थेंब शांततेचे
खूप वेळापासून ‘कृष्णा’ त्या दोघांकडे बघत होती. बोलताना त्यांच्या चेह-यावर जरा जास्तच हालचाल दिसत होती. त्यांचे हावभाव, मुद्रा जरा जास्तच होत होत्या.
ते दोघे शाळेचे विद्यार्थी होते, हे त्यांच्या गणवेषावरून कळतच होतं. बसमध्ये एकाच सीटवर बसले होते आणि तरीसुद्धा इतक्या जोरजोरात तोंडं वेडीवाकडी करून बोलत होते.
कृष्णा बसमध्ये उभी होती. त्या दोघांची सीट तिच्यापासून दूर होती. त्यामुळे त्यांचे आवाज तिच्यापर्यंत पोचत नव्हते. तरीही त्यांच्या बोलण्याचा ढंग तिला काहीतरी विचित्र वाटत होता. उभ्या प्रवाशांची रांग हळूहळू पुढे सरकत गेली तशी कृष्णापण थोडी पुढे सरकली. त्यांच्याजवळ आली. थोडा वेळ त्यांचं निरीक्षण केल्यानंतर तिच्या लक्षात आलं, ते दोघं मूकबधिर होते. म्हणूनच ते संपूर्ण चेह-याचा संप्रेषणासाठी माध्यम म्हणून वापर करून घेत होते, हातांच्या अतिजलद हालचाली करत होते. चिन्हांकित, शब्दहीन भाषेमुळे त्यांचे चेहरे, हावभाव अतितीव्रतेने अर्थ प्रकट करण्याचा प्रयत्न करत होते.
मोठ्या कुतूहलाने कृष्णा त्यांना निरखत होती. तेवढ्यात, रांगेत त्यांच्या सीटशेजारी जो माणूस होता त्याने त्या दोघांपुढे हात केला आणि हातांच्या जलद हालचालींनी काहीतरी सांगितलं. दोन्ही मुलांच्या चेह-यावर तीव्र आश्चर्याचे भाव उमटले. एक हात स्वतःच्या छातीवर आणि दुसरा त्या माणसाकडे करून मुलाने चेहरा प्रश्नांकित केला. उत्तरादाखल रांगेत उभ्या असणा-या त्या माणसाने आपल्या शेजारी उभ्या असलेल्या दुस-या माणसाच्या गळ्यात हात टाकून त्याला स्वतःकडे ओढलं. अर्थ स्पष्ट होता. चौघेही मूकबधिर होते. सीटवर बसलेले शाळेचे विद्यार्थी होते, बहुधा मूकबधिर विद्यालयाचे. रांगेत त्यांच्या शेजारी उभे असलेले दोघे २०-२५ वयाचे तरुण होते. एकाच वेळी चार मूकबधिर व्यक्ती एकाच बसमध्ये एकमेकांशेजारी याव्यात ही किती योगायोगाची गोष्ट होती!
कृष्णा दुरून चौघांना न्याहाळत होती.
एका सरकारी कार्यालयात सरकारी योजना शब्दांकित करणं, त्यांचं योग्य, नेमक्या शब्दात स्पष्टीकरण देणं, दुस-या भाषांमध्ये त्यांचा अनुवाद करणं, वेळ पडल्यास संस्कृतच्या आधारे नवे शब्द तयार करणं हे काम कृष्णा करत होती. तिला संपूर्ण दिवसभर सहवास होता, तो शब्दांचाच. शब्दांशिवाय तिच्या जगण्याला काही अर्थ नव्हता. प्रत्येक क्षणी शब्द.. शब्द.. शब्द..
कधी कधी तिला शब्दांची घृणा वाटायला लागायची. या पार्श्वभूमीवर आज त्या चौघांचा निःशब्द संवाद पाहून तिला खूप आश्चर्य वाटलं आणि आनंदही झाला.
थोड्या वेळाने रांगेतले अनेक लोक उतरून गेले. कृष्णा त्या चौघांच्या जवळ आली. त्या चौघांचे हावभाव पाहण्यात, त्यांचा अर्थ लावण्यात तिचा कितीतरी वेळ निघून गेला. एका हाताने वरची दांडी पकडलेली, खांद्यावर ओझं असताना कुणालाही असंच वाटेल की, या अवस्थेचं थोडा वेळ विस्मरण व्हावं. वेळ असा जावा की, कसा गेला कळूही नये. कृष्णालाही हेच हवं होतं. म्हणून ती मोठ्या कुतूहलाने त्या चौघांच्या संभाषणाचा एक भाग, एक श्रोता म्हणून बनली होती. फक्त पाहणारा, जाणणारा, साक्षी.
थोड्या वेळानंतर मात्र हे संप्रेषण आवश्यकतेपेक्षा जास्तच होतंय असं तिला वाटायला लागलं. जे बोलू शकत नाहीत, ऐकू शकत नाहीत त्यांना एवढं बोलताना पाहून तिला जणू शिसारी यायला लागली. माणसाला ‘दुसरा’ एवढा का हवा असतो? का उघडी करायची असतात सगळी दारं?
मध्यरात्री अर्धवट झोपेत अर्धवट जागेपणी कृष्णाला वाटलं, शब्द कीटक बनून आपल्या डोळ्यात जातायत. ती जोरजोराने डोळे चोळून शब्दांच्या कीटकांना बाहेर काढू लागली. ते कानात शिरले, नाकात शिरले, तोंडात छोटे, छोटे केसांचे तुकडे असावेत तसे दातात, जिभेवर येऊ लागले. थू.. थू.. करून कृष्णाने शब्दांना थुंकून टाकलं. ढेकूण बनून ते कपड्यात घुसून तिला चावू लागले. मुंग्या बनून पायावर चढू लागले. कृष्णा कपडे झटकून त्या ढेकूण, मुंग्या, कीटकांना आपल्या शरीरापासून दूर करू लागली. मग तिच्या असं लक्षात आलं की शब्द जळवेसारखे तिच्या शरीराला चिकटून बसलेत. तिचं रक्त शोषतायत्. तिच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली आणि त्या आवाजानेच ती जागी झाली.
कृष्णा बाल्कनीत येऊन उभी राहिली. तिच्यासमोर आभाळाचा एक तुकडा होता. त्यावर एकच तारा संपूर्ण सामर्थ्यानिशी तळपत होता. झाडं झोपलेली होती. स्वतःत मिटलेली होती. इमारती अंधारात गुडूप झालेल्या. कुणीही, कुठेही, काहीही आवाज करत नव्हतं. त्या असीम शांतीमुळे कृष्णा व्याकुळ झाली. तिने तोंड उघडून त्या शांततेचे थेंब पिऊन टाकले. स्वतःच्या शरीरावर अलगद हात फिरवत तिने त्या शांततेच्या कणांना स्वतःच्या शरीरात मुरवून टाकलं. शांततेचे थेंब डोळ्यात पाणी बनून हळूहळू पाझरू लागले. त्यांच्या पाझरण्याचा कुठलाही आवाज नव्हता. सगळं नीरव, चुपचाप.
By
Sujata Mahajan
USA