Wednesday 29 April 2020

पाळीव प्राणी

आपल्याला जी गोष्ट आवडत नाही तीच नेमकी आपल्या पुढ्यात येते.  मग घरच्यांसाठी चालवून घ्यावी लागते मनात नसलं तरी.  काय करणार! तडजोड करण्याचा स्वभाव असल्यावर दुसरं काय होणार! 😛😜😝

मला कधीच पाळीव प्राणी, पक्षी आवडलेच नाहीत.  पण कधीच आवडले नाही म्हणत वर्ष दीड वर्ष लव्ह बर्डस आणि स्पिन्झ पाळून झाले.  त्यांच्या घरट्यांसाठी म्हणून मडकी बांधा, त्यांच्यासाठी राळ्यांबरोबर कॅल्शियमचे क्यूब्ज खायला ठेवा.  स्वच्छ पाणी पिण्यासाठी ठेवा.  पिंजरे साफ करा.  सगळं केलं. कोणासाठी? तर परिधी आणि तिचे अनिल आबा यांच्यासाठी.  नाव परीचं.  हौस माझ्याच बुवाची.   कामं करायला मी आहेच.  आधी 6च पक्षी होते.  बघता बघता प्रजा वाढू लागली. किलकिलाट वाढला तसा शिकारा, कावळे यांच्या घिरट्या सुरू झाल्या.  सर्पमहाराज पण येऊ लागले.  पक्षी होते त्या दोन अडीच वर्षात जवळ जवळ 8-10 सर्पांना  सर्पमित्र येऊन पकडून घेऊन गेले.  

शेवटी ह्यांना म्हणाले अहो हे काही मला पटत नाहीये हो.  शेवटी बुवाने सगळे पक्षी देऊन टाकले.  मी हुश्श झाले.  आता काहीही हौस नकोय हे बजावलं.  नाही म्हणून वदवून घेतलं. पण कसचं काय! काही दिवसांनी एक भटकं मांजर येऊ लागलं. 

"ए त्याला वाटीभर दुध आण" मला सकाळच ऑर्डर सुरू झाली.  न देऊन करते काय! पण एक बरं होतं की मांजर काही रहात नव्हतं.  घेणेकरी असल्यासारखं रोज येतं दुध प्यायलं की थोडं रेंगाळून निघून जातं.  हे पण गेले सहा सात महिने सुरू आहे.

दोन दिवसांपूर्वी एक गंमतच झाली.  एक काळं कुळकुळीत कुत्र्याचं पिलू गेटच्या बाहेर उभं राहून आत बघत होतं.  मला आम्ही रत्नागिरीला रहात असताना अनाहुत आलेल्या मुधोळ हाऊंड कुत्र्याची आठवण आली.  ज्याला मी नंतर थिबा म्हणू लागले होते. तर तसंच हे पिलूही बघत होतं.  

ह्यांना फक्त सांगितलं हं पिलू आलंय तर बुवा अगदी लहान मुलगा होऊन त्या पिलाला  "ए तू कशाला आलाय इकडे? भुकू लागलीय का तुला?" म्हणू लागले.  पिलू पण शेपटी हलवून ऊं ऊं आवाज करू लागलं.  झालं.  गेट उघडून पिलाला घरात घेतलं.  

 ठेवणीतल्या 'प्रेमळ' आवाजात मला ऑर्डर.  " पोळी घेऊन ये" आणली बिचारीनी पोळी.  बुवाने अगदी प्रेमाने पिलाला भरवली.  झालं.  पिलू बागेत बागडू लागलं. मधे मधे गायब होत होतं मांजरासारखंच. 

पण आज अजून एक गंमत झाली.  दोन्ही घेणेकरी एकाच वेळी हजर.  मांजर पण आणि कुत्र्याचं पिलू. दोघांचं प्रेमाने आदरातिथ्य करून झालं.  पण आता दोघं जायचं नाव काही घेत नाहीत.  उलट हे आवार आपलंच आहे अशी दोघांची समजूत झालीय आणि दोघं एकमेकांवर गुरगुरून ते सिद्धही करण्याचा प्रयत्न सुरू झालाय. 

आणि ह्या न आवडणा-या गोष्टी आता मला आवडून घ्याव्या लागणार आहेत.  बुवाच्या आवडीपुढे माझा आवाज बंदच ठेवावा लागणार.  न ठेवून सांगते कुणाला?

By

Anagha Joshi

No comments:

Post a Comment