शाळकरी असताना मे महिन्याच्या सुट्टीत ऐन उन्हाळ्यात उगारला गेले होते. उगार म्हंजे मिरज,सांगली जवळचे,बहुतांश मराठी वस्ती असूनही आता कर्नाटकात असलेले, आणि वाहत्या 'कृष्णेचे' सान्निध्य लाभलेले संपन्न गाव. बारामाही नदी म्हंजे काय हे पहिल्यांदा तिथे पाहिले मी. माझ्या गावची नदी 'भारंगी' ही मुख्यतः पावसाळ्यात वाहणारी, डिसेंबरपासूनच हळूहळू तिचे पात्र आक्रसत जायचे आणि एप्रिल मे मधे फक्त केंदांडात जिथे तिचे पात्र खोल होते तिथे पाणी उरायचे. त्यामुळे 'कृष्णेच्या' पात्रात ऐन उन्हाळ्यात 'भारंगीत' पावसाळ्यातही नसेल एवढे पाणी पाहून हरखून जायला झाले होते.
नंतर 'कृष्णेचे' दर्शन झाले नरसोबाच्या वाडीला. तिचे पात्र तसे लांब वाटले होते मला देवळापासून. ऐन पावसाळ्यात देऊळ पुर्ण पाण्याखाली जाते यावर विश्वासच नव्हता बसला माझा. अर्थात वाडीतच तिला 'पंचगंगा' येवून मिळते हे तरी कुठे माहित होते मला. कराड जवळच्या 'कोयने'बरोबरच्या 'कृष्णेच्या' संगमाबद्दल मात्र खुप ऐकले होते. एखाद्या गोष्टीबद्दल खुप ऐकावे, अपेक्षा वाढवाव्यात आणि प्रत्यक्ष दर्शनात अपेक्षांपेक्षा मोठं असे काही मिळावे असे झाले होते मला संगम पाहून.
यावर्षीच्या उन्हाळ्यात उगारला साक्षात 'कृष्णेचे' पात्र कोरडे पडल्याचे ऐकले आणि मराठवाडा विदर्भात असलेले दुष्काळाचे सावट सप्तनद्या असलेल्या संपन्न 'कृष्णाखोऱ्यात' पसरल्यासारखे वाटले. ऐन पावसाळ्याच्या सुरवातीला कोरडे पात्र पडलेल्या 'कावेरी' नदीचे पुन्हा पात्र भरताना स्वागत करण्याऱ्या लोकांचा व्हिडीओ बघितला. सुरवातीला फेकच वाटला. पण नंतर धडधडले छातीत. एवढी मोठी नदी आणि कोरडी पडली. कशामुळे? कमी पाऊस, तुटलेले जंगल, वाढते नागरीकरण का धरणे अणि त्याच्या पाणीसाठ्याचे अयोग्य व्यवस्थापन यामुळे?
जुलैचा शेवटचा आठवडा आणि ऑगस्ट महिना आला तो जोरदार पाऊस घेवून. सांगली, कोल्हापूरकडे पावसाच्या दमदार बँटिंगनंतर सर्व नद्या भरून वाहू लागल्याच्या बातम्या येवू लागल्या. हळूहळू नद्या धोक्याची पातळी ओलांडू लागल्या आणि त्याचवेळी धरणे पण भरत आल्यामुळे कराव्या लागलेल्या विसर्गामुळे इतक्या फुगल्या की पात्र सोडून बऱ्याच बाहेर पसरल्या.
'कृष्णा'खोरे मुळातच अनेक नद्यांनी बनलेले. कृष्णेच्या उपनद्या सुध्दा स्वतंत्र नदी म्हणता येईल एवढ्या मोठ्या. 'कोयना', 'येरला' ,'वारणा', 'पंचगंगा' या महाराष्ट्रातील आणि 'घटप्रभा', 'मलप्रभा' या कर्नाटकातील साधारण सारख्या भौगोलिक प्रदेशातून वाहत येणाऱ्या नद्या. या सगळ्याच पट्यात एकाचवेळी चांगला पाऊस झाला. बरं या सगळ्याच नद्यांवर बांधलेली मोठी मोठी धरणे. शहरांची वीज आणि पाण्याची, आणि खेड्यांमधील उसाची तहान भागवणारी. ही तहान भागली पहिजे म्हणून येईल ते सगळे पाणी धरून ठेवणारी. या तहानेची भुक इतकी मोठी की एकुणच व्यवस्थेला नदी वाहती राहिली पाहिजे याचे काहीस सोयरसुतक नाही.
त्यामुळे पावसाळा सोडल्यास कोरड्याच भासणाऱ्या नदीपात्राजवळचं बांधकामे झाली. कोरडे पडलेले ओढे नाले बुजवले गेले. उन्हाळ्यात नदी कोरडी ठेवून धरणात पाणी राखले गेले. सुरवातीच्या पावसानंतर अधिकच्या हव्यासापायी जरूरीपेक्षा जास्त पाणी धरणात साठवले गेले. आणि मग एकदम पाऊस पडल्यावर नाकातोंडाशी गाठ आल्यावर सोडले गेले. एकाचवेळी पाऊस आणि सर्व धरणातील विसर्ग यामुळे नद्या फुगल्या आणि नेहमीचे वाटा शोधून वाटेत येणारे सगळे कवेत घेत पसरल्या. संगमाजवळ जिथे दोन फुगलेल्या नद्या मिळतात तिथली अवस्था तर अधिकच भीषण. सगळ्यांना चटका लावणारी ती बोट दुर्घटना घडली ती ब्रह्मनाळला अशाच 'कृष्णा येरला' संगमाच्या ठिकाणी.
बऱ्याच ठिकाणी 'गंगामाई' नुसती भेट देवून नाही गेली तर चांगली आठवडाभर राहिली. मागच्या वर्षी केरळात झाले तेच थोड्या फार फरकाने कृष्णेच्या खोऱ्यात झाले. ज्यांचे नुकसान झाले त्यांच्या पाठीवर फक्त हात ठेवून लढ म्हणणे पुरेसे नाही हे जाणून अनेक हात मदतीला सरसावले. शासनानेही काही चांगले उपक्रम राबवले. लोक हळूहळू सावरतील. उभे राहतील. पण हळूहळू हे सगळे कशामुळे घडले ते सोयीस्करपणे विस्मृतीच्या विळख्यात जाईल. पुन्हा नदी कोरडी पडली की किंवा अंगणात आली कीच आठवले जाईल.
By
Prajakta Karve
Mumbai, India
No comments:
Post a Comment