२००३ ऑगस्टची गोष्ट आहे. गौरीने नुकतच पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केल होत. त्या दिवशी खूप पाऊस होता. गौरी सकाळीच वृक्षारोपणाच्या (आर्ट ऑफ लिव्हींग) कार्यक्रमाला गेली होती. बराच वेळ होऊन गेला. माझा कॉल उचलत नव्हती. थोड्या वेळानी मला फोन केला, म्हणाली, “मला अजून उशीर होईल. इथे खूप मजा आहे.” मी म्हटल, “अग पण कुणाबरोबर, कुठे आहेसॽ” “शैलेश, सारंग, त्यांचे फ्रेंडस् आहेत. मग तुला सांगेन.” “कोण हे शैलेश, सारंग आणि कोण आहेॽ” अर्थात मी रागावून. “वैशाली मावशी आहे, खूप छान आहे ती. ठेवते.” “नको, कोण ती मावशी, तिला दे.” नमस्कार चमत्कार झाल्यावर मी सांगितल, “गौरीला एम. आय. डी. सी. वगैरे भाग माहीत नाहीत. तिला एकटीला घरी सोडू नका.” “काळजी करु नका. शैलेशला पाठवीन मी.” परत शैलेश... काय प्रकार आहे हाॽ
थोड्या वेळाने गौरी घरी आली. म्हणाली, “मावशी येणार आहे तुला भेटायला.”
२/३ दिवसांनी ती खरच भेटायला आली आणि मग येतच राहिली.
अगदी परवाच्या मे महिन्यात मला म्हणाली, “गुरुजी कधी आश्रमात आहेत ते सांग मी येते बंगलोरला, तुझ्या नवीन घरात यायचय मला.”... पहिल्यांदाच तिने शब्द पाळला नाही.
ओळख झाल्यानंतर दोन्ही कुटुंबातील सर्वांचा सर्वांशी परिचय झाला. शैलेश सारंग सार्खी गुणी मुलं तर मी आतापर्यंत पाहिली नाहीत. श्री. ढेकणे यांचे निःशब्द सहकार्य सतत असायचे.
त्यानंतर लेगचच सारंगच्या लग्नासाठी (ऑगस्ट २००४) आम्ही आश्रमात प्रथमच आलो. आणि “आश्रम” ही आमची लाइफ स्टोरीच होऊन गेली. ती म्हणायची आर्ट ऑफ लिव्हिंग म्हणजे तिला समाजकार्यासाठी मिळालेला प्लॅटफॉर्म आहे. कामाच्या निमित्ताने विविध क्षेत्रातील, विविध वयोगटांतील स्त्रिया, पुरुष, मुले एकत्र आणावीत, त्यांच्याशी स्नेहसंबंध जोडावेत हा तिचा छंद. त्यामुळे तिला अनेक मैत्रिणी आणि कुटुंबे जवळची होती. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कामासाठी कुणाचा कसा उपयोग करुन घ्यावा आणि सेवाकार्य पुढे कसे न्यावे याबद्दल तिच्या योजना असायच्या, आणि हे सर्व पूर्ण निःस्वार्थपणे! पैसा, नाव, मोठेपणा याचे तिला काडीमात्र आकर्षण नसायचे.
कधी कधी सकाळी साडेसात आठलाच घरी यायची. अग, तयार हो पटकन. वाघेरा पाड्याला जायचय. किंवा अंबरनाथला नाला सुशोभिकरणाच काम चालू आहे, त्या संदर्भात एक परमिशन घ्यायचीय. असे काहीतरी. ही नक्कीच उपाशी आली असणार. आई आम्हाला चहा, नाश्ता, द्यायची, काम झाल्याशिवाय आम्ही परत येणार नाही हे तिला माहीत होत.
एखादा भाग कसा डेव्हलप करावा हे मी तिच्याबरोबर “वाघेरा पाडा” येथील काम करतांना शिकले. तीन रिक्षा बदलून आम्ही त्या आदिवासी खेड्यात जात असू. नवचेतना, सत्संग, वृक्षारोपण, स्वच्छता-आरोग्याबद्दल जागरण, पाणीपुरवठ्यात सुधारणा, तरुण मुलांना “मोहाच्या दारू”च्या मोहातून आवरणे, हे सर्व कसं करायचं, तिला माहित होते.
डोंबिवली शहरात आणि आजूबाजूच्या गावांमध्ये नवचेतना, सत्संग पासून हॅपीनेस प्रोग्राम, अडव्हान्स मेडिटेशन प्रोग्राम, डी. एस. एन., वाय. एल. टी. पी., सहज, इ. कोर्सेस आणि स्वच्छता, वृक्षारोपण, फॉलोअप्स, त्र्यंबक होम, ललितासहस्त्रनामपाठ इ. कार्यक्रम संघटित करण्यात तिचा नेहमीच पुढाकार होता.
२००८ मध्ये ए. ओ. एल. टीचर झाल्यावर पहिले काही हॅपीनेस प्रोग्राम म्हणजे अक्षरशः सेलिब्रेशन असायचे दोन्ही घरांतील इनडोअर प्लांट्स, दिव्यांच्या माळा, फ्लॉवरपॉट्स, कारपेट. हा सर्व माल व्हेन्यूवर जात असे. काही काळ तर आम्ही इनव्हर्टर सुद्धा घेऊन जात होतो.
एखाद्या पुढाऱ्याचा कमी वेळात अनेक कामे करण्यासाठी अल्पकाळाचा झंझावाती दौरा असतो, अगदी तसच तिने झंझावाती काम केल आणि निघून गेली.
उपलब्ध परिस्थितीचा विविध आनंद उपभोगून ती रसिकतेने जगली. चांगली पुस्तके वाचावी, चांगले सिनेमे पहावे, छान कपडे घ्यावेत, घरात मोजक्या पण सुंदर वस्तू असाव्यात, कधी चविष्ट पदार्थ तयार करावे, प्रकृतीसाठी सात्विक आहार घ्यावा. मॉर्निंग वॉक आणि पंचकर्म करावे. संगीत ऐकावे व शिकावे. सत्संगात मनसोक्त्त नृत्य करावे. या सगळ्यात ती रमून जायची, नव्हे – झोकूनच द्यायची स्वतःला.
माझ्याबरोबर डोंगरावरील मुंब्रादेवीच्या देवळात येऊन मेडिटेशन करणे तिला आवडे. तसेच खरेदीसाठी “मसजिदला” किंवा पर्श मटेरियलच्या खरेदीसाठी “मदनपुरा मार्केट”मध्ये यायला तिला तितकच आवडे. मुंबई महानगर पालिकेची, व्ही. टी. येथील हेड ऑफिसची गॉथिक बांधणीची पुरातन इमारत तिला इतकी आवडली की तळमजल्यापासून वरपर्यंत फिरून तिने ती एखाद्या लहान मुलीसारखी पाहिली. बाजीप्रभू चौकातील भाजीसुद्धा आम्ही एकत्र घेतली.
मी बंगलोरला स्थलांतर केले आणि योगायोगाने तिने पुण्याला बिऱ्हाड हलवले. आमच्या भेटी कमी झाल्या पण होत राहिल्या. अगदी एवढ्यातच आमची भेट झाली नाही. तिची इथे येण्याची इच्छा होती.
असं वाटतं, एका भल्या पहाटे वैशाली येईल, म्हणेल – भारती चल, कोर्ससाठी खूप फोन कॉल्स करायचेत. तुझ्याकडेच बसू या दिवसभर.
By
Bharati Garud
Bangalore, India
No comments:
Post a Comment