Wednesday, 20 February 2019

सत्याच्या प्रकाशात चालायचं असतं ते, एकट्यानेच!

 ‘तुंगा’ च्या बाबतीत सर्व शिक्षकांचं एकच मत होतं, ‘तिच्या चेह-यावरची माशी हलत नाही.’ पण वर्गात पहिल्या पाचात येणा-यात ‘तुंगा’ होती. बाकी कश्शा – कश्शात ती भाग घेत नसे. ना क्रीडा, ना संगीत, ना वक्तृत्व, ना नाटक. काहीही नाही. नाही म्हणायला तिच्या एका चलाख मैत्रिणीने ‘मी तुंगाला घेऊन नाटक करून दाखवीन’ असं आव्हान स्वीकारून तुंगाला नाटकात घेतलं. नुसतं नाटक नाही, ‘विनोदी’ नाटक. स्त्रीराज्यात सापडलेल्या एका मॅनेजरची त्रेधातिरपीट वर्णन करणारं नाटक. तुंगा त्यात पुन्हा पुन्हा बाळंतपणाच्या रजेवर जाणारी कारकून होती. प्रॅक्टिसच्या वेळी तुंगाचे संवाद अचूक पाठ असत. दिग्दर्शक मैत्रिणीचा तिच्यावर दृढ विश्वास होता. ‘तुंगा’ने तो सार्थ ठरवला. मैत्रिणीने तिला संवाद अगदी मोजकेच ठेवले होते. पण तुंगाने ते इतक्या ठसक्यात म्हटले की तिला हिणवणारे शिक्षकसुद्धा पाहत राहिले. 

    तुंगाला चांगले मार्क्स मिळाले. मायक्रोबायोलॉजी सारखा विषय घेऊन ती बी.एस.सी. झाली. पुढे खूप काही करू शकणारी तुंगा अचानक दूरध्वनी केंद्रात कामावर रुजू झाली. तेव्हा अनेक जण हळहळले. ‘तुंगा’ने शिक्षण पुढे न वाढवण्याचा आणि नोकरी करण्याचा निर्णय घरच्या गरिबीमुळे घेतला होता. त्याबद्दल तिच्या तोंडून तक्रारीचा, पश्चातापाचा सूर कधीच कुणी ऐकला नाही.

    तिने आनंदाने नोकरी स्वीकारली. पुढे लोकांना तिने आणखी एक धक्का दिला तो म्हणजे तिच्याच ऑफिसात काम करणा-या सहका-याशी लग्न करण्याचा निर्णय घेऊन.

    सुरेश तिचा नवरा – चारचौघांसारखा, चारचौघांच्या रीतभातीत बसेल ते ते करणारा होता. दोघंही एके ठिकाणी नोकरी करतात म्हणून सुरुवातीला ऑफिसातल्या सहका-यांच्या प्रेमळ चेष्टेचा विषय बनले. पुढे पुढे लोकांना सवय झाली.

    सुरेशच्या घरी कडक स्वभावाची आई आणि वडील होते. सुरुवातीला काही दिवस सासूचा जाच तुंगाने निमूट सहन केला. नंतर ती सासूला शब्दात पकडू लागली. तिच्या बोलण्यात लॉजिक नसल्याचं दाखवून देऊ लागली. टिप-या अधूनमधून चालत. पण कधी विकोपाला गेलं नाही. कारण तुंगा इतक्या हसतमुखाने मजेदारपणे सासूच्या चुका दाखवून द्यायची. संतापणं नाही, धुसफूस नाही. शांतपणे आपल्याला हवं ते करत रहायची.

    काही वर्षांनी नोकरीत प्रमोशन मिळावं म्हणून वरच्या ग्रेडच्या परीक्षा देण्याची कल्पना पुढे आली. तुंगाने ती त्वरित उचलून धरली. सुरेशला काही ती कल्पना आवडेना पण त्याचा मित्र ‘अमित’ आणि तुंगाने त्याला भरीस घातले.

    तिघंही परीक्षेला बसले. अभ्यासाला लागले. सुरेशला ऑफिसातनं आल्यावर वेळ असायचा पण तो थोडावेळ झोपायचा मग टीव्ही पहायचा, मग जेवून झोपायचा.

    तुंगाला आल्या आल्या घराच्या, मुलांच्या सेवेत उभं रहावं लागायचं. सगळं आवरून झोपायला तिला खूप उशीर व्हायचा. बेडरुममध्ये आल्यावर ती सुरेशकडे पहायची. तो झोपला असेल तर शांत चित्ताने अभ्यासाकडे वळायची. जागा असेल तर पुस्तक खाली ठेवून गुपचूप त्याच्या शेजारी झोपायला जावं लागायचं.

    चहा – स्वयंपाक करताना, कपड्यांच्या घड्या करताना, डाळ-तांदूळ निवडताना, फर्निचरवरची धूळ साफ करताना, आंघोळ करून बाहेर आलेल्या छोट्याचं डोकं पुसताना, थोरल्या सोनूची वेणी घालताना तिच्या डोक्यात फक्त अभ्यासाचेच विचार असायचे. वाचलेल्या संकल्पना आठवायच्या, नवे प्रश्न पडायचे. उत्तर देणारं कुणीच नव्हतं. किंबहुना ठरलेल्या मजकुराबाहेर स्वतंत्र चिंतन असावे अशी अपेक्षाही नव्हती.

    अभ्यासासाठी घरातलं एखादं काम बाजूला ठेवलेलं चालत नव्हतं. सगळं दोरीत जिथल्या तिथे करावं लागायचं. पण तुंगाची तक्रार नव्हती. कशाबद्दलच. वेळ मिळत नाही. घरातले लोक मदत करत नाहीत, मुलं सारखं गुंतवून ठेवतात, या कशाबद्दलच नाही. सुरेशने अभ्यास करावा असं मात्र तिला वाटायचं. ती म्हणायची सुद्धा त्याला तसं. पण सुरेश लक्ष द्यायचा नाही. बघता बघता परीक्षा जवळ आली. याच काळात मुलांच्या परीक्षा होत्या. त्यांचा अभ्यास घेणं, त्यांच्या खाण्याच्या वेळा सांभाळणं ही जबाबदारी होतीच. पहिल्या पेपरच्या दिवशी तिने, सुरेशने पहाटे उठून अभ्यास केला. पेपर समोर आल्यावर तिला एकदम हसू आलं. काय हे! बीएस.सी. नंतर जवळ जवळ १२ वर्षांनी ही वेळ. सुरुवातीला वाक्यरचना कशी करावी हेच सुधरेना. पेपर समोर ठेवून ती मूढपणे त्याच्याकडे बघत राहिली. ब-याच काळानंतरच एक सामान्य वाक्य तिच्या मनात तयार झालं. हे लिहिलं आणि झालं! लिहीतच राहिली. सुपरवायझर हातातून पेपर घ्यायला आले तेव्हा तिने लिहिणं थांबवलं.

    मान, पाठ, खांदे सगळं ठणकत असताना डाव्या हाताने उजवा खांदा दाबत ती बाहेर आली. सुरेशला पाहून आनंदाने धावत त्याच्याकडे गेली अन्‌ विचारलं, ‘‘कसा गेला?’’

    कपाळाला आठ्या घालून सुरेश म्हणाला, ‘‘कसा जाणार? अवघड!’’

    ती म्हणाली, ‘‘मला सोपा गेला.’’ सुरेशने चमकून तिच्याकडे पाहिलं, ‘‘तू सगळे प्रश्न लिहिलेस?’’

    ‘‘हो. एकूण एक.’’

    तेवढ्यात अमित आला, ‘‘सोपा होता यार’ म्हणत.

    तिघंही एका कट्ट्यावर बसले. तिथेच पेपर सोडवायला सुरुवात. ‘तुंगा’ची उत्तरं ऐकून अमित थक्क होऊन तिच्याकडे पाहत राहिला. सुरेशने अस्वस्थ होऊन विचारलं, ‘‘काय रे अमित, काय म्हणतोस? किती मार्कस्‌ पडतील हिला?’’

    ‘‘ऐंशीच्या पुढे सहज’’

    हे उत्तर ऐकताच सुरेशचा चेहरा चपराक बसावी तसा झाला.

    ‘‘खरं म्हणतोस?’’

    ‘‘हो मग, बघच तू.’’

    सुरेश पुढे काहीच बोलला नाही. दोघेही आपापल्या गाड्यांपाशी गेले. तुंगा सुरेशचा चेहरा निरखून पाहत होती. त्याला काय बोचतंय याचा अंदाज तिला आला होता. त्यामुळे तिनेही स्वतःचा आनंद आवरता घेतला.

    परीक्षेसाठी दोघांनीही रजा घेतली होती. त्यामुळे घरीच आले. आईने उत्सुकतेने विचारलं, ‘‘कसा गेला?’’ एकाचवेळी ‘‘चांगला’’ आणि ‘‘वाईट’’ अशी उत्तरं आली. आईचाही चेहरा पडला. ती सुरेशला म्हणाली, ‘‘हिला सोपा न्‌ तुला अवघड गेला होय? आता हिला जास्त मार्क न्‌ तू नापास झालास तर?’’

    आईचं हे डायरेक्ट बोलणं सुरेशला मानवलं नाही. तो खेकसून म्हणाला, ‘‘कायतरी बोलू नकोस गं!’’ आईने भांडी लावण्याच्या निमित्ताने आदळआपट सुरू केली. तोंडाने काहीतरी रागारागात पुटपुटणं चालूच होतं. सुरेश वर निघून गेला. थोड्यावेळाने तुंगा बेडरूममध्ये आली.

    ‘‘काय झालं? बरं वाटत नाही का? आज लवकर उठलोय पहाटे. झोप झाली नाही. थोडं झोपूयात.’’ सुरेशचा चेहरा अतिशय चिंतामग्न दिसत होता. तुंगा त्याच्याशेजारी झोपली. त्याच्या छातीवर डोकं टेकवलं.

    ‘‘कसला विचार करता एवढा? काही टेन्शन आहे का?’’

    ‘‘तुंगा...’’ सुरेश इतक्या घोग-या आवाजात बोलला, की त्याला स्वतःलाच दचकल्यासारखं झालं. तुंगा तर उठूनच बसली तो आवाज ऐकल्यावर.

    ‘‘तुंगा...’’ सुरेश तिच्याकडे न पाहता समोरच्या भिंतीकडे पाहत बोलायला लागला. ‘‘तुंगा, मी जे बोलतोय ते नीट ऐक. असं समजू नकोस, की तुझी प्रगती पाहून मला वाईट वाटतंय. पण आपण ज्या समाजात रहातो तो एवढा पुढारलेला नाही. इथं पुरुषापेक्षा एखादी बाई श्रेष्ठ ठरते ही कल्पना लोकांच्या पचनी पडत नाही. अशा मागे पडलेल्या पुरुषाकडे लोक फार विचित्र नजरेने पहातात, जणू तो नपुंसकच असावा.’’

    तुंगाला हळूहळू अंदाज यायला लागला होता सुरेशला काय बोचतंय याचा. पण त्याच्या पुढच्या वाक्याने तिच्यावर बॉम्बच पडला.

    ‘‘माझी तुला कळकळीची विनंती आहे, तू उद्याच्या परीक्षेला बसू नकोस.’’

    ‘‘काय?’’

    ‘‘हो तुंगा, तू एवढ्या मार्कांनी पास झालीस आणि मी नापास झालो तर... तू विचार कर. आपल्या मुलांना काय वाटेल? आईला एवढे मार्क आणि बाबा नापास? तू विचार कर माझ्या आई-बाबांना काय वाटेल?’’

    तुंगा थिजल्यासारखी ऐकत होती. आपोआपच तिची मान नकारार्थी हलायला लागली. ते पाहून एक्साईट झालेला सुरेश जोरजोरात बोलायला लागला, ‘‘तू पास झालीस तर तुला प्रमोशन मिळेल आणि ट्रेनिंगसाठी वर्षभर पाठवतील. आपल्याला कसं जमणार ते? एक वर्षभर तू बाहेर रहाणं? मुलांचं कोण करणार? आईबाबांचं कोण करणार? ते काही खरं नाही. मला याच मुद्यासाठी तू परीक्षेला बसायला नको होतीस. मी काही इतका क्षूद्र नाही की तुझ्या यशाने नाराज होईन. पण आपण संसार मांडलाय तर आपणच तो सांभाळायला हवा, नाही का? तो विखुरला तर काय उपयोग? माझं एवढंच म्हणणंय की आत्ता तू बसू नकोस. वाटलं तर... वाटलं तर पाच-सहा वर्षांनी दे परीक्षा. काय मोठासा फरक पडतो. मुलं पण मोठी होतील तोवर.’’

    तुंगा अवाक्‌ होऊन त्याच्या रणनीतीला मनोमन दाद देत होती. तिचं नकार देणं आता थांबलं होतं. सुरेशने अजिजीने तिच्या गळ्यात हात टाकून म्हटलं, ‘‘ऐकशील ना एवढं माझं?’’ तुंगा काहीच बोलली नाही. तिने उशीवर मान टेकवली तेव्हा खळकन्‌ एक अश्रूंनी धार तिच्या गालावर ओघळली. सुरेश ते पाहून तडकून म्हणाला, ‘‘हे बघ, मी काय अन्याय बिन्याय करतोय तुझ्यावर, असं समजायचं कारण नाही. मी हे सगळ्यांच्या भल्याचंच सांगतोय. याउप्पर तुझी मर्जी.’’ तो उठून खाली निघून गेला. त्याच्या चेह-यावरचा ताण आता कमी झाला होता. 

    चार भिंतींच्या चौकोनी पेटीत पलंगावर पडलेलं तुंगाचं शरीर आणि मन निर्णयक्षम राहिलं नव्हतं. डोळ्यातल्या धारा थांबत नव्हत्या. बीएस.सी. ला असताना तिच्यावर प्राध्यापकांच्या आशा केंद्रित होत्या. ती एमएस.सी. करणारच हे प्रत्येकाला ठाऊक होतं. बीएस.सी.चा रिझल्ट घेऊन ती घरी आली. धो धो मार्क्स होते. बाबा थकलेल्या, मिणमिणत्या डोळ्यांनी तिच्याकडे पाहत म्हणाले, ‘‘तुंगाक्का, आता नोकरी शोधायला लागा. माझ्या एकट्याच्या पगारावर किती काळ रेटायचं हे सारं. मकरंदचं पण शिक्षण व्हायचंय. त्याला इंजिनियर करायचंय.’’

    मकरंद इंजिनियर होणार नव्हता. सिग्रेटी फुंकत गावभर पोरींच्या मागे फिरण्यात त्याचे दिवस चालले होते. पण आईबाबांच्या त्याच्यावर केंद्रित झालेल्या आशा शाबूत होत्या. ..... अशी कुठली वेळ असेल जेव्हा आपल्या आयुष्याचा निर्णय आपल्याला घेता येईल? कदाचित आपलं लग्न झाल्यावर आपल्याला हे स्वातंत्र्य मिळेल’ असं वाटून तुंगाने लगेच नोकरी मिळवली, लग्नही केलं. आणि आता शिक्षणात कर्तृत्व दाखवण्याचं तिचं स्वप्न पुन्हा एकदा संपलं...

    ती खाली आली. घरात सगळेजण तणावरहित अवस्थेत वावरत होते. तिने चहाचं भांडं घेतलं. गॅसवर आधण ठेवलं. दुस-या शेगडीवर दुधाचं पातेलं ठेवलं. ओट्याला टेकून ती आपल्याच घराकडे स्वतःतून बाहेर पडल्यासारखी पहात राहिली.

    रात्री ती बेडरूममध्ये आली तेव्हा तिच्या मनात काहीही खळबळ शिल्लक नव्हती. चेहरा नेहमीसारखाच शांत होता. प्रति रणनीती तिच्या डोक्यात तयार होती. 

    सुरेश तिच्याकडे पाहून हसला. त्याच्या दृष्टीने आता कोणतंच टेन्शन राहिलं नव्हतं. तुंगा त्याच्याजवळ बसली आणि अतिशय निर्धाराने बोलली. ‘‘मी परीक्षेला बसणार आहे. आपल्या सर्व कुटुंबाला वर नेणारी ही संधी आहे. ती केवळ ‘इगो’ पायी गमावणं मूर्खपणाचं आहे. वर्षभर मला बाहेर जावं लागेल. तेवढा काळ आई-भाऊ मुलांना सांभाळतील. त्यांच्या मदतीला आपण एखादी बाई ठेवू कामाला. तुम्ही स्वतः घरात थोडं लक्ष घाला. मुलंही आता खूप लहान नाहीत. स्वतःचं करू शकतात. माझं प्रमोशन झालं तर दर आठ दहा दिवसांनी मी येईनच. पण आपला परिस्थिती किती सुधारेल याचा विचार करा. मुलांच्या शिक्षणासाठी या अवघड काळात किती पैसे लागतात विचार करा. माझ्या मनात तुमच्याविषयी रिस्पेक्ट वाढेल. दोघांपैकी ज्याला जे जमेल ते त्याने करावं. सबंध घराच्या प्रगतीसाठी मी कष्ट करीन. तुम्ही त्याग करा. काय हरकत आहे?

    सुरेश काही बोलला नाही. पण ‘तुंगा’ चा प्रॅक्टिकल अप्रोच टाकून देण्यासारखा नक्कीच नव्हता. काय हरकत आहे?

    दुस-या दिवशी ती काही न बोलता तयार झाली. सुरेशबरोबर पेपरला गेली. पेपर लिहिताना पहिला आनंद, महत्त्वाकांक्षेची एक्साईटमेंट काहीही राहिलं नव्हतं. वारंवार डोळे भरुन येत होते. निर्जीवपणे ती लिहीत राहिली.

    अखेरीस रिझल्ट लागला. व्हायचे तेच झाले. ती डिस्टिंक्शनचे गुण मिळवून उत्तीर्ण झाली आणि सुरेश नापास झाला !

    रिझल्ट हातात पडल्यावर सुरेशच्या चेह-यावर संताप स्पष्ट दिसला. ‘‘सांगितलं होतं तुला मी. किती नाचक्की होईल आता माझी’’ आपल्या नापास होण्याचा संबंध आपल्या अकार्यक्षमतेशी नसून तुंगाच्या गुणवत्तेशी आहे असंच त्याला वाटत राहिलं.

    ‘तुंगा’ला आनंद झालाच होता. आपल्या उत्तम गुणांचा योग्य तो अभिमान तिला वाटत होता. माझ्यात अजूनही ‘ते’ आहे जे मी विसरून गेले होते, असं तिला वाटत होतं.

    दारात सासूसासरे वाट पहात होते. त्यांनी दारातच सुरेशला हटकलं. तो चिडून म्हणाला, ‘‘आत तर चला ना?’’

    आत गेल्यावर रिझल्ट फेकून देत म्हणाला, ‘‘नापास झालो! कळलं का, नापास झालो!’’

    ‘‘अगंबाई!’’ सासूबाई मटकन्‌ सोफ्यावर बसल्या. अन्‌ सुरू झाली रडारड. सगळे रडायला लागले.

    तुंगाला वाटत होतं, आपल्या मार्कांमुळे सुरेशच्या अपयशाचं दुःख लोक विसरतील पण त्यांनी कुणीही तिला विचारलं सुद्धा नाही. कुणीतरी ‘गेल्यासारखी’ रडारड चालू राहिली. तुंगा थक्क होऊन त्या तमाशाकडे पाहत राहिली.

    माहेरच्या अणि सासरच्या घरात आपले असे काय होते? आपल्या सुखदुःखाचे भागीदार कोण होते? स्वयंपाकघराच्या पडद्यापाशी उभं राहून ती रडणारी त्रिमूर्ती पाहताना तिला लख्ख जाणवलं, हा प्रवास एकट्याचाच असतो.

    काही काळ काही भ्रम असतात आपल्याबरोबर. ते भ्रमच असतात, सावल्या असतात.

    जेव्हा ज्ञानाची जाणीव फुटते तेव्हा आपल्याला सोडून जातात ते. जावंच त्यांनी. 

By

Sujata Mahajan

Chicago, USA

   

No comments:

Post a Comment