मौनं सर्वार्थ साधनम्।
संस्कृतमध्ये
अनेक असे श्लोक आहेत की ज्यातील श्लोकार्ध हे एक सुभाषित म्हणून आपल्याला ज्ञात
असते. त्यातलेच आपल्या सर्वांच्या परिचयाचे हे सुभाषित ‘मौनं सर्वार्थ साधनम्’.
मौन हे बोलण्याचा सर्व अर्थ साधणारे असा त्याचा अर्थ आहे.
पंचतंत्रातला मूळ श्लोक असा “आत्मनो मुखदोषेण
बध्यन्ते शुकसारिकाः। बकास्तत्र न बध्यन्ते मौनं सर्वार्थ साधनम्॥” या श्लोकांतून
सुभाषितकार सांगतात की आत्मनो मुखदोषेण म्हणजे आपल्या तोंडाच्या दोषामुळे म्हणजेच
सतत बोलण्यामुळे शुक म्हणजे पोपट आणि सारिका म्हणजे मैना यांना बंधनात पडावे
लागते. मात्र बगळा तेथे मुकाट्याने असल्याने त्याला कोणी बंधनात अडकवत नाही.
म्हणून मौन हे सर्व मतलब साधण्याचे उत्तम साधन आहे.
पोपट आणि मैना हे मधुर ध्वनि करीत असल्याने
लोक त्यांना आपल्या मनोरंजनार्थ पिंजऱ्यात अडकवतात. मासे गिळणारा बगळा मात्र आपले
मुकाट्याने मासे गिळण्याचे काम करीत असल्याने तो स्वतंत्र रहातो.
आपल्याला घरातही कधी कधी गप्प बसून राहणारी
माणसे दिसतात. केव्हा केव्हा ती बाकी साऱ्या दुनियेशी बोलत असतात आणि आपल्यासाठी
मात्र त्यांनी मौन धरलेले असते. आपल्याला अत्यंत चीड येते आणि वरील सुभाषित आपण
त्यांना दरवेळी ऐकवतो. मौनं सर्वार्थ साधनम्!
मला कधी कधी वाटते की यांचे मौन खरच त्यांचा
मतलब साधण्यासाठी असते का? त्यांच्याजवळ बोलण्यासारखे आपल्यासाठी विषय नसतात का?
विशेषतः विवाहापूर्वी एकमेकांशी अव्याहत बोलणारी माणसे जेव्हा अशी गप्प होतात
तेव्हा काय कारण असेल?
सातत्याने एकत्र राहिल्यामुळे एकमेकांच्या
आवडी, प्रतिक्रिया ज्ञात होतात आणि मग तेच तेच बोलण्याऐकण्यापेक्षा मौन बरे असे
वाटत असेल असे वाटते. कधी कधी गृहित धरलेल्या गोष्टींविषयी अपेक्षांची पूर्ती होत
नसल्यामुळे मग ते विषय बाद होत असतील.
अशावेळी आपण काय करायचे? होईल याचीही सवय
म्हणून दुर्लक्ष करायचे? आरडाओरडा करायचा? की आपणही गप्प बसून कुढत रहायचे? आपल्या
विचारांची दिशा, क्रियाप्रतिक्रिया बदलायच्या? प्रश्नच प्रश्न नाही का?
थोडा विचार करु या. सगळ्यात महत्त्वाचे की,
आहे ही परिस्थिती मान्य करायची. आवडीनिवडी भिन्न टोकाच्या असल्या की हे जास्त
प्रमाणात घडते. आपल्याला सगळ्या गोष्टी कळल्या पाहिजेत हा अट्टाहास थोडा बाजूला
ठेवायचा. जे आपल्या दृष्टीने महत्त्वाचे आहे त्यासंबंधी समोरच्याला मोजकेच प्रश्न
विचारायची सवय आपल्याला लावायची. मिळालेला वेळ आपल्या हितासाठी आहे हे समजून आपले
हित कशात आहे ते शोधायचे, ठरवायचे. आणि त्यानुसार आपला दिनक्रम आखायचा.
काही दिवस दोन समांतर रुळ असल्यासारखी
संसाराची गाडी चालतेय असे वाटते. सध्या तर घरात दोनच दोन फारतर तीन माणसे असल्याने
ही स्तब्धता बोचरी होते कधीकधी. अशावेळी समान आवडींवरचा संवाद चालू करता येतो.
त्याचवेळी आपण नविन काय करतोय त्याचा ओझरता उल्लेख करायचा. भडाभडा सगळेच बोलून
नाही दाखवायचे. समोरच्याला उत्सुकता वाटेल एवढीच माहिती द्यायची. सगळ्यात
महत्त्वाचे दुसऱ्याला बदलवण्यात आपली उर्जा आणि वेळ वाया घालवायचा नाही. कारण तो प्रयत्न
नेहमी निरुपयोगी असतो.
आपण स्वतः आनंदी रहाणे हे सगळ्यात महत्त्वाचे
असते. जगात दुःख असणारच. आपल्यालाही आणि इतरांनाही. त्यामुळे त्याबाबतीत संवेदनशील
असावे पण रडके असू नये. संगीत, नामस्मरण आणि एकादा बाहेरचा फेरफटका यापैकी
त्यावेळी जे शक्य असेल त्याचावर अंमल करावा. निसर्गातील ह्या तीन गोष्टी आपल्याला
कुठल्याही विपरित स्थितीतून बाहेर काढायला समर्थ असतात. मी तरी यावरच सर्व काही
निभावून नेले आहे आणि आजही याचाच परिपाठ चालू आहे. तुम्हीही प्रयत्न करुन पहा. वेगळे
काही प्रयोग असतील तर कळवा.
Padma Dabke
Apratim Padma
ReplyDelete