Sunday, 26 April 2020

स्वर्गरोहिणी

अग, सप्टेंबरमध्ये ‘सतीपंथ स्वर्गरोहिणी’ चा ट्रेक ठरतोय. येणार आहेस नाॽ मैत्रिणीला उत्साहाच्या भरात होकार दिला खरा, मग मात्र जमेल ना आपल्यालाॽ १५,००० फूटांवर जायचंय, झेपेल नाॽ इथपासून या पंधरा दिवसात स्वयंपाकपाणी, घराच कायॽ अशा अनेक शंकांनी भंडावून सोडलं. “ आवा निघाली पंढरपूरा। वेशीपासून आली घरा॥” असं आपलं होतंय की काय असंही वाटू लागलं. पण लेकीने, “तुला मनापासून जावसं वाटतंय नाॽ आम्ही करु मॅनेज. जा तू बिनधास्त” म्हणत आश्वस्त केलं. मग फिटनेस गुरुपासून सुरु झाली तयारी.

युद्ध जिंकूनही हरलेल्या, सर्वस्व गमावलेल्या पांडवांचा द्रौपदीसह देहत्याग करण्यासाठीचा प्रवास ज्या वाटेवरून झाला ती वाट म्हणजे सतीपंथ. या वाटचालीत एकेक करत द्रौपदीसह चार पांडवांचा मृत्यू होतो. श्वानासह असलेला धर्मराज ज्या सात पायऱ्या चढून स्वर्गात प्रवेश करतो ती स्वर्गरोहिणी.

या वाटेवरून जातानाच इरावतीबाईंच्या ‘युगान्त’मधील द्रौपदी भीमाला, “पुढच्या जन्मी थोरला हो.” असं म्हणाली होती ती वाट एकदा तरी अनुभवावी या इच्छेला मूर्तरूप लाभल.

वसुधारा उजव्या हाताला ठेवून डाव्या बाजूने सुरु झाली आमची ही वारी. आनंदवनाच्या पायवाटेने जाताना पाठीमागचा नीलकंठ, त्यावरून ओसंडणाऱ्या सहस्त्रधारा, समोरचा रांगडा कुबेर पर्वत, अलकनंदेचा खळाळता नाद, वाऱ्यावर डोलणारी रानझुडपं, आसमंत भारून टाकणाला फलांचा गंध पावलं जड करत होता. भुलवणाऱ्या या निसर्गामुळेच, ‘चला विसावू या वळणावर’ म्हणत द्रौपदीला इथेच चिरनिद्रा घ्यावीशी वाटली असणार हे नक्की.

मोठमोठे बोल्डर्स, दगडांच्या बारीक तुकड्यांखाली दडलेली ग्लेशिअर्स, अधूनमधून भूस्खलनाचा होणारा गडगडाट, उंचच उंच चढाई अन घाबरवणारे तीव्र उतार....... पावलापावलांवर अनभिषिक्त्त सम्राट आहे मी इथला याची जाणीव करून देणाऱ्या निसर्गाच्या रौद्ररूपाचा विसर पाडणारे सतीपंथ सरोवराचे विलक्षण लोभस रूप. इथपर्यंत पोचला तो फक्त धर्मराजा.

आजही ५०-५२ कि. मी. चा हा प्रवास करताना वस्तीसाठी वाटेत एकही निसर्गनिर्मित आडोसा सापडत नाही की
पशुपक्ष्यांचे दर्शनही घडत नाही. आनंदवनाचा अपवाद वगळता तुरळक झाडीही अपवादानेच दिसते. पांडव ज्या काळात या वाटेवरून गेले, तेव्हा तर ही वाट खडतर, परीक्षा बघणारी नक्कीच असणार. कशी केली असेली ती त्यांनीॽ पाचांना बांधून ठेवणाऱ्या पांचालीच्या मृत्यूनंतर पांडवांनी कशाच्या बळावर मार्गक्रमण केले असेलॽ स्वर्गरोहिणीची एकेक पायरी चढतांना, सुटलेली भावंडांची, द्रौपदीची साथ आठवून धर्मराजाची पावलं अडखळली नसतील काॽ त्यांच्याशिवाय स्वर्ग सुखदायी नक्कीच नसेल असे वाटून देह त्यागावासा वाटला असेल का त्यालाॽ ‘नरो वा कुंजरो वा’ म्हणून आपणही अपराध केलाच की, मग ही स्वर्गप्राप्ती एकट्यालाच काॽ हा प्रश्न पडला असेल काॽ की आपल्याला इथपर्यंत सुखरूप आणणाऱ्या श्वानरूपातले आपले पिताश्री, यमराजा यांची साथ आहे हे कळल्यावर काय प्रतिक्रिया झाली असेल धर्मराजाचीॽ असे अनेक प्रश्न सतत अस्वस्थ करत होते या वाटचालीत.

त्याचबरोबर छाती दडपून टाकणाऱ्या दऱ्या, बर्फाच्छादित शिखरं, पर्वतरांगांमधील तीव्र चढ-उतार, नदी ओलांडण्यातला थरार, ब्रह्मा-विष्णु-महेश या त्रयींचा वास असलेलं, आकाशाच्या निळाईशी स्पर्धा करणारं सतोपंथ सरोवर, दुरून खुणावणारा बर्फाच्छादित स्वर्गसोपान या सगळ्याचं गारुड प्रवासभर मनावर पसरलेलं. हे सगळं एकट्यादुकट्याने अनुभवण्याचं नाहीच.... अंतर्मुख करणारा.....स्वतःची आनंदओवरी दाखविणारा हा प्रवास जिवलगांच्या साथीसोबतीनेच करण्याचा आहे. कधी कधी संपू नये असं वाटत असतानाच, ‘पुनरागमनायच’चा हाकारा उठवणारा..... मर्मबंधातल्या ठेवीसारखा.

माधुरी गोखले.

No comments:

Post a Comment