तिचं वय सदुसष्ट. लहानपणापासून अनेक चढउतार बघीतलेले, अनुभवलेले.आता मुलासुनांच्या राज्यात सुखाऩ साय धरलेली. सायीसारखी नातवंड पण आता मोठी होऊ लागलेली.एकदम स्थैर्य आलेलं आयुष्याला.पण एकाजागी बसवतंय होय! सतत काहीतरी व्याप मागे असण्याची सवय. देवदयेनं बिपी, शुगर असलं काहीही मागं लागलेलं नाही. भजन, भिशी मध्ये रमणारा जीव नाही तिचा. मग काहीतरी नविन शिकायचं ठरवलं. मोडी शिकायचं. सुरुवात केली. हळूहळू शिकण्यामधला रस वाढत गेला. वेडच लागलं म्हणा नं. लहान मुल जसं नविन लिहायला शिकल्यावर सतत काहीतरी लिहीतं तसंच. दिसेल ते मोडीत लिप्यंतर करु लागली. मग ठरवलं भगवद्गीतेचे मोडीत लिप्यंतर करायचं. तो दिवस होता आषाढी एकादशीचा. विठू माऊलीचं नाव घेऊन केली सुरुवात. चातुर्मासाचे व्रतच. संस्कृत भाषा जोडणारी. अनेक जोडाक्षर तिच्यात. पण न थकता नेटानं काम सुरुच ठेवलं. प्रत्येक काम वेळेच्या आत पूर्ण करण्यात तिचा हातखंडा. हे पण काम संपवलं की तिनं दसर्याच्या आतच. आता काय? वय कितीही असलं तरी कुणीतरी मोठ्या व्यक्तीनं कौतुक करावं अशी ईच्छा असतेच नं. मोडी एक ऐतिहासिक लिपी. आणि ईतिहास क्षेत्रातलं ऋषितुल्य व्यक्तीमत्व आदरणीय बाबासाहेब पुरंदरे. होय त्यांनाच आपलं काम दाखवावं असं ठरवलं. पण कसं? काय करावं बरं? योग काही जुळून येईना. पण तिची ईच्छाशक्ती प्रबळ. मोडीच्या लिप्यंतर स्पर्धेत तिनं भाग घेतला होता. त्यात बक्षीस मिळालं. पुरस्कार मिळणार होता बाबासाहेबांच्या शुभहस्ते. बक्षीसापेक्षा हा आनंद खुपखुप मोठा. तिनं दाखवली तिची वही तिथं. प्रत्यक्ष बाबासाहेबांनी कौतुक केलं. तिचा,तिच्या जिद्दीचा उल्लेख केला भाषणात. हे अजुन एक अनपेक्षीत बक्षीस. भरुन पावली ती आणि आम्ही पण. आई, खरंच खुपखुप अभिमान वाटतो तुझा आणि तुझ्या जिद्दीचा.
मनीषा ढापरे , पुणे
|
Friday, 1 February 2019
तिची जिद्द
Subscribe to:
Post Comments (Atom)
Wa.. Manisha.. Chhan lihites...Hats off to kaku🙏🙏
ReplyDeleteआपल्या आईंना भेटायला खूप आवडेल. खूप महत्त्वाचं काम करत आहेत त्या
ReplyDelete