Friday, 1 November 2019

हाम हाम

‘‘थँक यू’’ आपल्या पॉवर पॉइन्ट प्रेझेन्टेशनची शेवटची स्लाईड इरावतीने दाखवली आणि ती थकून खुर्चीवर बसली. गेले कित्येक दिवस या प्रेझेन्टेशनची तयारी चालू होती. दिवस कुठे सरायचा पत्ताही लागत नव्हता. सुदैवाने तिचं काम सगळ्यांना आवडलं होतं. झारखंड, छत्तीसगड, ओरिसा या सगळ्या भागात खाडिया, मुंडारी आणि कुडुख भाषा बोलणा-या लोकांचीलिंक लँग्वेजम्हणून ओळखली जाणारी सादरी किंवा सदनी किंवा लाटिया या भाषेवर तिनं केलेलं काम महत्त्वाचंच होतं. या विषयीचा तिचा पेपर लवकरच अमेरिकेत सादर केला जाणार होता.

चर्चा संपल्यानंतर अनौपचारिक प्रश्नोत्तरं आणि गप्पाही खूप वेळ चालू राहिल्या. थकलेली असूनही ती अतिशय प्रसन्न मनःस्थितीत होती. काम कडेला नेण्याचा आनंदच तेवढा होता. मिस पार्क, जून, जेसिका, वॉन्टॉक, पॅट्रोविच वेगवेगळ्या देशातले हे तिचे मित्र, त्यांनी असंख्य प्रश्न विचारले. शेवटी तिचं तोंड भरून कौतुक केलं.

जिना उतरताना मागून हाक आली,
‘‘हाम, इरू, हाम.’
हाम? इरावतीनं वळून पाहिलं. जेसिका मराठी शिकत होती. शब्दांच्या अनेक गफलती करायची. आत्ताहीथांबऐवजीहाम, हामम्हणत मागे येत होती.

हाम!’ रस्त्यावरून चालताना अचानक एखादी धून ऐकू यावी, कडक उन्हात घामाच्या धारा लागलेल्या असताना अनपेक्षितरीत्या मानेवर एखादी गार झुळूक फिरून जावी असं तिला त्याहामशब्दाने झालं. 
   
जेसिका जवळ आली. ‘‘तू परवा येणारेस का?’’ वगैरे असलंच काहीतरी तिला विचारायचं होतं. विचारलं न्गेली. मागेहामशब्द ठेवून गेली.

इरू कारजवळ आली. लॉक उघडलं. मागच्या सीटवर लॅपटॉप ठेवला. पुस्तकं ठेवली. कार सुरू केली.

गाडी चालवताना तिच्या मनात प्रेझेंटेशनचेच विचार चालू होते. कुणी कुणी काय काय मुद्दे काढले, आपण कशी उत्तर दिली?

या विचारशृंखलेच्या बॅकग्राऊंडला मधूनच एक शब्द वाजायचा ‘‘हाम!’’ क्षणभर ती घुटमळायची. तिची विचारशृंखला विस्कळीत व्हायची. पुन्हा ती स्वतःला प्रेझेंटेशनच्या विचारांकडे घेऊन जायची की विचार सुरू. मध्येच शब्द यायचा,‘‘हाम!’’ की पुन्हा कट्.

असं होत होत ती घरी पोचली. कार पार्किंगमध्ये लावून घरात गेली.फॅन सुरू केला. हातपाय धुऊन फ्रीजमधली पाण्याची बाटली काढली. सोफ्यावर बसून अर्धी बाटली पाणी प्यायली. पोटात गार वाटलं. डोक्यावर पंखा. आलेला शीण. सोफ्यावरच तिला डुलकी लागली.

गाढ झोपेत एकदम शब्द ऐकू आला, ‘‘हाम, हाम!’’ नंतर त्यात अजून एक हाक अॅड झाली. ‘मा, मा, हाम, हाम!’’ 
   
इरू खडबडून जागी झाली. पुष्कळ घाम आला होता. उठून तोंड धुतलं. फोन वाजायला लागला. किरणचा फोन. ‘‘हॅलो, कसं झालं प्रेझेंटेशन?’
   
‘‘चांगलं झालं
‘‘आता विश्रांती घे जरा. खूप दिवस चाललंय काम हे.’
‘‘छे ! पेपर पाठवायचाय आठ दिवसात.’
‘‘आता काय तुझं रेडीच आहे की सगळं.’
‘‘हो, तरी पण पाच-सहा दिवस लागतीलच.’
‘‘विश्रांती घे अन्मग कर.’
‘‘खरं रे, मला फार गरज आहे विश्रांतीची.’
‘‘म्हणूनच सांगतोय, एखाद्दुसरा दिवस विश्रांती घे. जरा विश्रांती झाली की काम आणखीन चांगलं होतं.’
 ‘‘ठीक आहे. आज तू कधी येतोयस घरी?’
‘‘आमची नेहमीचीच कटकट आहे. तेनोल्टं बिल्टंसगळे घेऊन आज जेवायला जायचंय. रात्री उशीर.’
‘‘जर्मन लोक का?’
‘‘हो इतकं बोअर होतं ना, रोज बाहेरचं खाऊन
 ‘‘ठेवता कशाला मीटिंगा रात्रीच्या?’
‘‘जाऊ दे. जे आहे त्यात काही बदल होणं शक्य नाही. अॅक्सेप्ट इट.’
 कानात शब्द वाजला. ‘‘हाम, हाम!’
चल मग. ये शक्यतो लवकर.’’ बोलण्याचा समारोप कसा करायचा. रात्री बोलू म्हणावं तर हा रात्री उशीरा येणार. आपण झोपेत. तो कंटाळलेला. उद्या बोलू म्हणावं तर नव-याला उद्या भेटू कसं म्हणायचं.

या शहरात आल्यापास्नं हे असंच चाललंय. गेली वीस वर्ष नुसती झुंज. अस्तित्व टिकवण्यासाठीची. आपण एकमेकांबरोबर नुसते आहोत. पण खरंच आहोत का? तो धावतोय, आपण धावतोय, आपली पोरगी धावतेय, तिचे कथक नृत्याचे प्रोग्रॅम, प्रॅक्टिस, धावपळ. कनिष्ठ मध्यमवर्गाकडून वरिष्ठ मध्यमवर्गाकडे झालेल्या प्रवासाचं हे फलित.
   
कित्येकदा ते तिघं ठरवून बाहेर हॉटेलमध्ये भेटायचे. एकत्र जेवण करायचे. मग बरोबर घरी.

एकत्र जेवायला जरी आले तरीसतलजची चिवचिव चालू रहायची. माझा हा प्रोग्रॅम, तो प्रोग्रॅम. इरूजवळ सांगण्यासारखं पुष्कळ असायचं. पण किरणच्या जगात त्या गोष्टी अगदी किरकोळ होत्या. कधी कधी ती उत्साहात येऊन सांगायला लागायची, ‘‘तुम्हाला माहिताय, या दोन्ही भाषा एका ग्रुप मधल्या आहेत. एका फॅमिलीतल्या. पण त्या एकमेकांना कळण्यासारख्या नाहीत. म्हणून लिंक लँग्वेज आहे ती दुस-या फॅमिलीतली.’

अशा वेळेस किरण आणि सतलज एकमेकांकडे सूचक पहायचे, कधी कधी हसायचे, मग सतलज म्हणायची, ‘‘आई, तू काहीतरी लहान मुलीसारखं सांगत असतेस..’

मग एकमेकांशी इथं भेटून काय बोलायचं? शेजारचेपाजारचे, नातेवाईक,... कुणाविषयी बोलायचं ! चांगले पिक्चर्स, गाणी, चांगली पुस्तकं, संबंधांमध्ये इतकी जवळीक असते की असले त्रयस्थ विषय बोलताच येत नाहीत. आपण एकही झालेलो असतो तरीही काही मोठ्या फटी राहिलेल्या असतात, ज्या भरता भरत नाहीत. प्रत्येकाला आपलं आपलं काम असलं, की या फटींचा फारसा प्रश्न येत नाही. फक्त एकमेकांच्या सहवासात आलं, की काय बोलायचं हा प्रश्न असतो. मग एकटेपणा बरा वाटतो. 

या शहराचं पोतच आता असं झालंय. जगणं अगदी वैयक्तिक झालंय आणि एकाकीसुद्धा. नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकवणारी कॉलेजेस्‌, युनिव्हर्सिटीज ओपन होतायत. परप्रांतातल्या विद्यार्थ्यांच्या झुंडीच्या झुंडी येताहेत. होस्टेल्स भरून गेलीयत, सोसायट्या भरून गेल्यायत. हॉटेल्समध्ये, पँटमधून ढुंगणाची फट दाखवणा-या लठ्ठ लठ्ठ मुली, कोप-यापर्यंत बांगड्या घातलेल्या, हात पाय, तळपाय, कोप-यापर्यंत मेंदीने सजलेल्या, दागिन्यांनी लडबडलेल्या आणि सिगरेट ओढणा-या मुली, विमान चालवल्यासारखी बाईक चालवणारी मुलं, दुकानांसमोर साठणारे सिगरेटच्या धुराचे ढग, गांजा, चरस, मावा या सगळ्यांची रात्री उशिरा उघडणा-या दुकानांमधून देवघेव, मध्यरात्री तीन वा. ‘तुने क्या जुल्म किया हैवगैरे वगैरे आळवणारी गाणी, टेरेसमध्ये उभं राहून सगळ्या जगासाठी फोनवर बोलणं, मध्यरात्री केव्हाही टरर्र्र् गाड्या उडवत, लोकांच्या झोपा मोडत सगळं जग आपल्याच बापाचं असल्यासारखं उद्दामपणे वागणं, मध्यरात्री चालणा-या डान्स, गाणी, बियरच्या पार्ट्या, कुणीही कुणाशीही कशाशीही बांधील नसल्यासारख्या, पाण्यावरच्या तेलाच्या तवंगासारखा प्रत्येक जण, बाहेरून इथे.

आपल्या फ्लॅटच्या सुंदर टेरेसमध्ये मस्त चांदण्यांनी भरलेल्या आकाशाकडे पाहत, गार वा-याच्या झुळुकांमध्ये शांत झोपावं म्हणून तिने कौतुकाने टेरेसमध्ये झोपायचा प्लॅन केला. रात्री बारा वा. तिला असं फीलिंग आलं की आपण भर बाजारात गादी टाकून झोपलोत. इतकी विविध भाषांमधून, मोठ्याने चालणारी बडबड, मोठ्याने हसणं.
   
तिची चिडचिड झाल्यावर किरण म्हणाला, ‘‘तू पण चक्रमच आहेस. टेरेसमध्ये काय झोपायचं मध्यमवर्गीय माणसासारखं. किती दिवस म्हणतोय तुला एसी बसवून घेऊ तर तुझं काहीतरी तिसरंच. नॅचरल वारं पाहिजे, म्हणे.’
   
मोठ्या धबधब्यात एखादी गोष्ट सोडली की तिच्यावर कुणालाही कंट्रोल नसतो वाटेल तशी वाहत जाते ती. तसंच आहे इथलं आयुष्य. एकदा ते धबधब्यातून ढकलून दिलं की थांब म्हटलं तरी कुठलं थांबतंय. थांब? हाम?
   
तिला पुन्हाहामशब्द आठवला. भूतकाळात रमत बसण्याची अजिबात आवड नसल्यामुळे तिने तो शब्द परत कधीच आठवला नव्हता. गाव सोडल्यानंतर पण आता सकाळपासून तो शब्द जणू तिचा पाठलागच करत होता.

तिचं गाव खेडेगाव तर नव्हतंच पण तालुका प्लेस सुद्धा नाही, चांगलं जिल्ह्याचं गाव. पण महानगरीय रूप त्याला कधीच मिळालं नाही खेडेगावाचंच पोत होतं त्या गावाला. ‘अपार्टमेंटनावाच्या काडेपेट्या अजून फारशा निर्माण झालेल्या नसताना एका काडेपेटीत ती राहात होती. दोन खोल्यांचा फ्लॅट, हॉल आणि छोटंसं किचन. यापूर्वी कधीच फ्लॅटमध्ये राहिलेली नसल्याने तिला त्याचंही तेव्हा काय कौतुक. बेसिन पाहिल्यावर ती प्रचंड खूष झाली. वाड्यात कॉमन संडासच्या जागेत वर्षानुवर्षे राहिल्याने आपल्या घरात आपल्यासाठी संडास बाथरूमसुद्धा आहे याचंच कौतुक. शिवाय किचन ओट्याचं कौतुक, वाड्यात आपण दोन मोठमोठे हॉल, स्वयंपाकघर, गच्ची, गॅलरी, व्हरांडा, अंगण इतके प्रकार असणा-या घरात राहात होतो आणि इथे दहा बाय दहाच्या रूम्स आहेत हेही तिला जाणवलं नाही. खुशीत राहिली ती तिथे. एका मजल्यावर चार फ्लॅटस्‌. सगळ्यांची दारं  उघडी असायची कुणी कुणाच्याही घरात केव्हाही पसरलेलं असायचं. एकत्र जेवण, कुठलीही वस्तू आणायची तर मिळून वाजत गाजत. पाणी फक्त खालून आणावं लागायचं.

एकदा तिच्याकडे एक गृहस्थ आले होते. पण नव-याला रात्रीची मीटिंग होती. किरण त्या गृहस्थांना म्हणाला, ‘‘बरं येतो जाऊन मी.’’ इरूलायेतोम्हणाला. शेजारच्यांच्या दरवाजातनं ते काका उभे दिसले तर त्यांना म्हणाला, ‘‘येतो जाऊन मी.’

इरूकडे बसलेले गृहस्थ म्हणाले, ‘‘हा काय प्रकार आहे? हा काय युद्धावर चालला का काय?’
असलं त्या गावातलं वातावरण.

शेजारी जॉन कांबळेचा फ्लॅट होता. त्याच्या घरी तो, त्याची आई, बायको, तीन मुलं होती. त्याची आई नर्स होती. सरकारी हॉस्पिटलमध्ये. तिच्याच जिवावर त्याचं कुटुंब जगत होतं. जॉन मॅट्रिकसुद्धा पास नव्हता. इलेक्ट्रिशियनची कामं करायचा. दारू प्यायचा पण सज्जन गृहस्थ होता. आजीबाईंची सगळ्या घरावर हुकूमत असायची. पोरांना शिस्त लावणे, मारमारून अभ्यासाला बसवणे, संध्याकाळची प्रार्थना म्हणायला लावणे या सगळ्यांची जबाबदारी आजीबाईंची होती. सून म्हणजे साक्षात गरीब गाय. अहोरात्र राबत असायची.

अशात दुष्काळात तेरावा महिना तसाच जॉर्जचा जन्म झाला. ‘अनवॉन्टेडहे त्याच्या जन्मावर आधीच शिक्कामोर्तब होतं. तीन दिवसानंतर आशाबाई जेव्हा छोट्या जॉर्जला घरी घेऊन आल्या तेव्हा इरू धावत त्याला पाहायला गेली. काळ्याभोर, लुकलुकत्या डोळ्यांच्या जॉर्जला तिनं प्रेमानं जवळ घेतलं. पहिले काही दिवस गेल्यानंतर जॉर्जला घेऊन त्याच्याशी खेळायला लागली. पुढे पुढे तिच्याकडे जॉर्जला ठेवून आशा कामाला जायला लागली. जॉर्ज आरामात राहायचा. आशाच्या बाकीच्या मुलांना दूध पाहायला मिळत नसताना जॉर्जला इरू रोज ग्लासभर दूध पाजायचीत्याला रोज सतलजबरोबर जेवायला द्यायची. जॉर्जच्या भावंडांना जॉर्जचा हेवा वाटायचा पण ती मोठी होती. आजीबाई त्यांना जाऊ द्यायच्या नाहीत.

रोज दुपारी किरण घरी जेवायला यायचा तेव्हा सतलज शाळेत गेलेली असायची. तेव्हा जॉर्जला आणलंच पाहिजे. शेजारी त्याला बसवून मधून मधून त्याला हे खाऊ घाल, ते खाऊ घाल करत किरणचं जेवण व्हायचं. सतलजला शाळेत सोडायला जॉर्जने इरूबरोबर जायचं. कुठेही, भाजीला वगैरे जायचं तरी ती जॉर्जला कडेवर घेऊन जायची.

अशात एक दिवस किरणची बदली झाली. अर्थात किरणच्या इच्छेनेच महानगरात. महिनाभरात जायचं निश्चित झालं. सगळ्यात मोठा प्रश्न त्यांना पडला जॉर्जचा. आता जॉर्जला सोडून जाण्याशिवाय पर्याय नव्हता.

जॉर्जला सोडून जायचं? त्याच्याशिवाय जगायचं? सवय करायला हवी. दुस-या दिवशीपासून सवय करण्याचा प्रोग्रॅम सुरू. दुपारचं त्याला घरी आणणं बंद झालं. इरूच्या घरी चांगलं खायची, ग्लासभर दूध प्यायची सवय झालेल्या जॉर्जला हे जड गेलं. घरी जे असेल ते खायचं. शिळ्या पावाचे तुकडे अर्धा कप चहात बुडवून खायचे. इरू त्याला बाहेर नेईनाशी झाली. तो आला तर ती त्याच्याशी खेळायची, गप्पा मारायची पण स्वतःहून बोलावणं बंद झालं.

एकदा तर ती बाहेर जाताना त्याने पाहिलं, ‘माम्हणत असे तिला. ‘मा, हाम, हाम. मी येतो. मा, हाम, हाम’’ म्हणत मागे लागला. तोपर्यंत त्याच्या आजीने त्याला आत ओढलं. दार बंद झालं. आतून दूरपर्यंत त्याच्या रडण्याचा आवाज येत राहिला.

सोपं नव्हतं हे. एका जिवाचे मायेचे बंध तोडून येणं. महानगरात इरू राहायला आली तेव्हा गार भिंतीना पाठ टेकवून उभी राहायची आणि एकटीच रडायची जॉर्जच्या आठवणीनं.

आज पुन्हाहाम हामशब्दाबरोबर तिला जॉर्ज आठवला. आणि विश्वासाच्या, प्रेमाच्या, आपलेपणाच्या नात्यांची वीण असलेलं ते गाव. जणू इथल्या संवेदनशून्य प्रवाहात वाहत जाताना कुणीतरी कड्याच्या टोकावरून विरून जाणा-या हाका मारत असावं,
   
‘‘हाम हाम ! हाम हाम !’

By

Sujata Mahajan

USA


No comments:

Post a Comment