Thursday, 30 April 2020

राहिले रे, दूर घर माझे.....!

घर !  एक पुण्याच, एक कल्याणच !  पुण्याला माझा जन्म झाला,  लग्नानंतर मी कल्याणला गेले. 

ज्याच्या नांवाने पुण्याची ओळख पटते त्या सदाशिव पेठेत माझ्या आजोबांनी १९३९ साली घर बांधले.  सदाशिव पेठेच्या वाडा संस्कृतीच्या मांदियाळीत आजोबांचे हे घर म्हणजेच दुमजली बंगला उठून दिसत असे.  घर जरी १९३९ साली बांधल तरी त्यात आजच्या जगातील सर्व सोयी-सुविधा होत्या.  पश्चिम महाराष्ट्रातील पुणे हे त्या काळातील मोठ शहर असल्यामुळे छोट्यामोठ्या कामांसाठी अनेक लोक पुण्यात येत असत.  त्यामुळे आमच्या घरीही पाहुण्यांचा राबता कायम असायचा.  आजोबा सिव्हिल सर्जन असल्यामुळे त्यांच्याकडे वैद्यकीय सल्ल्यासाठी अनेकजण येत असत.  या साऱ्याचा विचार करून आजोबांनी मोठ घर बांधल.  त्यांची तीन मुलं, एक मुलगी आणि स्वतःसाठी,  पाहुण्यांसाठी असे ते प्रशस्त घर होते.  कवडीच सुरेख डिझाईन केलेली एक मोठी गच्ची व एक छोटी गच्ची होती.  मोठा वऱ्हांडा होता.  पुढच्या गेटमधून आत आल्यावरही वऱ्हांडा होता.  वऱ्हांड्यात वर जाण्यासाठी जिना होता, हा खास पाहुण्यांसाठी !  त्याच्या बाजूला एक खोली होती तिथे सर्वजण चपला, बूट काढत असत म्हणून ती चप्पल खोली !  वऱ्हांड्यात आल्यावर उजव्या हॉलला प्रशस्त दिवाण व डाव्या हाताच्या खोलीत मोठा झोपाळा असल्याने ती झोपाळ्याची खोली !  मधल्या दारातून प्रशस्त व हवेशीर माजघरात प्रवेश होता. एका बाजूला जेवणाचे टेबल होते. डाव्या हाताला स्वयंपाकघर.  त्यामध्ये त्याकाळी आधुनिकतेची साक्ष देणारा उभ्याचा ओटा होता, त्याचबरोबर जुन्या काळाची आठवण देणारी ताक घुसळणी होती. कासंडीमध्ये मोठी रवी व तिला दोरी बांधलेली होती.  माझी काकू रोज एवढ मोठ ताक करायची ते बघताना अप्रूप वाटायचं.  माजघराच्या शेवटी उजव्या हाताला मोठी बाथरूम व जवळच्या दारातून मागच्या अंगणात जाता यायचं. तिथे आजोबांच्या गाडीसाठी गॅरेज होत. तसच घरगड्याची खोली व एक कोठीची खोली होती. त्याच्या शेजारी गोठा होता व त्यात आमची जर्सी गाय 'रूपी' होती. रोज जे ताक होत असे त्यातील लागणारं घरात ठेवून बाकीच आजूबाजूच्या कुटुंबांना दिले जात असे. अंगणात एक छोट गेट होत ते एका मोठ्या बागेत उघडत असे. बागेत अनेक तऱ्हेची फुलझाडे होती, माड होते. पण विविध प्रकारची गुलाबाची रोपं ही एक वेगळी खासियत होती. माझ्या मोठ्या काकूला गुलाबाच्या झाडांचा फार मोठा शौक होता आणि त्या काळात पुण्यात भरणाऱ्या गुलाबांच्या प्रदर्शनात तिला हमखास बक्षिस मिळत असे. 

माझे आजोबा पूर्ण थ्री-पीस सूटमध्ये दवाखान्यात जायचे.  येताना क्लबमध्ये १ तास ब्रिज खेळून यायचे. आमच्या माजघरात एक लंबकाच टोले देणार घड्याळ होतं. त्या घड्याळात ९ चा ठोका पडला कि आजोबांच्या गाडीच दार वाजायच. हा नियम कधीच चुकला नाही. सोवनी शिस्तीचे भोक्तेच ! आजोबा येण्याच्या आधी घरातील नातवंडे, सुना, घरातले नोकरचाकर यांचे जेवण झालेले असायचे, असा आजोबांचा दंडक होता ! आजोबां बरोबर आजी,  त्यांची तीन मुलं व आत्या जेवायला बसायचे. आजोबांचा असा एकप्रकारे दराराच होता. पण ते स्वतः जेवायच्या आधी घरातील सर्वांची जेवणे झालेली असावीत, हे त्यांच वागणं आजच्या काळात देखील पुढेच होत. 

आजीशी मात्र आमची गट्टी होती. आम्ही सर्वजण तिला नन्ना म्हणायचो. अत्यंत प्रेमळ, सुगरण.  सगळ्यांना जेऊ खाऊ घालायची हौस आणि सुनांच कौतुक करण हा तिचा विशेष होता. संध्याकाळी बाहेरच्या अंगणात सतरंजी टाकून आजी सर्व नातवंडांना गोष्टी सांगत असे. तिच्या त्या गोष्टी ऐकण हा आमचा आनंद होता ! आमची आजी उत्कृष्ट ब्रिज खेळायची. 

बाबा रुपारेलमध्ये प्राध्यापक म्हणून रुजू झाले आणि आम्ही मुंबईस आलो. पण पुण्याच्या घराशी नाळ जोडलेलीच राहिली. दिवाळी, उन्हाळा अशा सुट्ट्यांमध्ये आम्ही पुण्याला जात राहिलो.  ऋणानुबंध कायमच राहिले. 

लग्नानंतर मी कल्याणला गेले. माहीमहून कल्याणला,  हे तस तर एक प्रकारच स्थित्यंतरचं होत. कल्याण जरी रेल्वेच जंक्शन होत, शिवाजीच्या काळापासून माहित असलेलं गाव होत, तरी परिस्थितीत फारच फरक होता. वारंवार वीज खंडीत होणं, डास, वाहतुकीसाठी टांगा अशा अनेक गोष्टी ! रेल्वेने जाण्यायेण्यात ३/४ तास हे ही ordeal च होत. पण ह्या गोष्टी दुर्लक्ष करून उमेद देणारं अस कल्याणच घर होत. छोटासा बंगला मागेपुढे अंगण. आमच्या घरात जरी नळ होते तरी पूर्वापार असलेली विहीर तशीच होती. हे घर स्वतंत्र होत. पुढ मागे अंगण, बाहेर बाग, उतरत छप्पर आणि घर ज्या गल्लीत होत त्याचा नंबर झीरो ! गम्मतच वाटायची मला.  त्याच्या अंगणात ३ आंब्याची झाड होती. दोन उंबर होते. शिवाय प्राजक्त, अनंत, कर्दळ, शंखासूर अशी अनेक झाड. मीही मग हौसेन तिथे निशिगंध, ग्लॅडी, पिवळी घंटी, जास्वंद यांची भर घालून माझी हौस पुरवून घेतली. आमच्या घरात एक बंब होता. वेगळाच होता. माझ्या सासूबाई पहाटे उठून त्यात बंबफोड घालून पेटवायच्या आणि मग बंब तापला कि त्याच्या बाजूच्या झडपेतून पाणी घालायच, ते लगेच खालून बाहेर यायच.  पण अस गरम कि बापरे ! युनिकच होता तो बंब ! त्याच घरात माझा संसार वाढला, फुलला.  माझी दोन्ही मुलं याच अंगणात क्रिकेट खेळत मोठी झाली. ते आणि त्यांचे मित्र खेळायचे आणि आमच्या बाहेरच्या खिडकीच्या काचा सतत फुटलेल्या असायच्या ! 

उन्हाळ्यात कैऱ्या काढायला माणूस यायचा. मुल आधीपासूनच दगड मारत असायची पण त्या रविवारी मुलांची खूप गर्दी गेटजवळ व्हायची. भरपूर कैर्‍या निघायच्या. मी तिथे असेपर्यंत देवासाठी फुल व कैर्‍या कधीच विकत आणल्या नाहीत. सगळ्यांना कैर्‍या वाटल्या जायच्या. सर्व मुलांना पण आणि आजूबाजूच्या घरातही ! 

माझ्या सासूबाई सुगरण होत्या. तऱ्हेतऱ्हेची लोणची, मुरांबे घालायच्या. एक अशी घडीची कॉट होती त्यावर वाळवणं घातली जायची. अंगणात कॉट टाकून साबुदाणा पापड्या, बटाट्याचा किस, गव्हाच्या चिकाच्या कुरडया सगळ ! त्या कुरडयांचा आंबूस मस्त वास घरभर दरवळायचा. 

पावसाळ्यात अंगणात पाणी जमायचं मग मुल त्यात होड्या सोडायची. घराच्या मागच्या दारात कडुलिंब होता आणि पिंपळही, त्यावर मधुमालतीचा वेलु गगनावरी गेला होता. पांढरट गुलाबी फुलांचे घोसच्या घोस लगडलेले अजून डोळ्यांसमोर येतात. 

पण कालाय तस्मै नमः! हळूहळू आजूबाजूची बैठी घर जाऊन उंच इमारती उभ्या राहिल्या. घरात अंधार येऊ लागला आणि घर विकण्याचा निर्णय झाला ! ह्या घरात मी २० वर्ष राहिले आनंदाने, समाधानाने. ह्याच घराच्या पायर्‍यांवर मुल माझी ऑफिसमधून येण्याची वाट बघत बसायची. आमच्या घरात ७४/७५ ला T.V. आला तेव्हा सबंध झीरो नं. मध्ये कोणाकडेच T.V. नव्हता. तब्बसुमच 'फूल खिले है गुलशन गुलशन' पहायला अख्खी गल्ली जमायची दर बुधवारी, आम्हांलाच जागा नसायची. पण मजा होती ! 

हे घर सोडून दुसरीकडे गेल्यालाही २० वर्ष होऊन गेली, पण अजूनही ते घर सारखं आठवत ! 

लग्नानंतर वीस वर्षांनी हा बंगला सोडून आम्ही ३ बेडरूमच्या फ्लॅट संस्कृतीत राहायला गेलो. आज पुण्याच व कल्याणच दोन्हीही घर नाहीत. पण माझ्या आयुष्याच्या उमेदीच्या काळात ह्या दोन्हीही घरांनी एक वेगळच समाधान मला दिलं, त्यांच्या आठवणी आजही माझ्या स्मृतीच्या दिवाणखान्यात ताज्या आहेत....

By

Medha Sule

            

No comments:

Post a Comment