Wednesday, 20 February 2019

अरे संसार संसार

बाईच बाईचा शत्रू असते असं नसून समोरच्या बाईच्या बोलण्या,वागण्याकडे आपण कशा दृष्टीकोनातून बघतो यावर शत्रुत्व की मित्रत्व की शुभचिंतक हे ठरवलं पाहीजे.  असं पल्लवी,  माझी वयाने छोटी पण प्रगल्भ विचारांची मैत्रीण मला गप्पांच्या ओघात म्हणाली.

खरं सांगू, मी तिच्या वयाची असताना खरंच इतकी समजूतदार नव्हते.  बाईच बाईला छळते, शत्रू असते, घर मोडते इत्यादी मतं माझीही होती.  याला कारण तेव्हाची आजूबाजूची परिस्थिती, काॅलेज संपायच्या आधीच लग्न झालेलं अशी अनेक कारणं असू शकतील नव्हे होतीच.

सासरी आम्ही रहात असलेल्या इमारतीत अक्षरशः सर्व धर्माची बि-हाडं होती.  आगरी,  सिंधी, ख्रिश्चन, मराठा, सोनार, मुस्लीम, सीकेपी, ब्राह्मण.  बरं यात सासूबाईंच्या वयाच्या तिघीजणी होत्या.  माझ्यासारख्या नव्या सासूरवाशिणी चार जणी होत्या.  आणि चार पाच जणी दोन मुलं/ एक मुलं आणि राजा-राणी अशा टाईपच्या होत्या.

तिन्ही अहो आई (आगरी, मराठा आणि ब्राह्मण) यांच्या गप्पा ओघानेच सुना, घरकाम या विषयाकडे वळायच्या आणि कळत नकळत त्याचे पडसाद आमच्या घरातही उमटायचे.  त्या तुलना, टोमणे नको व्हायचे.  मी माझी नोकरी बरी आणि घरी आलं की घरातली कामं, वाचन टी.व्ही बघणं बरं या स्वभावाची होते तरीही हमखास कोणीतरी बिल्डींगमधलंच (बाईच बरंका) आईंबद्दल काहीतरी सांगेच.  कितीही दुर्लक्ष करायचं ठरवलं तरी मनात ते ठसठसत राहीच. यात भर म्हणून की काय आईंनी मला स्पष्ट सांगून टाकलं होतं "की मी काही मुलीची जबाबदारी अजिबात घेणार नाही".  मला वाटे मावशींची मुलं बरी सांभाळता आली ह्यांना. बहिणीची, भावजयांची वाळवणं, पापड, फेण्या, हळदी, तिखटं बरं धावून धावून करता येतात. फक्त माझ्यासाठी काही करता येत नाही.

आईला ही अशी कुरकुर केली की आई मलाच समजावे. "सुरेख, असं नसतं गं!  लहान मुलाची जबाबदारी खूप असते. इतर कामं परवडतात.  पण मुलांचे हट्ट, खाणं पिणं करण्यात दमछाक होते. आडनिड्या वयाच्या मुलांना ना उचलून घेता येत ना ओरडता येत.  त्यातून काही वयानंतर मनाची तयारी असते. पण शरीर साथ देत नसतं".

आईचाही मला जाम राग येई.  वाटे माझी आई माझं दुःख समजून घेतच नाहीये.  वाद व्हायचे आमचे. आई मुलीला सांभाळायची त्याबद्दल टोकलं तर म्हणायची,"माझी अजून पंचेचाळीशी पण आली नाहीये.  झेपतंय तोवर सांभाळणार नातीला. होत नाहीसं झालं की तेही सांगणारच तुला.  आत्ता तुला माझ्या मदतीची गरज आहे.  पैसा पैसा जोडणं तुला करणं आवश्यक आहे.  म्हणून मी मुलीला सांभाळतेय".

आता माझी पन्नाशी उलटल्यावर माझ्याच आयुष्यातल्या घटनांकडे मी त्रयस्थपणे बघते तेव्हा जाणवतं की केवळ आईच्या दबावामुळे, समजावण्यामुळे, संस्कारांमुळे आणि माझ्या तडजोड करण्याच्या वृत्तीमुळे आमच्यात टिपिकल सासूसुन संघर्ष झाला नाही. जगाला बघायला मिळाला नाही. पण मी आईंवर प्रेम, मायाही नाही केली. ब-याच गोष्टी कशा करू नयेत, कसं वागू नये हेच शिकले असं कडवटपणे मी आत्तापर्यंत सांगायची. पण आता मात्र मी तेव्हाच्या त्यांच्या स्थितीचा विचार करू शकते आणि त्यांच्याबद्दलचा मनातला सल बोथट होतोय हे जाणवू शकते. 

आईने मला घटनेकडे बघण्याचा वेगळा दृष्टीकोन दाखवला नसता तर कदाचित सासूच्या छळाच्या कहाण्या माझ्याकडेही असत्या.  

आता मी सुनेची सासू होण्याच्या वयात आले आहे. पण हल्लीची मुलं खूप प्रॅक्टीकल आहेत. फारसा त्रास करून घेणारी नाहीयेत. भावनिक त्रास, गुंतवणूक करणारीही नसावित. तरीही मी सासू म्हणून, आई म्हणून, बाई म्हणून घरात येणा-या मुलीला, तिच्या वागण्याला कोणतीही लेबल्स न लावता स्वीकारायची तयारी ठेवली तरी आहे.  माहित नाही भविष्याच्या पडद्यामागे काय लपलंय. पण एक मात्र खात्री आहे नवरा  तेव्हा मला म्हणायचा "तू लहान आहेस ना! लहानांनी मोठ्यांचं ऐकायचं असतं." आणि आता म्हणेल, "अगं तू मोठी आहेस ना? तू नाही सांभाळून घ्यायचं लहान मुलीला तर कोणी घ्यायचं?"

By

Anagha Joshi

Talegaon, India

No comments:

Post a Comment