Saturday, 1 August 2020

छोटे मासे

‘‘इथे, जवळच त्याचं हॉटेल आहे. छोटंसंच आहे, पण सगळं मिळतं. नाश्ता, जेवण सगळं. हे साहेब मात्र आपल्या या छोट्याशा स्नॅक सेंटरमध्ये येतात. त्याला माझ्याकडचे पदार्थ आवडतात. मला म्हणतो, ‘‘मॅडम, तुमच्या हाताला चव आहे. माझं हॉटेल दहा-पंधरा वर्षांपासून आहे. मी कुणाकडे कधी गेलो नाही. तुमच्या या ‘तापी’ तले पदार्थ मला फार आवडतात. पण मॅडम, एक सांगू का तुम्हाला, राग मानू नका. पण कस्टमर लोकांना ना, जास्त वेळ थांबू नाही द्यायचं. उगी जागा अडवून बसतात.’’ मग हातात पेपर उचलून म्हणतो, ‘‘हे... हे... पेपर ठेवत जाऊ नका इथं. लोक बसून राहतात. अच्छा, चहा नाही ठेवला तरी चालतंय. काही पैसा नाही चहात. लोक एक कटिंग घेतात आणि तासभर पेपर वाचत बसतात. माझा अनुभव सांगतोय तुम्हाला. इथं चहा ठेवू नका. खायचे पदार्थ ठेवा फक्त.’’

    ‘तापी’ रंगून जाऊन तिच्या हॉटेलातले एकेक किस्से सांगत होती. आता हा, याच्या हॉटेलचं नाव ‘स्वाद’. तापी त्याला ‘स्वादवाला’ म्हणते. या स्वादवाल्यासारखे अनेक नमुने इथे येतात.

    दोन माणसं ‘तापी’ जेव्हा सुरू झालं तेव्हापासून येतात. रोज सकाळी ‘तापी’ मध्ये एक डिश, दोन कप चहा, जोडीने पेपर ही त्यांच्या दृष्टीने सुखाची परमावधी असते. दोघं सकाळी सकाळी येऊन बसतात तेव्हा ‘स्वादवाला’ त्यांच्या जवळच्याच टेबलवर बसून ही सगळी बडबड - लोकांना जास्त वेळ बसू देऊ नका - वगैरे करतो. तो गेला की हे दोघं चिडून तापीला म्हणतात, ‘ओ, मॅडम, याला कशापायी येऊ देता? साला भंकस करत राहतो. येकदा मार खाईल बघा. या साल्याचं काय जातं आम्ही हितं बसलो तर?’’

    ‘‘आणखी एक मजेदार गोष्टय बरं का त्याची.’’ तापी स्वादवाल्याबद्दल सांगत होती. 

    ‘‘आम्ही इथं दडपे पोहे करतो. माहिती आहे ना, दडपे पोहे? तशी ती कोकणची डिश आहे. नारळाच्या दुधात, पाण्यात भिजवतात पोहे. आमच्या तापीची ही सर्वात लोकप्रिय डिश आहे. आणि गंमत सांगू का, मी नारळाच्या दुधात बिधात भिजवत नाही पोहे.’’

    ऐकणारे तोंड उघडं टाकून तापीकडे बघतच राहिले. थोड्या वेळाने कुणीतरी बोललं. ‘‘ते कसं काय? दडपे पोहे तर नारळाच्या दुधाशिवाय किंवा पाण्याशिवाय बनतच नाहीत.’’

    ‘‘मी बनवते. साध्या पाण्यात भिजवते.’’

    ‘‘पण का?’’

    ‘‘साधी गोष्ट आहे. नारळाचे भाव काय आहेत सध्या. कोकणची गोष्ट वेगळी आहे, बाबांनो! त्यांना काय, अंगणात नारळाचं झाड. आम्हाला कसं परवडणार?’’

    ‘‘पण लोक कसं ऐकतात? कुणी विचारत नाही?’’

    ‘‘छे! इथली माणसं फार सहनशील. लोकांना सवय झालीय, दुकानदारांच्या असल्या वागण्याची. इथे दुकानदार कसलेत, पाऊण वाजता जर एखाद्या दुकानात पाऊल ठेवलंत तर तुमच्यासमोर आवराआवर करतील, दुकानाचं शटर खाली ओढतील. तुम्हाला विचारणार नाहीत, की तुम्हाला काय हवंय. तुम्ही तिथे मूर्खासारखे उभे राहून त्यांच्या हालचालीकडं पहाल. तुम्हाला पायरीपाशी उभं करून ते निघूनही जातील. आणि सर्व्हिस तर काय? वा! वा! कुठलीही वस्तू विचारा, झटकन्‌ मिळणार नाही. मिळाली तर त्यात एकच पर्याय असेल. घ्यायची तर घ्या, नाही तर फुटा. वस्तू आपल्याला हवी त्या पद्धतीची नसेल तर? ते तुमच्यासाठी ती मागवण्याचे कष्ट घेतील? शक्य नाही. त्यांचं प्रशिक्षणच असं असतं. कुणीही ग्राहक त्यांच्या दुकानातून समाधानी होऊन परतू नये. ग्राहकांच्या अपेक्षांशी त्यांना काहीही कर्तव्य नसतं. खास करून, महाराष्ट्रीयन दुकानदार तुम्ही पाहा.’’

    ‘‘ए हो, हो, हे अगदी खरंय बरं का. मलाही हा अनुभव आहे महाराष्ट्रीयन दुकानदारांचा. एक तर इथल्या लोकांना दुपारची झोप अत्यंत प्रिय आहे. पुन्हा ते इतके कुटुंबवत्सल आहेत की दुपारी घरी जातील, कुटुंबियांबरोबर जेवण करतील, तास - दीड तासाची झोप काढतील. मग उठून चहा घेऊन, बायकोशी गप्पाटप्पा करून चार - साडेचार वाजता कसंबसं डुलत दुकानात परततील. त्यांना जास्त पैसेही नकोत आणि जास्त काम करणंही नको. म्हणून तर एवढे परप्रांतीय लोक इथं येऊन काम करतात. भाषाबिषा काही येत नसते पण त्यांचा दहा-बारा वर्षांचा मुलगाही उत्तम प्रकारे दुकान सांभाळू शकतो.

    ‘‘एकदा मला लो फॅट दूध हवं होतं. गेले एका दुकानात. दुकानदाराला सांगितलं. बराच वेळपर्यंत मी काय मागतेय हेच त्याच्या डोक्यात शिरेना. मग थोडा वेळ स्तब्ध राहून शून्यात पाहात तो एकच शब्द बोलला, ‘‘नाहीये’’ मी त्याच्या चेह-यावरून आणि आवाजावरून एवढं ओळखलं, की नाहीये म्हणजे नाहीये. हा आता आणखी काही नाही बोलायचा. महाराष्ट्रीयन होता. मग मी दुस-या दुकानात गेले. ते कानातले वगैरे घालणारे नाहीत का, राजस्थानी होता तो. त्याच्याकडेही दूध नव्हतं. पण त्याने माझ्याकडनं हे समजून घेतलं, की मला कोणत्या ब्रँडचं दूध पाहिजे, किती पाहिजे. मग त्याने तासाभरात दूध आणून देण्याचं आश्वासन दिलं आणि नुसतं आश्वासनच नाही, तासाभरात मला इथे, ‘तापी’ मध्ये दूध आणून दिलं. मग मी काय करू? राजस्थानी दुकानदाराकडून जे हवं ते घेऊ की महाराष्ट्रीयन सुधारण्याची वाट पाहात राहू?’’

    ‘‘प्रत्येक दुकानावर बोर्ड - माल घेण्यापूर्वी नीट तपासून घ्या. तक्रार चालणार नाही. एकदा विकलेला माल पुन्हा परत घेणार नाही. वगैरे वगैरे. इतकी निगेटिव्ह भाषा असते यांची आणि बॉडी लँग्वेजपण निगेटिव्ह.

    ‘‘मी असलं वागत नाही म्हणून तर ‘तापी’ त एवढी गर्दी असते. मी लोकांना सरळ सांगते. आमच्याकडे ‘दडपे पोहे’ असेच असतात. आमची स्टाईल सगळ्यांपेक्षा वेगळी आहे... हॅ... हॅ...हॅ...’’

    ‘स्वाद’ वाल्यावरून सुरू झालेली चर्चा केवढी लांबली होती. ‘तापी’ पुन्हा त्याच्याबद्दल सांगायला लागली, ‘‘आणि हा भला गृहस्थ - स्वादवाला - काय करतो माहीताय, स्वतः कागदाच्या पुडीत खवलेला नारळ घेऊन येतो. पोहे घेतले की त्यावर खोबरं भरपूर घालतो. पण इथेच येऊन खातो.’’ हे ऐकून सगळे हसायला लागले. ती पुढं म्हणाली, ‘‘अरे, एकदा तर एका मित्राला घेऊन आला. दोघांच्याही हातात पुड्या. मला इतकं हसायला आलं. काही असो, लोकांनाही इथलं वातावरण आवडतं. एकदा काय झालं, सकाळी ‘तापी’ उघडलं. आमचा नेहमीचा ब्रेडवाला आला नव्हता. तेवढ्यात ग्राहकराजा आले. त्यांना ‘मिसळपाव’ खायचा होता. ब्रेडवाला आला नाही कळल्यावर ग्राहकराजा म्हणाले, ‘‘असं करा मॅडम, तुम्ही मिसळची डिश तयार करा. मी येतो पाच मिन्टात पाव घेऊन ”आणि स्वतः घेऊन आला. आता काय बोलणार?’’

    तापीचं कीर्तन रंगलं होतं. ती सांगत होती, ते खरंच होतं. अत्यंत थंडपणे आपलं स्वागत करणा-या, आहे ते पुढ्यात आदळणा-यांच्या पंक्तीत एक तरुण, हसरी, आनंदाने स्वागत करणारी, आनंदाने वाढणारी स्त्री असल्यावर हॉटेलात गर्दी का नाही होणार? पुन्हा येणा-याजाणा-यांशी या लांबलचक गप्पा.

    ‘‘कमाल करतेस हं तापी,’’ ऐकणा-यांच्या या वाक्याने नेहमी तापीचं व्याख्यान संपतं. दिवसभरात वीस-पंचवीस वेळा तरी तिला हे वाक्य ऐकायला मिळतंच. तिच्याजवळ अनेक किस्से असतात. पोलिसांशी तर तिचं खास नातं आहे.

    एकदा ती आणि तिचा भावी पती सागर विदाऊट लायसन्स पकडले गेले. पोलिसांनी पैशांची मागणी केली. ‘तापी’ ने इतक्या नाट्यपूर्ण रीतीने स्वतःची, दुःखभरी कहाणी सांगितली, की पोलिसाने दया येऊन आपल्या ‘भावाचं’ पोट कष्ट करून भरणा-या त्या गरीब बिचा-या बहिणीला आणि तिच्या भावाला सोडून दिलं. एकदा नो एंट्रीत पकडली गेली तर पोलिसाशी इतक्या हुशारीने बोलत राहिली की शेवटी त्या बिचा-याने तिच्याकडून एल.आय.सी.ची पॉलिसी घेतली.

    एकदा गाडी चालवताना मोबाईलवर बोलत होती म्हणून पकडलं तर सुरुवातीला तिला कळलंच नाही की आपल्याला अडवणारे पोलिस आहेत. ते सिव्हिल ड्रेसमध्ये होते. मग तिनं स्वतःला सांभाळलं आणि मोठ्या ऐटीत सुरू केलं, ‘‘हे पहा, मी हॉस्पिटलमधून येतेय. कुणीतरी सीरियस आहे म्हणून. पाच-पाच मिटांनी माझा फोन चाललाय. मला बंद ठेवता येणार नाही. पहा, आणि इथे गाडी थांबवायला कणभर तरी जागा आहे का?’’ ज्या स्टाईलने पोलिसवाल्यांच्या मोटरसायकलचं हँडल पकडून ती बोलत होती की ते पाहणा-याला वाटावं, लेडी पोलिसने दोन मुलांना पकडलंय.

    अशी आहे तापी.

    अशा अनेक तापी आहेत या शहरात. फक्त मुलीच नव्हेत, मुलंही आहेत. छोट्या छोट्या गोष्टीत कायदा मोडणं, नियम मोडणं, त्यांच्यासाठी काही विशेष गोष्ट नाही. ते इथल्या अव्यवस्थेचा एक हिस्सा बनून जातात. छोट्या छोट्या गोष्टींसाठी एखादा नियम मोडला तर त्यांना अपराधी वाटत नाही.

    त्यांना चांगलं ठाऊक आहे, त्यांच्या छोट्या छोट्या चुका आणि छोट्या छोट्या बाबीत सोय पाहण्यासाठी नियम मोडणं यामुळे इथल्या मोठ्या अव्यवस्थेत काही फार फरक पडत नाही. मोठ्या मोठ्या लोकांनी मोठे मोठे गुन्हे करून, आपल्या स्वार्थ्यासाठी कायद्याला पायतळी तुडवूनच ही मोठी अव्यवस्था आणि अराजक निर्माण केलंय.

    हे स्वतः तर या अव्यवस्थेच्या समुद्रातले अगदी छोटे मासे आहेत.


सुजाता महाजन



No comments:

Post a Comment