Friday, 1 November 2019

गुब्बारा

मुंबईत आले की ह्यांच्या चुलत बहिणीकडे एक फेरी ठरलेली असतेच.  कालही मृदुलाकडे असेच संध्याकाळी गेलो.  तिच्या सोसायटीच्या बाहेरील फुटपाथवर  एक फुगेवाला उभा होता.  पावसात भिजत.  मला म्हणाला, 

"माँजी एक तो गुब्बारा लिजिए.   गरीब को मदत हो जाएगी.  बच्चा सुबहसे भुका है. बीवी वहा बिमार पडी है "

पाहिलं तर खरंच एका बंद दुकानाच्या पायरीवर मुटकुळं करून झोपलेली बाई आणि तिच्या शेजारी तीन चार वर्षाचा मुलगा दिसत होता.  फुगा घेऊन करायचं काय हा प्रश्नच होता माझ्यासाठी.  त्याला म्हंटलं थांब जरा.  येते मी दुकानात जाऊन.  घरासाठी ब्रेड, सटरफटर काहीतरी घ्यायचं होतंच.  त्याबरोबर ह्या फुगेवाल्यासाठीही एक पावाचा पुडा घेतला.  जामची छोटी बाटली घेतली.  एक ढोकळ्याचे आणि थेपल्याचे पाकीट घेतले.  

परत त्या फुगेवाल्याजवळ आले त्याच्या हातात त्या वस्तू दिल्या.  एक सत्कृत्य करतेय मी असं वाटून माझा मलाच आनंद झाला.  पण माझा आनंदाचा फुगा मगाशी मला माँजी म्हणणा-या फुगेवाल्याने भस्सकन फोडूनच टाकला.  ब्रेड वगैरे हातात दिल्यावर तो फुगेवाला मला म्हणाला (आता स्वर बदलला होता बरंका!) ,"मैने गुब्बारा लो बोला था.  बीस रूपैया मिलता था"  

त्याला म्हणाले अरे गुब्बारा नकोय मला तर म्हणे "चालीस पचास वैसेही देने थे फिर!"    मी अक्षरशः आवाक झाले.  हे बोलणं सुरू असताना तो छोटा मुलगा मात्र ढोकळाचं पाकीट फोडून खाऊ लागला.  एवढ्यात गाडी पार्क करून हे पण मी होते तिथे आले.  एकंदर प्रकार कळल्यावर ह्यांनी प्रेमळ शब्दात माझं जे काही कौतुक यांनी केलंय म्हणून सांगू! 

रिपी रिपी पावसाळी संध्याकाळ आणि 'धन्य' वाटावा असा हा अनुभव त्यात ते म्हणतात ना "चेरी ऑन द टाॅप" तसं ह्यांचं प्रेमळ कौतुक! 

पावनच झाले मी अगदी काल! आता यापुढे ठरवलंय.  फार उतू चालली आहेत माझी पुण्यकर्मं. आता त्यात भर नको.  नकोच ते पुण्य आणि नकोच ते प्रेमळ कौतुक.

By

Anagha Mahajan

Talegaon, India

No comments:

Post a Comment