Saturday, 1 August 2020

“क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे।”

“क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे।”




सध्या रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री निजेपर्यंतही सतत वार्ता कानांवर अक्षरशः आदळत आहे. विषय एकच विविध प्रकारची युद्धजन्य स्थिती. मग ती कोरोना विषाणुमुळे असेल, माणसाच्या दुर्वृत्तीने केलेली कृती असेल किंवा सत्तेच्या हव्यासापायी केलेला गदारोळ असेल. या सगळ्यांचा परिणाम सर्व जगभर सारखाच झालेला दिसतोय तो म्हणजे नेमके काय आता करावे हे कोणीही निश्चितपणे ठरवून करण्याची सिद्धता करीत नाही. प्रत्येक आघाडीवर वेगवेगळे चाचपडणेच सुरु आहे. या महिन्यासाठी काय लिहावे याची नीट जुळणीच होत नव्हती. आज अचानक संस्कृतमधील खालील सुभाषित वाचनात आले आणि ठरवले यावरच विचार करुन पाहू या जमतेय का ते. “क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे।” अर्थ - महापुरुषांच्या कार्यसिद्धीचे कारण त्यांची आंतरिक शक्त्ती असते. त्यांना उपलब्ध असलेली बाह्य साधने नव्हे.

आपणही रोजच्या रोज अनेक संकल्प करतो पण ते पूर्णत्वाला जातील असे प्रयत्न नित्य करीत नाही. आपल्याकडे त्यासाठी आरंभशूर असा एक शब्द प्रयोग आहे. म्हणजे नविन काम सुरु करण्याची आवड असते पण ते शेवटपर्यंत तडीस नेत नाही. त्यासाठी योजना आखत नाही. आखली तरी ती शेवटपर्यंत कशी न्यायची याचा विचार आपला पूर्णपणे झालेला नसतो. येणारे अडथळे आपल्या दृष्टीपथात येत नाहीत किंवा त्याबद्दल आपण बेफिकीर तरी असतो नाहीतर त्या अडथळ्यांचाच विचार करीत बसतो. अगदी साधे उदाहण पाहू. रोज गीतेचे २ अध्याय म्हणायचे ठरवले तरी ते साधत नाही. नियम केला तरी तो पाळतांना कितीतरी वेळा मोडला जाण्यासारखा विचार आधी मनात येतो. सकाळी उठल्याबरोबर वाचावेॽ नको. का तर इतक्या लवकर आंघोळ होत नाही. बिना आंघोळीचे देवाचे कसे वाचायचेॽ आंघोळ झाल्यावर लगेच वाचता येत नाही. स्वयंपाक, पाणी इतर घरातली कामे असतात. दुपारी निवांतपण असते पण घरात कोणीच नसते. नेमके वाचायला बसले की कोणीतरी येते. घंटी वाजवते, फोन वाजतो, संध्याकाळी न बघता आलेल्या मालिका इ. मधे अडथळा आला तर राहील अर्धवट. संध्याकाळी तर शक्यच नसते. बाहेर जायचे, भाजी आणायची, मुलांचे खाणे पिणे, स्वयंपाक आहेच पुन्हा. रात्री जेवणी खाणी, मुलांचे अभ्यास इ. इ. म्हणजे अध्याय वाचण्यापेक्षा त्याच्यासाठी वेळ कोणता याची निश्चिती करण्यातच मनात उलटेसुलटे विचार फिरत राहतात. अशीच असते न आपली सगळ्यांची स्थितीॽ

मात्र एकदा हाती घेतलेले काम असते ते शेवटपर्यंत जे पूर्ण करतात, मधेच अर्धवट अवस्थेत सोडत नाहीत ते उत्तम, श्रेष्ठ, महान असतात. त्यांनी काम हाती घेण्यापूर्वीच त्याचा साधकबाधक विचार केलेला असतो. येणाऱ्या अडचणींवर उपाय शोधलेला असतो. चिकाटी हा गुण त्यांच्याकडे प्रकर्षाने असतो. हाती घेतलेल्या कामाच्या उत्तम परिणामाची त्यांना खात्री असते. लोककल्याणासाठी त्यांची तळमळ असते. प्रत्येकी १ रु. या संकल्पनेतून जमा केलेल्या रकमेतून निर्माण झालेले विवेकानंद शिला स्मारकासारखे एकनाथजी रानडेंचे काम याचीच साक्ष पटवते. जिथे गेल्यानंतर अनेकांना उद्दात्त दिव्य अनुभूती प्राप्त होते.

आळंदी येथे १०० वर्षांपासून सुरु असलेले किर्तन संकुलाचे जोग महाराज, मामा दांडेकर यांनी केलेले कार्य हे अर्धवट स्थितीत न रहाता पूर्णत्वाला जाते. वर्धिष्णु होते. त्यातून अनेकानेक कीर्तनकार तयार होताहेत. जनतेला चांगल्या विचारांचे अमृत वाटत जागृतीसाठी हिंडत आहेत. साडेसातशे वर्षांपासून चालत आलेल्या वारीचे स्वरुप यंदा पूर्णतः बदलवून नविन मिडियाच्या माध्यमाचा उत्तम रितीने उपयोग करुन त्या प्रथेत त्यांनी खंड पडू दिला नाही. कोणताही आतताईपणा किंवा दुःसाहस केले नाही. हेही त्यांच्या संकल्पापासाठी त्यांची आंतरिक शक्त्ती ओजस्वी होती त्यामुळेच घडले. कोणत्याही बाह्य साधनांमुळे, बंधनांमुळे त्याला बाधा आली नाही हेच दर्शविते. त्यांची आंतरिक शक्त्ती इतकी तीव्र असते की त्यांचे कार्य सिद्धीस जातेच याचा आपल्यालाही प्रत्यय मिळाला.

आपणही या वृत्तीचे अनुशीलन करु या.

Padma Dabke

No comments:

Post a Comment