Friday 24 April 2020

गिरीभ्रमण


माझ्या गिरीभ्रमणाचा वृत्तांत सादर करताना मनात काही विचार जरूर येतात. माझ्याविषयी म्हणाल तर अंगात कोणतीही विशेष खास कला नाही. व्यक्त्तिमत्त्व सामान्य, साधी बी.एम्.सी. तली नोकरी. असे एकूण सर्व आयुष्य सर्वसामान्य.

माझ्या वयाच्या ३५ व्या वर्षी १९८९ मध्ये मला प्रथम हिमालयाचे दर्शन घेण्याचा योग आला. (पोखरा व्हॅली ट्रेक. उंची १२,००० फूट) तेव्हापासून आत्तापर्यंत मी जवळ जवळ २५, ३० वेळा मी हिमालयात गेले. त्यातले २०-२२ वेळा ट्रेक करता गेले. ५-६ वेळा सहलीसाठी असेल.

मी या छंदात पदार्पण करताना, माझ्या सासूबाई, सासरे पती व मुलगी यांचा अनमोल वाटा आहे. मी बाहेर फिरायला गेल्यावर या साऱ्यांनी माझ्या मुलीला प्रेमाने सांभाळले. त्यामुळे मला मनमुराद फिरावयास मिळाले. जवळ जवळ अख्खा हिमालय पालथा घालता आला. त्यांची मी अनंत ऋणी आहे.

माझ्या ट्रेकची सुरुवात तसे बघायला गेले र माझ्या लहानपणापासूनच झाली. म्हणजे त्याचे असे झाले की माझे माहेरचे गाव माल्दोली. डोंगराच्या कुशीत वसलेले, छोटेसे, सुंदर, गर्द हिरव्या झाडीत लपलेले. तिथे माझे आजी, आजोबा, गाई, म्हशी, आमराई, काजूची बाग, शेती, भले मोठे घर, त्याला मोठे अंगण, समोर गुरांसाठी गव्हाण. ४,५ पायऱ्या खाली उतरून, भली मोठी  भाज्या लावण्यासाठीची जागा, दाराशी ४-५ गडी माणसे अशा खानदानी रुबाबात रहात होते.

माझे आईवडील दोघेही नोकरी करायचे. त्यावेळी पाळणाघर ही संकल्पना नव्हती. त्यामुळे माझी रवानगी माझ्या आजीकडे माल्दोलीला झाली. वयाच्या पहिल्या वर्षापासून. कारण आईला आजीवर ११०% विश्वास होता माझ्या संगोपनाचा.
माल्दोलीला आल्यावर मोकळी शुद्ध हवा, घरचे अन्नधान्य, भाज्या,फळफळावळ, पाटाचे वाहणारे शुद्ध पाणी, घरच्या गाईचे दूध व हुंदडायला भरपूर जागा त्यामुळे माझी तब्येत सुधारु लागली.

त्याकाळी गावात वीज नव्हती, पक्के रस्ते नव्हते, बस नव्हती. बोटीने दाभोळपर्यंत जाऊन पुढे छोट्या होडीने आमच्या माल्दोली गावात यावे लागे. उतरल्यावर एक मोठा प्रचंड डोंगर चढून जवळ जवळ १-१॥ तासानंतर आम्ही आमच्या घरी येत असू. गावात कुणाच्याही घरी जायचे असले तरी पाखाडी (छोट्या छोट्या पायऱ्यांचा चढउताराचा रस्ता ) चढून जावे लागे. मी वयाच्या ४ वर्षापर्यंत माल्दोलीला होते. व शाळेत जाण्याची वेळ आल्यावर मी मुंबईला आले आईवडिलांकडे.

नंतर प्रत्येक मे महिन्याची सुट्टी लागली की माल्दोलीला शाळा उघडायच्या आदल्या दिवशी मुंबईला परतायचे, गिरणगावात. तिकडे डोंगर चढायची सवय लागली. आंबे काढायला, करवंद काढायला डोंगरात जावे लागे. त्यामुळे निसर्गात फिरायची सवय लागली. निसर्ग सहवास आवडू लागला. शारीरिक, मानसिक शक्ती खूप वाढली. त्यातूनच गिरीभ्रमणाची आवड निर्माण झाली. हे चक्र १९७५ सालापर्यंत अव्याहत सुरू होते. नंतर मात्र नोकरी लागली. आजी काकांकडे तळेगावला आली. मग माल्दोलीचा ऋणानुबंध संपला व राहिल्या माल्दोलीच्या आठवणी. निसर्गात फिरायची, डोंगर चढाउतरायची आवड माझ्या आत दबा धरून होतीच. ती उफाळून येई. पण! नोकरी, लग्न, संसार या बंधनात ते मागे पडे.

माझी मुलगी १० वर्षांची झाल्यानंतर मी महाबळेश्वर जावळी जंगल ट्रेकला १९८८ डिसेंबर मध्ये पहिल्यांदा सुरुवात केली ते आत्तापर्यंत माझे ट्रेकिंग सुरुच आहे.

आत्तापर्यंत मी जवळ जवळ ३० वेळा हिमालयात गेले आहे. त्या सर्वात टॉप ऑफ द वर्ल्ड म्हणजे कैलास मानस सरोवर (१९,००० फूट) आणि एव्हरेस्ट बेस् कॅम्प (१५,००० फूट). तसेच सह्याद्रीमध्ये २०-२२ वेळा ट्रेकला गेले आहे. त्या सर्वात टॉप ऑफ द वर्ल्ड हरिश्चंद्रगड आणि भीमाशंकर ही ट्रेकची आव्हानात्मक ठिकाणे. ट्रेक दरम्यान अनेक परिक्षा पाहणारे प्रसंग, अविस्मरणीय गोष्टी घडतात. त्या आठवतील तशा पुढे सांगेनच. आत्ता तूर्त विराम.

By

Meenal Velankar

3 comments:

  1. Yes.... keep on writing...

    ReplyDelete
  2. छान लिहिले आहेस.

    ReplyDelete
  3. खूप छान लिहिलेय .
    असेच लिहिते व्हा

    ReplyDelete