Saturday, 7 September 2019

गुरुपौर्णिमा


गुरुपौर्णिमा झाली की गीतासंथा वर्गातील विद्यार्थिनींना आपले कलागुण दाखवायला एक उत्तम संधी असते ती म्हणजे गोकुळअष्टमी. गीतेचा उद्गाता स्वतः परमात्मा श्रीकृष्ण याचा उत्सव. आमच्या वर्गात बाईंनी एक प्रथा सुरु ठेवली आहे की या कार्यक्रमासाठी सर्व काही विद्यार्थिनींनीच करायचे, लिहायचे, बसवायचे. या आधी तुम्हाला एक पोवाडा ऐकवला होता ते आठवत असेलच

आज कल्याण स्वामी म्हणजे रामदास स्वामींचे एकनिष्ठ शिष्य यांनी मनुष्याचे आयुष्य १०० वर्षे आहे असे कल्पून त्याचे दहा भाग केले आहेत. आणि प्रत्येक दहा वर्षात माणसाची कशी स्थिती असते ते वर्णन केले आहे आणि त्यापासून सावध होऊन माणसाने रामनाम घ्यायला हवे असे सांगतात. ते खरे तर खूप वेळा ऐकले होते. पण गीता शिकायला लागल्यानंतर असे वाटायला लागले की गीतेतील तत्त्व जर आपण अमलात आणू शकलो तर ही वेळ येणारच नाही. संकल्पना सुचली पण नेमके शब्द काही एकटीला योग्य योजता आले नाही. मग आमच्याच वर्गातल्या आधीच्या विद्यार्थिनींनी सहाय्य केले आणि खालील रचना तयार झाली. ती आज सादरप्रत्येक कडव्याची पहिली ओळ कल्याणस्वामींची आणि दुसरी आमची

सावध सावधान सावध सावधान। वाचे घ्या हो रामनाम॥ध्रु.
सावध सावधान। सावध सावधान। वाचे घ्या हो हरिनाम॥ ध्रु.
दहा वर्षे बालपण। वीसा वर्षी तारुण्य। अंगी चढे अभिमान। तेव्हा घडे साधन॥१॥
गीता संथा घेई झणी। पाठांतर बालपणी। योग्य साधन मिळता। अंगी येई विनम्रता॥१॥
तिसाची होय भरती। कांता पुत्र लाभ होती। मग त्यांचीच भ्रांती। कळे स्वरुपाची स्थिती॥२॥
कर्मयोगाची येता जाण। भ्रांतीचे सहजी उच्चाटन। कर्मगती विलक्षण। सोडा फलाचे बंधन॥२॥
चाळीस वर्षे झाली। डोळा चाळिशी आली। नेत्रांसी भूल पडली। जवळी असता दिसती॥३॥
ज्ञानचक्षु प्राप्त होता। ईश्वराशी सन्निधता। मग कैसी पडे भूलॽ सत्कर्माची घेऊ झूल॥३॥
पन्नास वर्षे झाली। दंतपंक्ती हालती। श्याम केश शुभ्र होती। त्याला म्हातारा म्हणती॥४॥
पन्नाशीची नको चिंता। कळली ज्ञानाची महत्ता। क्षेत्र क्षेत्रज्ञाचे ज्ञान। आणि ज्ञेयाचे चिंतन॥४॥
साठीची बुद्धी नाठी। हाती घेऊनिया काठी। वसवसा लागे पाठी। त्याला पोरे हासती॥५॥
साठी बुद्धी नसे नाठी। कळली ध्यानाची महती। पळविले काम क्रोध। घेई भगवंताचा शोध॥५॥
सत्तरीची विवंचना। बसल्याने उठवेना। उठल्याने चालवेना। दिसे दिस दैन्यवाणा॥६॥
सत्तरीची नको भिती। मनी उपजली भक्त्ती। नामस्मरणी दृढ मन। देहाचे सहजी विस्मरण॥६॥
वय झाले ऐंशी। फिरतसे दिशा दिशी। पाण्याविना मत्स्य जैसा। तैसी होते कासाविसी॥७॥
होईना का वय ऐंशी। भेटी आपुली आपणाशी। संवाद भगवंताशी। संपादिती पुण्यराशी॥७॥
नवावर दिले शून्य। सुख राहिले गुंज। म्हणतसे माझे माझे। आता सांग काय तुझेॽ॥८॥
भगवद्गीता हाती येता। अभ्यासे ती जाणून घेता। संपते माझे मीपण। सारे भगवंताशी अर्पण॥८॥
राजहंस उडोनि गेला। देह कोरडा पडला। जन म्हणति मेला मेला। मोठा आनंदाने नेला॥९॥
योगयुक्त्त जीवन असता। नाही मरणाची चिंता। देही असता मुक्त्त झाला। लोकी ख्यातीसी पावला॥९॥

सर्व साधारणपणे सगळ्यांचाच राजहंस उडून जातो पण काहींचा राहिला. तुकाराम, मीराबाई . चा. आपला पण राहू शकतो त्यासाठी कल्याणस्वामी रहस्य सांगतात – 

सांगतसे गुरुदास। सोडा संसाराची आस। सांगतसे सज्जनास। धरा सद्गुरुची कास॥ सावध सावधान। वाचे वदा रामनाम॥१०॥
सांगती भगवंत सोडा संसाराची आस। सांगतसे सज्जनास। धरा सद्गुरुची कास॥ सावध सावधान। वाचे घ्या हो हरिनाम॥१०॥

By

Padma Dabke

Pune, India


1 comment:

  1. The very fact of life..... Very few people know and understand....

    ReplyDelete