Monday, 30 September 2019

बाप्पा मोरया

बिल्डिंगच्या खाली चाललेल्या उत्साही गोंधळाचा आवाज बंद खिडकीतूनही कानावर आदळला आणि आप्पांना जाग आली. झोप कसली ग्लानीच होती ती. गेल्या कितीतरी दिवसांपासून आजारपणाने त्यांना घेरून टाकले होते. जागचे उठवतही नव्हते. छोट्या छोट्या गोष्टींसाठी इतरांची मदत लागत होती. आत्ताही त्यांनी क्षीण आवाजात माईंना हाक मारण्याचा प्रयत्न केला. पण किती वेळ झाला तरी माई आल्याच नाहीत. मग त्यांनीच हळूहळू उठण्याचा प्रयत्न केला आणि बाजूच्या टेबलाला धक्का लागला. बरेच सामान खाली पडण्याचा, ग्लास फुटण्याचा खळकन आवाज आला. आणि माई धावत आत आल्या.

'काही हवे आहे का? ' आप्पांना आधार देत बसते करत माईंनी विचारले. ' कसला आवाज ग खालती?' आप्पांनी विचारले. 'दहीहंडी बांधलीय खाली बिल्डींगमधे. धमाल करता आहेत पोरे खाली. तेच बघत होते शेजारच्या खोलीच्या खिडकीतून.' माईंचे एकीकडे आवाराआवर करत उत्तर.

"दहीहांडी म्हंजे अष्टमी आली. बापरे म्हंजे गणपतीला जेमतेम दहा दिवस उरले. एव्हाना 'बाप्पा' ने रूप घेतले असते आपल्या नेहमी. वाळण्याची वाट बघत कोपऱ्यात बसलेला असतो बाप्पा. एकीकडे पोळ्यासाठी बैलजोडी, आणि हरितालिकेसाठी सखी पार्वतीच्या मुर्ती पण घडत असतात. गणपतीचे पितांबर, पोट, कान, सोंड ,हात, हातातली आयुधे, मोदक दागदागिने आणि उंदिरमामा सगळे एकएक करून रंगवले जातात. मग उरतात फक्त डोळे. ते रंगवायला आप्पा नेहमी सकाळीच घ्यायचे ते सुद्धा बाहेर पडवीत स्वच्छ उजेडात. खुप कौशल्याचे काम ते. नीट झाले की खरा जिवंतपणा येतो मुर्तीत." आप्पा स्वतःशी बोलत असल्यासारखे आठवणीत रमले.

" कुलकर्ण्यांचा गणपती आजवर कधी विकत आणला गेला नाही. पहिले दादा, आप्पांचे आजोबा घडवायचे तो. नंतर तात्या, आप्पांचे वडिल. आप्पा लहानपणापासून मदत करता करता कधी मुर्ती घडवायला लागले कळलही  नाही त्यांना. मुळची कलाकार वृत्ती. त्यांत मुंबईला आल्यावर समानपंथी सुहृदांची भर पडली आणि दरवेळी साच्यापेक्षा वेगळी मुर्ती घडू लागली. नवे प्रयोग, नवे रंग, नवी आरास. दहा दिवसांत आप्पांकडचे बाप्पांचे रूप आणि मुक्काम अगदी गाजायचा."

"शेजारपाजरचे आणि मित्रमंडळ अगदी मागे लागायचे आप्पांच्या यावेळचा आमचा बाप्पा तुम्हीच घडवा म्हणून. मग नोकरी सांभाळून एवढे सगळे गणपती करताना तारांबळ उडायची आप्पांची. एक वर्ष हत्तीवरच्या अंबारीत बसलेला गणपती केला होता तेव्हा तर दागदागिन्याचे नाजुक काम पुर्ण होईस्तोवर गौरी आगमनाचा दिवस उजाडला होता. एक वर्ष अष्टविनायक ते सुद्धा चक्राकार फिरणारे केले होते. त्यासाठी वेल्डिंग करुन घेताना डोळ्यात ही उडाले होते. पण आख्खा गाव लोटला होता तेव्हा दर्शनाला. एकेका वर्षाचे गणपती आणि आरास आप्पांच्या डोळ्यापुढे अगदी चित्रफितीसारखे फिरू लागले."

"गेल्या सव्वाशे वर्षांपेक्षा अधिक काळापासून असणारी कुलकर्ण्यांची परंपरा यावेळी मोडणार की काय? दहीहंडी आली तरी मुर्ती चा पत्ता नाही. त्यात प्रसाद आप्पांचा एकुलता एक मुलगा ही कामानिमित्ताने परदेशी गेलेला. तो असता तर घडवली असती मुर्ती त्याने. तसा फारसा रमत नाही तो त्यात लहानपणापासून, पण वेळेला हातभार नेहमीच लावतो. आत्ता घरात फक्त आप्पा, माई, प्रज्ञा म्हंजे प्रसादची बायको आणि 'सान्वी म्हंजे आप्पांची नऊ वर्षाची नात. तशी आप्पा गणपती घडवायचे तेव्हा सान्वी घुटमळायची मागे मागे. पण बरेचदा जेव्हा आप्पांना गणपती घडवायचा उत्साह असायचा तेव्हा बरेचदा शाळा आणि कसले कसले क्लास यांतच दिवस जायचा तिचा. तेव्हा यावेळी बाप्पांच्या मनात  कुलकर्ण्यांच्या हातून सेवा घडणे नाही या विचाराने आप्पांचे मन भरून आले."

विचार आणि ग्लानी च्या फेऱ्यात रात्र गेली. रविवारचा दिवस उजाडला. सकाळी सान्वी खोलीत येवून आज गंमत आणणार आहे आप्पा मी असे कानात सांगून गेली. 'काय ग' माईला खुणेने विचारले तर तीही काहीतरी निम्मित करून बाहेर सटकली.होता होता संध्याकाळ होत आली. आणि आप्पांना फारशी रुचत नसे अशी जोरात दोनदा बेल वाजली.

हॉलमधून उत्साही खिदळणे ऐकू येवू लागले आणि सान्वी आणि मित्रमंडळ आले हे आप्पांनी ताडले. सरप्राईज करत पोरे आप्पांच्या खोलीत घुसली. सान्वीच्या हातात तिने घडवलेला बाप्पा होता. होता छोटासाच पण तिने घडवलेला. त्यासाठी मागले चार रविवार कार्यशाळेत जात होती ती. अर्थात तिच्या ड्रॉईंग क्लासच्या ताई दादांची मदत होतीच. बाप्पाचे ते रूप बघून डोळे भरून आले आप्पांचे. हात जोडले गेले आणि मनात आले. "देवा गजानना तुलाच काळजी. तुझे रुप तु घडवून घेतलेस. परंपरा जपली गेली आणि वारसाही. शेवटी सगळ्याचा कर्ता करविता तुच" 

By

Prajakta Karve Joshi

Thane, India

No comments:

Post a Comment