Saturday, 1 August 2020

एक असाही अनुभव

1991चा जानेवारीचा महिना.काॅलेज सुरु झालं .जमला आम्हा त्रिकूटाचा अड्डा या मे महिन्यात कुठे जायचं उंडारायला हे ठरवायला.अगणित कटिंग चहा पीत, भरपूर वाद ..नव्हे चर्चा करुन सिक्किम-दार्जिलिंग वर शिक्का मारला एकीकडे काॅलेजचे तास,परीक्षा,पेपर तपासणे,निकालाची... नंतरच्या  ॲडमिशन्सची कामं उरकता उरकता मे कघी उजाडला ते समजलंच नाही.
       मुंबई -कलकत्ता, कलकत्ता-न्यू जलपायगुडी असा मोठ्ठा प्रवास कमीच की काय म्हणून पुढचे काही तास टॅक्सीत घालवून एकदाचे पोचलो दार्जिलिंग मुक्कामी... रुमच्या खिडक्यांतून येणारं गार वारंअन् समोरची बर्फाच्छादित शिखरं बघून सगळा थकवा पळूनच गेला.
       कांचनगंगा दर्शनासाठी भल्या पहाटे पहाटे उठून टायगर हिलची केलेली वारी,टी टेस्टिंगची धमाल ,माॅनेस्ट्रीतील गंभीर शांतता .. ' ओम मणि पद्मे हूं ' म्हणत बाहेर असलेल्या ' माने ' ना फिरवत घातलेली प्रदक्षिणा,टाॅय ट्रेनची पिटुकली स्टेशन्स न्याहाळणं,माल रोडवरच्या अनेक चकरा ...मस्त चालले होते दिवस .आता परवा निघायचं सिक्किमसाठी....
       अचानक धडाधड सगळी दुकानं बंद व्हायला लागली.. स्थानिक लोकं भर्रकन् पांगली...गजबजलेले रस्ते सूनसान झाले. नेमकं झालं तरी काय .... " राजीव गांधी याची हत्या " धक्कादायक बातमी आदळली कानांवर.आता पुढे काय करायचं.. सिक्कीमला शक्य नाही जाणं... सिलिगुडीला जायचं.. तिथूनच पुढचं ठरवू .पोस्ट ऑफिसमधून घरी फोन करून सुखरुप असल्याचं कळवलं.
       पोचलो सिलिगुडीला. राजीव गांधींच्या अंत्यसंस्कारांचं दृश्य मन विषण्ण करणारं... हातातल्या पाच-सहा दिवसांचं करायचं काय ?इथे खोलीत बसून राहण्या ऐवजी भूतानला जायची कल्पना उचलून धरली.आता शोध सुरू झाला जायचं कसं,परमिट कसं काढायचं याचा.
       उद्या शुक्रवार.शनिवार -रविवार परमिट ऑफिस बंद.म्हणजे परमिट  उद्याच हवं हातात.आमच्याकडे काॅलेजच्या आय डी कार्ड शिवाय काही नाही.मग काय  सगळी कन्व्हिंगसिंगची स्किल्स पणाला लावून हाती घेतलं परमिट.निघालो फुन्शोलिंगला बसने.
     पाच -सहा तासांचा प्रवास.बसमघली माणसं आम्हाला न कळणाऱ्या भाषेत बोलत होती.अधेमधे माणसांची चढ -उतार होतीच.रस्ता बऱ्याच खाच खळग्यांचा.पण दुतर्फा असलेले चहाचे देखणे मळे , वातावरणात भरलेला झाडांचा गंध त्रासाचा विसर पाडत होता. अधेमधे इतका सूनसान रस्ता,अनोळखी जागा,न कळणारी भाषा ..कुणी आम्हाला काही केलं तर घरच्यांना काही कळणारच नाही,ही सूक्ष्म भीती मनात होतीच.तसं काहीही न होता आम्ही पोचलो.रस्ता ओलांडला.आलं ," फुन्शोलिंग.
      एकच रात्र तर काढायचीय.शिरलो बऱ्याशा दिसणाऱ्या हाॅटेलमध्ये.तिघींना मिळून एक मोठ्ठी रुम.सामान टाकून जेवणासाठी उतरलो.हिला डायनिंग रूम म्हणायचं...मिणमिणते दिवे..गूढ वातावरण..दबल्या आवाजात बोलणारी अन् दबून चालणारी माणसं..आम्ही परग्रहावरुनच आलो आहोत असं वाटायला लावणाऱ्या त्यांच्या नजरा... ' हावडा ब्रीज ' सिनेमातल्या के.एन.सिंगच्या नजरेची आठवण करुन देणाऱ्या.कसंबसं जेवून पळालोच तिथून.वर येऊन,हे सगळं आठवून पोटभर हसलोही.पण त्या वेळची सूक्ष्म थरथर आजही आठवते...
      पंचवीस वर्षांनी पुन्हा एकदा फुन्शोलिग ला आले..भूतानला जाण्यासाठी. तेव्हा  ' भूतांचा अड्डा ' वाटलेलं  ते हाॅटेल नजर शोधत होती..नावही आठवत नव्हतं मला..पण खाणाखुणा सापडताहेत का शोघत होते..उगाचच..मी बदलले तर काळाच्या ओघात हेही बदललेलंच असणार नाही का  ?
     
                           माधुरी मोरे.

No comments:

Post a Comment