"१७ जूनला म्हणजे पुढच्या शनिवारी सकाळी रुपाली तू येशील का? मी ट्रंपेट वाजवणार आहे.. ” इति मार्क.
“जमलं तर बघीन.. शनिवारी कधी शाळेसाठी आले नाहीये तेव्हा ही बस असते की नाही मला माहित नाही सकाळी शाळेत यायला. बघून ठेवेन बसचे टाईमटेबल आणि सांगेन पुढच्या वेळेस तुला ”, मी म्हटले.
शाळेचे मुख्याध्यापक, इतर शिक्षक ह्यांच्यापैकी कोणीच जेव्हा मला काही सांगत नाही तेव्हा मला वाटेल तरी कसं तिथे जावसं? पण काहीतरी उत्तर द्यायचं म्हणून मी ही सबब सांगून वेळ मारून नेली. पुढच्या शुक्रवारी मार्क चा पुन्हा तोच प्रश्न.
“पाहिलस टाईमटेबल? आहे की नाही बस तुला यायला? ”
आता आली का पंचाईत? एका टीचर कडे विषय काढला होता तर म्हणाली होती वर्षिकोत्सवाची तयारी चालू आहे असे.. पण पठ्ठी म्हणाली नाही, “ ये हो तू.." म्हणून..
पुन्हा आपले मी बसबद्दल माहित नसल्याचे सांगितले. शुक्रवारी ह्या शाळेत मधल्या सुटीच्या आधीचा एक तास घेऊन मी बोस्के मध्ये जायचे तिथल्या दुपारच्या वर्गांमध्ये.. आणि मुळातच माझ्या शहरातून ह्या गावांमध्ये येणारी बस तासाला एकुलती एक असल्याने ह्या एका शाळेतून दुसर्या शाळेत जायच्या वेळेस मला चालतच जावे लागे. मार्क सुटीत जेवायला जाताना त्याच्या घरापर्यंतचे थोडे अंतर आवर्जून माझ्याबरोबर चालत असे. त्या दिवशी मी बरोबर असतानाच तो मला आधी बसस्टॉप वर घेवून गेला. स्वत: बसची वेळ पाहिली आणि त्या वेळेस यायला बस आहे हे पाहून “तू उद्या येणार आहेस सकाळी ” असे त्याने ठरवूनच टाकले. मला काहीच पर्याय न राहिल्याने मी म्हटले सहजच
“अरे पण मला कोणी सांगितले नाहीये शाळेत उद्या येण्याबद्दल.. ”
“नको सांगू देत ना.. मी सांगतो आहे ना? तू येणार आहेस! ”
दुसर्या दिवशी मला कार्यक्रमाच्या हॉल मध्ये पाहून सगळ्यात जास्त आनंद झाला असेल तर तो मार्क ला आणि त्या इंग्लिश च्या शिक्षिकेला, जी आजारी असल्याने गेला आठवडाभर शाळेत येऊ शकली नव्हती. बरीचशी मुलं मी त्यांचा नाच पहायला आले आहे हे पाहून आनंदली पण “मी आग्रह केला म्हणून रुपाली आली आहे ” असे सांगताना मार्क चा चेहेरा काही वेगळाच खुलला होता.
कितीही झाले तरी मुले निरागसच असतात अशी एक आपली समजूत असते परंतु ते नेहेमीच खरे नसावे असे वाटायला लावणारा एक अनुभव तिथेच असताना आला. Tuilerie मध्ये एक मुलगा होता लार्बी नावाचा. आई-वडील मोरोक्कन होते. मला तर वर्गात त्रास द्यायचाच पण मुलांचेही त्यामुळे कामातले लक्ष उडून जायचे. सुट्टीत खेळत असतानाही इतरांबरोबर त्याची सतत भांडणं व्हायची. त्यामुळे सुटीतही शिक्षा व्हायची त्याला कोपर्यात उभं रहाण्याची. त्याच्या वर्गशिक्षिकेनं तर मला सांगून टाकलं होते की त्याने जर मला त्रास दिला तर मी त्याला जरूर वर्गाबाहेर काढावे आणि तिच्या वर्गात परत पाठवून द्यावे. पण मी माझी पुरी सहनशक्ती ताणून ठेवत असे आणि मला त्रास झाला तरी शक्य तेवढं दुर्लक्ष करीत असे. एक दोन वेळा वर्गातून बाहेर काढला, त्याच्या वर्गात परत पाठवला पण रोज रोज तरी त्या वर्गाला का म्हणून त्रास द्या असा विचार करून एक दिवस जेव्हा त्याची मस्ती फारच वाढली तेव्हा त्याला कोपर्यात उभं केलं. जरा वेळाने इतरही मुलं खूप मस्ती करायला लागली. वर्गाच्या चार कोपर्यात चार मुलांना उभं केलं.. पण उपयोग नाही. एकमेकांना पडद्याआडून खुणा करीत लार्बी महाशय शिक्षा भोगतायत. शेवटी मी वर्ग थांबवला आणि सगळ्यांना खाली पाठवून दिले.. त्यानंतर शाळेच्या वार्षिकोत्सवाच्या दिवशी हाच लार्बी खेळण्यातल्या अस्वलाची उडवाउडवी करीत होता जेव्हा शाळेचे मुख्याध्यापक वार्षिक आढावा घेत होते आणि गावचे मेयर आणि इतर प्रतिष्ठित माणसे तिथेच आमच्या मागे बसून त्याची ही मस्ती बघत होती.. ती मस्ती सहन न होऊन मी ते अस्वल हस्तगत केलं आणि कार्यक्रम संपल्यावरच त्याला परत दिलं. ह्याच सगळ्याचा राग की काय कोण जाणे पण ह्या शाळेचा निरोप घेण्यापूर्वी मी जेव्हा ग्रुपफोटो काढायला सगळ्यांना बोलावले तेव्हा हा एकटाच कितीही बोलवून शेवटपर्यंत आला नाही. खरं तर ह्या आठ वर्षाच्या मुलानं एवढे वाकड्यात शिरायची गरज नव्हती पण कदाचित इतर सगळ्या चांगल्या अनुभवांनी मीच हुरळून जाऊ नये ह्याचसाठी असा एक कडू अनुभव सुद्धा ह्या वास्तव्यात मला त्या वरच्याने दिला.
असाच एक प्रसंग ज्यातून एका पालकातली माणुसकी मला दिसून आली. जानेवरीतल्या गारठून टाकणार्या थंडीत, एका संध्याकाळी साडेपाचची बस पकडायला मी पाच मिनिटं कमी असताना शाळेतून निघून बसस्टॉप वर पोहोचले.. आणि जवळजवळ पावणेसहा होऊन गेले तरी बस काही आली नाही. दर तासाला एकदाच येणार्या बसची वेळ होऊन गेल्यावरही तिथे कोणी उभे आहे ह्याचे अश्चर्य वाटून रस्त्यातून जाणार्या एका मुलीने मला विचारले की मी Valenciennes ला जायला उभी आहे का. मी अर्थातच हो म्हटले.. त्यावर ती म्हणाली “अगं आजपासून बस चा रुट बदलला आहे इथून दोन स्टॉप सोडून पुढच्या स्टॉप वर जा.. साडेपाचची बस निघून गेली आहे आता साडेसहाची बस मिळेल तुला. ” मी सकाळी आले तेव्हा बस नेहेमीच्या रुटनेच गेली होती त्यामुळे मला ही शंका काही आली नव्हती. आता तिथल्या फ़लकावर लावलेलं अशा आशयाचे पत्रक मी पाहिले आणि त्या दुसर्या स्टॉप पर्यंत चालत गेले. बस यायला अजून किमान चाळीस मिनिटं होती. रस्त्यावर नाही चिटपाखरूही आणि थंडी तर अगदी जीवघेणी. ख्रिस्तोफ शाळेत एका मिटिंग मध्ये होता नाहीतर त्याला सांगितल्यावर त्याने लगेच सोडले असते मला घरी. पण त्याला आज डिस्टर्ब करणं बरं वाटेना. शेवटी देवाचे नाव घेत मी तिथे उभी कारण छोटा स्टॉप असल्याने बसायचीही सोय नव्हती. एक गाडी जाता जाता अचानक माझ्या समोर थांबली. माझ्यासारख्या परदेशी मुलीला पाहून तिथे कोणीही मला रस्ता तर नक्कीच विचारणार नव्हते त्यामुळे कोणी बोलायला आलच तर नक्की काय करावे ह्याचा विचार करीत असतानाच आतून प्रश्न आला.
Valenciennes “ला जात्येस का? बस चुकली का तुझी? ”
गाडीत नक्की कोण आहे हे नीटसे पाहिलेही नव्हते मी.. तेवढ्यात “घाबरू नकोस मी बोस्केतल्या कीमची आई.. मी सोडते तुला घरी, बस गाडीत. ” असे शब्द कानी आले.
मला प्रत्येक शाळेतली किमान शंभर अशी तीन शाळांतली मुलं त्यांच्या नावासकट लक्षात रहाणे कसे शक्य आहे? आणि मुलांना बघून ओळखलेही असतं मी पण त्यांच्या पालकांनाही? विचार करण्याएवढा वेळही नव्हता आणि ते बरंही दिसलं नसतं त्यामुळे मी निमूटपणे गाडीत बसले. विरुद्ध दिशेला चाललेली कीमची आई केवळ मला सोडायला वेळ काढून माझ्या घरी मला पोहोचवायला आली. मी थंडीने एवढी गारठून गेलेली असताना तिने दाखविलेल्या माणुसकीने मला पार भारावून टाकलं. तिचे अनेकदा आभार मानूनही नंतर मला काहीतरी राहून गेल्यासारखे वाटत राहिलं.
त्या दिवशी सकाळी बातम्या ऐकायला टी.व्ही. लावला आणि शेहेनाईचे सूर कानी पडले. बातम्यांमध्ये सुप्रसिद्ध शहनाईवादक बिस्मिल्लाह खन निवर्तल्याची बातमी ऐकली.. खरेतर हे होणार हे माहीतच होते पण तरीही मन सुन्न झाले क्षणभर.. ती शेहेनाई ऐकताना शाळेतला तो दिवस आठवला.. भारतीय संगिताबद्दल बोलताना खास भारतीय शेहेनाई ह्या वाद्याची मी एका वर्गात ओळख करून दिली होती. शेहेनाईची सीडी माझ्या मुलांना मी ऐकवली. शेहेनाईचे अपरिचित सूर ऐकून सुरुवातीला ते विचित्र वाटून त्या सात वर्षाच्या मुलांत खसखस पिकली. पण नंतर त्या शेहेनाईचे आणि तिच्या वादकाचे फोटो बघत असताना एकीकडे त्यांचे कान ह्या नव्या आवाजाला सरावले आणि हीच मुलं नंतर गुंग होऊन गेली. जगप्रसिद्ध खानसाहेबांची कोणाला काय ती ओळख करून देणार माझ्यासारखी छोटी माणसं पण मला किमान माझ्या काही मुलांना तरी ही शेहेनाई ऐकवायला मिळाली आणि त्यांना ऐकायला मिळाली ह्याचा आज आनंद होतोय.
असाच आनंद होतो ह्या जाणीवेतून की बोस्केतली थोडीच का होईना पण इंटरनेट क्लबच्या निमित्ताने काही मुलं भारताचा झेंडा, भारताचे राष्ट्रीय फूल, फळ, प्राणी, पक्षी, खेळ हे सगळं जाणून घेऊ शकली. आज त्यांना ताजमहाल माहित आहे. गेट वे ऑफ़ इंडिया आणि लाल किल्ला त्यांना ओळखता येतो. आणि ह्याचे अप्रूप वाटते की रुपालीला फ़्रांसमधून तिच्या घरी जायला विमानात किमान नऊ तास एका जागी बसावे लागते. पॅरीस हे नाव ऐकून माहित असणार्या ह्या पिलांना आपल्या देशाची ती राजधानी आहे ह्याची जाणीव होत नाही कारण त्यांची ह्या वयात तो दुसरा एक देश आहे अशी समजूत आहे पण भारताची राजधानी नवी दिल्ली आहे हे त्यांना विचारता क्षणी सांगता येतं. डिसेंबर महिन्यात साडी नेसलेल्या रुपालीने लावलेल्या टिकलीची, बालमंदिरातल्या पाच वर्षाच्या Brandon ने सहा महिन्यांनंतरही ठेवलेली आठवण पाहून माझी आई सुद्धा आश्चर्यचकित झाली जेव्हा तिची टिकली पाहून तिच्याकडे बोट दाखवत तो उद्गारला टिकली!
Brandon ची जशी हुषारी तशी लक्षात रहाते ती Charlotte चि निरागसता. रुपाली मुंबईची आहे. तिला फ़्रेंच येत. ती Valenciennes ला रहाते हे सगळे माहित असूनही तिनं मी अच्छा करून वर्गातून बाहेर पडताना एक दिवस मला विचारलं , “ तुझे विमान कुठे ठेवलं आहेस? ” माझ्या चेहेर्यावर भलंमोठं प्रश्नचिंन्ह! “बागेत ठेवतेस का ते नेहेमी? ” हा पुढचा प्रश्न. “विमान नाहीये माझं. ”, मी म्हटले. “मग तू घरी कशी जाणार? ”
रुपाली घरी जाते म्हणजे रोज नऊ तास विमानातून प्रवास करून मुंबईला जाऊन दुसर्या दिवशी परत शाळेत तशीच येते अशी त्या बिचारीची समजूत झाली होती हे त्या वेळेस माझ्या उघडकीसं आलं.
जून महिन्याच्या चोवीस तारखेला, शनिवारी, बोस्केचा वार्षिकोत्सव होता. मी जरी शनिवारी शाळेत जाणार होते तरी तेवीस तारखेला सगळ्यांचा वर्गात औपचारिक निरोप घेतला कारण त्यानंतर इंग्लिशचे शाळेतले तास संपणार होते. मोठी मुलं पुढच्या वर्षी शाळेत परत येणार का विचारत होती. कागदाच्या चिठोर्यावर आपलं नाव, पत्ता लिहून देत होती.. काही जण माझा पत्ता लिहून मागत होती. बालमंदिरातली मात्र मी परत जाणार हे मानायलाच तयार नव्हती. अनेक वेळा सांगूनही पुढच्या शुक्रवारी भेटूच असं परत परत सांगत होती. “उद्या मी वार्षिकोत्सवासाठी येईन पण आजचा वर्ग शेवटचा. पुढच्या शुक्रवारी तुम्ही शाळेत असाल तेव्हा मी विमानात असेन आणि घरी मुंबईला परत जात असेन. ” असं सांगूनही ह्यांचे आपलं तेच. वर्गात फोटो काढून झाले, पन्नासदा अच्छा करून झालं. शेवटी वर्गशिक्षिकेच्या सांगण्यावरून प्रत्येकानी माझी पापी घेत माझा गाल चिकट करून टाकला आणि आमचं निरोप घेणं संपलं. माझा मात्र पाय निघत नव्हता.
दुसर-या दिवशी मला पुन्हा शाळेत बघून मी खोटं सांगितले ह्याची त्यांना खात्री पटली. त्यांची समजूत बदलण्याचा मीही प्रयत्न केला नाही कारण मी परत जाणार आहे असे ठासून सांगताना मलाही काही कमी यातना होत नव्हत्या. एकंदरीत मी तिथे असल्याचा त्या लहानग्यांना खूप आनंद आहे ह्यातच मला आनंद होता.
वार्षिकोत्सवाच्या कार्यक्रमात ख्रिस्तोफ़ने माझे आभार मानले. मुलांनी टाळ्यांचा कडकडाट केला. माझ्या नावाच्या आरोळ्या मारल्या.. मी स्टेजवर चढून अभिवादन केल्याशिवाय त्यांचे समाधान झालं नाही. आज निरोप घेणं आणखीच कठीण गेलं कारण आजचा दिवस नक्कीच शेवटचा हे माझेही मन मानायला नाखूष होतं. ह्याच अंगणात मी कधी मुलांसोबत बास्केटबॉल खेळले तर कधी कोणाला मारामारी केल्याबद्दल दटावले होते. कधी कोणा रडणार्याची समजूत काढली होती तर कधी कोणाची चेष्टा केल्याबद्दल त्याला दम भरला होता.
माझा आणि ह्या शाळेचा सहवास वाटला तरी संपला नव्हता. शाळेचं एक पुस्तक माझ्याचकडे राहिल्याचे लक्षात आल्यामुळे मंगळवारी परत मी शाळेत गेले. परत भेटणार नाही असं सांगूनही परत शाळेत दिसल्यावर काही मुलांनी भूत पाहिल्यासारखा चेहेरा केला आणि बालमंदिरातल्या मुलांनी “रुपाली ह्या पुढे शुक्रवार ऐवजी मंगळवारी येणार आहे ” अशी गोड समजूत करून घेऊन माझे पूर्वी एवढ्याच प्रेमानं स्वागत केलं. जवळजवळ नऊ महिन्यांपूर्वी जेव्हा मी प्रथम शाळेत गेले होते तेव्हा ह्याच चिमुकल्यांनी माझ्याकडे थोड्याशा परक्या, थोड्याशा आश्चर्यचकित आणि ब-याचशा उत्सुक नजरांनी पाहिले होते.. आज नऊ महिन्यांनी मी त्यांना इंग्लिश शिकवणारी पण जणू त्यांची मैत्रीण बनून गेले होते. मला पाहिल्यावर, बटरफ़्लाय म्हणजे पापियॉन, कॅट म्हणजे शा, हॉर्स म्हणजे शव्हाल असे मला भेटताक्षणी उजळणी करणारा Theo, मला भेटल्यावर माझ्याशेजारी आधी बसून माझं कानातलं, गळ्यातलं अगदी हातानेही चाचपून छान आहे असे सांगणारी Anaïs, माझ्याच वर्गात माझे लक्ष नाही असं बघून अगदी टिश्यु पेपरवर चित्र काढून देणारी Claire ! कोणाकोणाच्या म्हणून किती आठवणी अजूनही ताज्या आहेत.
आज शिक्षक दिन! शाळेत असताना शिक्षकांना त्या दिवसापुरती विश्रांती देऊन अगदी शिपायापासून ते मुख्याध्यापकापर्यंत सगळ्यांची जवाबदारी विद्यार्थांनी पार पाडायची अशी आमच्या शाळेची पद्धत होती. मी कधीही त्या थोड्या वेळासाठीही शिक्षकाच्या भूमिकेत शिरायला गेले नाही. आज एवढ्या वर्षांनी मी तेही धाडस केलं. “मी केलं ” असं म्हणण्यापेक्षा कदाचित माझ्या ह्या विद्यार्थ्यांनी माझ्याकडून करवून घेतलं असे म्हणणं जास्त योग्य ठरेल. मला अनेक बरे-वाईट अनुभव देताना मला खूप सारा विचार करायला लावला. मला शिक्षक व्हायची पहिल्यांदाच संधी दिली. त्यांच्यापैकी पुन्हा कोणी मला भेटणार तर नक्कीच नाही. पण त्यांची आठवण मला आहे आणि कायम राहिल. केवळ त्यांच्यामुळेच मी औटघटकेची का होईना पण शिक्षिका म्हणवून घेत्येय ह्याची मला जाणीव आहे. त्याबद्दल त्यांचे आभार मानून मला ऋणातून मोकळे व्हायचे नाही म्हणूनच आजच्या दिवशी मी त्यांच्याच आठवणी कायमसाठी शब्दबद्ध केल्या.
By
Rupali Sohoni Kamat
Belgaum, India
No comments:
Post a Comment