पहाटेपासून ऐकू येतो, आर्त आर्जवी कोकीळस्वर,
जरा उजाडता, चिमुकल्या पर्पल रंप्ड सनबर्डचा नाजूक चिवचिवाट हमखास येतोच कानावर,
केबलच्या तारेवर किंवा एखाद्या डिश अँटेनावर बसून काळा-पांढरा मॅगपाय रॉबिन आळवतो मधुर धुन,
लाल बुडाचा आणि काळ्या तोंड-तुऱ्याचा करडा बुलबुल जणू म्हणतो, माझ्याही गोड गळ्याचे गा ना जरा गुण!
आपल्या तारस्वराने, निळ्या तपकिरी रंगकांतीने आणि लांबलचक चोचीने, किंगफिशर (खंड्या) लक्ष घेतो वेधून,
अन साधारण माकडासारखा हुप हुप आवाज घुमवणारा भारद्वाज, दर्शनही देतो अधून मधून,
चुक चुक आवाज करत, मधेच एखादी शीळमय लकेर गात, शेपटीचा पंखा फुलवत, नाचत राहतात नाचण,
इवलेसे असले तरी डोमकावळयासारख्या मोठाड, हिंस्त्र पक्षाला बिनधास्त देतात टशन!
कावळे आणि कबुतरांना तर मुंबई दिलेलीच आहे आंदण!
चिमण्यांची संख्या हळूहळू वाढत्येय, हे त्यातल्या त्यात बरं लक्षण!
काळ्या डोक्याचा हळद्या पक्षी दिसतो कधीतरी, अवचित,
पोवळ्याच्या
रंगाची केशरट लाल चोच आणि रूज लावल्यागत गाल असलेला रेड चिक्ड फिंच भले
दोनदाच पण अगदी जवळून बघता आणि टिपता आला, हे माझं पूर्वसंचित!
असाच धुमकेतूसारखा एकदाच उगवला, ससाणा प्रजातीतील शिकरा,
त्याची तीक्ष्ण, बाकदार चोच आणि भेदक मोठे डोळे पुरेसे होते वाटण्यासाठी दरारा!
ज्या त्या केबलच्या तारेवर स्वतःचीच मक्तेदारी असल्यागत काळे कोतवाल (drongo) तिथेच जातीनं बसून देतात पहारा!
पोपट आणि उठावदार डोळ्यांच्या साळुंक्यांचा अधून मधून सुरूच असतो काहीसा कर्कश्श गोंगाट,
अन प्रजननासाठी चिंचेच्या झाडावर घरोबा करून बसलेल्या बगळ्यांचा, पिल्ले बाहेर येताच दुणावतो कलकलाट!
कर्कश्श आवाजात ओरडत, अथकपणे घारी घेतात घिरट्या गोल गोल,
क्वचित कुठे एखादी जरा विसावलीच, तर टपलेले कावळे तिला हुसकण्यासाठी लगेच करतात हल्लाबोल!
डोमकावळ्यांपुढे मात्र ते शरणागती पत्करत, सुरक्षित अंतरावर बसून, अंग फुलवत जाहीर करतात जळफळाट,
त्यांनी कष्टाने साठवलेल्या घबाडावर आयतोबा डोमकावळे डल्ला मारताना पाहून त्यांचा होतो चडफडाट!
असे हे माझे 'सर्वपक्षीय' विवेचन आवडले वा नावडले तरी अभिप्राय नक्की द्या, पण बघायला लावू नका फार वाट!
आकांक्षा फडके
No comments:
Post a Comment