मोती…
बस स्टॉपजवळ एक मोठं कडुनिंबाचं झाड होतं. त्या झाडाच्या बुंध्याच्या खड्ड्यात एका कुत्रीने पिल्लं घातली होती. झाडाची सावली त्यांचं उन्हापासून संरक्षण करत होती. शाळेतून येताना व जाताना त्या पिल्लांना बघणं हा माझा रोजचा कार्यक्रम झाला होता. ती कुत्री गुरगुरून जवळ येऊ देत नसे. जवळ जवळ एका आठवड्याने पिल्लांनी डोळे उघडले व ती पिल्लं इकडे तिकडे चालू लागली. एव्हाना डब्यातील उरलेली पोळी व बिस्किटे कुत्रीला खाऊ घालून तिच्याशी थोडी मैत्री जमली होती. आता ती गुरगुरत नसे. एक महिन्यात ही पिल्लं शेपटी वर करून सैरावैरा पळू लागली होती. आम्ही सर्व मुलं त्यांच्या भोवती घोळका करून रोज खेळू लागलो. घरी येऊन आईला कुत्र्याच्या पिल्लांच्या गोष्टी सांगायचो. या सर्व पिल्लांमध्ये एक भुऱ्या रंगाचं पिल्लू माझं लाडकं झालं होतं. त्याचा भुरा रंग आणि काळेभोर डोळे मला खूप आवडायचे. मी बसमधून उतरताना दिसले, की ते पळत यायचं आणि अंगावर उड्या मारू लागायचं. बसस्टॉपपासून घर दहा मिनिटांच्या अंतरावर होतं.
एके दिवशी घरी जाताना हे भुरं पिल्लू मागे पळत पळतआलं. कितींदा बस स्टॉपवर सोडलं तरी परत मागे मागे येत होतं. शेवटी त्याला उचलून मी घरीच घेऊन आले. पिल्लू हातात बघताच आई रागावली, "हे काय उचलून आणलेस ग! कोण सांभाळणार याला आता? तुम्ही सगळे काही मला कमी आहात का? अजून या पिल्लाला कुठे ठेवू? तुम्ही शाळेत जाणार रोज, मग याला कोण बघणार?"
माझा चेहरा रडवेला झाला. पिल्लाला खाली सोडताच ते आईच्या पायात घुटमळू लागलं. आईचे पाय चाटून कुई कुई आवाज काढू लागलं. शेवटी आईने त्याला दूध पोळी कुस्करून खायला दिली. पोटभर खाऊन पिल्लाने मस्त ताणून दिली. आणि त्या दिवसापासून हे पिल्लू म्हणजेच मोती आमच्या कुटुंबाचा मेम्बर झाला. एक वर्षातच मोतीचे एका "हँडसम डॉग" मध्ये रूपांतर झाले. मोती आमच्याच घराची नव्हे तर सोसायटीतील सर्वच घरांची राखण करत असे. फेरीवाल्यांना घाबरवणं, तसेच नवीन लोकांवर भुंकणं यामुळे आम्ही त्याला "अँग्री बॉय मोती" असे म्हणत असू. मोती आमच्या सोसायटीत सर्वांचाच खूप लाडका होता.
रोज शाळेत सोडायला बस स्टॉपपर्यंत मोती येणारच. कितींदा सांगूनही मोती कधीही ऐकत नसे. "मोती घरी बस रे.. येऊ नकोस मागे." तरीही तो येणारच. रस्त्यात सर्व कुत्र्यांशी भांडण करत हा बस स्टॉपपर्यंत यायचाच. आम्ही बसमध्ये चढलो की मग घरी परतायचा.
यानंतर एक वर्षांनी मला शाळेत जाण्यासाठी नवीन सायकल घेतली होती. माझी आता सायकल स्वारी शाळेत जाणार होती. मोती बाहेर सज्ज उभा होताच. त्याला समजावलं, "मोती प्लीज, आता तरी मागे घेऊ नकोस ..मी सायकलने शाळेत जाणार आहे आजपासून" पण मोती आलाच धावत धावत. माझी नवीन सायकलवर जाण्याची धडपड, त्यात मोती मागे पळतोय, रस्त्यात कुत्री भुंकत होती. धडधडत्या छातीने कशीतरी शाळेपर्यंत पोहोचले. आता तरी मोती घरी जाईल असं वाटलं होतं. तर हा वर्गात माझ्यामागे आत शिरला. वर्गात कुत्रा शिरलेला पाहताच एकच मोठा गोंधळ सुरू झाला. मुली उड्या मारून बेंचेस वर चढल्या. रडायला, ओरडायला लागल्या. बाईंनी मला मोतीला घेऊन वर्गाबाहेर जाण्यास सांगितले. मी बाहेर येताच मोतीही बाहेर आला. बाईंनी वर्गाचं दार लावून घेतलं. मला आता रडू आवरलं नाही. मी रडत रडत मोतीवर ओरडले. "आत्ताच्या आत्ता घरी परत जा ...माझ्या मागे येऊ नकोस पुन्हा!"
आमच्यावरच्या प्रेमापोटी मोती अशा अनेक लीला करतच राहिला.
अशाच एका घटनेने मोतीच्या प्रेमळ व प्रामाणिकपणाची ख्याती अजूनच वाढली. एकदा आमच्या सोसायटीतील दोन वर्षाचं लहान मूल त्याचं रोलर घेऊन आईचा डोळा चुकवून गेटच्या बाहेर पळालं. रोलर ढकलत ढकलत ते मेन रोडला आलं. दुपारची वेळ असल्याने सोसायटीच्या बाहेर कोणीही नव्हतं. कोणाच्याही नजरेस न पडता हे मूल मेन रोडवर चालू लागलं. मात्र या मुलाची पाठराखण मोती करत होता. मुलाच्या मागे मोती निमूट चालत राहिला. रस्त्यावर लोकांना एकटे लहान मूल नजरेस पडले. हे मूल नक्कीच चुकून घराबाहेर पडलं आहे म्हणून लोक थांबून चौकशी करू लागले. आता मूलही कावरंबावरं होऊन रडू लागलं. मोतीने मात्र कोणालाही मुलाच्या जवळही येऊ दिलं नाही. जोरजोरात गुरगुरत तो मुलाची राखण करत राहिला. मेन रोडवर चौकात मूल, रोलर आणि मोती उभे असलेले सोसायटीतील एका व्यक्तीला दिसले. पण मोती जवळ येऊ देत नव्हता म्हणून त्याने मुलाच्या घरी जाऊन वृत्तान्त सांगितला. घरी सर्वजण मुलाच्या शोधात होतेच. जेव्हा त्या मुलाची आई जवळ आली, तेव्हाच मोती तिथून हलला व घरी परत आला. मोतीच्या प्रामाणिकपणाचे किस्से सर्वांना परिचित होऊ लागले.
उन्हाळ्याच्या दिवसात आम्ही रात्री गच्चीवर गाद्या घालून झोपत असू. रात्री आकाश व तारे बघत बघत छान झोप लागायची. मोती देखील आमच्याबरोबर गच्चीच्या कोपऱ्यात पोत्यावर झोपायचा. घराच्या मागच्या परसातील झाडं बरीच उंच झाली होती. बऱ्याच फांद्या गच्चीवर पोहोचल्या होत्या. गच्ची गार ठेवण्याचं काम ही झाडं करत असत. पहाटे गार हवा सुटायची. त्यामुळे पहाटेची झोप अतिशय गाढ लागायची. एके दिवशी पहाटे सूर्योदयाचं थोडंसं तांबडं फुटतच होतं, मोतीच्या विव्हळण्याचा आवाज मला ऐकायला आला. कुई कुई करत तो बहुधा रडत असावा. मी उठून बघितलं, तर खरंच मोती रडत होता. मी सर्वांना जागं केलं. आईने गच्चीचा दिवा लावला... आणि बघतो तर काय एक मोठा काळा साप गच्चीत मरून पडला होता. बहुधा झाडावरून तो आला असावा. मोतीच्या पोटावर सर्पदंशाची जखम होती. त्याच्या तोंडातून फेस येत होता. मोती शेवटचे श्वास घेत घेत आमच्याकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यातून प्रामाणिकपणाचे अश्रू वहात होते.
मोतीने आमच्या सर्वांचे प्राण वाचवण्यासाठी सापाशी झुंज दिली होती, पण सर्पदंशाने त्याचे प्राण गेले.
मूकं प्राण्याशी अतूट मैत्रीचं नातं आजही आमच्या मनात कोरलेलं आहे. आम्ही सर्व कुटुंबीय मोतीचे कायम ऋणी आहोत. माहेरच्या घरी गेल्यावर मोतीची आठवण आल्याशिवाय राहत नाही.
No comments:
Post a Comment