Friday, 1 November 2019

रंग सुरांचे

कलेचा उत्कृष्ट कलाविष्कार हा कलाकाराने केलेल्या विविध प्रयोगांचे फलित असतो. मलाही माझ्या कलाक्षेत्रात असे प्रयोग करण्याची आवड आहे. त्यातीलच एक "लाइव्ह पेंटिंग" हेही माझ्या लिस्टवर होते. माझ्या मूड प्रमाणे शांततेत अथवा म्युझिक बरोबर चित्र काढणे ही माझी नेहमीची सवय. संगीत मला नेहमीच प्रेरणा देते, आणि चित्रकला हा माझा आवडीचा छंद. असे रंग आणि सूर एकत्र मिळाले तर तयार होतात रंग सुरांचे म्हणजेच लाईव्ह पेंटिंग विथ म्युझिक.

हा प्रयोग पूर्ण करण्याची संधी मला महाराष्ट्र मंडळ स्टुटगार्ट मुळे गणेश उत्सवाच्या कार्यक्रमात मिळाली. असा प्रयोग मी प्रथमच करत असल्यामुळे मनात धाकधूक तर होती, पण करण्याची इच्छा जबरदस्त, म्हणून धैर्य एकटवून लगेच होकार दिला. माझ्याबरोबर अजून एक मैत्रीण चित्र काढणार आहे असे ठरले. तसेच अत्यंत उत्साही म्युझिक टीमही आमच्या मदतीला होती.

म्युझिक टीम टीमने प्रसंगाला साजेसे असे सूर व बाप्पा चे गाणे ठरवले आणि आम्ही साजेशी रंग संगती ठरवली. अवघ्या चार मिनिटाच्या गाण्यावर गणपती बाप्पा साकारणे हे आमच्या समोर आव्हान होते तेही सर्व प्रेक्षकांसमोर. विघ्नहर्ता मदत करणारच याची खात्री होती.

आमच्याप्रमाणेच हा प्रयोग बघण्याची प्रेक्षकांनाही तेवढीच उत्सुकता होती, त्यात अँकरनेही सगळ्यांची उत्सुकता वाढवण्याची कसर सोडली नाही. अँकरच्या शब्दांच्या कोट्यांनी प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचली. संगीताच्या लई वर तल्लीन होऊन कॅनव्हास वर रंग उतरु लागले. एकीकडे म्युझिक टीम सुरात तल्लीन तर दुसरीकडे आम्ही रंगात रमलो. प्रेक्षकांनी रंग सुराच्या मिलाफाचा आस्वाद घेतला. सुरांच्या संगतीत बाप्पा कॅनव्हास वर कधी अवतरले हे कळलेच नाही.

आमच्या हातून एक अप्रतिम गणेश चित्र साकारले. रंगांच्या संगतीत रंगवण्याचा आनंद मी नेहमीच एकांतात अनुभवते तोच आनंद आज प्रेक्षकांसोबत व सुरांच्या संगतीत घेता आला.असा अविस्मरणीय अनुभव घेण्याचा लाभ मला महाराष्ट्र मंडळ स्टुटगार्ट मुळे मिळाला यासाठी मंडळाचे व म्युझिक टीमचे मनःपूर्वक आभार व सर्व प्रेक्षकांना मनापासून धन्यवाद.

गणपती बाप्पा मोरया!!!

Image may contain: one or more people, people sitting and indoor

By

Anagha Mahajan,

Stuttgart, Germany

No comments:

Post a Comment