काही वर्षापूर्वी आमच्या ऑफिसतर्फे एक ट्रेनिंग प्रोग्रॅम झाला होता. मुंबईसारख्या ठिकाणी जेव्हा अशा ट्रेनिंगला लोक जमतात तेव्हा त्यातल्या निम्म्याहून अधिक लोकांना रिक्षा, बस,ट्रेनचा तासादोनतासाचा प्रवास करायला लागलेला असतो. पुन्हा समोर दिसत असतात आजच्या दिवसातली राहलेली कामे जी उद्या कितीही संकट आली तरी पूर्ण करावीच लागणार असतातच. त्यात पुन्हा बायका असतील तर त्यांचा निघण्याआधी तासादोनतासाचा वेळ ओट्याशी उभे राहण्यात गेलेला असतो. कुणाच्या डोक्यात इतर चिंता असतात तर कुणाच्या डोक्यात जाताजाता खरेदी करण्याचे विचार. काही नवं शिकवण्याआधी या सगळ्यांना एका प्लँटफॉर्मवर आणण्यासाठी ' बिरारी 'सरांनी त्यांच्या सत्राची सुरवात प्रार्थनेनी केली. ती प्रार्थना होती 'अंकुश' सिनेमातले 'सुषमा श्रेष्ठ' आणि 'पुष्पा पागधरे' यांनी गायलेले 'इतनी शक्ती हमे देना दाता...' हे गाणे.
नंतर हळूहळू रोज सकाळी ऑफिसमधे काम सुरू करण्याआधी हे गाणे लावले जावू लागले. मी कायम आस्तिक नास्तिकतेच्या सीमारेषेवर भटकणारी. पण हे गाणे खरतर प्रार्थना सुरू असताना डोळे मिटून नकळत गुणगुणताना डोक्यातील विचारचक्रे सुरू असतात आणि रोज नवा अधिकअधिक खोल असा अर्थ लागत जातो.
"इतनी शक्ति हमें देना दाता
मन का विश्वास कमजोर हो ना।"
सर्वशक्तिमान अशा दात्याकडे म्हंजे ईश्वराकडे वा अज्ञात शक्तीकडे आपले हे मागणे. आपण मागतो ते कुणाकडे तर आपल्या अत्यंत जवळच्या माणसाकडे. जिथे काही मागताना आपला अंहभाव मधे येत नाही किंवा आत्मसन्मानाला ठेच पोचत नाही. आणि मागणे तरी काय तर माझ्या क्षमतांवरचा, मी प्रामाणिकपणे अंगिकारलेल्या मार्गावरचा माझा विश्वास नेहमी कायम राहो.
"हम चले नेक रस्ते पे हमसे
भूलकर भी कोई भूल हो ना॥"
इथे मला कायम तो 'दिवार' मधला शशी कपूरचा रस्ता आठवतो. कच्चा, खाचखळग्यांनी भरलेला लांबचा पण नेकपणाचा. नकळत घडणारी छोटीशी चूक किंवा पडणारा छोटासा मोह वेळ वाईट असेल तर एखाद्या व्यक्तीला कुठून कुठे घेवून जावू शकतो. टिकटिक काही नेहमी प्रेमाचीच वाजली पाहिजे असं नाही. वेळेवर धोक्याची घंटा ही वाजली पाहिजे त्यासाठी ईश्वराचे पाठबळ आणि मनावरच्या संस्काराची ताकद दोन्ही पाहिजे.
"दूर अज्ञान के हो अंधेरे,
तू हमें ज्ञान की रौशनी दे।
हर बुराई से बचते रहें हम,
जितनी भी दे भली ज़िन्दगी दे॥
बैर हो ना किसी का किसी से
भावना मन में बदले की हो ना।"
माझ्या मनातले अज्ञान मग ते माझ्या कामामधल्या एखाद्या गोष्टीबद्दल असेल किंवा कुणाबद्दल समज गैरसमज असतील तर ते दूर होवोत. आळशीपणा, कामटाळूपणा, अप्रामाणकिपणा सारख्या अनेक वाईट वृत्तींपासून माझे रक्षण व्हावे. दुसऱ्याशी स्पर्धा किंवा बदला यांत माझी शक्ती खर्ची होऊ नये. त्याऐवजी माझ्या शक्तीचा उपयोग व्हावा अधिक अधिक चांगल्या कामासाठी.
"हम ना सोचे हमे क्या मिला है
हम ये सोचे किया क्या है अर्पन
फुल खुशिंयो के बॉंटे सभी को
सबका जीवन ही बन जाये मधुबन
अपनी करूणा का जल तू बहाके
करदे पावन हर एक मन का कोना'
आपण एखादी गोष्ट करतो तेव्हा त्याच्या बदल्यात आपल्या खूप अपेक्षा असतात. पैसा, नाव, कौतुक अशा अनेक. त्याचा विचार करण्यात आपण बहूमुल्य वेळ वाया घालवतो. तोच वेळ जर का काम अधिक नेटके, लवकर,अचुक करण्यावर घालवला तर. किंवा रूढ पद्धतीत अधिक चांगले बदल कसे करता येतील यावर घालवला तर आपला वेळ तर सत्कारणी लागेलच. पण हे करताना जो आनंद मिळेल त्याने आपल्या सर्वांचेच आयुष्य आनंदमय होईल.
प्राजक्ता कर्वे जोशी
No comments:
Post a Comment