ज्ञानेश्वरांच्या हस्तस्पर्शाने पुनीत झालेली व समग्र संत वाङ्गमयातून भक्तिरसात रंगलेली, ती आपली मराठी,
महाराष्ट्राचा त्रिकालाबाधित गौरव व भूषण अशा शिवछत्रपतींच्या गुणगाथेची, शाहीरी परम्परेची, ती आपली मराठी!
भारुड, गोंधळ, वग, लावणी आदि लोक कलांचा कणा असलेली, ती आपली मराठी,
स्वातंत्र्यपूर्व काळात, टिळक, सावरकर आदिंच्या जाज्ज्वल्य देशभक्तिने ओजस्वी झालेली, ती आपली मराठी!
तर, स्वातंत्र्योत्तर काळात, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत, प्रा.अत्रे, प्रबोधनकार ठाकरे प्रणीत मराठी अस्मिता, ती आपली मराठी!
न्यायमूर्ति व रमाबाई रानडे, महात्मा ज्योतिबा व सावित्रीबाई फुले, महर्षि कर्वे यांच्या प्रखर समाजाभिमुखतेमुळे, स्त्री शिक्षणाचा श्रीगणेशा करणारी, ती आपली मराठी!
संगीत नाटकांची दैदीप्यमान परंपरा लाभलेली, ती आपली मराठी,
कुसुमाग्रज, कानेटकरांच्या अलंकारिक, भव्य-दिव्य शैलीने नटलेली व शिवाजी सावंतांच्या प्रासादिक शैलीचे 'उत्तरीय' ल्यालेली, ती आपली मराठी,
बाबासाहेब पुरंदरे, ना. सं. इनामदार, रणजीत देसाई आदिंच्या ऐतिहासिक साहित्याने गौरवान्वित झालेली, ती आपली मराठी,
खांडेकर, गोनीदांच्या प्रतिभेने बहरलेली, जीएंच्या वैशिष्टयपूर्ण तरल शैलीने 'ऍनिविओला' बनलेली, ती आपली मराठी!
गदिमांसारखा शब्दमहर्षी अन सुधीर फडक्यांसारख्या महान गायक-संगीतकराच्या संगमातून उगम पावलेल्या 'गीत-रामायणा'ची जननी, ती आपली मराठी!
भा.रा. तांबे, इंदिरा संत, बा.भ. बोरकर, वसंत बापट, मंगेश पाडगांवकर, शांता शेळके आदि कविवर्गाच्या शैलीने नाद, सूरमय झालेली, ती आपली मराठी,
'आरतीप्रभू', मर्ढेकरांच्या काव्याने कधी दुर्बोध, कधी आत्ममग्न तर कधी प्रगल्भ झालेली, ती आपली मराठी,
'पुल' या महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्वाच्या चतुरस्त्र लेखणीने गळ्याचा ताईत झालेली, ती आपली मराठी!
वपुंच्या कधी मिश्किल, खुमासदार तर कधी हृदयस्पर्शी लिखाणाने नवी कात टाकलेली, ती आपली मराठी,
गाडगीळ, मतकरींच्या कधी मिश्किल, कधी वास्तववादी तर कधी गूढकथांत गुंतलेली, ती आपली मराठी,
बहिणाबाईंच्या काव्यातून वर्हाडी बोलीचे पाणी व महानोरांच्या कवितांतून रानवारा प्यायलेली, ती आपली मराठी,
जयवंत दळवींच्या लेखणीने अंतर्मुख, हृदयद्रावक करणारी तर दांभिक, परंपरावादी संकल्पनांना छेद देत थेट प्रश्नाला भिडणारी 'तेंडुलकरी' शैली, ती आपली मराठी!
लवचिक, लडीवाळ, तर कधी ओकेल अंगार, अशी ही माय-मराठी!
राजभाषा असूनही आज वाटते काहीशी हतबल, हाक मारत्येय पुनरुत्थानासाठी!!
By
Aakansha Phadke
Mumbai, India
No comments:
Post a Comment