Saturday, 30 November 2019

चंचल मनाला काबूत कसे आणावे?


आपल्याकडे एक म्हण आहे – वळले तर सूत नाही तर भूत! इतर कोणाला ती लागू होवो न होवो पण मनाला मात्र ती तंतोतंत लागू होते. अत्यंत चंचल अशी मनाची स्थिती असते. आत्ता एक गोष्ट करायला घेतो की पुढच्याच क्षणी यापेक्षा हे करु, नको नको ते करु अशी अवस्था होत असते आपली अनेकदा. बहिणाबाई आपल्या एका कवितेत मनाचे खूप छान वर्णन करतात. ते इतके चंचल आहे की आत्ता जमिनीवर असते तर क्षणात आकाशात जाते. पिकात शिरलेल्या ढोरासारखे कितीही हाकलले तरी पुन्हा पुन्हा विषयांकडेच वळते. त्यात इतके विकार उद्भवतात की कुठेही ते चटकन स्थिर होत नाही.

समर्थ रामदास स्वामी यांनी मनाला काबूत आणण्यासाठीच्या प्रयत्नांना सहाय्य व्हावे म्हणून २०५ श्लोकांची योजना केली. भगवद् गीतेच्या सहाव्या अध्यायातही अर्जुनाने या चंचल अशा मनाला काबूत ठेवणे हे वाऱ्याला अडविण्यासारखे दुष्कर आहे असे म्हटल्यावर भगवंतांनी मनाची चंचलता मान्य केली; मात्र त्यावर अभ्यासाने आणि वैराग्याने अंकुश ठेवता येतो असे सांगितले आहे.

आपली उन्नती करुन घेण्यासाठी उत्तम गोष्टी आत्मसात कराव्या लागतात. त्या आत्मसात करण्यासाठी अभ्यास आवश्यकच असतो. इथे मनाचा अभ्यास आवश्यक आहे. आपले मन कशात रमते, कशाला घाबरते हे जाणून त्याला कशात रमवायचे व कोणत्या गोष्टीसाठी त्याला धाकात घ्यायचे याचाही अभ्यास करणे इथे अपेक्षित आहे. इंद्रियांवर निग्रह ठेवला नाही तर आरोग्य धोक्यात येईल हा धाकही उचितच असतो. भौतिक गोष्टीतली विफलता कळली की विषयासक्ती कमी होऊ लागते. त्यामुळे तशा स्वरुपाच्या घटनांची उजळणी नैराश्य येणार नाही याची काळजी घेऊन करता येते.

सुख आणि दुःख या गोष्टी एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्यातली कोणतीच कायम राहणारी नाही. आपण जन्माला आलो आहोत तेव्हा मृत्यू हाही अटळ आहे याची जाणीवही माणसाला योग्य तेवढेच इंद्रियोपभोग घेण्यापर्यंत सिमित करु शकते. वैराग्य निर्माण करु शकते. नित्य टिकणारे सुख म्हणण्यापेक्षा आनंद हा परमात्म्याच्या चिंतनाने मिळतो ही अनुभूती आली की त्याची गोडी मनाला लागते. त्यामुळे मनाच्या चंचलत्वाला काबूत आणण्यासाठी अभ्यास आणि वैराग्य या दोन गोष्टींचे सहकार्य होते.

अभ्यास ही विधायक गोष्ट आहे. वैराग्य ही विध्वंसक क्रिया आहे. असे विनोबाजी त्यांच्या प्रवचनात आवर्जून सांगत. त्यासाठी ते शेतात बी पेरण्याचे आणि तण उपटून टाकण्याचे उदाहरण देत. मनात सद्विचारांचे पुन्हापुन्हा चिंतन करायचे हा झाला अभ्यास. आणि मनातील नको ते विचार काढूनच नाही तर फेकूनच द्यायचे हे झाले वैराग्य.


By

Padma Dabke

Pune, India

No comments:

Post a Comment