चौकट
ती गुदमरली,
अखिव-रेखीव चौकटीत ती एकदा गुदमरली,
म्हणून चौकटी बाहेर पडली...
आणि तिच्यासाठी चौकट कायमची मिटली....
तो ही एकदा गुदमरला,
आणि चौकटी बाहेर पडला...
मोकळ्या हवेत मोकळा होऊन,
पुन्हा परतला...
त्याच्यासाठी मात्र चौकट उघडीच होती,
'सुबह का भुला, श्याम को लौट आया' म्हणत
त्याचं स्वागत केलं सर्वांनी...
आणि 'राह भटक गयी' म्हणत
तिला मात्र टोचून खाल्लं
असंख्य गिधाडांन्नी...
---
असेही कधी व्हावे
कधी हसावे कधी रडावे,
आयुष्याचे मज कोडे उमगावे;
वारा उनाड होऊन,
स्वच्छन्दी नभी उडावे;
असेही कधी व्हावे...
सुर मज नवे कधी गवसावे,
हृदयीच्या छेडीत तारा,
तुजसंग मग बेभान मी व्हावे;
असेही कधी व्हावे...
क्षण एकांती धुंदी चढावे,
पदरी माझ्या आभाळ बरसावे;
अन् चिंब मी होऊनि
तुझ्या प्रेमरंगात न्हावे;
असेही कधी व्हावे...
पिसारा मनमोराचा फुलून,
सप्तरंगी मी, तुझ्या अंगणी सजावे;
अश्रू नयनीचे होऊन,
तुझ्याच गाली ओघळावे;
असेही कधी व्हावे...
न्हाऊन लक्ष चांदण्यांत तुजसवें,
ओठांतून मी कधी ओथंबावे;
विरता तुझ्यात, गंधित मी व्हावे;
असेही कधी व्हावे...
चांदणरात होऊन कधी तू,
ओंजळीत चांदणं भरावे;
लक्खं मी होऊन, तुझ्यातच विरावे;
असेही कधी व्हावे...
तुझ्याच सुरांत मी, एकाकी रे सरावे;
नि तुझ्या नयनी रम्य, मी जगावे;
असेही कधी व्हावे...
असेही कधी व्हावे...
By
Dipti Ajmire
Karlsruhe, Germany
No comments:
Post a Comment