Friday, 1 November 2019

आत्मौपम्य


श्रीमद् भगवद् गीतेत काही काही शब्द असे येतात की चटकन त्याचा अर्थ आपल्या लक्षात येत नाही. पण एकदा त्या शब्दा मागचा भाव, संकल्पना उकलली की गमंतही वाटते आणि आपला दृष्टिकोन अधिक प्रगल्भ होण्यास मदत होते. असाच मला भावलेला शब्द आत्मौपम्य.  ‘आत्मौपम्यया शब्दाचा अर्थ आहे आपल्या प्रमाणे. मानवनिर्मित वस्तूत हे शक्य आहे. जसे एकासारखी अनेक भांडी असू शकतात. अनेक वस्त्रे एकसारखी असू शकतात. दागिने असू शकतात. पण परमेश्वराच्या निर्मितीत प्रत्येक जीव हा स्वतंत्र एकक आहे. एकासारखा दुसरा नाही. तरीही भगवंत सहाव्या श्लोकात म्हणतात,  ‘आत्मौपम्येन सर्वत्र समं पश्यति योऽर्जुन। सुखं वा यदि वा दुःखं योगी परमो मतः।याचा अर्थहे अर्जुना! जो कोणाचेही सुख अथवा दुःख आपल्याप्रमाणेच पाहतो तो योगी सर्वश्रेष्ठ होय.”

शब्दशः याचा अर्थ घेतला तर ते कधीच शक्य नाही असेच दिसेल. किंबहुना ते विपरितच वाटेल. प्रत्येकाच्या सुखदुःखाला वेगवेगळे घटक कारणीभूत असतात. एकाद्याला सुखाची वाटणारी गोष्ट अनेकदा दुसऱ्यासाठी दुःखाची असते असेही आपल्या निदर्शनास येते. अगदी आपली वाटणारी माणसेही सुखदुःखासंबंधात वेगवेगळे अनुभव घेतात. आणि इथे तर भगवंत कोणाचेही सुख अथवा दुःख आपल्याप्रमाणे पाहणारा सर्वश्रेष्ठ योगी म्हणतात हे कसे साधेल असा प्रश्न पडतो

पुरुषसूक्तामध्येसहस्त्र शीर्षा, सहस्त्र पादाःहजारो डोकी, हजारो हात, पाय इतर अवयव यांचे वर्णन आहे आणि असा सर्व मिळून पूर्ण पुरुष झालेला आहे. आपण एक उदाहरण घेऊन हा विचार समजून घेऊ. ज्या घरात आपण रहात असतो ते घर आपण मी बांधले असे म्हणतो. परंतु त्या ठिकाणी जेव्हा घर बांधले जाते त्यावेळी किती तरी हात, पाय, डोकी शिणलेली, श्रमलेली असतात तेव्हा ते तयार होते. एवढ्या घराला लागलेल्या विटाही जमवणे माझ्या एकट्याच्या शक्तीने शक्य नसते. इथे घर बांधतांना मी पैसे देऊन त्यांच्यातील पैशांची अपूर्णता भरुन काढली  त्या रुपाने मी त्यांच्यात सामावलो तर त्यांनी कष्टाने माझ्यातील अपूर्णता भरुन काढली म्हणून ते माझ्यात सामावले. विवेकाने हे समजून घेतले पाहिजे की मी या सर्वांमधील एक भाग आहे आणि हे सर्व माझ्यातलेच एक आहेत. आपली अंतरदृष्टी बदलली की मग यातील कोणाविषयीही मला मत्सर द्वेष वाटत नाही किंवा याहून मी वेगळा आहे असा भासही होत नाही. सर्वांप्रती समभाव निर्माण होणे म्हणजेचआत्मौपम्यहोय. एकाद्याच्या मुलाला उत्तम यश मिळाले तरी माझ्याच मुलाने ते यश मिळविले आहे असे वाटणे. किंवा एकाद्याची वेदनाही आपल्याला झालेल्या वेदनेइतकीच कळणे याला आत्मौपम्य म्हणता येईल

मी पणा म्हणजे संकुचितपणा. तो आपल्याला इतरांपासून निराळा समजण्याला कारणीभूत असतो. तो टाकून देऊन सर्वजण आपल्यासारखेच आहेत अशी समज येणे म्हणजे आत्मौपम्य होय.

By

Padma Dabke

Pune, India



No comments:

Post a Comment