Friday, 1 November 2019

दोन कप चहा

दारात आलेल्या कोणालाही उपाशीपोटी, रिकाम्याहाती पाठवू नये ही शिकवण लहानपणापासून च मिळालेली...
आमचं घर जरा शहराबाहेर असल्याने वस्ती कमी होती...
पाऊस पडून गेला की नव्या हिरवाईने जमिन सजायची...
एक आजोबा आपल्या बकऱ्या चरायला घेऊन यायचे नेहमी तिकडे... कधी कधी आमच्या घराच्या बाहेर ओट्यावर बसायचे...
गरीब असले तरी चेहऱ्यावर नेहमी हास्य, नीट राहणी, ठिगळ असले तरी स्वच्छ कपडे...
मी रोज त्यांना पाणी आणि गुळ द्यायची...
आजोबा तेव्हढ्यानेच खुश होऊन तोंडभरून आशीर्वाद देऊन निघून जायचे आपल्या बकऱ्यांना घेऊन...
आम्हाला ही त्यांची सवय झाली होती...
एखादवेळी ते आले नाही की चुकल्यासारखे वाटायचे...
आजोबा यायचे...
दोन एक तास बाहेर बकऱ्या चारत बसायचे आणि जातांना गुळ न पाणी घेऊन जायचे...
कित्येक दिवस झाले ते आजोबा आलेच नाही... आम्हालाही चुकल्यासारखे वाटत असे... मी रोज त्यांच्या वाटेचा गुळ आणि पाणी रोज बाजूला ठेवायची... पण ते आलेच नाही...
जवळजवळ महिनाभर ते नाहीच आले...
आम्हाला वाटलं की त्यांनी कदाचित बकऱ्या चारण्याची जागा बदलली असेल...
एक दिवस ते आजोबा आमच्या ओट्यावर बसलेले दिसले... डोळ्यांत पाणी आणि अंगावर मळके कपडे होते... चेहरा ही पडलेला दिसत होता... जणू खूप दिवसांपासून आजारी होते...
आम्ही दोघांनी ही अगदी मनापासून त्यांची विचारपूस केली... खूप रडले ते... अगदी लहान लेकरासारखे...
त्यांना नेहमीप्रमाणे गुळ आणि पाणी दिले... पाणी पिऊन शांत झाल्यावर, त्यांना जेवायला ही दिले... आधाशासारखे जेवले ते... जणू कित्येक दिवसांपासून ते जेवले नव्हते...
जेवण करून आजोबा बकऱ्या घेऊन गेले... आज बकऱ्या कमी दिसत होत्या... आम्ही विचार च करत होतो, नेमकं काय झालं असणार???
दुसऱ्या दिवशी आजोबा आले... बकऱ्या घेऊन
ओट्यावर बसले असतांना त्यांना विचारले, आजोबा काय झालं?? एवढे दिवस का नाही आलात??? काही अडचण आहे का??? पण ते काहीच बोलेना...
मग आम्ही विचारणं ही सोडलं...
आजोबा रोज यायचे बसायचे आणि गुळ-पाणी घेऊन जायचे... पण चेहऱ्यावरचं हास्य ही हरवलं होतं...
मात्र एक दिवस त्यांनी गुळ-पाणी घेण्यास नकार दिला...
म्हणाले, "बाई आज गुड-पाणी नको..."
"पण.......  च्या देशील काय??"
"अहो, आजोबा चहाला कोण नाही म्हणेल!!
बसा इथेच... लगेच आणते..."
"बाई, दोन कप देशील का व बाई ??"
आजोबा जरा कचरतच बोलले...
"लय दिस झाले बग... च्या नाय पिलो... देशील का व बाई???"  डोळ्यांत पाणी आलं होतं... आजोबा पुटपुटत होते...
छान गुळाचा चहा केला... दोन कप... काठोकाठ भरून आजोबांना दिले...
आजोबा चहाकडे असे बघत होते जणू, कधी चहा बघितला नाही...
आज लहान बाळासारखेच ते आशेने बघत होते आणि वागत ही होते...
आम्हालाही नवल वाटत होते...
चहा बघून ते बोलके झाले आणि सांगू लागले...
"3 पोरं आणि 6 लेकी पदरी...
सगळ्यांची लग्न झालीत... आपापल्या घरट्यांसाठी पारखी झालेत... त्यांनाही संसार लागला... पण कोण कोणासाठी नसतं बाय..."
महिन्याभरापूर्वी आजारी असलेल्या त्यांच्या पत्नीचे निधन झाल्याचे त्यांनी सांगितले...
" तेव्हा लेकी बाय आल्या... १५ दिवस राहून गेलेत पण या बापाला कोणी ईचारलं नाय बग..."
"लहान पोरगी म्हणली, बाबा... चला घरी पण जवाया ची नजर काही वेगळीच बोलत होती... मग पोरीला तसंच पाठवलं सासरी..."
"पण घरची बाय गेल्यावर घर लय सुनं-सूनं वाटतंय... ती गेल्यापासून धड जेवण नाय की च्या बी नाय..."
"च्या प्यायची लय तलब आलती, पर कसं बोलू काय समजेना बग बाय..."---आजोबा.

"अहो, आजोबा, चहाला काय असं लागतं... तुम्हाला जेव्हा जेव्हा ईच्छा होईल सांगत जा...
मी देईल चहा..."
अजून एक कप भरून गरम गरम चहा त्यांच्या हाती दिला...
आजोबांनी मोठया आनंदाने झुरका मारत बशीने चहा घेतला... त्यांच्या डोळ्यांत आनंद ओसंडून वाहत होता आणि तोंडात चहाभरून आशीर्वाद...
जातांना आजोबांच्या चेहऱ्यावर एक वेगळंच समाधान होतं...
आणि आमच्याही...

By

Dipti Ajmire,

Karlsruhe, Germany

No comments:

Post a Comment