Monday, 30 September 2019

धर्मस्थापना म्हणजे कायॽ


आपल्या आकलनापलीकडे एक शक्ती या जगात आहे असा अनुभव आपल्या प्रत्येकाला येतो. त्या शक्तीला नाव वेगवेगळी दिलेली दिसतात. कोणी देव म्हणेल, कोणी निसर्ग म्हणेल, कोणी परम तत्त्व म्हणेल तर कोणी ब्रह्म मानेल. या शक्तीचा प्रत्यय आपल्याला केव्हा व कसा येतो या संदर्भातले गीतेच्या अनुषंगाने थोडेसे चिंतन. 

प्रत्येक युगात असा काही काळ येतो की धर्मानुसार नित्यनेमाने अधिक प्रमाणात वागणारी माणसे हळूहळू शिथिल वर्तन करु लागतात. नकळत धर्माला ग्लानी येते. अधर्म वाढू लागतो. काही जणांचा अहंकार वर्धिष्णु होतो. अशास्त्रीय पद्धतीने ते जीवन व्यतीत करतात. विषय लोलुप इंद्रियांचा स्वैराचार सुरु होतो. विवेकबुद्धी नष्ट होत जाते. आपले तपही ते अशाच अमर्याद अधिकारप्राप्तीसाठी खर्ची घालतात आणि मग सामान्य जनांवर अत्याचार करायला सुरुवात करतात. त्यांची मुजोरी इतकी वाढत जाते की ते सज्जनांनाही पीडा देऊ लागतात. धर्माबद्दल द्वेष, अनुद्गार आणि मी म्हणेन तीच पूर्व अशा पद्धतीचे वर्तन करु लागतात. देव वगैरे खोटे. मीच काय तो कर्ता धर्ता अशी प्रवृत्ती वाढते. दुष्टपणाची पराकोटी होते. आपल्या धर्मात अशा मनुष्यांनाच राक्षस अशी संज्ञा दिलेली आहे. हिरण्यकश्यपु, रावण, महिषासूर ही काही नावे त्याच पठडीतील. आज दिसणारे आतंकवादीही त्याच वंशाचे. याच परिस्थितीचे वर्णन यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। या श्लोकार्धात येते.

अशावेळी दुष्टांचे निर्दालन व्हावे असे अनेकांना वाटते पण त्यांचे काही चालत नाही. तेव्हा अशी माणसे एकत्र येऊन काही अनुष्ठान करतात. प्रार्थना करतात. त्या परमतत्त्वाला विनवणी करतात. दिसत असलेल्या परिस्थितीचे निवेदन करतात. आधी ज्याप्रमाणे दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी अवतरलास तसा आताही ये म्हणून हाक मारतात. माणसामाणसांतील आत्मविश्वास जागवतात. अन्यायाला प्रतिकार करण्याचे सामर्थ्य मिळावे असा प्रयत्न करतात. त्यासाठी  परमतत्वाला आवाहन करतात की तुझेही सहकार्य प्राप्त होवो. तेव्हा भगवंत त्यांच्या सहाय्यार्थ अवतार घेतात. याचाच अर्थ असा की विश्वचालक शक्ती जी आहे ती देहात अवतरित होते. म्हणजेच अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्। सगुण रुपात येऊन लीला करतात.

अवतरित झालेला भगवंत मग दुष्टांचे निर्दालन करण्यासाठी सत् शक्तीला संघटित करतात. धर्माची पुनःस्थापना करतात. त्या त्या युगानुरुप विस्कटलेली समाजघडी सुचारु पद्धतीने चालावी अशी व्यवस्था लावून देतात. विनाशकारी शक्तींना हद्दपार करण्यासाठी ज्या ज्या आवश्यक गोष्टी असतील त्या करतात. कधी शस्त्राच्या सहाय्याने कधी युक्तीच्या सहाय्याने. रावणाचा, कंसाचा नाश शस्त्रसामर्थ्याने केला गेला तर हिरण्यकश्यपुला युक्तीच्या सहाय्याने संपविले गेले. नरसिंहासारखा अवतार दुष्ट निर्दालनानंतर लगेच अंतर्धान पावला. धर्मस्थापनेचे कार्य प्रल्हादाकरवी केले गेले. मात्र राम आणि कृष्ण या अवतारांना अनेक दुष्टांचे निर्दालन करावे लागलेले दिसते. रामांच्या काळात काही विशिष्ट भागापुरताच अधर्म माजलेला दिसतो. तर कृष्णावतारात या अधर्माची व्याप्ती वाढलेली दिसते. 

विस्कटलेल्या समाजघडीचे नव्या पद्धतीने बांधणीचे कार्य म्हणजेच धर्मसंस्थापना होय. आणि ती घडी विस्कटण्याचे कार्य करणारांचे पारिपत्य म्हणजे दुष्टांचे निर्दालन. भगवद्गीतेतील चवथ्या अध्यायात 

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत। अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥ 

परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम्। धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

या श्लोकातून हेच व्यक्त होते. 

By

Padma Dabke,

Pune, India


No comments:

Post a Comment