Sunday, 26 April 2020

मोगरा फुलला - एक अविस्मरणीय अनुभव

झाडांना पण भावना असतात, त्यांच्याशी बोललं की ती प्रसन्न होतात, फुलतात तसेंच दुर्लक्ष केलं तर रुसतात असं ऐकलं होतं, पण विश्वास नव्हता, अगदी जगदीशचंद्र बोस या शास्त्रज्ञांनी सांगून सुद्धा. पण म्हणतात ना अनुभव हीच खात्री असते .

मला स्वतःला मोगरा खूप आवडतो. उन्हाळ्यात मोगऱ्याच्या दरवळ सुटला की मन कसे अगदी प्रसन्न होते. एखादे फुल माठात घालून ठेवून ते थंड पाणी पिताना अगदी स्वर्गसुख मिळते.
 
चार एक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. माझ्या बागेत मोगऱ्याची 3, 4 रोपे होती. सर्वसाधारणपणे थंडी संपत आली की मी मोगऱ्याचे पाणी तोडते. सात आठ दिवस झाले की त्याची पाने पूर्ण सुकून जातात, हात लागला तरी गळून पडतात. असे होऊ लागले की सगळी पाने काढून झाडाची छाटणी करायची व थोडं थोडं पाणी द्यायला सुरुवात करायची. हळू हळू त्याला छान धुमारे फुटायला लागतात. पंधरा एक दिवसात झाड परत हिरवेगार होते, आणि उन्हाळा सुरू झाला की फुलांनी डवरून जाते . रात्रीच्या वेळी ती फुलं तर चांदण्यांसारखी दिसतात. हा माझा वर्षानुवर्षांचा परिपाठ. 

त्या वर्षी नेमकं काहीतरी अडचण आली आणि मोगऱ्याचे पाणी जास्त दिवस तोडले गेले, माझ्या मनात खूपच धाकधूक होती की या झाडांचं आता काय होणार म्हणून, कारण जीव लावलेला असतोच त्यांच्यावर. 
देवाचं नाव घेऊन छाटणी तर केली मी, रोज पाणीही द्यायला सुरुवात केली. पण काहीही सुधारणा होईना. मग म्हटलं आपल्याकडून चूक झाली आहे, सॉरी म्हणून टाकूया झाडांना. तसं म्हटलंही. पण कदाचित त्या दिलगिरीत आत्मीयता  नसावी. एक दिवस अगदी कळकळीने माफी मागितली मी त्यांची. आणि काय आश्चर्य? दुसऱ्याच दिवशी मला एक ठिकाणी थोडासा हिरवा अंकुर दिसला. मी रोज क्षमा मागणे सुरूच ठेवले होते, माझी तीव्र इच्छा, भावना बहुतेक त्यांच्यापर्यंत पोचत होत्या. हळू हळू तीन रोपे हिरव्यागार पानांनी भरून गेली. एक रोप मात्र रुसलेलंच होतं, मी चिवटपणाने रोज त्याच्याशी बोलत होते, त्याला कुरवाळत होते, अखेर माझ्या भावना त्याही रोपापर्यंत पोहोचल्या आणि माझ्या प्रयत्नांना त्याने प्रतिसाद दिला आणि त्याच्या अंगोपांगावर पाने दिसू लागली. 

त्या वर्षी फुलेपण उदंड आली. मी कायमच त्यांच्या ऋणात आहे.

शामा छाजेड

No comments:

Post a Comment