Thursday, 26 September 2019

शिक्षक पहावं होऊन आणि परदेशात पहावं शिकवून - भाग १


र्हुपाली, लुपाली, उपाली, मादाम.........! 

मी शाळेच्या आवारात पाऊल ठेवले मात्र आणि पाच-पंचवीस डोकी माझ्या दिशेने धावत आली. सगळ्यांनी मला चक्क गराडा घातला.. त्यातल्या चार-पाच जणांनी तर मी त्यांना उचलून घेऊन पापी घेतल्याशिवाय पुढे पाऊलही टाकू दिले नाही. ह्या सगळ्या प्रकाराने आत्तापर्यंत सगळ्या पालकांचे डोळे कोण आले हे बघायला आमच्याकडे वळले. आपली इवली इवली मुले वर्षभर कोणत्या रुपालीचे वर्णन घरी करीत होती हे अनेक पालकांनी पहिल्यांदाच पाहिले

आज माझ्या सगळ्यात आवडत्या शाळेचा वार्षिकोत्सव होता आणि अर्थातच शालेय वर्षातल्या शेवटच्या आठवड्यातला पण खूप महत्वाचा दिवस होता. शाळा कायमची तिथेच असणार होती.. शिक्षक तिथेच असणार होते.. मुले ही पुढच्या वर्गात जाणार होती.. ज्या मुलांचे तिथले शेवटचे वर्ष होते ती फक्त पुढे कॉलेजला गेली तरी त्याच गावात रहाणार होती.. शाळेतला तो माझा शेवटचा दिवस होता

एखाद्या शिक्षकाने शाळा सोडून जाणार्या मुलांना निरोपे देणं हे त्याला काही नवीन नाही. दर वर्षी नवीन मुले हाताखालून जातात.. शिक्षक चुकता आपले काम करीत त्याच शाळेत अनेक वर्षे काढतात.. जवळपास रहाणार्या शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या गाठीभेटी अगदी रस्त्यातच का होईना पुढेही होत रहातात. पण माझ्या बाबतीत हे असे घडणार नव्हते. मी वर्ष संपल्यावर तिथून दूर जाणार होते आणि ह्या विद्यार्थ्यांपैकी कोणी मला पुन्हा कधी भेटेल ही शक्यताही गृहीत धरणे कदाचित वेडेपणाचे ठरले असते

माझी Part-time English Assistant ची फ़्रांसमधली नोकरीच केवळ एक वर्षासाठी होती. वर्ष संपल्यावर मला त्या शाळाच काय पण माझे Valenciennes हे गाव आणि तो देशच सोडून परत यायचे होते. दुसरे म्हणजे भाषांतराचे आणि दुभाषाचे काम पूर्वी करणारी मी अशा शिक्षक सहाय्यकाच्या भूमिकेत पहिल्यांदा आणि कदचित शेवटच्या वेळेलाच असणार होते. असा हा अनोखा पण बहुतेक एकुलता एक अनुभव असल्याने एक वर्षाच्या सहवासाने जुळलेले ऋणानुबंध मला तसेच कायमसाठी माझ्या फक्त आठवणीत जपून ठेवायचे आहेत ह्याची जाणीव मला सुरुवातीपासूनच होती

English Assistant ची अर्धवेळ नोकरी म्हणजे नेमकं काय तर इंग्लिश च्या शिक्षकाबरोबरच वर्गात राहून मुलांचे उच्चार, व्याकरण ह्यावर लक्ष देणं. मुले नकळत ज्यातून शिकू शकतील असे व्यवसाय शिक्षकाच्या मदतीने बनवून ते मुलांकडून करवून घेणं. त्यांना गाणी शिकवणं.. छोटे छोटे खेळ खेळणं.. ती ती परकीय भाषा आणि अर्थातच फ़्रेंचही चांगल्या प्रकारे बोलू शकणार्या मुलांची निवड फ़्रेंच एंबसी करते आणि त्यांना एका शालेय वर्षासाठी फ़्रांसमध्ये बोलवून घेते. आपल्या देशात हे कौतुक परवडण्यासारखे नाही. माझ्या आठवणीत लहानपणी पाहिलेला फ़ॉरीनर म्हणजे एक तर टी.व्ही वर किंवा एअरपोर्टपासून जवळच रहात असल्याने कधीमधी हौसेने रस्त्यात फिरायला उतरलेला एखादा प्रवासी. मला अजूनही आठवतं की रस्त्यात असा एखादा आगंतुक दिसला की रस्त्यातले पाच-पंचवीस डोळे कसे कौतुकाने त्याच्याकडे वळायचे. परंतु फ़्रांसमधील मुले नशीबवान खरी.. एवढ्या लहान वयात तिथली शिक्षणपद्धती थोडी वेगळी असल्याने परदेशी भाषेचे शिक्षण अगदी प्राथमिक शाळेपासून सुरु होते. एक गोष्ट नक्कीच आहे की आपल्या मुलांना मातृभाषा, राष्ट्रीय भाषा आणि अर्थातच इंग्लिश अशा तीन भाषा शाळेत शिकाव्या लागतात. पण फ़्रेंच हीच मातृभाषा आणि राष्ट्रीय भाषा असल्यामुळे त्याशिवाय एक परकीय भाषा शिकणे त्यांना निश्चितच कठीण नाही. आणि अर्थातच आर्थिक दृष्ट्या त्यांना असे असिस्टंट्स बोलवून घेणं हे परवडण्यासारखेही आहे

असिस्टंट आणि शिक्षक दोघेही एकाच वेळेस वर्गात असण्या मागचा उद्देश हाच की नेहेमीचे शिक्षक वर्गात असल्याने मुलांवर थोडी जरब असते आणि असिस्टंट असल्याने मुलांच्या कानावर योग्य उच्चार पडतात. आपल्याला शिकवायला एवढ्या दुरून कोणीतरी आले आहे ह्या जाणीवेने मुलं आणि ओघानंच त्यांचे पालकही सुखावतात. परदेशी भाषा मग ती इंग्लिश, जर्मन, रशियन, स्पॅनिश, इटलियन वा अगदी अरेबिक ह्यापैकी कोणतीही असो, ती शिकण्याची गोडी मुलांच्या मनात लहानपणापासून निर्माण व्हावी ह्या साठी फ़्रेंच सरकार असे प्रयत्न करते ह्याचे कौतुक आहे.. 

आता परदेशातली शाळा म्हणजे बडे खटले असणार असे कोणालाही वाटले तर ते चूक नाही. श्रीमंत देश, श्रीमंत पालक, उच्च राहाणी आणि सुखी जीवन.. पण प्रत्यक्षात तसे नव्हते. मी मुळात गेले तोच भाग फ़्रांसमधील गरीब मानला जाणारा भाग होता. फ़्रांसच्या उत्तरेला बेल्जिअन बॉर्डरपासून जवळ Valenciennes ह्या छोट्या शहरात मी रहात होते. मी अर्थातच प्राथमिक शाळेतल्या म्हणजेच ते ११ ह्या वयातल्या मुलांना शिकवणार होते. बालमंदीरची दोन वर्ष आणि नंतर प्रायमरी ची पाच वर्ष झाल्यावर तिथली मुले साधारणपणे बाराव्या वर्षी कॉलेजला जातात. तर Wallers आणि Bellaing ह्या दोन छोट्या गावांतल्या तीन शाळांमध्ये एका आठवड्यात मला प्रत्येकी चार तास असे एकून बारा तास शिकवायचे होते. सर्व administrative formalities साठी ह्यापैकीच बोस्के ( Ecole du Bosquet) ही शाळा प्रमुख शाळा ठरवण्यात आली होती. त्या शाळेचा मुख्याध्यापक ख्रिस्तोफ हा माणूस म्हणून लाख होता आणि मी नशीबवान की तोच माझा ट्युटर सुद्धा होता

माझ्या रहात्या ठिकाणापासून साधारण पंधरा-वीस कि.मी. वर ही शाळेची दोन छोटीशी बाजूबाजूला असलेली गावं होती. जवळपासच्या गावातील कोळशाच्या खाणी बंद झाल्या असल्यामुळे बर्याच घरी मुलांच्या पालकांना नोकर्या नव्हत्या.. सुरुवातीला मला ह्या गोष्टींची म्हणावी तशी कल्पना नव्हती पण नंतर जसजसा मुलांशी संबंध यायला लागला तसतसे मी त्यांना अधिकाधिक समजून घेऊ शकले. काही मुले इथेही आधीपासूनच कानफाटी ठरलेली होती. काही मुलं अगदीच अबोल तर काही अतिशय बडबडी. शालेय शिक्षण सक्तीचे असल्याने पालक मुलांना शाळेत पाठवीत असत पण म्हणावा तसा पाठिंबा नसे. बर्याचदा ह्या मुलांचे अभ्यासात लक्ष नसायचे. पालकांच्या शिक्षणाबाबतच्या उदासीनतेमुळे आणि निराशाजनक परिस्थितीमुळे कधी मधी काही मुलांना घरी मारही मिळत असे. मुळातच माझा स्वभाव थोडा मृदु असल्याने काही मुलांनी अभ्यासात लक्ष दिले नाही किंवा वर्गात त्रास दिला तरी मी त्यांना शिक्षा करणे शक्यतो टाळत असे. नाहीतर शाळेत शिक्षा झाली हे कळल्यावर कदचित घरीही त्यांना शिक्षा होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. याउलट मुलाला शिक्षा केली म्हणून धमकी द्यायला पालक एका जर्मन असिस्टंटच्या घरी गेल्याची घटनाही जवळच्याच एका गावात घडलेली होती. त्यामुळे आगीतून फोफाट्यात पडायचे नसेल तर स्वत: शांत राहून शक्य तेवढ्या चांगल्या पद्धतीने आपण आपले काम करायचे एवढे मी ठरवले होते. माझी ओळख तिथे English Assistant अशी करून दिली गेली असल्याने, माझ्याबरोबर शिकणे हे त्यांच्या नेहेमीच्या शिक्षकांबरोबर शिकण्यापेक्षा वेगळे आहे हे मुलांनी अध्यारुतच धरले होते. त्यामुळे माझ्याबरोबर चाळीस मिनीटे ही दुसरी सुटीच असल्यासारखे एक दोन वर्गांच्या बाबतीत झाले होते. शाळेत शिकवणार्या मुख्य इंग्लिश शिक्षकाबरोबरच मी वर्गात असले पाहीजे ह्या नियमास एका शाळेने कधीच धाब्यावर बसवलेले असल्याने तिथे माझी फारच पंचाईत होत असे. मी स्वत: लहानपणी शाळेत शिक्षकांची टिंगल करण्यात प्रत्यक्ष जरी भाग कधीच घेतला नसला तरी इतर टवाळखोरांच्या दंग्यांनी हैराण झालेले शिक्षक पाहून हसू लपविणे कठीण होत असे हे मला आजही नीट आठवत असल्याने आज स्वत: शिक्षकाच्या भूमिकेत शिरल्यावर ती भूमिका निभावताना येणार्या अडचणी मला हळू हळू कळायला मात्र लागल्या


क्रमश:

By

Rupali Sohoni Kamat

Belgaum, India

No comments:

Post a Comment