इंग्रजांच्या दीडशे वर्षे गुलामगिरीच्यानंतर १५ अॉगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला. त्यानंतर २६ जानेवारी १९५० रोजी भारत देश प्रजासत्ताक झाला. भारतात लोकशाही पद्धतीने राज्यकारभार चालविला जातो. जगातील एक लोकशाही देश म्हणून भारताकडे पाहिले जाते.ही लोकशाही यशस्वी करण्यामागे येथील नागरिकांचा म्हणजेच मतदारांचा अत्यंत महत्त्वाचा सहभाग आहे. लोकशाही म्हणजे लोकांनी लोकांसाठी लोकांकरता चालविलेले राज्य. येथे मतदार आपल्या मतदानाद्वारे लोकप्रतिनिंधींची निवड करत असतात. त्यामुळे प्रत्येक मतदारांनी आपले अमूल्य मत देणे महत्त्वाचे आहे.आपण आजपर्यंत अनेक वर्षे शालेय पाठ्यपुस्तकातून शिकत आलेलो आहोत तर मतदानाआधी रेडिओ, टी.व्ही. अशा संपर्काच्या माध्यमातून मतदान आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे असा संदेश लोकांपर्यंत पोहोचवले जातात.
आज मतदान करायला जाताना मला खूप अनुभव आले.काही जण मतदानाच्या आदल्या दिवशी जागृत होतात. मतदानाच्यादिवशी नगरसेवकांनी आम्हाला मतदानाच्या स्लीप दिल्या नाहीत, हे काय आमचे काम आहे का?असे बोलणारी लोकं आज मला मतदानकेंद्रावर पाहायला मिळाली. मतदान करून काय होणार? एक मतं दिलं नाही तर काय फरक पडणार? आम्हाला राजकारण आवडत नाही. पाऊस आहे, कंटाळा आला, सुट्टी आहे तर चांगली ट्रिप काढली असती, मतदानासाठी खूप मोठी रांग आहे अशी अनेक कारणे आणि टीका मला आज ऐकायला मिळाल्या.
मतदान करायला जायच्या अगोदर काही लोकं मतदानकेंद्र कुठे आहे? यासाठी जागृत होतात. हद्द म्हणजे आज एक व्यक्ती मला म्हणाली, "झालं मतदान करून? " मी म्हणाली, "हो झालं." त्यावेळी मला त्यांनी सांगितले, गेली चौदा (१४) वर्षे झाली माझे नाव मतदार यादीत नाही आणि मी मतदान करत नाही. ही व्यक्ती सुशिक्षित असूनही ही गोष्ट अतिशय अभिमानाने सांगत होती. मला ह्या व्यक्तीची अतिशय कीव आली. ह्याला सुशिक्षित असून अशिक्षितच म्हणावे, नाही का!! मतदारयादीत नाव का आले नाही, त्यामागची कारणे कोणती याची तसदी घ्यायला या व्यक्ती कधीच तयार नसतात आणि सरकार, प्रशासन आणि नगरसेवक यांना नावं ठेवतात, मतदारयादीत नाव येणं हे त्यांचे काम आहे असे बोलतात. हे फक्त स्थानिक राजकीय कार्यकर्ते, नेते यांचे काम नाही तर आज भारतीय नागरिकत्व तुमचेही आहे त्यामुळे माझे मतदारयादीत नाव का नाही हे जाणून घेणे प्रत्येकाची जबाबदारी आहे तसेच मृत व्यक्तींच्या नातेवाईकांनी त्या व्यक्तीचे नाव मतदारयादीतून कमी करून घेणे गरजेचे आहे ; एकाच व्यक्तीचे नाव दोन वेगवेगळ्या प्रभागात असेल तर तेही कमी करून घ्यावे यामुळे मतदानाची अचूक टक्केवारी समजेल.
आज भारतीय निर्वाचन(निवडणूक)आयोगाने मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून मतदानकेंद्रावर सेल्फी पॉईंट, अॉनलाइन मतदार नोंदणी, अंध व अपंग व्यक्तींसाठी विशेष सुविधा आणि प्रत्येक मतदानकेंद्रावर 'सखी केंद्र ' असे अनेक उपक्रम राबविले जात आहेत.
मतदार दिवस हा २५ जानेवारी रोजी साजरा केला जातो हे काहींना माहीतही नाही. मतदान का करायचे, ते करून काय फायदा ? अशीच लोकांची मानसिकता राहणार असेल तर निवडणूक आयोगाने विविध उपक्रम राबवून मतदानाची टक्केवारी वाढणारच नाही. सुशिक्षित लोकांची मतदानाबद्दलची मानसिकता बदलणे ही काळाची गरज आहे. लोकांना जबाबदार आणि जागृत नागरिक म्हणजे काय हे समजणे गरजेचे आहे तसेच जबाबदार आणि जागृत नागरिक हे त्यांच्या वर्तनातून दिसले पाहिजे.उचशिक्षित लोकांनी अॉनलाइन मतदार नोंदणीचा वापर करावा त्यामुळे वैयक्तिक माहितीमध्ये अचूकता येईल तसेच प्रशासनावरचा ताण कमी होईल. तरच मतदानाची टक्केवारी वाढेल आणि लोकशाही सक्षम होईल.
By
Shreya Gole
No comments:
Post a Comment