Thursday 16 April 2020

कोरोना आपत्ती की इष्टापत्तीॽ

कोरोना आपत्ती की इष्टापत्तीॽ

प्रत्येकाच्या तोंडी, हर एक प्रसारमाध्यमांद्वारे एकच विषय सध्या चर्चेत आहे. ‘करोना’ ‘CONID 19.’
ह्या जागतिक महामारीने अत्यंत उग्र रुप धारण केलेले असून रोजच वाढणारी रुग्णांची संख्या, त्याद्वारे होणाऱ्या
मृतांची संख्या, अन त्यावर प्रतिबंध, लगाम हवा तसा अजून तरी उपलब्ध नाहीये, ही समस्या भेडसावत आहे.
तरी दिवस रात्र मेहनत करणारे, रुग्णांची सेवा करणारे वैद्यकीय कर्मचारी, लोकांना शिस्त लावणारे सरकारी
यंत्रणेतील कर्मचारी, पोलीस, लोकांची निकड भागवणारे बँक कर्मचारी, स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाला स्वच्छ ठेवणारे
सफाई कर्मचारी हे सर्वच सध्या आपले ‘नायक (हिरो)’ ठरले आहेत.
पण आम्हाला त्याचे कायॽ त्यांच्या या कर्तव्य भावनेचे, मेहनतीचे आपण कोणत्या रितीने पारणे फेडत आहोतॽ
उगाच वेळ घालवण्यासाठी रस्त्यावर फिरणे, सरकारी आदेशाचे पालन न करणे हे मोठे दिमाखाने दाखवत आहोत. अरे,
सरकारला काय तुम्हाला घरात डांबून ठेवण्यात स्वारस्य आहे काॽ त्यांचा त्यात काय स्वार्थ आहेॽ ह्या टाळेबंदीच्या निर्णयाने
खरे तर देशाचे खूप मोठे आर्थिक नुकसान होत आहे. असे नुकसान कोणीही करुन घेण्यास तयार नसते. कोलमडलेली
अर्थव्यवस्था सुरळीत व्हायला किती अवधी लागेल माहीत नाही. टाळेबंदी करणारे सरकार खुळे तर नक्कीच नाही. या सर्व
परिस्थितीचे नियंत्रण करुन देशातील जनतेला वाचवायचे आहे असे पंतप्रधान आपली दोन अडीच तासाची झोप सुद्धा नको
म्हणत सर्वथा प्रयत्न करुन आवाहन करीत आहेत. त्यांना स्थानीय प्रशासन मदत करीत आहे. तर आपणही त्यांच्या आदेशांचे
पालन करून स्वतःला व त्याचबरोबर देशाला ह्या महामारीच्या गर्तेतून बाहेर आणण्यास आपला खारीचा वाटा का उचलू नयेॽ
बळीराजा मेहनतीने सर्व नैसर्गिक परिस्थितीचा सामना करून पिक घेतो. यंदा निसर्गानेही हात दिलेला आहे. पिकं
छान आली आहेत. आशा बळावल्या आहेत. उत्पादन विकून कर्जाचा डोंगर हलका होईल अशी अपेक्षा असतांना हा ‘करोना’
उभा ठाकला, अन घात झाला! सारे कष्ट, मेहनत व्यर्थ होतांना पाहतोय. हवालदिल झालाय. कर्जाचा डोंगर पुन्हा गरगरलाय!
काय करावे सुचत नाही अन एक पर्याय समोर दिसतो सुटकेचा ‘आत्महत्त्या!’ आत्महत्येने किती प्रश्न सुटतीलॽ एक- दोन-
दहा- वीसॽ ह्यासाठी काही उपाय नाही काॽ
स्थानिक ठेकेदार, घाऊक शेतकरी अथवा दलाल यांनी एकल शेतकऱ्याचा माल योग्य किंमतीत घेऊन (सरकारने
किंमत ठरवून द्यावी) बाजारपेठेत पोहचवावा. तेथून सरकारी, निमसरकारी अथवा खाजगी कंत्राटदारांकडून उत्पादनाचे थेट
ग्राहकांपर्यंत वितरण केल्यास फुकट जाणारा माल यामुळे शेतकरी व असूनही मिळत नाही म्हणून उपासमार होणाऱ्या ग्राहकांचे
दुहेरी नुकसान टाळता येण्याजोगे आहे. यात फक्त साठेबाजी करुन आपलीच पोतडी भरण्याचा प्रयत्न न करता, अव्वाच्या
सव्वा किंमत न करता, परिस्थितीचे भान ठेवून, शुद्ध भावनेने, योग्य त्या मोबदल्यात ही साखळी चालल्यास सर्वांचेच हित
साधले जाईल. होणाऱ्या आत्महत्या व मागे पडणारी राष्ट्रीय अर्थव्यवस्था यांचा समन्वय साधता येईल. सद्सद्विवेकबुद्धी
जागृत व्हावी व किमान अपेक्षेने हे कार्य चालावे.
जनसामान्य, जे रोजंदारीवर काम करीत आहेत, हातावर पोट भरणारे यांना सद्यःस्थितीत एक वेळेचे जेवणही
मुश्कील झाले आहे. अनेक व्यक्ती, संस्था उदार मनाने, शासनही आपल्या परीने मदतीस धावून आले आहेत. सढळ हाताने
मदत करून महिन्याचे राशन लोकांपर्यंत पोहोचवण्यास तयार आहेत. पण --- प्रत्येक वेळी हा ‘पणच’ आडवा येतो. खरे तर
‘देणाऱ्यांचे हात हजारो, दुबळी ही झोळी’ अशी परिस्थिती आहे. व्यवस्थित वाटप होत गेल्यास एकही माणूस उपाशी राहणार
नाही इतकी प्रचंड मदत सर्व बाजूंनी येत आहे. ‘झारीतल्या शुक्राचार्यां’मुळे ही मदत पूर्णत्वापर्यंत पोहोचत नाही. ह्या
शुक्राचार्यांवर अशी वेळ आली तर कायॽ हा विचार त्यांनी करावा. कधी काळी आपणही समोरच्या रांगेत असू, अन त्यावेळी
योग्य ती मदत आपल्यापर्यंत पोहोचली नाही तरॽ समजा कोरोनानेच घात केला तरॽ ह्या सर्व विचारांनी कार्य केल्यांस
देणाऱ्यांस व घेणाऱ्यांस दोघांनाही समाधान लाभेल.
ज्या लोकांना पैशांमागे धावतांना दिवसाचे आठ, दहा, बारा पंधरा तासही कमी पडत होते. ये जा करतांना तीन-चार
तास प्रवासांत गर्दीत अडकून पडत होते. त्यांना खरे तर मानसिक, शारीरिक विश्रांतीची किती नितांत गरज होती हे आता
कळत असेल. जरी घरी बसून काम करीत असतील तरी पूर्वीचा शारीरिक, मानसिक ताण सैल झाल्याचे जाणवत असेल.
आणि ह्या सक्त्तीच्या विश्रांतीने का होईना पण शरीर मन ताजेतवाने झालेले वाटत असणार! एरव्ही कामाच्या धकाधकीत,
धावपळीत कुटुंबियांना दिला जाणारा वेळ किती गुणवत्तापूर्ण होताॽ अन आत्ताचा कसा आहे, हा फरकही जाणवतोय. एकत्र
राहून नाते संबंध, प्रेम, आपुलकी, माया वाढत आहे. खरी ओळख स्वतःशीच होत आहे. आई वडिलांपासून दूर गेलेली पाखर,
आपल्या पिलांसह जेव्हा घरी आलीत तेव्हा त्या आईबाबांचे समाधानी तृप्त चेहेरे पाहून घराबद्दलची माया, प्रेम, आपुलकी

वाढून ‘घर’ हे विश्वासाचे स्थान वाटू लागलेय. सर्वांच्या सहाय्याने घरातील जेवण बनवणे, आवरणे, हास्यविनोद, गप्पाटप्पा
करतांना ह्या आय्. टी. कल्चरच्या आधीच्या काळातील गोष्टी आठवताहेत. म्हणूनच ह्या न मागता मिळालेल्या अनाहूत
संधीचा फायदा सोन्यात करून आपली तब्येत, आपले आपसांतील संबंध, नाते दृढ करु या.
शिवाय एक महत्त्वाचा बदल सध्या सर्वत्र जाणवत आहे. अरे, आपण निसर्गाच्या किती जवळ आलो आहोत. अहंह –
निसर्ग आपल्या जवळ आलाय जणू. स्वच्छ, निर्मळ आकाशाच्या दर्शनाला, शुद्ध हवेचा श्वास घ्यायला, वाहणारे शुद्ध
नदीपात्र पहायला वर्षा दोन वर्षात एकदा आपण पर्यटन करीत होतो. ते सारे सारे आपल्या जवळच आजूबाजूला दिसतेय.
निसर्गाचे खरे मालक पशु, पक्षी आपला आनंद आता दिलखुलासपणे करतांना मंजूळ आवाजातले कलरव, गूंजन कानी पडतेय.
कोणत्याही प्रकारचे ध्वनी, वायू वा अन्य प्रदूषण सध्या थांबले आहे. रस्त्यावरील अपघातांची नोंदही नाही. असा सुंदर,
सुस्वरुप निसर्ग दिमाखाने समतोल राखतांना दिसतोय. फक्त दुःख हेच आहे की देशाच्या अर्थव्यवस्थेबरोबरच ‘जनसामान्य’
भरडला जात आहे.
अर्थव्यवस्थेला सुस्थितीत येण्यासाठी काही कालावधी लागणार आहे. पण त्यासाठीही आपला होतकरु तरुण पुढे
येऊन, स्वयं रोजगार निर्माण करून, उद्योगधंद्यांना लागणारा कच्चा माल, यंत्रणा याचा, बेरोजगार युवाशक्तीचा वापर करून
विनियोग करेल. आपली बाहेरच्या देशातून होणारी आयात थांबून देशातील पैसा देशातच राहील. बेरोजगारीचा प्रश्नही मार्गी
लावेल.
अशा रितीने या ‘कोरोना’ आपत्तीचे आपण सर्वांच्या सहाय्याने इष्ट आपत्ती व योग्य परिवर्तन करून चांगले घडवू या.
शासकीय नियमांचे, सूचनांचे काटेकोर पालन करून, सामाजिक अंतर ठेवून धैर्याने, सामर्थ्याने, सहनशीलतेने, एकजुटीने,
सध्या घरांत राहून कोरोना हा शहरांतून, देशांतून, जगातून पळवून लावू या! लढा देऊ या! घरांतच राहू या!
जय जिनेंद्र!

सौ. निर्मला देविदास जैन.
कर्वेनगर, पुणे.

No comments:

Post a Comment