लेक्चरला दांडी मारुन,काॅलेजसमोरच्या कट्यावर गप्पा ठोकणं, विविध विषयांवर तज्ज्ञ असल्याच्या
थाटात चर्चा करणं...मॅटिनीचे सिनेमे बघणं...काॅलेजजवळच्या Five Gardens मध्ये जाऊन पक्षी बघणं..दर
रविवारी सकाळी सकाळी संजय गांधी उद्यानात जाऊन पक्षीनिरीक्षण होतंच बरं................. कधी लेक्चरला
बसून फुली-गोळा खेळणं नाही तर चिठ्ठ्या पाठवणं...त्या त्या वयातली निखळ खेळकर मस्ती मजा काॅलेजच्या शिक्षणाबरोबरच संपून गेली.मैत्री राहिली पण त्या वयात जडलेले छंद नोकरीच्या धबडग्यात जोपासायला जमले नाहीतच... जनाब जीने की असली उम्र तो शुरु होती है पचास के बाद असं सांगणारे अनेक फंडे सोशल मिडियावर येतच असतात.त्यांनाच अनुसरुन छंदांना उजळणी द्यायचं घेतलं मनावर. भटकंतीला केली सुरुवात.मग काय.. समविचारी छंदाकिनी जमायला वेळ नाही लागला.अगं किती फिरशील ?..जरा बस की घरात निवांत.. पूर्वी नोकरी म्हणून दिवसभर घराबाहेर अन् आता काय.. कधी ट्रेक म्हणून तर कघी पक्षीनिरीक्षण म्हणून..कधी संमेलन तर कधी झुंबा क्लास...नाटक -सिनेमा -या ना त्या निमित्ताने पार्ट्या आहेतच की... शोभता का हे या वाढत्या वयाला ..असं आडून आडून कानी पडू लागलं.आयुष्यात येणारं प्रत्येक नवं वर्ष म्हणजे नुसती वयाची वाढ नसते.ती असते अनुभवात, उत्साहात, समजुतदारपणात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आयुष्याच्या मोहकतेत..म्हणूनच हे बोल काना-मनाआड करुनच आखला बेत पक्षीनिरीक्षण कम नवीन प्रदेश बघण्याचा.
नोव्हेंबर ते फेब्रुवारी हा पाहुण्या पक्ष्यांच्या आगमनाचा काळ.हजारो मैलांचं अंतर पंखांच्या..खरं तर जीवनेच्छेच्या बळावर ते येतात आपल्या इथे. त्यांना न्याहाळणं हे अपार आनंदाचं..तोच मुठीत घेण्यासाठी पोचले राजस्थानमधल्या बिकानेर -तालछापरला. गीघ संरक्षण केंद्रातली दिवसभराची भटकंती.. निसर्ग साखळीत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या गिधाडांना जवळून बघण्याची.इथे फिरताना झाडाच्या ढोलीत बसलेली घुबडं दिसली...वीस-पंचवीस पावलांवर.फोटो काढण्यासाठी कॅमेरा सरसावला की फिरवलीच त्यांनी मान..अरे !काढू द्या ना रे एखादा तरी फोटो...या विनवणीला ठाम नकार..मग काय घेतलं डोळा भरून पाहून...
पायवाटेनं पुढे चालत असताना तांबूस पंखांचं इगल आऊल आमच्या चाहुलीनं भर्रकन उडालंच डोक्यावरुन..दचकायलाच झालं... अरेच्चा ! पायाखालच्या पाचोळ्याचाही आवाज होणार नाही असं पाऊल टाकायचं अन् कुलूप लावायचं तोंडाला हा पक्षीनिरीक्षणातला पहिला धडा कसा विसरले बरे !! हळहळ वाटली..पण इगल आऊल नाहीच मिळालं परत बघायला..
तालछापर... संध्याकाळची वेळ.. निर्मनुष्य ,नि:शब्द जंगल.समोरचा शांत जलाशय.पलीकडच्या काठावर पिसारा फुलवलेले देखणे मोर..मागे बाभळीच्या झाडांची रांग...पानं खात खात चाललेला उंट...
बाजूच्या फांदीवर शुभशकुनी भारद्वाज..पाण्यात सर्रकन जाणाऱ्या मूर हेन,काॅमन पोचार्ड ,नाॅरदर्न शाॅवलर...डेमोझिल क्रेन्सचा गोतावळा...एका पायावर उभा असलेला ध्यानस्थ एकटा स्पून बिल...
उतरणीला लागलेली उन्हं.. इतक्यात दुरुन पाच-सहा नीलगाई आल्या.त्यांच्या आवाजानं छोटे छोटे पक्षी उडून गेले.पायऱ्यांवर बसून शांतपणे हे निसर्ग चित्र न्याहाळणाऱ्या आम्ही एकमेकींशी न बोलताही खूप काही सांगत..ऐकत होतो.हळूहळू मोरांच्या हालचालींनी क्रेन्स ही उडून गेले आणि सगळ्या जलाशयाची हालचाल शांत झाली...पण आमच्यासाठी एक अविस्मरणीय संध्याकाळ मागे ठेवून गेली.
काल सकाळी पाहिलेली गिधाडं.. अन् आताचा हा रंगीबेरंगी माहोल.एकाच्या दर्शनाने मृत्यूची चाहूल..तिची अटळता.तर जीवनाची उत्फुल्लता दाखवणारे हे पाणपक्षी.. परस्पर विरोधी ,पण दोन्ही वास्तवच.
काही वेळा आपण खरंच खूप भाग्यवान असतो.असे काही लम्हे ;आपल्या ओंजळीत येतात आणि आयुष्यातल्या काही सोनेरी क्षणांना आपल्या स्वाधीन करून टाकतात.काही काळ का होईना, आपल्याला सर्वार्थाने श्रीमंत करतात.
माधुरी गोखले.
No comments:
Post a Comment