मी जरी इंग्लिश शिकवायला गेले होते तरीही भारताचे प्रतिनिधित्व ही एक दुसरी जवाबदरीही माझ्यावर होती. ह्यामुळेच माझे काम केवळ शिकवण्यापुरते मर्यादित न रहाता माझ्या देशाबद्दल मुलांना माहिती करून देणे तसेच भारतासंबंधी असणारे गैरसमज दूर करणे हेही आवश्यक ठरणार होते. आणि त्यामुळेच दिवाळी, गुढीपाडवा, गणपती असे मराठी सण, मराठी पद्धतीचे पारंपारिक सणाचे जेवण ह्यावरच अख्खा एक तास मी एका वर्गात बोलत असे. अगदी उदाहरणच द्यायचे तर सणाच्या दिवशी केळीच्या पानावर वाढल्या जाणार्या पंगतीही माझ्या बोलण्यातून सुटल्या नाहीत. ख्रिस्तोफ ची ही इच्छाच होती की माझ्या असण्याचा उपयोग मुलांना फक्त अभ्यास शिकणे एवढाच न होता एक परदेशी मुलीशी आणि अर्थातच तिच्या संस्कृतीशी जितका जवळून संबंध येईल तेवढे चांगलं. आणि त्याचमुळे फक्त त्याच्या शाळेत माझा संचार बालमंदीर ते प्रायमरी शाळा असा सर्वत्र होऊ लागला. त्यामुळे मी अगदी पाच सहा वर्षांच्या मुलांशी खेळण्याचीही मजा वर्षभर लुटली. दुर्दैवाने इतर शाळांच्या बाबतीत असे झाले नाही. रोजच्या शाळेबरोबरच माझ्यासाठी रोजचे सहशिक्षक आणि मुलेही बदलत होती. तसेच कोणतीच शाळा खूप श्रीमंत नसली तरी Bellaing ची शाळा त्यातल्यात्यात सगळ्यात चांगली समजली जायची. बोस्के त्याखालोखाल आणि तशी बेताचीच परिस्थिती असणारी शाळा म्हणजे Ecole de Tuilerie. तीनही शाळेत येणा-या मुलांच्या आर्थिक परिस्थितीतली आणि शिक्षकांच्या वागणुकीतली तफावतही अगदी सहजपणे दिसत होती. Bellaing च्या शाळेत मी नेहेमीच इंग्लिश च्या शिक्षकासोबत असे. ती खूषच होती की काही वर्षांच्या खंडानंतर शिकवताना काही अडले तरी मी तिच्यासोबत होते. तिथलेच इतर शिक्षकही माझ्याशी ठीकठाक वागत होते परंतु सगळ्यात वाईट वाटले ते एकाच गोष्टीचे तिसर्या शाळेत नऊ महीने काम करूनही बर्याच शिक्षकांनी शेवटपर्यंत मला परकंच मानले होते. जी इंग्लिश शिकवायला आली ती आपली भाषाही एवढी चांगली बोलू शकते ह्या बद्दलची असूया मी कितीही दुर्लक्ष करायचा प्रयत्न केला तरीही मला ह्याच एका शाळेत कायम जाणवत राहिली.
शाळा सुरु झाल्यापासून आपला पहिला सण आला तोच दिवाळीचा.. मी अर्थातच घरापासून दूर होते. माझ्या मुख्य शाळेत ह्या सणाबद्दल मी माहिती दिली. कंदील, फराळ, रांगोळी आणि फटाके! आणि डिसेम्बर महिन्यात सुरुवातीपासून अचानकपणे बोस्के च्या शाळेत वर्गा-वर्गात अनेक योगर्टचे काचेचे रिकामे पेले दिसायला लागले. कारण विचारल्यावर ख्रिस्तोफ आधी काहीच बोलला नाही.. पण नंतर संध्याकाळी तो म्हणाला “ख्रिसमसची सुटी सुरु होण्यापूर्वी सोळा तारखेला शाळेत ख्रिसमस साजरा करायचा आहे आणि त्यासाठी तयारी चालू आहे. ” मला हे उत्तर ऐकूनही पुरते समजले नाही आणि माझी उत्सुकता अजूनच चाळवली गेली.. जरी त्याने मला पत्ता लागू दिला नाही तरी एका मुलाला रहावले नाही. त्याने मला बाजूला घेतले आणि मला म्हणाला “आपण ना दिवाळी साजरी करणार आहोत ह्या वर्षी ख्रिसमसबरोबरच! ”
त्याचे डोळे हे सांगताना असे काही लकाकले की ह्या वर्षी काहीतरी वेगळे होणार आहे ह्याचा आनंद त्याच्या चेहेर्यावर स्पष्ट दिसत होता. खिस्तोफ़ ने जे मला सांगण्याचे टाळले ते मुलांनी त्याला पत्ता न लागू देता मला मात्र सांगून टाकले. संध्याकाळी शाळा संपल्यावर काही निवडक मुले घेवून ख्रिस्तोफ़ आणि मी इंटरनेट क्लब चालवणार असे ठरले होते. पण गमतीचा भाग असा की शाळेत कॉम्प्युटरची लॅब तयार असूनही अजून इंटरनेट चालू झाले नव्हते आणि हेच आमच्या पथ्थ्यावर पडले.. ख्रिसमसची तयारी करू ह्या सबबीवर क्लबमधील सगळी मुले शाळेत थांबणार होती आणि मीही थांबणार ह्या माझ्या निर्णयामुळे ख्रिस्तोफ़चा नाईलाज झाला आणि तो अडचणीत पडल्याचे माझ्या लक्षात आलं.
“मला सगळे कळले आहे. ”
मी त्याला सांगून टाकले आणि नंतर ख्रिसमस आणि दिवाळी एकत्र साजरी कशी करायची ह्याचे बेत ठरले. पारदर्शक रंग वापरून हे काचेचे पेले मुलांनी नक्षी काढून सजवले.. जवळजवळ दोनशे-अडीचशे! प्रत्यक्ष कार्यक्रमाच्या दिवशी मी सगळ्या वर्गांना बुट्टी मारून प्रवेशद्वाराशी ठेवण्यासाठी एका फळ्यावर रांगोळी; अर्थातच रंगीत खडूंनी काढली. शाळेचे आवार सजवायची जबाबदारी काही पालकांनी उचलली होती. ख्रिसमस ट्री सजले होते. हळू हळू वेळ होत आली तशी आवार मुलांनी आणि पालकांनी गजबजून गेले. सगळ्या मुलांना आता मला भरतीय साडीत बघून खूप आश्चर्य वाटले. कार्यक्रमाला सुरुवात करताना ख्रिस्तोफ़ने सगळ्यांचे स्वागत केले.
“आज ख्रिसमस साजरा करायला रुपाली आपल्याबरोबर आहे पण ह्या वर्षी जेव्हा तिच्या देशात दिवाळी म्हणजे दिव्यांचा सण साजरा झाला तेव्हा ती तिच्या घरी नव्हती आणि तिला हा सगळ्यात महत्वाचा सण साजरा करता आला नाही त्यामुळे तिच्यासाठी आपण दिवाळी इथे साजरी करीत आहोत. ”
एवढे आपलेपण परक्या देशात अनुभवायला मिळेल असे मला स्वप्नातही वाटले नव्हते. मला त्या क्षणी काय वाटले ते मला शब्दात सांगणे केवळ अशक्य आहे. परदेशात पणत्या कुठून मिळणार म्हणून काचेच्या रंगवलेल्या प्रत्येक पेल्यात मेणबत्ती लावून आज त्यांनी सगळे आवार उजळून टाकले होते. एका साध्या, छोट्या गोष्टीतून त्या सा-यांनी माझे मन जिंकले होते. ही शाळा अर्थातच माझी सगळ्यात आवडती शाळा बनली.
सुरुवातीला तिथल्या अभ्यासाची पद्धत, तिथले चालणारे वर्ग ह्यांचा अंदाज यावा म्हणून पहिले काही दिवस मी वर्गात राहून केवळ निरिक्षण केले आणि तेव्हाच तीन आठवड्यात साधारण कोणत्या शाळेत कधी आणि किती वेळासाठी जाणार ह्याचे वेळापत्रक बनवले. नंतर हळूहळू मी वर्ग घ्यायला सुरुवात केली. यथावकाश मुलांनाही माझ्या तिथे असण्याची सवय होत गेली. अर्थात Tuilerie मध्ये पहिल्यापासूनच मला एकटीला वर्गात सोडले जाऊ लागले आणि इतर शिक्षकांचे म्हणावे तसे सहकार्य नसल्याने इतर शाळेतल्या मुलांबरोबर यशस्वी ठरलेले व्यवसाय इथे हमखास आपटू लागले. वर्गात विषयांतर कसे करता येईल ह्याच्या खास युक्त्या मुले शोधू लागली आणि मला मात्र दर सोमवारी आणि शुक्रवारी Tuilerie त जायची भिती वाटू लागली. कधी कधी मलाच शिकवता येत नाही अशी माझीही खात्री पटू लागे आणि ह्या शाळेत ही स्थिती असताना दुसर्या शाळेत मात्र मी म्हटलेल्या कवितांचे आणि गाण्यांचे कौतुक होई. तिसर्या शाळेत माझ्या बरोबर नैमा ही इंग्लिश ची शिक्षिका नेहेमीच असे आणि त्यामुळे तिथेहि मला कधी अडचण येत नसे. Bosquet मध्ये मी प्रत्येक वर्गाला इंग्लिश जरी शिकवत नसले तरी त्यांचा वर्गशिक्षक नेहेमी बरोबरच असे; मग ते बालमंदीरात जाऊन इंग्लिश कविता म्हणणे असो किंवा छोट्या मुलांच्या वर्गात पंचतंत्रातल्या गोष्टी सांगणे असो. बोस्के मधले सगळेच शिक्षक रस घेऊन अणि खूप आपुलकीने वागत होते. आणि म्हणूनच तिथे तग धरून रहाणे सोपे गेले. माझ्याच बरोबर एका जर्मन असिस्टंटची नेमणूक ह्याच तिन्ही शाळांमध्ये झाली होती. ती ऑस्ट्रिया ची असूनसुद्धा एकंदरीत ती काही तिथले हवामान आणि परिस्थिती ह्याच्याशी जुळवून घेवू शकली नाही आणि डिसेंबर महिन्यातच ती घरी परत गेली. त्यामुळे जर्मन शिकणार्या मुलांना अचानक पणे तिचा मिळणारा सहवास नाहीसा झाला आणि इतर मुलांच्या बरोबर मी असल्याने त्यांचा हेवा वाटू लागला. ही गोष्ट लवकरच माझ्या लक्षात आली आणि मी मुद्दामहून स्वत: मधल्या सुट्टीत त्यांच्याशी बोलायला जायला सुरुवात केली. मुले कोणत्याही देशातली असोत शेवटी मुलं ती मुलं.. दुसर्याकडे आहे आणि माझ्याकडे नाही ही भावना किती त्रासदायक असते ह्याचा अनुभव असल्यामुळेच मी त्यांनाही सामावून घ्यायचा प्रयत्न केला आणि त्यात थोडीफार यशस्वीही झाले.
Tuilerie मधली मार्क आणि स्टिव्हन ही दोन भावंडे नेहेमी लक्षात रहातील.. मार्क चे शाळेतले शेवटचे वर्षे आणि धाकटा स्टिव्हन शाळेच्या पहिल्या वर्षाला.. मार्क आधीपासूनच जर्मन शिकत होता आणि त्यामुळे तो माझ्या वर्गात कधीच नसायचा. स्टिव्हन सुद्धा जर्मन शिकण्याच्या बाबतीत दादाच्या पावलावर पाऊल टाकणार हे तसे ठरलेलच.. कारण कोणती भाषा शिकायची हे ह्या वयात मुलांना कळणे तसे कठीणच आणि त्यामुळे बहुतेक वेळा त्यांचे पालकच ही निवड करीत असतात. खरं तर ह्या स्टिव्हनच्या वर्गात शिकवण्याची माझ्यावर वेळही आली नसती कारण शाळेच्या तिसर्या वर्षापासून हे भाषेचे तास सुरु होतात पण त्या शाळेत मला चार तास भरून काढायला काही वेळ कमी पडत होता आणि त्यामुळे त्यांना मी थोडावेळ गाणी किंवा कविता म्हणून दाखवाव्या असे त्यांच्या शिक्षकाने ठरवले. तिथला पहिला दिवस अजून आठवतो. इंग्लिश मधे आपण आपले नाव कसे सांगायचे ते मी त्यांना शिकवत होते. स्टिव्हन ला मी विचारले
“My name is Rupali. What’s your name?”
हाताची घडी, चेहेरा हुप्प, चष्म्याच्या वरून माझ्याकडे बघत तो अर्थातच फ़्रेंचमध्ये मला म्हणाला
“मला इंग्लिश शिकायचे नाही. मला नाही आवडत. मी नाही बोलणार. ”
दोन-तीनदा मी आणि वर्गशिक्षकाने चुचकारून झाले तरी मला जाहीर विरोध दर्शवणारी ती हाताची घडी आणि फुरंगटून बसलेला स्टिव्हन.. कोणीच जागचं हललं नाही.. ह्याचीच पुनरावृत्ती पुढच्या काही वर्गात झाली आणि एक दिवस One, Two, buckle my shoe म्हणत असताना इतर मुलांबरोबर हाही बुटांचे बक्कल लावायला खाली कधी वाकला हे त्याचे त्यालाही कळले नाही. मीही चेहेर्यावर काही आश्चर्य दाखवले नाही. मधल्या सुटीत स्टिव्हन माझ्या जवळ आला “आता परत कधी येणार तू आमच्या वर्गात? ”
असे विचारणारा स्टिव्हन हिरमुसला जेव्हा मी त्याला मुद्दामच सांगितले, “नाही रे येणार आता बहुतेक मी.. कारण तुला इंग्लिश शिकायचे नाहीये. तुला आवडत नाही असे म्हणाला होतास तू मग राहूदे.” “नाही. आता मला आवडते पण ते शिकायला. ” एखाद्या शिक्षकाला आणखी वेगळी पावती कोणती हवी आपल्या केलेल्या कामाची?
मार्क ची गोष्ट आणखीच वेगळी.. दर वेळेस शाळेत गेलं की हा आधी येऊन मला हॅलो म्हणून जाणार, माझी चौकशी करणार.. सुटी चालू असेल तर इतर मुलं जरी फुटबॉल किंवा इतर काही खेळण्यात दंग असतिल तरी हा माझ्या बरोबर गप्पा मारणार. शिक्षकांना झेरॉक्स काढून देण्यात मदत लागली तर ती करण्याची जवाबदारी ह्याची असल्याने मला काही मदत हवी आहे का हे विचारणार.. भारताबद्दल, माझ्या घरच्यांबद्दल प्रश्न विचारणार. माझ्या आवडीनिवडी विचारणार. ह्या Tuilerie मधली जर्मन शिकणारी मुलं जेवढी माझ्याशी जवळीक साधायचा प्रयत्न करायची तेवढंच माझ्या वर्गातली मुले उदासीन असायची. वर्षाच्या शेवटी शाळेचा वार्षिकोत्सव कधी आहे ह्याबद्दल इतर कोणीही चुकूनही माझ्याशी बोललं नाही, एक तिथली इंग्लिश ची शिक्षिका आणि हा मार्क ह्यांचा अपवाद सोडल्यास!
क्रमश:
By
Rupali Sohoni Kamat
Belgam, India
No comments:
Post a Comment