Thursday, 30 April 2020

नाच रे मोरा..



नाच रे मोरा..


- सुजाता महाजन


सकाळी सकाळी ‘विपाशा’ची कडकड सुरू झाली. ‘‘आई, बघ हं, पुन्हा सुरू झालं या मठचं. मठ कसला मठ्ठय्‌ तो. मी आता त्याच्या घरी जाऊन ‘भ’ पासूनच सुरू करते.’’

‘पद्मा’पण वैतागलीच होती. त्यांच्या पलीकडच्या बिल्डिंगमध्ये राहणारा ‘मठ’. रोज प्रचंड आवाजात गाणी लावायचा. आधी तर इथल्या विचित्र आर्किटेक्चरमुळे बरेच दिवस हा एवढा आवाज कुठून येतो हे शोधायला बराच वेळ लागला. दर वर्षी परीक्षेच्या दिवसात एका तरी घरी जाऊन दार ठोठवावं लागायचं. त्यासाठी आधी घर शोधण्याचा कार्यक्रम. मग अनोळखी घराचं दार ठोठावणं. अनपेक्षित चेहरा समोर आला, की बहुधा हिंदीत बोलावं लागायचं. ‘तुम्ही तुमच्यापुरतं काय ऐकायचं ते ऐका’. हे सारखं कुणाला तरी सांगावं लागायचं. मागच्या वर्षी एक जण होता, त्याने पहिल्यांदा सांगितलं तेव्हा मुद्दाम आवाज आणखी मोठा केला होता. विपाशा त्यानंतर पुन्हा पाच वेळा गेली त्याच्याकडे. मग कंटाळून त्याने आवाज कमी केला. यावर्षी हा मठ. मठ माहितीचा होता. कारण सोसायटीचा चेअरमनच होता, विपाशा रोज खिडकीतून ओरडून सांगायची, ‘‘मठकाका, आवाज बारीक करा.’’ पण तिथल्या गदारोळात त्याला काय आवाज ऐकू येणार.

गेले चार दिवस त्याने नवीन धोरण धरलं होतं, ते म्हंजे ‘नाच रे मोरा’ हे गाणं एकापाठोपाठ किमान बावीस वेळा लावायचं. आज चौथ्या दिवशी ऐंशीव्यांदा ते गाणं ऐकून झाल्यावर विपाशाचा संयम सुटला. ‘‘आई, आता मला हे सहन होत नाही. आधी तर इकॉनॉमिक्सवर कॉन्सन्ट्रेट करणं अवघड त्यात या मोरापासनं सुटका होईना. चल, आपण त्याला जाऊन सांगू या.’’ पद्माला भांडणांचा कंटाळा. ती म्हणाली, ‘‘जाऊ दे ग, अजून फक्त आठ वेळा ऐकायचंय. आठ त्रिक चोवीस मि. काढ कशीतरी. तोवर आंघोळीला जा बरं. मग संध्याकाळी जाऊ वाटलं तर त्याच्याकडे.’’

विपाशाला अशावेळी आईचा राग येतो. नेहमी भांडणांना घाबरून पडतं घ्यायचं ! कशासाठी? त्यांच्यावरती केंकरे राहतात. श्रीमंत आहेत. त्यांच्या फ्लॅटएवढं केंकरेंचं टेरेस आहे. त्या टेरेसमध्ये भरपूर कुंड्या ठेवून त्यांनी सुंदर वातावरण निर्माण केलंय. सुविधेसाठी टेरेसमध्ये त्यांनी एक बेसीन बसवलं. भांडीवाल्या बाईला भांडी घासण्यासाठी छोटीशी मोरी केली. त्यानंतर त्याच्याखाली असलेल्या विपाशाच्या बाथरूममध्ये भिंतीला ओल येऊन फोडांनी भरल्यासारखी भिंत दिसायला लागली. एका वॉटरप्रूफिंगवाल्याला आणलं. वरच्या टेरेसवरून झुल्याने उतरून क्रॅक्स भरावे लागतील असं म्हटल्यावर केंकरेबाईंची कचकच सुरू झाली ‘‘म्हंजे, माझ्या कुंड्या हलवाव्या लागतील.’’

पद्माने सांगून पाहिलं, ‘‘अहो, एकच दिवस आम्ही हलवू, पुन्हा नीट ठेवू.’’

‘‘नाही, नाही, फुटल्या म्हंजे’’

विपाशा हे पाहिल्यावर खूप चिडली. ‘‘अगं आई, त्यांच्या कुंड्या एक दिवस खाली ठेवल्याने कुणी मरत नाही. इथे या बाथरूममध्ये इन्फेक्शन होऊन आपण मरू. त्यांचं चुकीचंच आहे. वर टेरेस त्यांनी केलंय. आपली काय चूक. त्यांच्या मोरीमुळे इथं ओल आलीय. आपल्याजागी दुसरं कुणी असतं तर वाजवून पैसे घेतले असते. खर्च आपण करतोय. कोऑपरेट तरी करा कमीतकमी. तू काय मुळमुळीत समजावत बसते त्यांना.’’

दुपारी पद्मा आणि विपाशाला जेवायला बोलावलं होतं शेजारच्या ‘मंदाकिनी’कडे. मंदाकिनीच्या मुलाची मुंज होती. मुंजीला अजून अवकाश होता. पुन्हा मुंज त्यांच्या गावी होती. इथल्या कुणाला तिथं येणं शक्य नाही म्हणून तिने ‘ग्रहमक’ ठेवलं होतं आणि जवळच्या काही लोकांना जेवायला बोलावलं होतं. पद्मा तिच्या जवळच्यांपैकी होती.

पद्माची आणि तिची जेव्हा ओळख झाली तेव्हा पद्माचा भोळा चेहरा तिच्या लक्षात आला. तिने पद्माला सांगायला सुरुवात केली. ‘‘मी न खोटे दागिने तयार करते. फार छान दिसतात आणि अगदी स्वस्त. हल्ली सोन्याचे दागिने म्हंजे टेन्शनच असतं ना...’’

पद्माला कुणी स्त्री स्वतः मिळवण्यासाठी धडपड करतेय म्हटल्यावर फार आदर वाटायचा आणि ती काही करून त्या स्त्रीला मदत करायला धडपडायची. ती दागिने अजिबात घालत नव्हती. तरी तिने मंदाकिनीकडनं ते घेतले, नुस्ते घेतले नाही तर घातले सुद्धा. मंदाची, तिच्या दागिन्यांची, तिच्या कष्टांची माऊथ पब्लिसिटीपण केली.

पुढचं एक वर्ष मग –

‘‘पद्मा, अग मी नवीन कानातले केलेत खूप छान दिसतायत. बघ ना एकदा येऊन.’’..

‘‘पद्मा, अग मी ते हे केलंय, पोळ्या ओल्या होऊ नये त्यांच्याखाली डब्यात ठेवायचं कुशन.’’

‘‘पद्मा, आता मी शिवणकाम शिकतेय. तुला काही टाकायचं असलं तर टाक माझ्याकडे.’’

‘‘पद्मा, मी आता झेरॉक्स मशीन आणलंय. तुझं काही काम असलं तर टाक.’’

‘‘माझा नवरा मोबाईलवरचं व्हिडिओ शूटिंग सीडीवर करून देतो. तुला हवं असलं तर बघ करून.’’

हे सगळं सगळं पद्माने केलं. मंदाकिनीने केलेले दागिने एका वापरात तुटले, झेरॉक्स करताना तिने काही पानं हरवली, तिने केलेल्या बॅगेचा पट्टा तुटला, तिने शिवलेल्या कपड्यांचे शेप फारच वाईट होते म्हणून टाकून द्यावे लागले... अशा सगळ्या गोष्टी होत राहिल्या. एवढंच काय, तिच्या नव-याने तयार केलेली सीडी घरी आणून लावल्यावर काहीही त्यावर आलेलं नाही कळलं.

विपाशा चिडचिडून जायची ‘‘आई, अग तू तिला का मदत करायला धडपडतेस. चांगली भांड तिच्याशी एकदा. सगळे पैसे वाया गेलेत.’’

पण पद्मा सोसत राहिली, काही बोलली नाही.

आज त्यांना जेवायला बोलावलं होतं. मुंजीची पत्रिका घरी आली त्यावर निगेटिव्ह भाषेत लिहिलं होतं, ‘‘कुठल्याही प्रकारचा आहेर स्वीकारला जाणार नाही.’’

तरी पद्माने पाकीट बरोबर घेतलं होतं. ती जेवायला गेली तेव्हा शेवटची पंगत चालू होती. मंदाच्या घरातले सगळे, तिच्यासह बसले होते. पद्माला पाहून ती जागची हलली पण नाही. तिने तिला आतल्या खोलीत बसायला सांगितलं. जेवणाची पंगत ओलांडून पद्मा आणि विपाशा आतल्या खोलीत गेल्या. इथून सगळ्यांच्या जेवणा-या पाठी दिसत होत्या.

त्या खोलीत एक १ वर्षाची मुलगी आणि एक विपाशाएवढी मोठी मुलगी होती. मोठी मुलगी त्या बाळाला सांभाळत होती. म्हंजे काय करत होती तर रंगीत मणी खाली घरंगळून एका डबीत पडतात असं एक खेळणं होतं. ते मणी पाडून ती डबीतनं गोळा करायची पुन्हा वरून सोडायची. छोटी मुलगी त्या पुनरावृत्तीला फार कंटाळली होती. तिने आवाज काढला की मोठी मुलगी ‘‘हे बघ काय’’ म्हणायची. छोट्या मुलीबरोबर पद्मा आणि विपाशाही उत्सुकतेने पहायच्या की आता ही काय नवीन दाखवणार. तर ती तेच मणी पुन्हा नव्याने घरंगळवायला सुरुवात करायची.

विपाशा संतापून त्या मुलीकडे पाहत होती. तशी ती मंदावर चिडलेलीच होती. शेवटी, तिचा चेहरा पाहून पद्मा बाहेर आली आणि मंदाला म्हणाली, ‘‘मंदा, मी परत येते अग, हिचे बाबा यायचेत घरी. किल्ली माझ्याजवळ आहे.’’

‘‘अग थांब ना, आत्ता संपेल ही पंगत.’’

‘‘नको, मी परत येते.’’

‘‘बरं, मग नक्की येणार का?’’

‘‘नक्की येते.’’

‘‘नाही तं म्हटलं थांब थोडं’’

पद्माला आता तिथून कधी जाऊ असं व्हायला लागलं. सगळी माणसं जेवून झाल्यावर दोघींनीच त्या हॉलमध्ये जेवायला बसायचं, काय उपयोग?

पद्मा आणि विपाशा खाली आल्या तेव्हा तिच्या नव-याची गाडी येतच होती. विपाशा म्हणाली, ‘‘आता पुन्हा जाऊ नको बरं का?’’

‘‘अग, ती जाताना काय म्हणाली तू ऐकलं नाहीस, असं चांगलं नसतं न जेवता जाणं. उगीच तिला वाटायचं आपण अपशकुन केला. ती म्हणेल तसं सारखं.’’

‘‘तुला असं वाटतंय का की, तू पुन्हा यायलाच पाहिजे असं तिला तीव्रतेने वाटतंय?’’

‘‘नाही. तरीपण...’’

‘‘मग जा तू. मी नाही येणार. माणसं तुझं किती शोषण करतात तुला कळत पण नाही. एक वाक्य फेकलं की झकत तू येणार. नाही आलीस तरी तिचाच चष्मा वर. काय हे!’’

संध्याकाळी ‘त्या’ एका वाक्याच्या भीतीनं पद्मा गेली. मंदाने तिला स्वयंपाकघरात बसवलं. पुरणाची पोळी गरम केली आणि नुसती पोळी एका ताटात वाढून दिली. एकीकडे बडबड, ‘‘त्या इथेच एक बाई आहेत, त्यांच्याकडनं सगळा स्वैपाक मी करून घेतला म्हंजे ऑर्डरच दिली. पण टेन्शन होतंच पुरतं की नाही. पण सगळं पुरलं व्यवस्थित. म्हंजे मी पोळ्या जास्त करून घेतल्या होत्या ऐनवेळेस एखादं माणूस वाढतं न ग. अग, तुला पोळीबरोबर काहीच नाही. अंऽ काय देऊ बरं. ही भाजी घेतेस का?’’

एका खाऊच्या वाटीत थोडीशी बटाट्याची भाजी होती. पद्माची एक पोळी खाऊन संपल्यावर ‘‘बघ, ना थोडासा नमुना,’’ म्हणत तिने त्या बटाट्याच्या भाजीतली अर्धी तिला वाढली.

पद्माने पोळी संपवलीच होती. भाजी खाऊन टाकली. मंदाचा नवराही घरात होता. सकाळी मण्यांना कंटाळलेली मुलगीपण होती. पद्माला पाहिल्यावर तिने ओळखीचे हात उंचावले. तेवढंच एक स्वाभाविक, माणसासारखं घडलं.

पोळी खाताना पद्माने चौकशी केली, ‘‘अग तुम्ही जर्मनीला गेला होता ना तिथे तुम्ही काय काय पाहिलं? माझा नवरा जाणारे, तर त्याला सांगीन.’’

मंदाला उत्साहाचं भरतं आलं. तिने सगळं सांगितलं. नव-याला बोलावून सांगायला लावलं. तिच्या मनातला अपराधभाव जाण्यासाठी पद्माने ते केलं होतं आणि तो गेला. दोघेही एकदम रिलॅक्स झाले.

पद्माने बरोबर आणलेलं पाकीट तिच्या मुलाच्या हातात दिलं. मंदा खोटं खोटं रागावून म्हणाली, ‘‘काय हे, आहेर काही द्यायचा नाही सांगितलं होतं ना,’’

पद्मा हसून म्हणाली, ‘‘अग, हे बाळाला, तुला थोडीच’’

घरी आल्यावर विपाशा चिडवायला लागली ‘‘आई शंभर रु. ची एक पुरणपोळी खाऊन आली.’’

थोड्या वेळाने ‘नाच रे मोरा’ सुरू झालं.

पद्माच्या मनात मंदाकिनीची वागणूक सलत होती. ती एकदम चिडून म्हणाली, ‘‘चल जाऊ मठाकडे.’’

दोघी पलीकडच्या बिल्डिंगपाशी आल्या. लिफ्ट चालू होईना म्हणून जिन्याकडे वळल्या. वळता वळता विपाशाचं लक्ष कशाकडे तरी गेलं. ती पुन्हा लिफ्टपाशी आली, लिफ्टच्या शेजारी त्या विंगमधल्या रहिवाशांसाठी सूचना लिहिलेल्या होत्या.

घरातून निघताना नळ बंद आहे की नाही ते तपासणे.

लिफ्टचे दार उघडे ठेऊ नये.

लिफ्टमध्ये घाण करू नये.

आपल्या घरातील रेडिओ, टेप, टी.व्ही.च्या आवाजाचा दुस-याला त्रास होऊ देऊ नये.

या सर्व सूचना पेंट केलेल्या होत्या. विपाशा थक्क होऊन त्यांच्याकडे पाहत राहिली.

दोघी वर गेल्या. दार वाजवलं. मठिणीने दार उघडलं. ‘या’ म्हणाली.

‘‘आम्ही अहो, आवाज कमी करा सांगायला आलोय. विपाशाची परीक्षा आहे ना.’’ आवाजातला अपराधभाव पद्माला झाकता येत नव्हता.

बाई म्हणाली ‘‘हेच फार मोठ्यांनी लावतात. तुम्हीच सांगा.’’

मठ संडासाच्या दारापाशी आतल्या चड्डीवर उभा होता. बायकोने त्याला टॉवेल नेऊन दिल्यावर तो बाहेर आला. चेह-यावर चंदन किंवा कसलासा पूर्ण लेप होता.

पद्माकडे पाहून म्हणाला, ‘‘काय?’’

‘‘नाही, ते आवाज कमी करा सांगायला आलोय. विपाशाची परीक्षा आहे ना.’’

‘‘कधीय परीक्षा?’’

‘‘चालूच आहे.’’ थोडं थांबून विचारपूर्वक पद्मा बोलली, ‘‘परीक्षा असो, नसो. आवाजाचा नेहमीच त्रास होतो. तुम्हाला मोठ्याने लावायचं तर या साईडच्या खिडक्या बंद करत जा. घरात काही सुचत नाही अक्षरक्षः आणि ते नाचे रे मोरा तुम्ही पाठोपाठ का लावता?’’

मठीण पुन्हा म्हणाली, ‘‘हेच, हेच लावतात.’’

विपाशाला तिने बाहेर थांबवलं होतं पण ती ऐकत होती. बाहेर आल्यावर खुश होऊन ती म्हणाली, ‘‘आई, आज तू माणसासारखं वागलीस. तुझ्या संतासारख्या वागण्याचा फार त्रास होतो बघ.’’

पद्माला याचं समाधान वाटत नाही. माणसाला शहाणपण का येत नाही? हा तिचा कळीचा प्रश्न. अपेक्षा, हट्ट, दुखावणं, भांडण, चिडचिड, कटकट हे सगळ घडतं ते का?

पद्मा थकून विपाशाला म्हणाली, ‘‘कुणाकुणाशी कशाकशासाठी भांडशील तू? रिक्षावाले स्टॅन्डपाशी उभे असले, बरोबर म्हातारं, थकलेलं माणूस असलं तरी त्यांना ज्या दिशेला यायचं नाही तिकडे येत नाहीत; त्यांच्याशी भांडायचं; सिग्नल मोडून आपल्याला रिस्क निर्माण करणा-यांशी भांडायचं; एक्सापयरी डेट झालेल्या वस्तू विकण्याबद्दल दुकानदाराशी भांडायचं, लहान मुलामुलात भांडण झाली तरी, आपल्या मुलाला ‘‘तू त्याच्या डोक्यात एक दगड का घातला नाहीस पुढचं मी पाहून घेतलं असतं’’, असं म्हणणा-यांशी भांडायचं. मला भांडण नकोयत ग. आपलं आपण शहाणं का होत नाहीये माणूस हा प्रश्न आहे.’’

तिला थोड्या वेळापूर्वीचा एक साधासा प्रसंग आठवला. रोज संध्याकाळी ती कॉलनीत थोडंसं चालते वीस मि. तरी. आज तिच्याबरोबर नवरापण होता. तोही कुणावर तरी चिडलेल्या मनःस्थितीतच होता. रस्त्यात पटकन्‌ दिसणार नाही अशा जागी एक कुत्रं बसलं होतं. पद्माला रोजच ते तिथं बसतं हे माहीत होतं. बाजूने चालणं तिला जमून गेलं होतं. नव-याचा त्याच्यावर पाय पडता पडता राहिला, त्याने एक शिवी हासडून कुत्र्याला तिथून हाकललं. दोघं पुढे गेले. येताना दुरूनच दिसलं कुत्रं पुन्हा त्या जागी येऊन बसलंय. ‘‘च्यायला’’ म्हणत नव-याने पुन्हा त्याला हाकललं. दोघं त्या एन्डपर्यंत चालत गेले. वळले. कुत्रं पुन्हा तिथं. नवरा आणखी चिडला. जास्त रागाने हाकललं. वळताना पाहिलं कुत्रं पुन्हा जागेवर.

नवरा चिडचिडून म्हणाला, ‘‘किती बेअक्कल आहे ग हे. आपण किती वेळा हाकललं तरी पुन्हा त्याच जागेवर येऊन बसतंय. अनुभवजन्य ज्ञान काही नाही.’’

आणि माणसाला? अनुभवजन्य ज्ञानाचा अॅक्सेस आहे; तरी तो त्याचं काय करतो? त्या ज्ञानाची व्यवस्था कशी लावतो? बावीस वेळा ‘नाच रे मोरा’ ऐकताना त्याच्या आत काहीच उरत नाही. सगळ्या बारीक सारीक अनुभवांच्या तुकड्यातनं स्फुरणारं शहाणपण उमलण्याची प्रक्रिया सुरूच होत नाहीये किंवा सगळे विसरून गेलेत ती. मग उरतं काय? नुसते ध्वनी. नाच रे मोरा, नाच रे मोरा.


No comments:

Post a Comment