ५.१०.२००९. दि. २० सप्टेंबरला आम्ही हरिद्वारला पोचलो व तिथून ६ जणांसाठी जीप बुक केली. दि. २१ पासून आमचा प्रवास सुरु झाला.
या शिवभूमीमध्ये उत्तराखंड राज्यामध्ये केदारनाथ, मध्वमहेश्वर, तुंगनाथ, रुद्रनाथ व कल्पेश्वर असे पाच पवित्र केदार असून त्यांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे.
केदारनाथ – पंच केदारमध्ये सगळ्यात महत्त्वाचा केदार म्हणजे रुद्रप्रयाग जिल्ह्यामध्ये स्थित असलेला केदारनाथ होय. हा १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. हरिद्वार-रुद्रप्रयाग-गुप्तकाशी-सोनप्रयाग पर्यंत बस∕जीपने जाऊन पुढे १८ कि. मी. पायी अथवा घोड्यानेजाऊन ३,५८५ मीटर उंचीवरील केदाराचे दर्शन घेता येते. सोनप्रयाग पासून गौरीकुंड-रामबाडा करत सतत ७०००∕७५०० फूट सतत चढावे लागते. वाटेत अगणित झरे, धबधबे, रानफुले बघून मन प्रसन्न होते. एका बाजूला महाकाय पर्वत व एका बाजूला खोल दरी व मधे साधा रस्ता.
केदार ग्लेशियर मधून उगम पावणाऱ्या मंदाकिनी नदीकाठी केदारनाथाचे घडीव दगडाचे मंदीर ७ ∕८ व्या शतकात बांधले असावे. येथे पाठीच्या स्वरुपातच शिवपिंडी आहे. सकाळी गाभाऱ्यात जाऊन दर्शन घेऊ शकतो. संध्याकाळी बाहेरुनच दर्शन घ्यावे लागते. एप्रिल∕मे महिन्यात अक्षयतृतीयेला हे मंदीर दर्शनासाठी उघडते. ते दिवाळीपर्यंत उघडे असते. नंतर अति बर्फवृष्टीमुळे बंद होते. केदारनाथच्या मंदीराच्या आणखी २५०∕३०० फूट उंचीवर भैरवनाथाचे मंदीर आहे. केदारनाथाच्या रक्षणासाठी द्वारपाल आहे असे समजले जाते.
२०१३ मध्ये आलेल्या महापुराने जुन्या रस्त्याचे फार मोठे नुकसान झाले. आता नव्याने चांगला प्रशस्त रस्ता बांधला आहे. आज काल हेलिकॉप्टरची पण सोय झाली आहे.
मधमहेश्वर – हा दुसरा केदार. येथे रासी गावापर्यंत बस∕जीपने जाता येते. पुढे चालत अथवा घोड्याने १८ कि.मी. जावे लागते. हा रस्ता दगडी असून मधे मधे राहण्याची सोय आहे. याजी उंची ३४९७ मीटर असून मधू गंगेच्या काठाने देवदार वृक्षांच्या सानिध्यातून निसर्गाचा आनंद लुटत जातांना कधी पोचतो ते कळत नाही.
येथे नाभीच्या स्वरुपात पिंडी आहे. या शंकराची पूजा ब्रह्मकमळाने केली जाते. रहाण्यासाठी धाबे आहेत. मधमेहश्वरापासून २ कि.मी. वर चढून बुढा मध महेश्वराचे मंदीर आहे. चौखंबा या महाकाय पर्वताचे अतिशय सुंदर व जवळून दर्शन होते. ३८०° चा सर्व बाजूंनी सुंदर नजारा बघतांना मन अत्यानंदाने भरुन येते. निरव शांतता मनाला मिळते. हे मंदीर अक्षयतृतीयेनंतर उघडते व दिवाळीनंतर बंद होते.
तुंगनाथ – तुंगनाथ हा तिसरा केदार असून उखीमठ- गोपेश्वर मार्गावर चोपटा ही एक जंगलातील वस्ती आहे. तेथपर्यंत बस∕जीपने जाऊन तेथून ५ कि.मी. पायी वा घोड्याने जाता येते. हा रस्ता उत्तम बांधला असून सतत ५००० फूट चढत जावे लागते. सुरुवातीला देवदारच्या वृक्षराजीतून जाता जाता पुढे अतिसुंदर कुरणे बघायला मिळतात. त्याला बुग्याल म्हणतात. बुऱ्हांस∕ न्होंडोडेन्ड्रनची फुललेली लाल फुले बघून मन शांत होते. इथे थोडी वस्ती आहे व राहण्यास धाब्याची सोय आहे.
तुंगनाथ येथे बाहूच्या रुपात पिंडी आहे. त्याचेच दर्शन घेता येते. मंदिराजवळ पांडवांच्या मूर्ती आहेत तसेच भैरवनाथाचे पण मंदीर आहे. तुंगनाथची उंची ३८१० मीटर आहे. तुंगनाथ मंदीराच्या वर ७००∕८०० फूटावर चंद्रशिला म्हणून ठिकाण आहे. तेथे छोटेसे गंगेचे मंदीर पण आहे. येथे आपण सर्वोच्च शिखर असल्याने चहूबाजूंनी पाहू शकतो ३८० अंशाच्या कोनातून. चारही बाजूस उत्तुंग हिमाच्छादित पर्वत आहेत. तुंगनाथ हे नितांत सुंदर पवित्र ठिकाण आहे. हे मदींर अक्षयतृतीयेनंतर उघडते व दिवाळीनंतर बंद होते.
रुद्रनाथ – हा चवथा केदार आहे. हा दिसायलाही नावाप्रमाणे रुद्र आहे. व त्याच्या पर्यंत पोहोचण्याचा मार्गही अतिशय कठीण आहे. मंडल व सगर गावापासून २२ कि.मी. चालून गेल्यावर रुद्रनाथाचे दर्शन होते. अत्यंत अवघड चढाई आहे. मधे मधे राहण्यासाठी धाबे आहेत. मंदीर प्रत्यक्ष ३५८० मीटर उंचीवर आहे. पण तेथे जातांना पित्रूधार या अत्युच्च खिंडीतून ३८५० मीटर उंच पुढे जावे लागते व खाली उतरले की देऊन येते. येथे मुखाच्या स्वरुपात पिंडी आहे. मंदीर पर्वताच्या टोकावर आहे व लहान आहे. येथे बाराही महिने ०° तपमान असल्याने प्रचंड थंडी असते.
येथे राहण्यासाठी धाबे आहेत. वाटेमधे सुंदर बुग्याल तसेच देवदार व इतर वृक्षांच्या सान्निध्यात व पर्वत शिखरांच्या दर्शनाने मन प्रसन्न होते. हे मंदीर सुद्धा अक्षयतृतीयेला उघडते व दसऱ्याला बंद होते.
कल्पेश्वर – हा पाचवा केदार बद्रीनाथाच्या मार्गावर जोशीमठ जवळ आहे. हेलंग नावाच्या गावापासून १० कि.मी. अंतरावर ३३०० मीटर उंचीवर आहे. उरगम गाव ८ कि.मी. असून तेथपर्यंत आता जीप जाते. पुढे २ कि.मी. चालत जाऊन कल्पेश्वर मंदीरात जाता येते. हा २ कि.मी. रस्ता अतिशय सुंदर आहे. दोन्ही बाजूला भाताची व राजगिऱ्याची गुलाबी शेती आहे. मधून वाहणारे पाण्याचे ओहोळ. कधी आपण मंदीरात पोहोचतो कळतच नाही. येथील मंदीरात जटा स्वरुपात पिंडी आहे.
आता पंचबद्रींची माहिती सांगते.
बद्रीनाथ – पंचबद्रीपैकी हा मुख्य बद्री आहे. बद्रीनाथाचे मंदीर ३११० मीटर उंचीवर असून अलकनंदेच्या किनाऱ्यावर आहे. त्याच्या बाजूस गरम पाण्याची कुंड आहेत. नारायण पर्वतावर बद्रीनाथचे तटबंदीयुक्त दगडी विशाल मंदीर आहे. उत्तुंग नीलकंठ पर्वताचे बर्फाच्छादित शिखर पार्श्वभागावर शोभून दिसते.
गाभाऱ्यात कमरेच्या उंचीच्या चौथऱ्यावर श्री. विष्णूची मूर्ती असून डाव्या बाजूला लक्ष्मी व उजव्या बाजूस कुबेर व गणपतीच्या मूर्ती आहेत.
बद्रीच्या पुढे ५ कि.मी. अंतरावर माना गाव आहे. तेथे व्यास गुंफा, गणेश गुंफा, मुचकुंद गुंफा आहेत. व्यासांनी महाभारत येथेच सांगितले व गणपतीने लिहून घेतले अशी मान्यता आहे. माना हे शेवटचे गाव असून पुढे चीनची हद्द लागते. बद्रीनाथापासून पुढे ३० कि.मी. चालत जाऊन स्वर्गरोहिणी व सतोपंथ सरोवर येथे जाता येते. येथूनच पांडव स्वर्गाला गेले असे मानले जाते. तिकडे कुबेर पर्वत आहे. तिरुपती बालाजी कुबंराकडे कर्ज मागायला गेले होते अशी आख्यायिका आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये आम्हाला तेथे जाण्याचा योग आला होता.
योगध्यान बद्री – पंडुकेश्वर येथे बद्रीनाथ पासून २५ कि.मी. अंतरावर योगध्यान बद्रीचे मंदीर आहे.
भविष्य बद्री – जोशीमठ पासून १७ कि.मी. सलधर म्हणून गाव आहे. तिथे जीपने जाता येते. तेथून पुढे सुबैन हे गाव ५ कि.मी. वर घनदाट जंगलात आहे. तेथे खडकामध्ये नैसर्गिकरित्या या बद्रीची मूर्ती असून ती हळू हळू पूर्ण होत आहे. लोककथा अशी आहे की जेव्हा नर-नारायण पर्वत कोसळून पडतील व बद्रीनाथाची वाट बंद होईल त्यावेळी भविष्यातील बद्री म्हणून या बद्रीला सर्व लोक जातील तेव्हा ही मूर्ती पूर्ण स्वरुपात दिसू लागेल. मुख्य बद्री म्हणून याची पूजा केली जाईल. याच्या आसपास बरीच गरम पाण्याची कुंड आहेत. तसेच देवदार वृक्षांच्या दाट जंगलात हे मंदीर अतिशयता स्वरुपात आहे.
ध्यान बद्री ∕ वृद्ध बद्री – जोशीमठाच्या अलीकडे उरगम नावाचे गाव आहे. जीपने जाता येते. तेथे ध्यान बद्री ∕ वृद्ध बद्रीचे छोटेसे देऊळ आहे. समोर गरुडाची एक घुमटी आहे.
आदिबद्री – हरिद्वार-बद्रीनाथ मार्गावर कर्ण प्रयाग नावाचे गाव आहे. तेथून पुढे १७ कि.मी. वर आदीबद्रीचे मंदीर आहे. जीपचा रस्ता आहे. निरनिराळ्या देवतांची १६ मंदीरे आहेत. एका मंदिरात काळ्या पाषाणात कोरलेल्या मीटरभर उंचीच्या मूर्तीला विष्णूची मूर्ती म्हणून गणले जाते.
आता पंचप्रयाग कोणते ते सांगते.
हिमालयात मोठमोठ्या नद्या पण आहेत. त्यांचा जेथे संगम होतो ती अशी ठिकाणेही पवित्र मानली जातात. मुख्य पाच प्रयाग असून ते पुढील प्रमाणे आहेत. देव प्रयाग, रुद्र प्रयाग, कर्ण प्रयाग, नंद प्रयाग व विष्णु प्रयाग.
देव प्रयाग – गंगोत्री ग्लेशियर पासून उगम पावणारी भागीरथी नदी व बद्रीनाथाहून अलकापुरीला उगम पावणारी अलकनंदा यांचा संगम देवप्रयाग गावी होतो. हे सर्व प्रयाग हृषीकेश बद्रीनाथ मार्गावर आहेत. भागीरथीचे राखाडी पाणी व अलकनंदेचे निळसर पाणी वेगाने एकमेकांत मिसळते. येथे मोठा घाट बांधला असून तेथे जाऊन स्नान करता येते. संगमाचे ठिकाण नितांत सुंदर असून एक दिवस राहून त्याचा आनंद घेणे यासारखे सुख नाही.
रुद्र प्रयाग – हा दुसरा प्रयाग असून ऋषिकेशपासून १३९ कि. मी. अंतरावर बद्रीनाथला जातांना आहे. येथे केदार पर्वताहून (केदारनाथ) उगम पावलेली मंदाकिनी व बद्रीनाथहून आलेली अलकनंदा यांचा संगम आहे. मंदाकिनीचे हिरवे पाणी व अलकनंदेचे फेसाळते निळे पाणी पाहतांना भान हरपून जाते.
कर्ण प्रयाग – येथे पिंडर पर्वतापासून उगम पावलेली पिंडर नदी व अलकनंदा यांचा संगम होतो. संगम बराच खोल असल्याने २०० ते २५० पायऱ्या उतरून खाली जावे लागते. खळखळत्या पाण्याचा संगम बघणे अवर्णनीय आहे. येथे कर्णाचे मंदीर पण आहे. इंद्राने ब्राह्मण वेषात येऊन कर्णाकडची कवचकुंडले येथेच मागून घेतली होती. दानशूर कर्णाने ती लगेच काढून दिली.
नंद प्रयाग – ऋषिकेशपासून १९८ कि.मी. वर नंद प्रयाग आहे. नंद पर्वतावरून उगम पावणारी नंदाकिनी नदी व अलकनंदेचे येथे संगम होतो.
विष्णुप्रयाग – बद्रीकेदार मार्गावर जोशीमठ पासून १५ कि.मी. अंतरावर अलकनंदा व नीती व्हॅलीतून येणारी धौलीगंगा यांचा संगम होतो. संगम अरुंद खिंडीत आहे. संगमावर जाण्यासाठी १०० पायऱ्या उतरुन खाली जावे लागते. लहानसा चौथरा आहे. तेथे थंडगार पाण्याने स्नान करणे दिव्यच आहे.
केशव प्रयाग – बद्रीनाथच्या पुढे ५ कि.मी. माना गाव आहे. कुबेर पर्वताच्या बेचक्यातून उगम पावणारी सरस्वती नदी व अलकनंदा यांचा संगम माना येथे होतो. त्याला केशव प्रयाग म्हणतात. पण पंच प्रयागमध्ये त्याचा समावेश केला जात नाही.
अशा तऱ्हेने आमची पंच पंच यात्रा निर्विघ्नपणे पार पडली ही त्या ईश्वराचीच कृपा नाही काॽ या यात्रेत आम्ही ३ आठवडे एका वेगळ्याच दुनियेत जणू काही स्वर्गातच अक्षरशः झपाटल्यासारखे फिरत होतो. जेव्हा सर्व यात्रा आटोपून हरिद्वारला परत आलो तेव्हा वास्तवाची जाणीव झाली.
मी या यात्रेत रुद्रनाथ (केदार) ला नाही जाऊ शकले. पण सप्टेंबर २०१८ मध्ये रुद्रनाथला गेले व माझा पंच केदारचा संकल्प सुफळ संपूर्ण झाला.
Meenal Mukund Velankar
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment