लहानपणी संध्याकाळचे ७-७.३० वाजले की आम्ही सगळी मुलं आपापल्या घरी परतत असू. मग घराघरांतून परवचा म्हणण्याचा अलिखित नेम असेच असे, तसाच आम्हां भावंडांचाही होता. त्यादरम्यान आम्ही एक श्लोकवजा कवन म्हणत असू... आई माझा गुरू, आई कल्पतरू, सौख्याचा सागरू, आई माझीI देवराय, आई जणु द्न्यानदेवी, सदा सुखी ठेवी, मायबापI
आई ही प्रत्येक व्यक्तीची पहिली गुरू असते कारण व्यक्तीच्या मूलभूत भौतिक, नैतिक जडणघडणीत आईचा मोठा हात असतो! आई सर्वार्थाने वंदनीयच, पण एका वेगळया संदर्भात मला माझ्या आईचा सूद्न्यपणा जाणवला. साधारण पहिलीत असताना मला वाचनाचा अतिशय तिटकारा होता, बाकी काही वाचन तर सोडाच पाठ्यपुस्तकंही मला नकोशी वाटत! आईने साम, दाम, दंड भेद सगळे हातखंडे वापरले पण परीणाम शून्य! शेवटी मजल्यावरच्या भाऊ जोशींकडील अनेक अमर चित्र कथांपैकी राम, क्रुष्ण, हनुमान व शकुंतला ही चार चित्रचरीत्रं माझ्या पाठी लागलागून तिने वाचून घेतली. स्वत: मुंबई मराठी ग्रंथ संग्रहालयाची ग्रंथपाल असलेल्या माझ्या आईला माझ्या पुस्तक विरक्तीचा किती ताप झाला असेल नाही?! पण तिच्या व माझ्याही नशीबाने ही मात्रा अगदी बरोबर लागू पडली आणि मग अमर चित्र कथांची पारायणं करकरून मी जोशीकाकूंच्या प्रेमळ शेजारधर्माचा यथेच्छ फायदा़ उठवला! पुढे 'चांदोबा'ही भावला अन् आईला देव पावला! यथावकाश दादर सार्वजनिक वाचनालय, आईचं वाचनालय, घरी येणारं किर्लोस्कर मासिक, मैत्रिणीकडे येणारं लोकप्रभा पाक्षिक यामुळे माझ्या वाचनाची गाडी तत्कालीन प्रसिद्ध लेखकांच्या साहित्यावरून सुसाट सुटली! शिवाय घरात पुलंचं असा मी असामी, व्यक्ती आणि वल्ली ही तर पारायण फेम पुस्तकं होतीच, गदिमांच्या गीतरामयणाने वाचतानाही रोमांचित वाटायचं मग ऐकताना तर ब्रह्मानंदी टाळी! तर, माझ्यासारख्या नाठाळ मुलीला वाचनाचे वळण लावण्यात आई माझी 'गुरू' निघाली!
शाळेतील सर्व शिक्षकांनी अत्यंत कळकळीने, निरलसपणे शिकवून, अक्षर, शुद्धलेखन आदींच्या संस्कारांनीही आमचे शालेय जीवन सम्रुद्ध केले त्यांचे स्मरण व त्यांना नमन केल्याशिवाय आजचा दिवस पुरा होऊच शकत नाही!
शाळेतून काँलेजमध्ये प्रवेश हे ट्रांझिशन अगदी सहज असेल या माझ्या समजुतीला सायकाँलाँजीच्या डावरा मिसने पहिल्या लेक्चरमध्येच सुरुंग लावला. औपचारिक ओळख परेड झाल्यावर तिने वर्गाला विचारलं what is psychology? झालं, अगदी एकसुरात सगळा वर्ग पोपटासारखा उत्तरला, 'मानसशास्त्र'! आणि डावरा मिसची सटकली, तरीही कसनुसं हसत तिने आम्हां सगळयांना जोरका झटका धीरेसे देत फक्त इंग्लिशमध्येच बोलायची तंबी दिली! इतना सन्नाटा क्यूँ है भाई?! अशीच हालत झाली वर्गाची! कारण आम्ही बहुतेक सर्वजण मराठी माध्यमाच्या शाळेतून आलेले होतो आणि शाळेतील बाळबोध इंग्रजी आणि तीसुद्धा लेखी यापलिकडे आमची उडी नव्हती! काँन्व्हरसेशनल इंग्लिशशी तर आमचा दूरान्वयानेही संबंध नव्हता कारण घरीदारी मराठी, मैत्रिणींत मराठी मग इंग्लिशकडे खास लक्ष द्या कशाला, काँलेजात गेल्यावर येईल आपोआप, नाहीतर रट्टा आहेच, हा अँटिट्यूड! तरीही ज्युनिअर काँलेजची दोन वर्षं स्पून फीडिंगमुळे पार पडली. काँलेजच्या सुरुवातीपासूनच माझी मोठी बहीण कल्पना मला परत परत सांगत असे इंग्लिश वाचन कर. यावर शहाजोगपणाचा उतारा म्हणून मी आर्ची काँमिक्स वाचू लागले. तिच्या नापसंतीच्या आठीकडे मी सोयिस्कर दुर्लक्ष केले. पण एकदा श्री लायब्ररीत राँबिन कुकचे स्फिंक्स नावाचे पुस्तक मी पाहिले आणि केवळ कुतुहलापोटी वाचायला घेतले, फक्त ३०० एक पानांची ती कादंबरी वाचायला मला तब्बल १०एक दिवस लागले. बाजूला आँक्सफर्डची जाडजूड डिक्शनरी घेऊन, अडला शब्द तिच्यात बघत, चिकाटीने मी ती कादंबरी वाचून काढली, खूपच भारावून टाकणारा अनुभव होता तो! आणि मग चटकच लागली, इतरांच्या मानाने, माझं वाचन ते काय?! पण जे काही वाचलं ते जेफ्री आर्चर, राँबिन कुक, आर्थर हेली, आयर्विंग वाँलेस, ग्लेन इनफिल्ड, लिआँन युरीस, सिडनी शेल्डन,विल्बर स्मिथ अशा प्रथितयश लेखकांचं साहित्य वाचलं, अगदी गाँन विथ द विंड, थोडीफार अँगाथा ख्रिस्ती, थोडाफार पी.जी. वुडहाऊसही वाचला. हा असा कैफ आणि एक वेगळीच समरसता मी नंतर बऱ्याच वर्षांनी चेतन भगतच्या पहिल्या चार कादंबऱ्या वाचताना अनुभवली, भगतकी भक्त हो गयी मैं! असो, सांगायचा मुद्दा हा की, माझ्या बहीणीने मला असं वाचतं करून मोठेपणा निभावला, गुरुर्भगिनी नमो नम:! आणि आज जे काही थोडंफार मी लिहू शकते त्याचं श्रेय माझ्या मराठी व इंग्लिश वाचनाला नक्कीच जातं!
मला चित्रकलेची आवड बहुधा उपजतच असावी, कारण लहानपणी खास माझ्या अशा फळ्यावर चित्रं काढण्यात मी तासंतास गुंग राहत असे. पण शाळेत असताना तिला विशेष खतपाणी मिळालं नाही. काँलेजच्या स्वच्छंदी दिवसांत या आवडीने परत डोकं काढलं ते स्केचेसच्या रुपात! त्याचं असं झालं, बोरीवलीला मामाकडे गेले असताना सिने ब्लिट्झवरची रेखा खूपच आवडली आणि सहज म्हणून दिसल्या त्या कागदावर सापडलेल्या पेन्सिलीने तिचं स्केच मी काढलं अन् घरी आल्यावर बहिणीला दाखवलं. तसं ते ठीकच होतं पण तिने मला तिची मैत्रीण ज्योतीला ते स्केच दाखवायला सांगितलं. ज्योती रचना संसदमध्ये इंटीरीअरचा कोर्स करत होती म्हणून ती मला जास्त चांगलं मार्गदर्शन करेल असं तिचं म्हणणं होतं. त्याबरहुकूम मी ज्योतीला माझं स्केच दाखवलं, तेव्हा तिने मला शेड्सच्या 2B, 4B, 6B या पेन्सिली वापर असा सल्ला तर दिलाच शिवाय स्वत:कडचे काही पूर्ण कोरे तर काही पाठकोरे स्नो व्हाईट पेपर्स दिले जे जाड असतात व ज्यावर डाँईंग ठसठशीतपणे उठून दिसते! 'आंधळा मागतो एक डोळा, अन् देव देतो दोन' अशी माझी अवस्था झाली! मी तो माझा आनंदाचा ठेवा घेऊन निघालेच होते इतक्यात माझी नजर तिथे ठेवलेल्या 'सनम तेरी कसम'च्या एल पी रेकाँर्डच्या कव्हरवर गेली. त्यावरच्या मदभऱ्या रीना राँयने मला जणु भुरळच घातली! ज्योतीची परवानगी घेऊन मी ते कव्हर घेतलं व अगदी अधीरमने शेड पेन्सिली आणून ते स्केच मन लावून काढायला घेतलं. एकंदर आऊटलाईन काढून चेहऱ्यापासून सुरुवात केली, डोळे चांगले जमले, पण नाक, ओठ अन् दात काढताना मला नाकी नऊ आले. मग काय, केस काढताना आला कंटाळा, 6B आडवी धरून कसेतरी फरांटे मारून केस पुरे करून स्वत:चं समाधान करून घेतलं! जेव्हा मी हे स्केच ज्योतीला दाखवलं, ती जवळ जवळ मला रागावलीच, म्हणाली अगं, हे काय केस काढल्येस का जटा?! मग नंतर मात्र तिने मला प्रेमाने समजावलं की केसांनाही विशिष्ट आकार, रंग, पोत, लय असते, लायटिंगच्या अनुषंगाने त्यांच्यातही विविध छटा असतात आणि त्याप्रमाणे स्केचमध्ये त्या उतरल्या तर स्केच परीपूर्ण वाटतं! अशी घिसाडघाई न करता शांत मनाने, योग्य तेवढा वेळ देऊन स्केच काढ असा गुरूमंत्र तिने मला दिला. मला ते तंतोतंत पटलं कारण केल्या आतताईपणाबद्दल कुठेतरी माझं मन मला खात होतंच! त्यानंतर मात्र मी प्रत्येक स्केच अगदी जीव ओतून काढलं, आणि बहुतेकांत केस अतिशय आकर्षित करणारी बाब ठरली! ज्योतीचं मार्गदर्शन माझ्या छंदाच्या परीपक्वतेला अमूल्य ठरलं!
काँलेज संपल्याबरोबर,एका मैत्रिणीच्या वडिलांच्या ओळखीमुळे, मला डेली न्यूजपेपरमध्ये अँडव्हर्टाईजमेंट डिपार्टमेंटमध्ये क्लेरीकल जाँब मिळाला, अगदीच नवखी होते मी, तिथे तेव्हा! तिथेच मला फ्लोरीन पिंटो भेटली,का कोण जाणे, ती मला माझी सुह्रुद् वाटली आणि तिला माझ्याबद्दल ममत्व! बरीच सिनीअर असल्याने माझ्या वागण्या-बोलण्यातला बुजरेपणा तिने लगेच ओळखला, आणि तो दूर करण्यात तिने मला मोलाची मदत केली. वरीष्ठ, शिष्ठ, अप्रिय पण अपरिहार्य व्यक्तींशी कसं कसं वागावं याचं थोडंफार मार्गदर्शनही तिने केलं! जणु गाँडमदरच होती ती माझी! पण वर्षंभरातच ती ही नोकरी सोडून दुबईला नोकरी करायला निघून गेली आणि अगदी आकस्मिकपणे तिच्याशी संपर्क तुटला, पण ती कायम मनात घर करून राहिली, आणि म्हणूनच आज तिची आवर्जून आठवण झाली!
लग्न होण्यापूर्वी, माझा स्वयंपाकघराशी संबंध नसल्यातच जमा होता त्यामुळे अगदी जुजबी पाक कौशल्य, कौशल्य कसलं अकौशल्यच घेऊन माझी सांसारिक सुरुवात झाली! पण माझ्या सासुबाईंनी, म्हणजे अहो आईंनी बऱ्याच अंशी समजुतीने तर कधी तरी रागावूनही मला सर्व प्रकार करायला शिकवले! शिवाय जोडीला 'आद्यगुरू' ओगलेबाई होत्याच, आजही आहेत! मी स्वत:ला सुगरण म्हणण्याचं धारीष्ट्य कधीच करणार नाही, पण आज कोणाला जेवायला बोलावलं तर त्यांनी वाखाणण्याजोगे, निगुतीने केलेले, मोजके का होईना चार-सहा पदार्थ करण्याची माझी जी कुवत आहे तिचं श्रेय मी आईंना व काही अंशी माझ्या काकूला देते!
मला आठवतंय, एफ. वाय. बी.ए.ला असताना मराठी लिटरेचरमध्ये आम्हांला आरतीप्रभूंचा 'नक्षत्रांचे देणे' हा काव्यसंग्रह आणि विश्राम बेडेकरांची 'रणांगण' ही कादंबरी होती. राजापुरे मँडमनी जीव ओतून हे दोन्ही साहित्यप्रकार आम्हांला शिकवले होते! रणांगण भावनिक गुंतागुंतींनी युक्त, नाझी क्रौर्याच्या दाहक पार्श्वभूमीवरील प्रेमकहाणी होती, तरी खूपच सुबोध होती पण नक्षत्रांचे देणे आम्हां अरसिकांना समजावून देताना राजापुरे मँडमना 'चिरा लाल अन् सिमेंट ढवळे, त्यातून निघते डहाळ हिरवी' अर्थात निर्जीवातून सजीव उत्पत्ती, तद्वतच आम्हां निर्बुद्धांना सुबुद्ध करताना प्रयत्नांची पराकाष्ठाच करावी लागली होती इतक्या दुर्बोध होत्या त्या कविता! तर अशा त्या दिव्य काव्यसंग्रहाचे रसग्रहण करण्याचे आव्हान आम्हांला परीक्षेने ठेवले आणि माझं रसग्रहण सर्वोत्तम ठरलं होतं! तेव्हा केवळ अभ्यासक्रम म्हणूनच की काय मी माझ्या व्यक्त होण्याच्या हातोटीला समजूनच घेतलं नाही, पण बऱ्याच नंतर का होईना मला माझ्यातल्या या सुप्त गुणाची जाणीव झाली अन् मी काही बाही लिहू लागले जे इतरांना आवडूही लागलं! त्याकाळी, पोरकटपणाने राजापुरे मँडमच्या नावाने बोटं मोडत होतो आम्ही, पण त्यांच्या पोटतिडकीने शिकवण्याला आज मी सलाम करते!
माझा मामेभाऊ आनंद शब्दप्रभू आहे त्याला मी वरचेवर पिडत असते, कधी काही शब्दाबद्दल संभ्रम असेल तर किंवा माझ्या लिखाणावर अभिप्राय दे म्हणून! तर कधी काही छान कविता पाठव म्हणून!तो पण एकदम सुमडीत माझी मदत करतो. तेव्हा, भावा, तूसुद्धा मला गुरूच्याच स्थानी आहेस!
जगण्याच्या प्रत्येक क्षणी आपण कोणा ना कोणाकडून काही ना काहीतरी शिकत असतो, कधी जाणून बुजून तर कधी नकळत! तर कधी अंतर्मुख होऊन स्वत:हून स्वत:त योग्य ते बदल घडवून आणतो! नकळत विंदांच्या ओळी आठवतात...
देणाऱ्याने देत जावे,
देणाऱ्याने देत जावे,
घेणाऱ्याने घेत जावे,
घेता घेता एक दिवस,
देणाऱ्याचे हात घ्यावे....
प्रेम,द्न्यान देण्याने वाढते, तुमची ओंजळ रिती न होता परत परत भरते!!!
By
Akanksha Phadke
Jogeshwari, India
No comments:
Post a Comment